आपल्याच कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं लग्न व्हावं अशाच थाटात ‘विरुष्का’प्रेमी सोशल मीडियावरून शुभेच्छा देत त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. अनेक जण तर लवकरच दिल्लीत होऊ घातलेल्या स्वागत समारंभाची आमंत्रण पत्रिकाही मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करून त्यांना तिथे येण्याची किंवा जाण्याची विनंती करतायेत. एकीकडे चाहत्यांना झालेला हा आनंद आणि दुसरीकडे शोकसागरात बुडालेला मीडिया. लग्नाला उपस्थित राहण्याची संधी न मिळाल्याने लग्नासंबंधी मिळेल ती माहिती, फोटो आणि व्हिडीओंचा भडिमार करून टीआरपी वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. स्वागत समारंभ होईपर्यंत हे असंच सुरू राहील म्हणा. असो. पण गेली काही र्वष चर्चेत असलेली ही जोडी अखेर विवाहबंधनात अडकली आणि सर्व उलटसुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला.

दहा वर्षांपूर्वी दोघांनीही आपापल्या क्षेत्रात नशीब आजमावयाला सुरुवात केली. एकोणीस वर्षांखालील भारतीय क्रिकेटच्या संघाचं नेतृत्व करत वर्ल्ड कपवर भारताचं नाव कोरण्याची कामगिरी ते आजघडीला भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार असा विराट कोहलीचा प्रवास झालाय. ‘अर्जुन’ आणि ‘पद्मश्री’ पुरस्काराचा मानकरी असलेल्या या खेळाडूची तुलना केली जाते थेट भारतात क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरशी. त्यामुळेच विराटकडेही रन मशीन म्हणूनच पाहिले जाते. लवकरच तो क्रिकेटमधील अनेक विक्रम मोडीत काढेल यात शंका नाही.

अनुष्काचाही प्रवास खूप रंजक आहे. ‘रब ने बना दी जोडी’ या सिनेमातून पदार्पण करताना बॉलीवूडचा किंग असणाऱ्या शाहरूख खानची नायिका होण्याचं भाग्य तिला मिळालं. पदार्पणातच फिल्मफेअर पुरस्काराचं नॉमिनेशन आणि त्यानंतर इंडस्ट्रिटल्या मोठय़ा दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी तिला मिळाली. नव्या दमाच्या कलाकारांसोबत काम करतानाच तिने तिन्ही खान मंडळींसोबत तितक्याच ताकदीने भूमिका साकारल्या आहेत. पण आपण इतर नायिकांपेक्षा अधिक वेगळ्या आहोत हे तिने दाखवून दिलं ते ‘एनएच१०’ या सिनेमाद्वारे निर्माती होऊन.. दरम्यान, ‘पीके’, ‘बॉम्बे वेल्वेट’, ‘दिल धडकने दो’सारख्या वेगळ्या आशयांच्या चित्रपटांतून ती आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडत होतीच.

अनुष्का आणि विराट हे दोघेही आता एकोणतीस वर्षांचे आहेत. दोघांचीही कारकीर्द जेमतेम दहा वर्षांची आहे. पण त्यांची कामाशी असलेली बांधिलकी आणि सातत्य याला तोड नाही. खरंतर पाहायला गेल्यास करिअर करण्यासाठी क्रिकेट आणि बॉलीवूड ही भारतातील सर्वात सोपी आणि तितकीच अवघड क्षेत्रे. कारण इथे संधीचं सोनं करणाऱ्याच्या पायाशी जगातील सर्व सुखसोयी लोळण घेतात आणि संधी गमावणाऱ्यांकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. विराट आणि अनुष्काने या दोन्ही क्षेत्रांत कसलीही कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना केवळ यशाची शिखरं पादाक्रांत केली नाहीत तर आपल्या व्यवसायाशीही कायम इमान राखलं. दोघांच्याही कारकीर्दीकडे पाहिल्यास त्यांनी प्रसिद्धीसाठी कुठलीच स्टंटबाजी केल्याचं दिसत नाही. पण एवढय़ा कमी वयातही त्यांनी आजवर केलेली कामगिरी, मिळवलेली लोकप्रियता, कमावलेला पैसा, समाजमान्यता यामुळे अनेक तरुण-तरुणी त्यांच्यामध्ये स्वत:ला पाहतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि आदर्शही मानतात.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या नातेसंबंधांच्या कहाण्या चवीने चर्चिल्या जाऊ  लागल्या तेव्हाही त्यांनी आपलं मौन कायम ठेवलं. अनुष्काने क्रिकेटचे सामने पाहायला जाणं आणि विराटने चित्रपटांचे शो पाहणं हेदेखील त्यांनी अगदी खुल्लमखुल्ला केलं. वेळोवेळी सोशल मीडियावर एकत्र फोटो टाकून स्वत:हूनच पडद्यामागील चर्चाना पूर्णविराम दिला. आजच्या तरुणाईला त्यांचं हे मोकळेपण भावलं. रिस्क घेण्याची आणि जे आहे ते मान्य करण्याची वृत्ती पटली. कदाचित याच गोष्टींमुळे ‘विरुष्का’ला तरुणाईचं भरभरून प्रेम मिळालं.

सुरुवातीला शाम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने एकत्र आलेली दोघं अलीकडे पुन्हा कपडय़ांच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. बॉलीवूड आणि क्रिके टची गाठ नवीन नसली तरी अनेकदा यशस्वी कहाण्यांपेक्षा तुटलेल्या नात्यांबाबतच जास्त चर्चा केली जाते. त्यामुळे ‘विरुष्का’चे सूर कायमचे जुळणार की लग्नाआधीच काडीमोड होणार याची अनेकांना उत्सुकता होती. सोमवारी इटलीतल्या टस्कनी प्रांतातील बोर्गो फिनोशितो या रिसॉर्टमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झालं. लग्नानंतर विराट आणि अनुष्कानेही एकाच वेळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विवाहाची घोषणा केली आणि आपल्या चाहत्यांना ट्वीटमधून धन्यवाद दिले.

लग्नानंतर समोर येणाऱ्या माहितीमध्ये असंही कळतंय की, अनुष्का आणि विराट एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. डेहराडूनमध्ये राहात असलेल्या अनुष्काच्या आजीनेच हा गौप्यस्फोट केला आहे. ही बाब जर खरी असेल तर स्वप्नवत वाटणारी गोष्ट आज प्रत्यक्षात उतरली असं म्हणायला हरकत नाही. ‘विरुष्का’ची जोडी अशीच सलामत राहो यासाठी प्रार्थना आणि त्यांना आदर्श मानणाऱ्या तरुणाईला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.

viva@expressindia.com