रघुनाथ फाटक, सिएरा लिओन

जुलै महिन्याच्या अखेरीस माझ्या कंपनीने (ब्लिस जीव्हीएस) मला सिएरा लिओन आणि लायबेरिया या दोन ठिकाणी पोस्टिंग दिलं. आमच्या कंपनीचा त्या भागात चांगलाच जम बसला आहे. पण त्यांना एक भारतीय माणूस स्वत:हून ठाण मांडून बसणारा पाहिजे होता. मीटिंगमध्ये दोन वर्षांसाठी मला तिकडे पाठवायचं ठरलं. तसं बघायला गेलं तर आफ्रिका माझ्यासाठी नवीन नाही. याआधी माझं पोस्टिंग टांझानिया आणि केनियात झालं होतं. पण त्यानंतरची आठ र्वष मी म्यानमारमध्ये घालवली होती. एकदम शांत अशा साऊथ ईस्ट आशियातून परत वेस्ट आफ्रिकेत जाणं जरा अवघड होतं. पण मीटिंगमध्ये एकदम ‘हो’ म्हणून बसलो होतो. या वेळी एकटं जायचं आणि देशाचा रागरंग बघून गोतावळा हलवायचा असं ठरलं.

वाटलं, कसा असेल हा देश? कितीही झालं तरी आफ्रिकाच, त्यामुळे एक प्रकारची भीती होतीच, त्याचबरोबर काही तरी वेगळं पाहायला मिळणार, हा आनंदही होता. इथे भारतीय लोक, देऊळ, शाळा, हॉटेल आणि ग्रोसरी शॉप्स असतील का?, यासारखे प्रश्नही मनात होतेच. पूर्वी एकदा ‘ब्लड डायमंड’ नावाचा चित्रपट पाहिला होता. त्याची आठवण झाली. तो चित्रपट सिएरा लिओनमधील हिरे खाण आणि तेथील यादवीवर होता. त्या ‘ब्लड डायमंड’च्या आठवणी डोक्यात घोळवत मी इथिओपियन एअर लाइन्सने मुंबई – एडिस – अबाबा (इथिओपिया) -अक्रा (घाना) ते फ्रीटाऊन शहर (सिएरा लिओन) असा २२ ते २४ तासांचा प्रवास करून पोहचलो.

अपेक्षेप्रमाणे फ्रीटाऊनच्या एअरपोर्टवर कोणतीही अपेक्षा न ठेवता मी उतरलो. ४० ते ५० ट्रॉलीज आणि त्या देण्यासाठी असलेला गोंधळ हा सगळा प्रकार पाहून आम्ही मारुतीरायाला स्मरून, लगेज घेऊन बाहेर पडलो. त्याआधी इमिग्रेशन आणि लगेज काउंटरवर पाच डॉलर ‘इदं न मम’ झाले. (आफ्रिकेत इमिग्रेशन डेस्कवर पैसे मागितले नाहीत, तर मलाच कधी कधी चुकल्यासारखं होतं). इथे प्रत्येक गोष्टीसाठी पैसे का मागतात? कारण सरकारी नोकरांपासून ते सामान्य माणसापर्यंत सगळेच अतिशय तुटपुंज्या पगारावर नोकरी करतात. प्रचंड महागाई! त्यामुळं कोणीही भेटलं तरी छानपैकी चौकशी करतात आणि भेटीचा शेवट पैसे मागून होतो. काही दिवसानंतर हा प्रश्न, सोबत कुकीज किंवा छोटे बिस्किट पुडे देऊन संपवला.

विमानतळावरून बाहेर आल्यावर समोर काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज बांधत होतो, तेव्हा पहिला झटका मिळाला. मी फ्रीटाऊन या शहरात पोहचलोच नव्हतो. मी ज्या विमानतळावर उतरलो होतो, त्या बेटाला ‘लुंगी’ म्हणतात आणि त्याचं नाव ‘लुंगी इंटरनॅशनल एअरपोर्ट’ आहे. इथून फेरीबोटीने किंवा हेलिकॉप्टरने शहरात जाता येतं. बोटीने ४० डॉलर आणि हेलिकॉप्टरला ८० डॉलर घेतात. हा प्रवास सी-फेरी नावाने ओळखला जातो आणि त्या प्रवाशांना अबर्दिन जंक्शन या शहराच्या ठिकाणी सोडतात. कीसी जंक्शनला अक्रॉस द फेरी आहे. त्या कारसहित प्रवाशांची ने-आण करतात. अबर्दिन जंक्शनपासून मामी याको, फॅमिली किंगडम, चायना टाऊन अशी चांगली हॉटेल राहायला आहेत. इथे परत थोडी टिप दिली की सगळं साहित्य सुखरूप मिळतं. एक चांगली गोष्ट अशी की, एकदा त्यांनी पैसे ठरवले किंवा आपण थोडीशी टिप दिली की मग हे लोक एकदम सरळ वागतात. टांझानियात, नायजेरियात किंवा केनियात होणारी सरसकट चोरी, जिवाची भीती इथे अजिबात नाहीच. रात्री-अपरात्रीसुद्धा बाहेर जाता येतं.

सिएरा लिओन या देशाच्या शेजारचे देश म्हणजे कोनाक्री, घाना, लायबेरिया आणि ग्याम्बिया. पण या सगळ्याच भागावरती घाना आणि नायजेरियाचा व्यापारी, सांस्कृतिक, आणि राजकीय प्रभाव आहे. १८०८ ते १९६१पर्यंत ब्रिटिशांनी या देशावर साम्राज्य गाजवलं. या देशाची राजधानी म्हणजे फ्रीटाऊन शहर. इथे अध्र्याहून अधिक लोकसंख्या फ्रीटाऊन, बो, कोईडू आणि केनेमा या शहरांत राहते. निसर्गसंपन्न देश म्हणजे काय, ते इथे आल्यावर समजतं. फ्रीटाऊन आणि साऊथ आफ्रिकेतील केपटाऊन ही एकाच पठडीतील दोन्ही शहरं. दोन्ही शहरांना एका बाजूने समुद्रकिनारा आणि दुसऱ्या बाजूला उंचच गर्द हिरवे डोंगर. एका पोर्तुगीज नाविकामुळे या देशाचं नाव सिएरा लिओन असं पडलं. या शब्दाचा अर्थ आहे सिंहगर्जना करणारे डोंगर. हे नाव पडण्यामागे भरपूर कारणं आहेत, पण त्यातील प्रमुख म्हणजे इथे सहा ते सात महिने जोराच्या वाऱ्यांसहित, विजा कडकडतात आणि भरपूर पाऊस पडतो. शहरात चार-पाच मोठय़ा ब्रिटिश कॉलोनियल इमारतींची आता सरकारी कार्यालये झाली आहेत. कॉटन ट्री हे ५०० वर्षांपूर्वीचं झाड शहराच्या मधोमध उभं आहे. ते प्रसिद्ध आहे ते त्याच्या पायथ्याशी होणाऱ्या गुलामांच्या विक्रीमुळे. पुढे १९०० पर्यंत ही प्रथा पूर्णपणे संपुष्टात आली.

सिएरा लिओनची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे इथे असणाऱ्या हिऱ्यांच्या खाणी. कानो आणि बो इथे हिऱ्यांच्या खाणी आहेत. एकदा ठरवून मी त्या पाहायला गेलो. जगातल्या पाच मोठय़ा हिरेनिर्यात देशांमध्ये सिएरा लिओनचं नाव येतं. हिऱ्यांबरोबरच सोनं, बॉक्साइट आयर्न, रूटाइल या खनिज पदार्थाची खूप मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. हिऱ्यांच्या खाणीतून हिरे कसे शोधतात, हे खरंच बघण्यासारखं असतं. चाळणीमधून वाळू, चिखल आणि दगडगोटे पाण्याच्या प्रवाहात धुऊन मग हळुवार नजरेखालून घातले जातात. पारंगत लोक हिऱ्याच्या वेगळ्या चमकेवरून त्या दगडमाती आणि वाळूतसुद्धा हिरे ओळखतात. लहान मुलं, तरुणांपासून ते म्हातारेकोतारेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत दगड-वाळू चाळतात. नशीब जोरावर असेल तर एका दिवसात तीन ते चार रॉ हिरे मिळतात. कधी काहीच हाताला लागत नाही. हिरे खोदताना अजूनही जुन्या पद्धतींचाच वापर केला जातो आहे. काही हुशार लोक खोटे हिरे घेऊन प्रवाशांना हिरे म्हणून विकायचा प्रयत्न करतात.

फ्रीटाऊन शहर हे व्यापाराचं मुख्य केंद्र. सगळ्या देशाचा आर्थिक, राजकीय कारभार इथून चालतो. या देशात लेबनीज, भारतीय आणि चायनीज लोक मुखत्वे ऑटोमोबाइल, औषधं, केमिकल, हॉटेल, ग्रोसरी शॉपिंग, मॉल चालवतात. भारतीयांमध्ये सिंधी लोकांचा व्यापार जोरात चालतो आहे. या सिंधी लोकांकडचा कर्मचारी वर्ग हा अधिकांशी इंदोर, अजमेर, कोलकता आणि थोडय़ा फार प्रमाणात दक्षिण भारतातून आलेला आहे. महाराष्ट्रातून मुंबई आणि पुण्याव्यतिरिक्त छोटय़ा शहरांतून भरपूर लोक इथे आले आहेत. एकच भारतीय मंदिर विल्किन्सन रोडवरती असून त्याच्या शेजारीच ईश्वरी भारतीय हॉटेल आणि लेबनीज हॉटेल आहे. सेठ चोइतराम नावाचं खूप मोठे भारतीय चॅरिटेबल हॉस्पिटल, शॉपिंग मॉल आणि त्याचबरोबर शेठ शंकरदास या नावाची फर्म या देशात प्रसिद्ध आहे.

इथे काही जमाती त्यांच्या कामासाठी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ- खूप शिकणारे क्रिओ, व्यापार करणारे फुलानी, नोकरी करणारे टेमने वगैरे. या प्रकारच्या जवळपास १५ ते १६ जमाती आहेत. प्रत्येक जमातीची स्वतंत्र भाषा आहे, पण सगळीकडं क्रिओ ही बोलीभाषा चालते. या भाषेचं इंग्रजीशी खूप साधम्र्य आहे. माझा परिचय फुला जमातीशी झाला आहे. त्यांची आडनावं बारी, जालो, बीओस आहेत तर कोरोमा, बांगूरा, कॉन्ते कानो ही खूपदा आढळणारी आडनावं आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ‘जय रामा’ अशी साद घालत जवळजवळ सगळे व्यापारी एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. नात्यातच रोटीबेटीचा प्रकार चालतो. सिएरा लिओन आणि कोनाक्री या दोन्ही देशांत या १६ जमाती आहेत. चापालापा नावाच्या लांब ब्रेडमध्ये कुस्करून घातलेलं मांस आणि बटाटय़ाचे काप हे त्यांचं आवडीचं खाणं. रोजच्या जेवणात मात्र भात आणि त्याबरोबर कसावा, बटाटा, किंवा क्रेंक्रेनची पाने कुस्करून केलेली भाजी असते. आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा मासे, मांस, पालेभाजी आणि भात खातात. कधी कधी समोसा आणि बिर्याणी हे पदार्थही खूप आवडीने खाल्ले जातात. युरोप आणि भारतामधून औषधं आयात केली जातात. युरोपियन औषधं महाग असली तरी तीच घेण्याकडे सधन लोकांचा कल आहे.

माझ्याबरोबर २० सहकारी असून त्यांच्या सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे नायजेरिअन पॉप साँग, भारतीय सिनेमा आणि गाणी. फुटबॉल आणि सॉकरच्या सामन्यांच्या वेळी ऑफिसला दांडी मारणारे महाभाग इथे भरपूर आहेत. काही तरुण मुलं खूपच सकारात्मक विचार करतात. ‘जेम्स कोरोमा’ हा मला भेटलेला अतिशय मेहनती असा तरुण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. छोटय़ा चणीचा, भरपूर बोलका. खूप मोठ्ठी स्वप्नं बघणारा. अगदी लहान वयात गृहस्थाश्रमात दाखल झालेला. प्रचंड व्यापार करायची हौस असणारा आणि पराकोटीचा सकारात्मक विचार करणारा. त्यांच्या घरासमोरच मिसेस कोरोमांनी दुकान थाटले आहे. आमच्या ऑफिसमधून तिला उधार आणि घाऊक दर दिला, यामुळे खूश होऊन मिसेस कोरोमाना आमची दृष्ट काढायची होती. ही धडपड बघून कधी कधी डोळ्यांत पाणी येतं. अगदी साध्या गोष्टीसुद्धा या लोकांना महत्प्रयासाने मिळतात. प्रत्येक कुटुंबात चार ते पाच मुलं. शिक्षणाचा अभाव आणि दारिद्रय़ हे प्रत्येक घरातील चित्र आहे. शिक्षण नसल्यामुळे भविष्याचं गांभीर्य नाही. दारिद्रय़ामुळे पोट भरणं, हा एकच विचार त्यामुळे उद्याचा विचार नाही.

‘ब्लड डायमंड’ हा चित्रपट याच देशात झालेल्या राजकीय यादवी युद्धावरती आहे. राजकीय सरशीसाठी शस्त्रसाठा आणि त्यासाठी तस्करी करून विकलेले हिरे, लहान मुलांना शस्त्र शिक्षण देऊन त्यांच्या हातात दिलेली एके ४७ रायफल, त्यांच्याकडूनच करून घेतलेल्या हत्या, त्यांना लावलेल्या नशेच्या सवयी अशा खऱ्या घडलेल्या गोष्टी पाहून मन सुन्न होतं. ही यादवी २००४ मध्ये थांबली. पण या यादवीमध्ये होरपळलेले भरपूर लोक इथे भेटले. सेंट मेरी या शॉपिंग मॉलबाहेर मला टांबा सा काउंजा हा निवृत्त मिलिटरी कमांडो भेटला. रेबेल ग्रुपनं या कमांडोच्या दोन्ही हाताचे तळवे तोडून त्याला शहरात पाठवलं होतं. यादवी युद्धाची झळ पोहचलेला हा पहिला सैनिक, पण युद्ध झाल्यानंतर सगळे लोक या सैनिकाला अगदी सन्मानाने वागवतात. त्याच्या खिशात पैसे ठेवतात. त्याच्या घरासाठी लागणाऱ्या वस्तू त्याला भेट म्हणून देतात. गेली १० ते १५ वर्ष तो त्या शॉपिंग मॉलबाहेरच बसून असतो.

निसर्गानं जे सौंदर्य उधळले आहे त्याचं उपयोजन करून आपली प्रगती करून घ्यायची वृत्ती इथल्या लोकांत नाही. निसर्गाने भरभरून देऊनसुद्धा भगीरथ प्रयत्न करणारे हात नाहीत, हेच त्यांचं दुर्दैव. सहा-सात महिने पाऊस असूनसुद्धा पाण्याचं व्यवस्थापन जवळजवळ नाहीच. त्यामुळे पाणी आणि वीज अशा गोष्टी रामभरोशावर चालतात. युरोपियन युनियन आणि इतर परदेशी देशांच्या उपकारांवर या देशाचा गाडा चालतो. देशात उत्पादन म्हणावं तर शून्य आहे. सारं काही निर्यातीवर आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवर ढकलायचे. सरकारी पातळीवरील भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचंड गंभीर आहे. युरोपियन देश आणि चीनने इथली खनिज संपत्ती अगदी ओरबाडून खाल्ली आहे. हा देश थोडा स्थिर होतोय, असं वाटत असताना २०१४ मध्ये ‘इबोला’ आजाराने त्यांना परत एका मोठय़ा गर्तेत ढकलून दिलं. इबोलाच्या तडाख्यात इथली सगळी आरोग्यव्यवस्था कोलमडून गेली. ३५०० लोक दगावले. कित्येक लोक देश सोडून पळून गेले..

एका अर्थी, बरं झालं मी इथे आलो. खूप काही करायचं बाकी आहे. तसंच आपण किती भाग्यवान आहोत, हे इथे आल्यावर समजलं. बाकी कामानिमित्त आणखी कुठे कुठे फिरावं लागणार, हे देवालाच ठाऊक. तोपर्यंत तरी ‘ब्लड डायमंड’च्या देशात राहायचं आहे.

संकलन : राधिका कुंटे

viva@expressindia.com