आदित्य कनोजे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

आपण नेहमी मोजकेच लोक यशस्वी कसे होतात, असा तिरकस विचार करतो. तो विचार पटलाच तर मग ते जसे यशस्वी झाले तसे आपणही होऊ  अशी भाबडी आशा बाळगून असतो. त्यांचे यशस्वी होण्यामागचे रहस्य कळले की आपणही तशा मार्गाने वाटचाल करू या आशेवर अनेक प्रश्नदेखील आपल्या मनात येतात. जवळजवळ २५ वर्षे संशोधन करून नेपोलियन हिल या लेखकाने ‘थिंक अ‍ॅण्ड ग्रो रिच’ या पुस्तकाद्वारे अशा प्रश्नांचा पाठपुरावा केला आहे. वरील वाक्य यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या यशामागचे रहस्य असून ते प्रत्येकाच्या जीवनाला शोभेल असेच आहे. हे वाक्य आपल्यातील स्वप्रतिमेला जागे करते. मी कोण?, माझे ध्येय काय?, हे प्रश्न आपल्या मनाला पडल्याशिवाय राहत नाही.

एखादे उच्च ध्येय गाठण्यासाठी आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. ध्येय गाठण्याच्या प्रवासादरम्यान यशापयशाच्या दोरीवर हिंदकळत असताना तरुणांच्या मनात आपण कधीच यशस्वी होणार नाही, कारण स्पर्धा श्वास रोखणारी आहे, असे विचार तरुणांच्या मनात फेर धरत असतात. हळूहळू मग अशा नकारात्मक छत्रछायेखालीच त्यांचे विचार वावरतात. परंतु मी यशस्वी होऊ  शकत नाही ही मानसिकता आहे, भविष्य नाही, ही गोष्ट आपण या ओळीतून लक्षात घेतली पाहिजे. कारण नकारात्मक विचारच आपल्याला ध्येयापासून विचलित करीत असतात. हे जोवर लक्षात येत नाही तोवर त्या विचारांशी सामना करता येत नाही.

अनेक विचारवंतांची अनेक वाक्ये जीवन जगायला शिकवतात, पण हे वाक्य वाचून आपल्या विचारांची कवाडे उघडल्याशिवाय राहणार नाही. आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तरुण वाटचाल करतात पण त्यांना कुठेच चांगले मार्गदर्शन मिळत नाही. त्यांना कुठलाही प्रेरणास्रोत मिळत नाही. आज त्यांना फक्त कुठल्याही क्षेत्रातील स्पर्धाच दाखवली जाते पण त्यांना एक चांगले मार्गदर्शन मिळाले पाहिजे, प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांना पुढे जाण्यासाठी धैर्य दिले पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. अशा वेळी तरुणाईने स्वत:च नवे आदर्श शोधले पाहिजेत. तुम्ही तुमच्या भविष्याचे सूत्रधार आहात. तुम्ही प्रभाव टाकू शकता, तुम्ही तुमच्या भविष्याला दिशा देऊ शकता, तुमचं आयुष्य तुम्हाला जसं हवं तसं घडवू शकता हा विश्वास प्रत्येक तरुणाने स्वत:त निर्माण केला पाहिजे, आपले प्रेरणास्रोत वाढवले पाहिजेत. नाही तर दुसऱ्यावर विसंबून राहिलो तर समुपदेशनाच्या नावाखालीही कधी कधी फसगतच वाटय़ाला येऊ शकते, यासाठी सावध होऊन स्वत:चा मार्ग शोधला पाहिजे.

viva@expressindia.com