तेजश्री गायकवाड

आपल्या आयुष्यात प्रत्येक नात्याची जागा वेगळी असते. नात्यापरत्वे आपलं भावविश्व फुलत राहतं. आई-वडिलांपासून ते जोडीदारापर्यंत नात्यात लहानपणापासून एकमेकांचे हात धरत, कधी धडपडत-कधी सावरत जाणारं नातं हे भावंडांचं असतं. हे नातं म्हणजे ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’सारखं तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं.. बदलत्या काळाचे पडसाद जसे इतर नात्यांवर उमटले तसे ते या नात्यावरही उमटले आहेत. एकमेकांशी जिवापाड बांधून घेणाऱ्या बहीण-भावाच्या नात्यालाही खऱ्या अर्थाने मोकळीक मिळाली असून एकमेकांचा घट्ट आधार बनून हे बंध पुढे नेण्याचा प्रयत्न या पिढीकडून होताना दिसतो.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?

गेल्या काही वर्षांत भावंडांच्या नात्यात आमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. हा माझा भाऊ , ही माझी बहीण यापलीकडे जात आता बेस्ट फ्रेंडचं, मोटिव्हेशन देणारं, सपोर्ट सिस्टीम असलेलं असे अनेक टॅग या नात्याला लागले आहेत. आधीच्या काळात भावंडाच्या नात्यामध्ये तेवढी मोकळीक नव्हती, जेवढी आताच्या काळात आहे. एखाद्या मोठय़ा भावासाठी लहान बहीण ही मोठी जबाबदारी असे तर बहिणीसाठी भाऊ  वडिलांसमानच असे. सध्या हे नातं बदललं आहे. आजच्या घडीला आपल्या मासिक पाळीपासून ब्रेकअप, सेक्सपर्यंत सगळ्या गोष्टी बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला सहज सांगताना दिसतात. मुळात आता भावंडं म्हणजे फक्त बहीण-भाऊ  न राहता बहिणी बहिणी, भाऊ  भाऊ , चुलत भाऊ -बहीण, मानलेले भाऊ -बहीण, एखाद्या पाळीव प्राण्यालाही भाऊ  किंवा बहीण मानलं जातं. ही सगळी नाती आपल्याला अनेकदा छोटय़ा-मोठय़ा अनेक गोष्टींमध्ये खूप मोठा आधार देतात. अशाच काही भावंडांना व्हिवाने बोलतं केलं.

आपल्या बहिणीपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी मोठा असलेला तेजस डेढिया सांगतो, ‘माझी बहीण लहान असली तरी आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. आपल्याला अनेकदा असं वाटतं की आपल्याच वयाच्या लोकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करायला हव्यात. आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना काय समजणार, ते काय आपल्याला सल्ले देणार. पण आमच्या नात्यामध्ये हे सगळं अगदी उलट आहे. मी वयाने मोठा असलो तरी अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, प्रसंगामध्ये मी माझ्या बहिणीची मदत आवर्जून घेतो. मला खूप छान आठवतंय की माझं लग्न ठरायच्या वेळी एक स्थळ मला अजिबात पसंत नव्हतं. पण माझा घरच्यांना ते खूप पसंत पडलं होतं. काही केल्या घरातले माझं बोलणं मनावर घेत नव्हते. अशा वेळी मी माझ्या बहिणीपाशी माझ्या भावना व्यक्त केल्या. ती माझ्यापेक्षा लहान असली तरी तिला माझे विचार पटले आणि तिने सराईतपणे घरच्यांनाही समजून सांगितलं. असंच एकदा माझं ब्रेकअप झाल्यावर मी प्रचंड डिस्टर्ब झालो होतो. चांगल्या पगाराची नोकरी हातातून जायची वेळ आली होती. आणि अशा वेळी आई-वडील जुन्या विचारांचे असल्यामुळे त्यांना काही सांगूही शकत नव्हतो. तेव्हाही तिनेच माझी परिस्थिती अचूक ओळखली आणि मला त्यातून काही दिवसांतच बाहेर काढलं.’ अनेकदा सख्ख्या भावंडांमध्ये जेवढी जवळीक नसते तेवढी ती चुलत भावंडांमध्ये असते. फातिमा आणि तिच्या चुलत बहिणीचंही नातं असंच जिवाभावाचं आहे. फातिमाला सख्ख्या दोन बहिणी आहेत पण तरीही ती तिच्या चुलत बहिणीशी जास्त कनेक्टेड आहे. अनेकदा आपल्या आयुष्यात काही वाईट प्रसंग येतात अशा वेळी आपण आपलं जीवनही संपवायचा विचार करतो. असाच काहीसा विचार फातिमाच्या बहिणीने केला होता. ‘आमच्या घरात माझी चुलत बहीण हीच एकटी खूप शिकलेली आणि चांगल्या पगारावर नोकरी करणारी होती.  मात्र तिला काही र्वष फार त्रास सोसावा लागला. तिचं ठरलेलं पहिलं लग्न काही कारणास्तव मोडलं. पण तरीही ती खचून गेली नाही. दुसऱ्या मुलासोबत लग्न जुळलं मात्र तिथेही मोडता आला. तिसऱ्यांदा तिला लग्नाबाबतीत असाच निराशाजनक अनुभव आल्यानंतर ती खूप खचली होती. आपल्यामुळे घरच्यांना त्रास होतोय, या भावनेतून आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळायला लागले. ती मला या गोष्टी सातत्याने सांगत असल्याने तिची मानसिक स्थिती ठीक नाही, याची मला कल्पना होती. अशातच एकदा आंघोळीला जाताना जीव देण्यासाठी ब्लेड घेऊ न जाण्याच्या प्रयत्न तिने केला. मात्र तिच्यावर मी बारीक लक्ष ठेवून असल्याने तिला वाचवता आलं. नंतर मात्र मी तिला कोणत्याच वेळी एकटं सोडलं नाही, तिच्याशी बोलून तू कुठेच चुकत नाहीस हे तिच्या मनावर बिंबवलं. आणि त्यातून ती बाहेर आली. पुन्हा पुढचं शिक्षण घेऊ न अजून चांगल्या पगाराची नोकरी करू लागली. आता तिचं लग्नही झालं आहे,’ असा अनुभव फातिमाने सांगितला.

असे अनेक किस्से आपल्या आजूबाजूला घडत असतात. खूपदा आपल्या गोष्टी शेअर करण्यासाठी आई-बाबा, मित्रमैत्रिणींपेक्षा आपली भावंडं जास्त जवळची वाटतात. सख्ख्या भावंडांच्या तर अनेक  कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. पण मानलेल्या भावाने किंवा बहिणीने आपल्यासाठी काही तरी केलंय असे प्रसंगही हल्ली खूपदा ऐकायला मिळतात. मिताली आणि ओमकार या मानलेल्या बहीण-भावांचं नातंही असंच आहे.

मिताली एकुलती एक मुलगी. लहानपणापासूनच तिच्या शेजारी राहणाऱ्या ओमकारला तिने आपला भाऊ मानले होते. या दोघांची जोडी सख्ख्या भावंडांपेक्षा कमी नव्हती. पुढे मिताली परदेशात शिक्षणासाठी गेली असताना तिच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. अशा वेळी तिची आई एकटी पडली होती. आणि उपचारासाठी पैशांचीही गरज होती. आणि याच वेळी नेमकी मितालीची महत्त्वाची परीक्षा सुरू होती. ओमकारने तिला वडिलांच्या तब्येतीबाबत काहीही कळू न देता स्वत: बाईकसाठी साठवलेले पैसे उपचारांसाठी खर्च केले. मितालीला जेव्हा या सगळ्याबद्दल कळलं तेव्हा ओमकार आपला सख्ख्या भाऊ  नाही, असा विचारही तिच्या मनाला शिवला नाही.

अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला असतात. कधी कधी आपल्याला बहीण नाही, भाऊ  नाही याची कमीही आपल्याला जाणवत नाही. मित्रमैत्रिणींपेक्षा भावंडंच आपली बेस्ट फ्रेंड बनतात. या भावंडांबरोबरच्या आठवणी, गमतीजमती, वाटून घेतलेले सुखदु:खाचे प्रसंग आपल्या आयुष्यातील अनेक अवघड वळणवाटा सुकर करतात. पूर्वीच्या काळातील बंधनं मोडून हे नातं अधिक घट्ट, प्रगल्भ आणि बदलत्या काळात एकमेकांना पुढे घेऊन जाणारं आश्वासक नातं म्हणून उभं राहिलं आहे.

viva@expressindia.com