News Flash

ब्रॅण्डनामा : अ‍ॅमेझॉन

दिवाळी खरेदीच नाही तर रोजच्या आयुष्यातील आवश्यक ते चनीच्या अनेक गोष्टी हमखास मिळण्याचं हे ठिकाण आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.

(संग्रहित छायाचित्र)

रश्मि वारंग

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

दिवाळी आणि खरेदी यांचं समीकरण सोपं करणाऱ्या ऑनलाइन खरेदीने अनेकांचे कष्ट आणि पसा सारंच काही वाचवलं आहे. या ऑनलाइनच्या जंजाळाचे फायदे तोटे बाजूला ठेवत जर ऑनलाइन खरेदी उत्सवाचा विचार केला तर खूप साऱ्या वैविध्यासह अगणित उत्पादनांचा पर्याय देणारा ब्रॅण्ड म्हणजे अ‍ॅमेझॉन. दिवाळी खरेदीच नाही तर रोजच्या आयुष्यातील आवश्यक ते चनीच्या अनेक गोष्टी हमखास मिळण्याचं हे ठिकाण आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.

अमेरिकेतील एका मोठय़ा कंपनीत उच्चपदस्थ म्हणून काम करणाऱ्या जेफ बेझॉस यांनी मनात काही निश्चय करून १९९४ साली आपल्या पदाचा राजीनामा दिला. ई-कॉमर्सचा उत्तम अनुभव असणाऱ्या जेफ यांना इंटरनेट व्यवसायाचं महत्त्व उमगलं होतं. येत्या काही वर्षांत ई-कॉमर्समध्ये २३००% वाढ होणार ही बातमी त्यांना महत्वाची वाटली. आपलं व्यावसायिक धोरण निश्चित करत त्यांनी वॉशिंग्टन सिएटल इथे आपलं बस्तान हलवलं. ऑनलाईन कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी २० उत्पादनं निश्चित केली. त्यातली ५ त्यांना अधिक विश्वासार्ह वाटली. सीडी, कॉम्प्युटर हार्डवेअर, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, व्हिडीयोज आणि पुस्तकं. यापकी पुस्तकविक्रीच्या पर्यायासह सुरूवात करण्याचा त्यांचा निर्णय झाला. जगातील सर्वात मोठं ऑनलाइन बुक स्टोअर निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगून ५ जुल १९९४ मध्ये त्यांनी स्वत:ची ऑनलाइन कंपनी सुरू केली. नाव होतं केडॅबरा इन्क. वॉशिंग्टनमध्ये भाडय़ाने घेतलेल्या घराच्या गॅरेजमध्ये या व्यवसायाला सुरुवात झाली. जेफ यांच्या आई-वडिलांनी या व्यवसायाकरता जेफना अडीच लाख डॉलर्सची मदत केली. केडॅबरा इन्क नावाचं रुपांतर अ‍ॅमेझॉनमध्ये व्हायला एक घटना कारणीभूत ठरली. कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच जेफ आपल्या वकिलांशी बोलत असताना केडॅबरा या नावाचा उच्चार वकिलांना नीट कळला नाही. त्यांनी ‘केडॅवर’ असा चुकीचा उल्लेख केल्यावर जेफ यांना नव्या नावाची गरज भासली. ऑनलाइन व्यवसायात नाव हे अत्यंत महत्त्वाचं असतं. नावाच्या उच्चारात संभ्रम म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहचण्यात अडथळा. नव्या नावासाठी जेफ स्वत: डिक्शनरी घेऊन बसले. त्यातून त्यांना गवसलेलं नाव म्हणजे अ‍ॅमेझॉन. हे नाव निवडण्यामागे अनेक कारणं होती. अ‍ॅमेझॉन ही जगातील सर्वात मोठी नदी जी वैविध्यपूर्णतेने संपन्न आहे. ती विशालता नावात प्रतित होत होती. शिवाय आद्याक्षर ए पासून सुरू होत असल्याने ऑनलाइन कंपन्यांच्या नावाच्या यादीत ते नाव सर्वात पहिले झळकणार होतं. अशा प्रकारे केडॅबराचं रूपांतर अ‍ॅमेझॉनमध्ये झालं.

ऑनलाइन बुक स्टोअर असणाऱ्या अ‍ॅमेझॉनचं १९९५मध्ये विकलं गेलेलं पहिलं पुस्तक होतं, डग्लस हॉफस्टॅडटर्स यांचं फ्लुईड कंसेप्टस् अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह अ‍ॅनोलॉजीज. अशाप्रकारे पुस्तक विक्रीने अ‍ॅमेझॉनची सुरुवात झाली आणि मग वेळोवेळी त्यात विविध उत्पादनांची भरच पडत गेली. कपडे,फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणकाचं सामान, गृहोपयोगी वस्तू असा विस्तार होत गेला.

नावाला जागत ऑनलाइन व्यवसायाचा हा प्रवाह खरोखरच अ‍ॅमेझॉनप्रमाणे विस्तारला. पहिल्या काही महिन्यांतच ५० राज्य आणि ४५ देशांमध्ये पसरण्याची किमया जेफच्या दूरदृष्टीने साधली. सुरुवातीच्या दोन महिन्यांत अ‍ॅमेझॉनचं आठवडी उत्पन्न वीस हजार डॉलर्स होतं. हळूहळू हा व्याप इतका वाढत गेला की अ‍ॅमेझॉन फ्रेश, अ‍ॅमेझॉन प्राईम, अ‍ॅलेक्सा, अ‍ॅमेझॉन ड्राइव्ह, अ‍ॅमेझॉन डिजीटल गेम्स ही आणि अशी अनेक उत्पादन येत गेली. ग्राहकांना त्याचा सर्वोत्तम प्रतिसाद लाभला.

या सगळ्यांत जेफ यांची भूमिका महत्त्वाची आहे. हा इतका मोठा अवाढव्य पसारा सांभाळायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपल्या कामाच्या बाबतीत जराही हलगर्जीपणा जेफ यांना चालायचा नाही. ते अनेकदा कर्मचाऱ्यांना यासाठी कठोर भाषेत खडसावत असत. पण अशावेळी यासाठी बोलताना आपला तोल सुटू नये म्हणून चक्क जेफने एक प्रशिक्षक ठेवला. जेणेकरून सौम्य पण प्रभावी शब्दांत अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेता येईल. जगभरात पसरलेल्या या लोकप्रिय ऑनलाइन कंपनीची कर्मचारी संख्या २०१७ मध्ये पाच लाख सहासष्ट हजार होती. या आकडेवारीवरून अ‍ॅमेझॉनची व्याप्ती लक्षात येते.

कंपनीचा लोगो वैशिष्टय़पूर्ण आहे. जेफ यांनी शोधलेल्या नावातली गंमत वाढवत ए आणि झेड या अल्फाबेटस् खाली ओढलेला बाण ए टू झेडची खूण दर्शवतो. अ‍ॅमेझॉनवर सगळ्या गोष्टी मिळतात याचं हे प्रतिक.अ‍ॅमेझॉनची टॅग लाईन देशागणिक बदलते. “यू शॉप. अ‍ॅमेझॉन गिव्ह्ज ” या इंग्रजी टॅगलाईनसोबतच “क्या नहीं मिलेगा”? ” अ‍ॅमेझॉन है अपना दुकान” या टॅगलाईन्सही महत्त्वाच्या.

सध्याच्या काळात जिथे माणसाचं ऑनलाइन आयुष्य अधिकाधिक विस्तारतंय तिथे अशा ब्रॅण्डस्मुळे कित्येक गोष्टी सोप्या होतात. आपल्या हाताच्या टिचकीवर बसल्या जागी आपले आवडीचे विविध ब्रॅण्डस् आपल्याला पहायला मिळतात. तुलना करता येते. ऑनलाइन खरेदीत मनासारखी वस्तू हाती न आल्याचे अनुभव ऐकून वाचूनही प्रत्येक दिवाळी, पाडवा, नववर्षांगणिक ऑनलाइन खरेदीची आकडेवारी वाढतेच आहे. या वाढत्या खरेदीत २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत ब्रॅण्ड अ‍ॅमेझॉन महत्त्वाचा आहे. कारण त्या नदीच्या नावातले सातत्य, विशालता, वैविध्य या ब्रॅण्डने जपले आहे. ऑनलाईन असो वा प्रत्यक्ष, प्रत्येक दिवाळी खरेदी खासच असते. अशा संस्मरणीय खरेदीसह दीपावलीचे मंगल पर्व आनंददायी जावो या मनापासून शुभेच्छा!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2018 3:39 am

Web Title: article about amazon brand story
Next Stories
1 बदलते ‘भाव’बंधन
2 चटकदार फराळाला मटकदार तडका!
3 दिवाळी, सफाई आणि बरंच काही..
Just Now!
X