18 February 2019

News Flash

रॅम्पवरची तिसरी वाट..

‘लॅक्मे फॅशन वीक’च्या इतिहासातही हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिच्याही आयुष्यात ही पहिलीच इतकी मोठी संधी होती.

नेपाळचा नबिन ते मुंबईची अंजली

मॉडेलिंग हे क्षेत्र आता अनेकांच्या माहितीचं झालेलं आहे. ‘फॅशन टीव्ही’च्या प्रेक्षक संख्येतही भर पडली असली तरी अजूनही आपल्या मुलाने किंवा मुलाने हे क्षेत्र निवडावं यासाठी कोणी पालक स्वखुशीने परवानगी किंवा प्रोत्साहन देत नाहीत. बहुतांशी वेळा मॉडेल्सना आधी घरातून आणि मग समाजातून विरोध सहन करावा लागतो. त्यांना या सगळ्याला तोंड देऊ न खंबीरपणे पाय रोवून उभं राहावं लागतं. जिथे मुलींनाच एवढं ‘धाडस’ दाखवावं लागतं तिथे मुलांनी या क्षेत्रात येणं म्हणजे ‘तोंडाला मुलीसारखा मेकअप फासून तो जगाला दाखवणं’ एवढीच त्याची संकुचित व्याख्या आणि तीही कुचेष्टेने केली जाते. मात्र स्वत:ची ओळख मुलगा किंवा मुलगी नाही, ‘ट्रान्सजेंडर’ आहे हे कळतं आणि घरातूनच या वास्तवाला विरोध व्हायला लागतो, तेव्हा खंबीरपणे स्वत:चे निर्णय घेऊन आपण जे आहोत ते पूर्णपणे स्वीकारण्याची हिंमत फार कमीजणांमध्ये असते. नेपाळमध्ये सात भावंडांमध्ये जन्मलेला नबिन ते आज मुंबईमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर सगळ्यात पुढे टेचाने आणि अत्यंत विश्वासाने चालणारी अंजली लामा ही प्रसिद्ध मॉडेल हा प्रवास सोपा नव्हता मात्र आज ती फॅशन इंडस्ट्रीतील या बदलाचा चेहरा ठरली आहे.

तिला आपल्या ‘ट्रान्सजेंडर’ असण्याबद्दल लाज नाही, घृणा नाही आणि कोणाची भीतीही नाही. ट्रान्सजेंडरना वापरला जाणारा कोणताच हिणकस शब्द तिला आवडत नाही. काही वेळा काही ठिकाणी अपयश आलं म्हणून ती खचून जात नाही. नेटवर्किंग कमी होतं, ओळखी कमी होत्या, पैसा कमी होता तरीही मेहनतीत ती कधीही कमी पडली नाही. समाजाने, अगदी घरच्यांनीही कोणतंच प्रोत्साहन दिलं नाही तरी तिने जिद्द सोडली नाही. तिच्या स्वप्नांना खतपाणी घालणारं कोणी नाही म्हणून तिने स्वप्नं पाहायचं सोडलं नाही. तिच्या सगळ्या सकारात्मक भावनेने आणि मेहनत करायच्या तयारीने तिला २०१७ मध्ये ‘लॅक्मे’चा रॅम्प मिळवून दिला. ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या इतिहासातही हे पहिल्यांदाच घडत होतं आणि तिच्याही आयुष्यात ही पहिलीच इतकी मोठी संधी होती. २००९मध्ये पहिल्यांदा मॅगझिन कव्हरवर दिसलेली अंजली इतक्या वर्षांच्या मेहनतीने आणि जिद्दीने भारतातल्या एका मोठय़ा ब्रँडसाठी रॅम्पवर चालली.

नेपाळच्या एका लहानशा गावातून आलेल्या अंजलीला सहा भावंडं आहेत. घरात ‘मुलगी’ हवी या आग्रहामुळे सहा भाऊ आणि सगळ्यात लहान बहीण, आई-बाबा अशा साध्या शेतकरी कुटुंबातून आलेली अंजली. नबिन वायबा या नावाने वावरणारा हा सहावा भाऊ पण तरी आपल्याला मुलींसारखं राहावं, वागावं असं का वाटतं, हे तिला कळत नव्हतं. अखेरीस २००५मध्ये घरात हे सत्य सांगायचं धाडस तिने केलं. तेव्हापासून घरातून बाहेर पडलेली अंजली आतापर्यंत फक्त एकदा आपल्या घरी परत गेली तीही बाबांचा आणि मोठय़ा भावाचा विरोध पत्करून! आपली ओळखही जिथे पटत नव्हती तिथे मॉडेलिंगचं स्वप्न तिने कसं आणि कुठे पाहिलं?, याबद्दल  बोलताना अंजली सांगते, ‘शाळेत सगळे मॉडेलसारखी हाइट आहे वगैरे म्हणायचे. तेव्हा मी मुलगा होते. एकदा माझ्यासारख्याच काही व्यक्तींना पाहिल्यानंतर मी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांना माझी खरी ओळख सांगितली आणि तिथे मला नेपाळमधल्या ट्रान्सजेन्डर कम्युनिटी सेंटरची माहिती मिळाली. तिथे राहायला गेल्यानंतरच मॉडेलिंगच्या माझ्या स्वप्नाला खतपाणी मिळाले. एका गरीब शेतकऱ्याच्या घरची अशी व्यक्ती जिला स्वत:ची ओळख माहितीये पण घरचे आणि समाज स्वीकारणार नाही म्हणून ती बोलत नाही, ती व्यक्ती काय स्वप्नं पाहणार? मात्र जेव्हा मला कम्युनिटी सेंटरमधून प्रोत्साहन मिळालं तेव्हा मी ठरवलं की मॉडेलिंग करायचं आणि केलं तर त्यात टॉपला जायचं’. मॉडेलिंगमध्ये टॉप करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अंजलीने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली.

कुठेही प्रशिक्षण न घेता केलेल्या प्रत्येक कामातून ती काहीतरी नवीन शिकत गेली. फोटोशूट आणि रॅम्पवॉक या गोष्टी तिने नेपाळमध्येही केल्या होत्या. मात्र स्वत:ला अजून उंचीवर नेण्यासाठी सीमेच्या बाहेर पडून आंतरराष्ट्रीय कामं मिळवणं गरजेचं होतं. २००७ मध्ये ‘ट्रान्सक्वीन’ स्पर्धेत तिने भाग घेतला. मात्र पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसल्यामुळे आणि माहितीच्या अभावामुळे पहिल्या फेरीतून पुढे गेलेल्या अंजलीला पुढची फेरी पार करता आली नाही. नेटवंग, पैसा, ओळखी, अनुभव यांच्या कमतरतेमुळे काही संधी हुकत होत्या. २०१६मध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या दोन्ही सीझन्ससाठी प्रयत्न करूनही तिची निवड झाली नाही. २०१७ची ऑडिशन देण्यापूर्वी मात्र तिने पूर्ण तयारी केली. वर्कआऊ ट, रॅम्पवॉकचा सराव, अचूक मेकअप करायला शिकणं, सगळ्या प्रकारच्या आऊ टफिट्समध्ये आत्मविश्वासाने वॉक करता आलं पाहिजे यासाठी सराव, आधीच्या सिलेक्ट झालेल्या मॉडेल्सचे व्हीडिओ बघणं, आपला वॉक सुधारणं अशा सगळ्या गोष्टींवर तिने मेहनत घेतली आणि २०१७च्या ‘लॅक्मे फॅशन वीक – समर रिसॉर्ट’मध्ये तिने इतिहास घडवला.

सध्या ती फॅशन जगतातील प्रतिष्ठित फॅशन डिझायनर्ससाठी काम करते. टॉप मॉडेल म्हणून लौकिक मिळवला असला तरी आता या इंडस्ट्रीत सर्वसामान्यपणे मॉडेल्सना येणाऱ्या समस्यांशी तिलाही झुंज द्यावी लागते आहे. ‘मी स्वप्नं पाहायला उशिरा सुरुवात केली आणि त्यामुळे माझा प्रवासही उशिरा सुरू झाला. याच कारणाने आता मॉडेलिंगच्या कामासाठी माझं वय हा काही वेळा माझ्यासाठी अडसर ठरतो’, असं सांगणाऱ्या अंजलीने तरीही टॉपची मॉडेल व्हायचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कितीही नकार आला तरी प्रयत्न करत राहणार, असा निर्धार व्यक्त केला.

लिंगभेदापलीकडे जात तथाकथित समाजसभ्यतेचे नियम मोडत जगभरातील फॅ शन इंडस्ट्रीने नव्या प्रवाहांना आपल्यात सामावून घ्यायला सुरुवात केली आहे. अ‍ॅसिड हल्ला पीडितांना रॅम्पवर आणणं असो किंवा कृष्णवर्णीय मॉडेल्सना रॅम्पवर प्राधान्य देणं असो.. रंगरूप, लिंग यापलीकडे जात गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या या फॅशन इंडस्ट्रीने गेल्या वर्षी साऱ्या जगाला आणखी एक धक्का दिला. स्त्री-पुरुष मॉडेल्सना बाजूला सारत चक्क तृतीयपंथी मॉडेल्स या रॅम्पवरच्या शोस्टॉपर ठरल्या. न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये पहिल्यांदा या मॉडेल्स रॅम्पवर आल्या तेव्हा त्यांचं स्वागत झालं ही एक आनंदाची गोष्ट. मात्र या मॉडेल्सना रॅम्पवर मागणी वाढते आहे हे कोडे बुचकळयात टाकणारे असले तरी त्याची पाळंमुळं ही अमेरिका आणि प्रगत देशांमध्ये वाढत चाललेल्या एलजीबीटी कम्युनिटीमध्ये आहे. आजवर समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान नसलेली ही मंडळी फॅशन जगतात टॉपवर असून चांगल्या अर्थाने अक्षरश: धुमाकूळ घालतायेत. रॅम्पवरची ही तिसरी वाट भारतीय फॅशन जगतातही लोकप्रिय झाली असून या अनवट वाटेवर प्रस्थापित म्हणून मिरवणाऱ्या अंजली लामा आणि निताशा बिस्वास या दोन तृतीयपंथी मॉडेल्सशी साधलेला संवाद..

viva@expressindia.com

First Published on February 2, 2018 12:41 am

Web Title: anjali lama first transgender model at lakme fashion walk 2017