तेजल चांदगुडे

सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सने सेलचा धडाकाच सुरू केला आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सवर मोठय़ा प्रमाणात सूट देत सगळ्यांचे लक्ष वेधून घेणं, सेलेब्रिटीजना जाहिरातींमध्ये दाखवून आमिष देऊ न बाजारातली रेलचेल या शॉपिंग साइट्सवर आणणं असे अनेक प्रकार या सेल नावाच्या राज्यात केले जातात. ऑनलाइन खरेदी हा तरुणाईच्या खास आवडीचा प्रकार. मात्र अशा प्रकारे सेलमध्ये खरेदी करताना काहीएक काळजी घ्यावी लागते, नाही तर खरेदीच्या आनंदावर विरजण पडायचे..

ऑनलाइन शॉपिंग हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय बनू लागला आहे. वेगवेगळ्या ऑफर्स, एकावर एक मोफतच्या घोषणा, वस्तूंवर मिळणारे घसघशीत डिस्काऊंट्स यामुळे गरज नसतानाही पावलं खरेदीकडे वळली तर नवल नाही. त्यात सध्या सणासुदीचे दिवस असल्याने ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सने सेलचा धडाकाच सुरू केला आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सवर मोठय़ा प्रमाणात सूट देत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणं, सेलेब्रिटीजना जाहिरातींमध्ये दाखवून आमिष देऊ न बाजारातली रेलचेल या शॉपिंग साइट्सवर आणणं असे अनेक प्रकार या सेल नावाच्या राज्यात केले जातात. ऑनलाइन खरेदी हा तरुणाईच्या खास आवडीचा प्रकार. मात्र अशा प्रकारे सेलमध्ये खरेदी करताना काहीएक काळजी घ्यावी लागते, नाही तर खरेदीच्या आनंदावर विरजण पडायचे..

नवरात्रीपासून सुरू झालेले हे शॉपिंग सेल्स आता वर्षांअखेरीसपर्यंत सुरूच राहतील. अनेकदा अशा सेलमध्ये तरुणाईकडून मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जाते; पण आता या ऑनलाइन खरेदीचे प्रमाण दिवसेंदिवस इतके वाढते आहे की, मध्यम वयोगटही या शॉपिंग सेलकडे वळतो आहे. ऑनलाइन शॉपिंग सेल्समधून गोष्टी खरेदी करणं खरं तर बाजारभावापेक्षा स्वस्त पडतं आणि गोष्टी कोणताही शारीरिक त्रास न घेता घरपोच मिळत असल्याने ते जास्त सोयीचं जातं. त्यामुळे हा पर्याय फायद्याचा ठरत असल्याने सगळेच या शॉपिंगकडे वळताना दिसतात. कित्येकदा आपल्याला हव्या त्या गोष्टी कुठे मिळतील याची आपल्याला माहिती नसते. ऑनलाइन खरेदी करताना ती अडचणच येत नसल्याने साहजिकच प्राधान्य या खरेदीला मिळते आहे.

मात्र हे सगळं छान छान आणि फायदेशीर दिसत असतानाच त्यासोबत येणारे धोकेही लक्षात घेणे गरजेचे आहे. अनेकदा शॉपिंग करताना आपण कमी किंमत बघून खूश होतो. मात्र ती वस्तू पारखून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे आपण विसरतो. म्हणूनच ऑनलाइन शॉपिंग करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

शॉपिंग वेबसाइट्सवरून खरेदी करताना संबंधित वेबसाइटची अर्हता तपासून घेणं महत्त्वाचं आहे. ज्या वेबसाइटवरून आपण खरेदी करणार आहोत, त्या वेबसाइटच्या तळाला ‘वेरी साइन ट्रस्डेट’ अशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्या वेबसाइटवर दिलेलं आहे किंवा नाही हे आधी तपासून पाहा. सध्या अनेक वेबसाइट्स ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. त्यामुळे या वेबसाइट्स ई-कॉमर्सच्या नियमानुसार सुरू करण्यात आलेल्या आहेत किंवा नाहीत, हे आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक कंपन्यांनी वेबसाइट्ससोबतच स्मार्टफोनसाठी मोबाइल शॉपिंग अ‍ॅप्लिकेशन्सही उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे एका क्लिकवर शॉपिंग करणं शक्य झालं आहे. मात्र हे अ‍ॅप्लिकेशन्स डाऊनलोड करताना ते ‘व्हेरीफाइड’ आहेत की नाही हे तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी संबंधित कंपनीच्या कॉलसेंटरवरही फोन करून माहिती घेता येऊ  शकते. त्याचप्रमाणे ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहात, त्या कंपनीची ऑनलाइन खरेदी संदर्भातील माहिती तपासून घ्यावी, त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ  शकते.

तसंच संबंधित वेबसाइटवरून गोष्टी खरेदी करण्यापूर्वी इतर ग्राहकांनी त्या वस्तूखाली त्यांना आलेल्या अनुभवांची माहिती दिलेली वाचणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे ग्राहकांनी दिलेले शेरे वाचून आपण खरेदी करण्यापूर्वी योग्य निर्णय घेऊ  शकतो.

खाद्यपदार्थ किंवा तत्सम नाशवंत गोष्टी खरेदी करताना एक्सपायरी तारीख, त्या खाद्यपदार्थाची किंवा क्रीम-परफ्युम्ससारख्या सौंदर्यप्रसाधनांची अर्हता या बाबी तपासून घेणं अत्यावश्यक आहे. अनेकदा अशा सेलमध्ये एक्सपायर झालेल्या किंवा थोडय़ाच दिवसांत ती संपणार आहे अशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे अशा गोष्टींची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.

खरेदी झाल्यानंतर पैसे देताना ग्राहकांना डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर नमूद असणारे आर्थिक तपशील भरावे लागतात. त्यामुळे आपण वापरत असलेल्या कार्डशी निगडित असलेल्या बँकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असेल तरच त्याचे तपशील भरावेत. आपल्या बँकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाइन वेबसाइटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत. तसंच अ‍ॅप्लिकेशन्सवरून खरेदी करताना कार्ड तपशील कायमस्वरूपी तिथेच सेव्ह होत असल्याने अ‍ॅप्लिकेशनच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. ऑनलाइन पेमेंटऐवजी अनेक जण शक्यतो ‘कॅश ऑन डिलिव्हरी’च्या पर्यायाची निवड करतात. त्यामुळे खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रकमेचा घोळ होत नाही.

खरेदी झाल्यानंतर आलेले ई-बिल तपासून घ्यावे. त्याची कॉपी जमल्यास भविष्यात उपयोगी ठरेल म्हणून सेव्ह करून ठेवावी. ऑनलाइन खरेदी करताना खरेदी केलेली वस्तू किंवा पैसे परत घेतल्या जात असतील किंवा वस्तू बदलून मिळत असतील तरच ऑनलाइन खरेदी करा. त्याचा पर्याय उपलब्ध आहे का, त्याची पद्धत काय आहे, त्याची सुविधा वेबसाइटवर देण्यात आलेली आहे का, त्यासाठी किती कालावधी देण्यात आलेला आहे, हे पाहून घ्यावे. खरेदी केलेल्या वस्तूचे पॅकेज उघडताना शक्यतो त्याचा व्हिडीओ करा. पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज किंवा दुसरी असेल, तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल आणि एक्स्चेन्ज किंवा रिफंडचा दावा करताना सोयीचं ठरेल.

मौल्यवान वस्तू जर स्वस्त दरात ऑनलाइन कुठेही विकली जात असेल, तर शक्यतो ती वस्तू विकत घेण्यापूर्वी त्याची अर्हता तपासून घ्यावी. त्यासाठी कस्टमर केअर सव्‍‌र्हिसचा वापर करता येतो. संबंधित वस्तू महाग असताना ती कमी किमतीत का विकली जाते आहे, याचा विचार खरेदी करताना केला पाहिजे. पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय ती वस्तू खरेदी करू नये.

खरेदी करताना आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा ‘पिन’ देऊ  नका, सीसीव्ही नंबर आणि कार्डच्या मागील सिक्युरिटी नंबर, ग्रीड नंबर दुसऱ्या कोणालाही पेमेंट करण्यासाठी देऊ  नका. ही सर्व माहिती तुम्ही स्वत: भरा. ऑनलाइन खरेदी करताना या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे, तरच तुमची संभाव्य फसवणूक टाळली जाऊ  शकते.

तसंच कोणत्याही वेबसाइटवर तुमचा ‘आधार क्रमांक’ किंवा ‘बँक खाते क्रमांक’ किंवा तुमच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित गुप्त क्रमांक नोंदवू नका. जन्मतारीख देणे टाळा. क्रेडिट कार्डचा क्रमांक, जन्मतारीख माहिती असल्यास हॅकर्ससाठी तुमच्या खात्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य होऊ  शकतं.

ऑनलाइन शॉपिंगसाठी दिल्या जाणाऱ्या आकर्षक ऑफर्स आणि भेटवस्तूंच्या मोहामुळे आता अनेक जण या पर्यायाला पसंती देऊ  लागले आहेत. मात्र, ऑनलाइन व्यवहार करताना काही अत्यावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा मोठा तोटाही सहन करावा लागतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना आपण कोणत्या वेबसाइटवरून खरेदी करत आहोत, काही समस्या आल्यास त्यांच्याकडून त्याचे निवारण करण्यासाठी काही यंत्रणा आहे का, याची खात्री ग्राहकांनी करून घेणे आवश्यक आहे; तरच ऑनलाइन फसवणूक टाळली जाऊ  शकते. अन्यथा त्याचा फटका ग्राहकांना बसतो. शॉपिंग करताना या काही गोष्टींचे भान ठेवले तरच या घसघशीत ऑफर्सचा फायदा घेत खरेदीचा आनंद आणखी द्विगुणित होईल..