‘आर्मी रेस्टॉरंट’ ज्या इमारतीमध्ये आहे ती ‘एस्प्लांड मॅन्शन’ म्हणजे पूर्वीचं वॅटसन हॉटेल. लोखंडाचे ओतकाम करून तयार करण्यात आलेल्या इमारतींपैकी ही भारतातील सर्वात जुनी इमारत आहे.

मुंबईतील फोर्ट परिसरात फिरताना पावलोपावली इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू पाहायला मिळतात. ब्रिटिशांनी उभारलेल्या या वास्तू म्हणजे वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने. इतक्या वर्षांनंतरही आपण या वास्तूंच्या तोडीची भरभक्कम आणि सुंदर वास्तुरचना करू शकलेलो नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. यांपैकी काही वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत तर काही आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत आहेत. काळा घोडा परिसरातील मुंबई विद्यापीठ आणि सत्र न्यायालयाच्या शेजारी महात्मा गांधी रोडवर उभी असलेली ‘एस्प्लांड मॅन्शन’ ही इमारतदेखील जवळपास दोन शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावर असलेलं ‘आर्मी रेस्टॉरंट अ‍ॅन्ड स्टोर्स’देखील १९३२ पासून मुंबईच्या सेवेत आहे.

‘एस्प्लांड मॅन्शन’ या इमारतीची रचना आणि ‘आर्मी रेस्टॉरंट’ हे नाव यामुळे या दोन्ही गोष्टी या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नव्या व्यक्तीसाठी कुतूहलाचा विषय असतात. दोन्हींचं एकमेकांशी इतकं घट्ट नातं आहे की, त्यांचा इतिहास वेगवेगळा सांगताच येणार नाही. शहरातील इतर इराणी हॉटेलच्या तुलनेत ‘आर्मी रेस्टॉरंट’ने खूपच मोठय़ा प्रमाणात कात टाकली आहे.

‘आर्मी रेस्टॉरंट’ ज्या इमारतीमध्ये आहे ती ‘एस्प्लांड मॅन्शन’ म्हणजे पूर्वीचं वॅटसन हॉटेल. लोखंडाचे ओतकाम करून तयार करण्यात आलेल्या इमारतींपैकी ही भारतातील सर्वात जुनी इमारत आहे. विशेष म्हणजे या इमारतीचे सांगाडे इंग्लंडमध्येच तयार करण्यात आले आणि नंतर समुद्रमार्गे जहाजातून ते भारतात आणून याच जागी ते जोडून इमारत बांधण्यात आली. संपूर्ण सुटे भाग आधी तयार करून नंतर जोडलेली ही आशिया खंडातील पहिली इमारत होय. इमारतीचा लोखंडी सांगाडा पाहून सुरुवातीच्या काळात भारतीय लोक याला पक्षाचा पिंजरा म्हणून संबोधत. ‘बर्ड केज’ म्हणून याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.

रोनॉल मसॉन आर्डीश या स्थापत्य अभियंत्याने डिझाइन केलेली ही इमारत २६ ऑगस्ट १८६७ रोजी अब्दुल हक यांना ९९९ वर्षांसाठी ९२ रुपये १२ आणे प्रतिवर्षी भाडेतत्त्वावर देण्यात आली. या हॉटेलचे मूळ मालक जॉन हडसन वॅटसन यांच्यामुळे या हॉटेलला ‘वॅटसन्स एस्प्लांड हॉटेल’ असे म्हटले जाऊ  लागले. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी वॅटसनने इंग्लंडमधूनच कर्मचारी आणले होते. भारतातील प्रतिष्ठित लोकांचे हॉटेल म्हणून या हॉटेलने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली. याच हॉटेलमध्ये ल्युमिएर बंधूंनी ७ जुलै १८९६ रोजी पहिल्यांदा भारतात काही चलत्चित्राच्या फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. अली मोहम्मद चोअस्पोर आणि महमूद गोल्फताब हे दोघे भागीदारीमध्ये सध्या आर्मी  रेस्टॉरंट चालवत आहेत. १९३२ साली महमूद यांचे सासरे हुसैन झाहीर झादे यांनी हे रेस्टॉरंट चालवायला घेतलं. त्या वेळी रेस्टॉरंटच्या जागेत लहान-मोठय़ा खोल्या होत्या. त्या तोडून त्यांनी हॉटेलसाठी प्रशस्त जागा तयार केली. लहान दरवाजांचा आकार बदलून मोठा केला. ‘एस्प्लांड मॅन्शन’च्या बाजूलाच ‘आर्मी अ‍ॅण्ड नेव्ही’ बिल्डिंग आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश आणि ऑस्ट्रेलियन आर्मी येथे येत असे. त्या वेळी हॉटेलच्या बाहेर २४० हा ‘इन बॉण्ड’ क्रमांक लावलेला होता, अशी आठवण महमूद सांगतात.  ही आहे ‘आर्मी रेस्टॉरंट’ या नावामागची कहाणी.

१९७९ पासून सादिक अली यांच्याकडे जागेची मालकी आहे. अस्खलित फारसी बोलणारे महमूद १९८० पासून ‘आर्मी रेस्टॉरंट’ सांभाळत आहेत. आधीसारखी मजा आता राहिली नसल्याचं ते सांगतात. पूर्वी येथे मोजकेच पदार्थ मिळायचे पण लोकांची खूप गर्दी असायची. समोरच असलेलं मुंबई विद्यापीठ, मागच्या बाजूला असलेलं एलफिन्स्टन महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यांचा राबता इथे असायचा. हाकेच्या अंतरावर असलेल्या ओव्हल मैदानात खेळून झाल्यावर मुलं चहा, बन मस्का, ऑम्लेट खायला इथे येत असत. पण हळूहळू या भागातील वस्ती मुंबई उपनगरांकडे सरकली. केवळ सरकारी आणि खासगी कार्यालयं येथे उरली. त्यामुळे आठवडय़ाचे पाच दिवस हा परिसर आणि हॉटेल गजबजलेलं असे. म्हणूनच १९८२ पासून चायनीज, मोगलाई, पाव-भाजी हे पदार्थ विकायला सुरुवात केली.

पाव, मावा केक, क्रीम केक, बन असे बेकरीचे काही मोजकेच पदार्थ इथे येतात. बहुतांश इराण्याच्या हॉटेलमध्ये असतात तशा काऊंटरच्या मागे काचेच्या कपाटात बिस्किटं, तेल, सिगारेट, चॉकलेट यांसारख्या गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. जुन्या पद्धतीचे चौकोनी लाकडी टेबल आणि खुर्च्या आजही येथे आहेत. रेस्टॉरंटचा एकूणच चेहरा पाहिला तर स्वच्छता आणि टापटीपीकडे दुर्लक्ष होत असल्याचं लक्षात येईल. रेस्टॉरंटचा डोलारा सांभाळणारे जुने लाकडी खांब किंवा मजबूत लोखंडी खिडक्यासुद्धा दुर्लक्षित आहेत. त्यामुळे आधीच मोडकळीस आलेल्या या इमारतीसोबतच रेस्टॉरंटबाबतही विशेष आस्था असल्याचं दिसत नाही. महमूद भाईंना इमारतीच्या आणि रेस्टॉरंटच्या गौरवशाही इतिहासाबद्दल अभिमान आहे, पण वर्तमानातील परिस्थिती पाहता त्यांना त्यात विशेष रस वाटत नाही.

ग्रेड-२ दर्जाची वारसा वास्तू असलेली ‘एस्प्लांड मॅन्शन’ ही इमारत आधीच मोडकळीस आलेली आहे. ८६ वर्षे जुन्या ‘आर्मी रेस्टॉरंट अ‍ॅण्ड स्टोअर्स’मध्येही आता कौतुक करण्यासारखं विशेष काही राहिलेलं नाही. पण शेवटच्या घटका मोजत असलेल्या या इमारतीला आणि रेस्टॉरंटला लवकरच एक तरी भेट देणं खूपच गरजेचं आहे. रेस्टॉरंटमध्ये शिरण्यापूर्वी समोरच्या फुटपाथवर उभं राहून ‘एस्प्लांड मॅन्शन’ इमारत डोळे भरून पाहून घ्या. त्याच्या बाल्कनीच्या जाळ्यांवर आजही तुम्हाला ‘वॅटसन हॉटेल’ची आठवण करून देणारं ‘डब्ल्यू’ हे मोनोग्राम दिसेल. १६० वर्षांपूर्वी ज्या खांबांवर हे हॉटेल उभं आहे त्या भल्यामोठय़ा खांबांना स्पर्श करून घ्या. आणि मग आत जाऊन रेस्टॉरंटमधील लाकडी खांबाच्या किंवा खिडजवळील टेबल पकडून बन मस्कासोबत इराणी चहाचा घोट घ्या. इथून बाहेर पडल्यावर वैभवशाली वारशाला भेट दिल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर झळकत असेल हे नक्की.

प्रशांत ननावरे viva@expressindia.com