03 August 2020

News Flash

रेहमान फेज 2

ही फेज चालू होते साधारणपणे ‘रंगीला’ या सरांच्या पहिल्या हिंदी चित्रपटापासून. सगळीच गाणी अफाट.

ए॰ आर॰ रहमान

नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
निमित्त तसे काही नाही. निमित्त काढायचेच झाले तर मागल्या आठवडय़ात पंडित हृदयनाथ मंगेशकरांची प्लेलिस्ट होती आणि ‘सरांना’ अर्थात ए आर रेहमान यांना नुकताच पंडित हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल सादर आहे ‘रेहमान फेज-२’ प्लेलिस्ट. वर्षांच्या सुरुवातीला मी रेहमान फेज-१ विषयी बोललो होतो. सरांच्या पदार्पणानंतरची तीन-चार वर्षे.. love at first listening वाली.. ऐकताच क्षणी प्रेमात पाडणारी गाणी. फेज-२ ची गाणी मात्र तशी नाहीत. ती आपल्याला पहिल्यांदा ऐकल्यावर नाही, तर दहाव्यांदा ऐकल्यावर प्रेमात पडतात. पहिल्यांदा ऐकल्यावर असे वाटते, की ठीक आहे.. टिपिकल रेहमान आहे..विशेष काही नवीन नाही वगैरे. कदाचित ती आपल्याला आवडणार नाहीतसुद्धा! पण दुसऱ्यांदा ऐकताना आपल्याला त्यात असे काही तरी सापडेल, की ते तिसऱ्यांदा ऐकावेसे वाटेल, मग तिसऱ्या खेपेपासून आपल्याला त्यातली गंमत कळत जाईल आणि ती गंमत उत्तरोत्तर वाढत जाईल. प्रत्येक वेळेला आपल्याला काही तरी नवीन सापडत राहील, काही तरी नवीन अनुभव येत राहील!

ही फेज चालू होते साधारणपणे ‘रंगीला’ या सरांच्या पहिल्या हिंदी चित्रपटापासून. सगळीच गाणी अफाट. माझी आवडती दोन म्हणजे ‘हाय रामा’ हे ‘पुरिया धनाश्री’ रागावर आधारित गाणे आणि दुसरे ‘तनहा तनहा’ – बासरीचा आधी कधीच न ऐकलेला असा वापर, बासरी आणि स्ट्रिंग्सचे फार वरचे पीसेस असलेले, स्केल चेंजचा उत्तम नमुना असलेले गाणे ‘तनहा तनहा’. पुढे आलेला ‘दिल से’ हासुद्धा असाच सगळी गाणी भारी असलेला अल्बम. माझे सर्वात आवडते ‘जिया जले जाँ जले’ दीदी, तमिळ कोरस, भारी संगीत संयोजन, विशेषत: ताल संयोजन. त्याच वर्षीचा (१९९८) आणखी एक चित्रपट ‘१९४७ अर्थ’. यातले ‘धीमी धीमी’ हे वेगळ्या धाटणीचे गाणे फार मस्त. मग ‘ताल’मधले ‘प्रेयसी’ आणि ‘रबता जोगी’, ‘पुकार’मधले ‘ईश्वर या अल्लाह’, ‘लगान’मधली पुन्हा सगळीच गाणी, पण त्यातूनही ‘राधा कैसे न जले’ आणि ‘घनन घनन घन’. ‘साथिया’मधली (सगळीच, तरीही) ‘चुपके से चुपके से’ आणि ‘मेरा यार मिला दे साईया’ हे फारच आर्त सूफी गाणे, ‘लीजेंड ऑफ भगत सिंह’मधले ‘देस मेरे देस मेरे’, आणि ‘पगडी संभाल जट्टा’ – ज्यात हार्मोनियम मस्त वापरले आहे, ‘स्वदेस’मधले ‘सावरिया सावरिया’, ‘यूहीं चलाचल’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘युवा’मधली ‘मोरा पीया’, आणि ‘ए खुदा हाफिज़्‍ा’, ‘मीनाक्षी’मधले ‘तितली दबोच ली मैंने’ आणि ‘धुँवा धुँवा’, ‘लकीर’मधली ‘नचले’, ‘सदियां’ आणि ‘शहजादे निकले..’, ‘वॉटर’मधले ‘छन छनन छनन’, ‘सुभाषचंद्र बोस’मधले ‘अपने देस की मिट्टी की खुशबू’. ‘रंग दे बसंती’- पुन्हा अख्खाच अल्बम, त्यातूनही ‘खलबली’ आणि जगातील सर्वात भारी प्रेमगीतांपैकी एक असणारे – ‘तू बिन बताएं मुझे ले चल कहीं’. ‘गुरू’मधली ‘शौक है’ आणि ‘जागे है देर तक हमें..’, ‘जाने तू या जाने ना’ टायटल साँग, ‘गजनी’मधले ‘कैसे मुझे तुम’ आणि ‘बहका मैं बहका’, ‘युवराज’ मधले ‘तू ही तो मेरा दोस्त है’ आणि ‘तू मुस्कुरा’, ‘जोधा अकबर’ मधली ‘मनमोहना’, ‘कहने को जश्नेबहारा’, ‘ख्वाजां मेरे’, आणि ‘इन लम्हों के दामन’ में हे वाढीव गाणे, ‘दिल्ली ६’ टाइटल साँग आणि ‘दिल मिला’,‘रावण’मधले ‘बहने दे.’
मला वाटते साधारणपणे ‘रावण’पासून सरांची फेज -३ चालू झाली आहे. यात एखाद्या चित्रपटाची गाणी नुसती ऐकताना आपल्यावर विशेष प्रभाव पाडत नाहीत, पण तो चित्रपट पाहिल्यावर मात्र आपल्याला त्या गाण्यांचे महत्त्व समजते, मग ती आपल्याला थोडी थोडी आवडायला लागतात. त्यांच्या पूर्णपणे प्रेमात पडण्यासाठी ती १० वेळा नाही, तर १० वर्षे ऐकावी लागतील का काय असेही वाटून जाते.. वाट बघायला लागणार तर!

हे ऐकाच.. डॉक्टर ऑफ म्युझिक
याच सुमारास गेल्या वर्षी ‘बर्कले कॉलेज ऑफ म्युझिक’ या जगातल्या सर्वोत्कृष्ट संगीतशाळेने रेहमानसरांना ‘डॉक्टर ऑफ म्युझिक’ ही पदवी बहाल केली होती. या पदवी प्रदान सोहळ्यात या म्युझिक स्कूलच्या भल्या मोठय़ा ग्रूपने सरांची गाणी सादर करून सरांना मानवंदना दिली होती. त्यातला ‘दिल से’चा व्हिडीओ या म्युझिक स्कूलने नुकताच यूटय़ूबवर प्रसिद्ध केला आहे. तसेच या कार्यक्रमासाठी ‘जिया जले’ चे स्टुडिओमध्ये रिकॉर्डिग करतानाचासुद्धा व्हिडीओ आहे. या कार्यक्रमाच्या ‘हायलाइट्स’चासुद्धा एक व्हिडीओ आहे. हे अगदी अगदी न चुकता पाहावेत. हे सांगीतिकरीत्या खूप खूप भारी आहेतच; आणि आपल्या देशातल्या एका महान व्यक्तीला आंतरराष्ट्रीय पातळीवर असा मान, आदर मिळताना पाहून भरूनही येते.

जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2015 1:08 am

Web Title: ar rahman hit songs
टॅग Jasraj Joshi
Next Stories
1 डेकोरेट युवर होम
2 दिवाळीची पूर्वतयारी
3 कलात्मक दिवाळी
Just Now!
X