21 October 2019

News Flash

जुळवाजुळव एथनिकची!

गेटअपला कम्फर्टेबल करण्यासाठी एखादाच एलिमेंट ठळक घेऊन बाकीच्या गोष्टी त्याला पूरक ठरतील अशा वापरता येतात.

| November 8, 2018 05:02 am

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

सण-समारंभ म्हटले की पहिली तयारी करायची असते ती म्हणजे कपडय़ांची! पूर्वी कधीकाळी फक्त सणासुदीला म्हणजे खरं तर अनेकदा फक्त दिवाळीच्या वेळीच किंवा कोणा जवळच्या लग्नासाठी, नवीन कपडय़ांची खरेदी होत असे. त्या वेळी घेतले जाणारे कपडे हे आपोआपच ट्रॅडिशनलच्या जवळपास जाणारे असत. आता मात्र वर्षभर नेहमीच शॉपिंग होत असतं. त्यामुळे प्रत्येक वेळी असे कपडे निवडले जातात जे वर्षभर इतर वेळेलाही वापरता येतील. यातूनच ‘मिक्स अँड मॅच’च्या विचाराला चालना मिळाली आणि संपूर्ण ट्रॅडिशनल वेअरऐवजी एथनिक सिंगल्स घेऊन ते पेअर करायला सुरुवात झाली.

ट्रॅडिशनल आणि एथनिकमध्ये असणारा हलकासा फरक म्हणजे ट्रॅडिशनल हे विशिष्ट प्रकारच्या कपडय़ांपुरतं मर्यादित असतं मात्र एथनिक वेअरमध्ये सगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल वेअरचा समावेश होतो. दोन वेगळ्या भागातले किंवा वेगळ्या प्रकारचे ट्रॅडिशनल वेअर एकत्र करून किंवा एक ट्रॅडिशनल आणि एक वेस्टर्न एलिमेंट घेऊ नही एथनिक लुक तयार करता येतो. उदाहरणार्थ, पंजाबी ट्रॅडिशनलमधली पटियाला सलवार आणि क्रॉप टॉप किंवा घागरा आणि क्रॉप टॉप असं पेअरिंग करून त्याला पूरक ठरतील अशा मोजक्याच अ‍ॅक्सेसरीज घालून एथनिक लुकला ‘कम्फर्टेबल’ही करता येतं.

गेटअपला कम्फर्टेबल करण्यासाठी एखादाच एलिमेंट ठळक घेऊन बाकीच्या गोष्टी त्याला पूरक ठरतील अशा वापरता येतात. काही एलिमेंट्स प्रामुख्याने उठून दिसण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या इतर गोष्टी काही प्रमाणात फिक्या असाव्या लागतात. या फेस्टिव्ह सीझनला सण साजरे करताना आणि इतरांचे लग्नसमारंभ एन्जॉय करताना नेहमीपेक्षा वेगळ्या एलिमेंट्सवर लक्ष द्या आणि आपला एथनिक लुक पूर्ण करा!

दुपट्टा :

दुपट्टा हा प्रामुख्याने पंजाबी ड्रेसवर घेतला जातो. त्यामुळे तो ड्रेसला पूरक ठरेल आणि ड्रेसचं सौंदर्य वाढवेल असा असतो. मात्र दुपट्टा केवळ पंजाबी ड्रेसचा जोडीदार राहिलेला नसून तो आता आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. हेवी दुपट्टा आणि सिंपल ड्रेस हे कॉम्बिनेशन तर सर्वाचं प्रिय बनलेलं आहे. हेवी दुपट्टय़ांमध्ये फुलकारी, बनारसी सिल्क, चंदेरी हे प्रकार हलक्या रंगाच्या कॉटनच्या ड्रेससोबत उठून दिसतात. मात्र दुपट्टा केवळ पंजाबी ड्रेससोबत पेअर न करता क्रॉप टॉप आणि फ्लेअर्ड स्कर्टवर किंवा धोती पँट्स आणि शॉर्ट कुर्त्यांवरही घेता येऊ  शकतो. या पेअरिंगमध्ये खूप हेवी दुपट्टय़ापेक्षा जरदोसी वर्कचा किंवा कांथा वर्कचा कमी हेवी असलेला मात्र कपडय़ाला ‘फॉल’ असणारे दुपट्टे जास्त योग्य ठरतील. थंडीचा काळ असल्यामुळे लोकरीची काश्मिरी आरी किंवा मेहरुनिसा एम्ब्रॉयडरी असलेला दुपट्टाही ट्रेण्डी ठरेल. एखादे वेळी दुपट्टा म्हणून काश्मिरी पश्मिना शालही ट्राय करता येईल. काठांना थोडी हेवी बॉर्डर किंवा टॅसल्स असलेले लिनेनचे प्लेन दुपट्टेही कॉटन ड्रेससोबत पेअर करता येतील.

जॅकेट्स :

विविध एम्ब्रॉयडरी असलेली हेवी जॅकेट्स केवळ लुकमध्ये भर घालत नाहीत तर थंडीच्या वातावरणालाही सूट होतात. हॅरम किंवा धोती पँट्स या दिवसभर वावरायला कम्फर्टेबल असतात. कॉटनच्या हॅरम किंवा धोतीवर कॉटनची शॉर्ट कुर्ती आणि एखादं हेवी जॅकेट पेअर केलं तर त्याने साध्या कॉटनलाही उठाव येतो. चिकनकारी, लखनवी आणि फुलकारी जॅकेट्स प्लेन कुर्तीवर पेअर करता येतात. फिक्या रंगाच्या कॉटनच्या कुर्तीवर खादीची प्लेन जॅकेट्सही उठून दिसतात. त्यावर एखादा ठळक नेकपीस घातला तर तो लुक जास्त खुलून दिसतो. हेवी नेकपीस किंवा हेवी इअररिंग्ज प्लेन कुर्ती आणि प्लेन जॅकेटला कॉम्प्लिमेंट करतात. शॉर्ट जॅकेट्सऐवजी लाँग अँकल लेंग्थ किंवा काफ लेंग्थ जॅकेट्सही फिटेड टॉप्सवर पेअर करता येऊ  शकतात. मात्र त्यासाठी बॉटमही फिटेड, जीन्स किंवा चुडीदार अशी असावी लागते. लाँग जॅकेट्सना साधारणत: गोल किंवा कॉलर असलेला गळा असतो. त्यामुळे त्यावर नेकपीस घालण्याऐवजी लाँग चेन आणि हेवी पेंडंट किंवा हेवी इअररिंग्ज किंवा झुमके जास्त सूट होतील.

पलाझो आणि स्कर्ट्स

पलाझो आणि स्कर्ट्समध्ये स्ट्रेट फिट आणि फ्लेअर्ड असे दोन प्रकार असतात आणि दोन्हींवर टॉपचे वेगवेगळे प्रकार पेअर होतात. स्ट्रेट फिट पलाझो आणि स्कर्ट्सवर लूज क्रॉप टॉप्स आणि शॉर्ट टॉप्स पेअर करता येतो. फ्लेअर्ड स्कर्ट आणि पलाझोवर फिटेड टॉप्स जास्त योग्य दिसतात. फिटेड टॉप्सवर दुपट्टा किंवा हेवी नेकपीस घालता येऊ  शकतो. लूज टॉप्सवर शक्यतो दुपट्टा किंवा हेवी नेकपीस न घालता हेवी इअररिंग्ज किंवा झुमके अधिक उठून दिसतात. शॉर्ट स्कर्ट किंवा क्युलोट्समध्ये टॉप इन करून हेवी एम्ब्रॉयडरीचा वेस्टबेल्ट पेअर केला तर तेसुद्धा हटके कॉम्बिनेशन ठरेल.

या सगळ्या पेअरिंगमध्ये एथनिक लुक टिकून राहण्यासाठी लुकच्या मुख्य एलिमेंटमध्ये पारंपरिक वर्क, एम्ब्रॉयडरी, फॅब्रिक असेल याची काळजी घ्यायला हवी. नेकपीस किंवा कोणत्याही अ‍ॅक्सेसरीज निवडताना त्याचं डिझाइन एथनिक असेल याकडेही लक्ष द्यायला हवं. ऑक्सिडाइज्ड सिल्व्हरची ज्वेलरी किंवा रस्टिक गोल्ड हे एथनिक लुक पूर्ण करतील. फुटवेअरमध्ये मोजडी किंवा चप्पल या सगळ्या लुकला साजेशा दिसतील. सँडल घालायची असेल तर हील आणि बेल्ट्सवर कलमकारी प्रिंट असलेल्यांना प्राधान्य देता येईल. सध्या एथनिक फुटवेअरमध्ये प्रिंटेड आणि हॅण्ड पेंटेड चप्पल, सँडल्स, मोजडी ट्रेण्डमध्ये आहेत. मात्र कोणतं डिझाइन कशासोबत पेअर करायचं यासाठी स्वत:ची कल्पकता वापरावी लागेल. येणाऱ्या दिवाळीला आणि लग्नसमारंभांना आपला लुक हटके ठेवण्यासाठी या टिप्सचा नक्की उपयोग होईल!

viva.loksatta@gmail.com

First Published on November 8, 2018 3:54 am

Web Title: article about matching ethnic cloths