अमित मराठे, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया

हेय मेट! हाऊ इज गोईंग? मी अमित मराठे. मी मूळचा पुण्याचा, सध्या मेलबर्नला असतो. जगात मेलबर्न जगभरातली मोस्ट लिव्हेबल सिटी आहे, असं म्हणतात आणि ते का म्हणतात ते मला इकडे आल्यावर कळलं. दीड वर्षांपूर्वी मी मेलबर्नला माझं मास्टर्स करायला आलो. एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या पहिली गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे स्वच्छता आणि शिस्त. ट्रॅफिकचे नियम इथले लोक फारच काटेकोरपणे पाळतात, त्यामुळे प्रवास अगदी सहज वाटतो. मेलबर्नला आलो तेव्हा माझे थोडे मित्र आधीच इकडे आले होते. त्यामुळे गेल्या गेल्या मी कोणाला भेटू, काय करू असे प्रश्न पडले नाहीत. पण नंतर असं वाटलं की इथे कोणी नसतं ओळखीचं तरी फरक पडला नसता. कारण इथले लोक  खूप फ्रेंडली आहेत. इकडची शिक्षणपद्धती टू द पॉइंट आहे. त्या त्या क्षेत्रात नोकरी करायला जेवढं ज्ञान लागतं तेवढं आवश्यक ते ज्ञान आपल्याला दिलं जातं. टाइमटेबलही आपल्याला हवं तसं आपण निवडू शकतो. त्यामुळे आपण रोज कॉलेजला जायचं की, दोन-तीन दिवस जायचं ते आपलं आपल्याला ठरवता येतं. इथली परीक्षा पद्धतीही एकदम सुटसुटीत आहे. वीकली असाइनमेंट सबमिट करा आणि मार्क्‍स मिळवा; नाही तर फेल व्हा, चॉइस इज युवर्स! त्यामुळे सेमिस्टरच्या अभ्यासाचा लोड येत नाही. अभ्यासाचे विषयही आपले आपण निवडू शकतो. त्यामुळे सहसा इतर देशांतले विद्यार्थी इकडे येऊ न कॉलेज आणि पार्ट टाइम जॉब करतात. कारण जेवढय़ा सोयीसुविधा उपलब्ध आहेत, तेवढाच त्यांचा खर्च आहे. हे सगळे खर्च भागवायला जॉब करणं गरजेचं आहे. या गोष्टीची दुसरी बाजू अशी वाटते की, इकडे मुलं वयाच्या १७-१८ व्या वर्षांपासून काम करून शिकून स्वतंत्र राहतात व स्वावलंबी होतात; तर मग आपण का नाही हे करू शकत? शिवाय जॉब करायचे अनेक फायदे आहेत. पैसे तर मिळतातच पण त्याबरोबर नवीन ओळखी होतात आणि इकडची संस्कृती समजायलाही मदत होते. इथल्या तरुणाईचा कामाच्या वेळी काम आणि मजा करायच्या वेळी मजा, असा सरळ फंडा आहे.

मी सध्या एका आंतरराष्ट्रीय फ्रेईट कंपनीमध्ये वेअरहाऊस असिस्टंट म्हणून काम करतो. काम अगदी साधं सरळ असतं, पण त्याचा मोबदला आपल्या अपेक्षेपेक्षा बराच मिळतो. त्यामुळे काम करायला उत्साह येतो आणि इकडचं वर्क कल्चरही जाणून घ्यायला मदत होते. इथे सोमवार ते शुक्रवार साडेसात तास काम करतात. त्यापुढे एक मिनिटही काम करत नाहीत. शब्दश: कामाची वेळ संपली की हातचं काम टाकून घरचा रस्ता पकडतात. इकडे काम करणाऱ्या माणसांना सरकारचा खूप पाठिंबा आहे आणि यासाठी बरेच नियम आहे. वर्क राइट्स, ह्युमन राइट्स, वर्क सेफ्टी आणि मिनिमम व्हेजेस यासाठी बरेच नियम व कायदे आहेत. ते नाही पाळले गेले तर त्याचा भरुदड कंपन्यांना बसतो. त्यामुळे कामाचं प्रेशर नसतं जास्त. पण अर्थातच टारगेट आणि परफॉर्मन्स हा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. आपलं (भारतीय लोकांचं) इंग्रजी चांगलं असल्यामुळे भाषेचा प्रश्न फारसा उद्भवत नाही. मात्र चायनीज लोकांना काही वेळा भाषिक अडथळा जाणवतो.

इथल्या सोयीसुविधा आणि त्या मिळवण्याची प्रोसेस तुलनेने चांगली आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने सगळ्या गोष्टी ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. ही ऑनलाइन माहिती अ‍ॅक्सेस करण्यासाठी जागोजागी फ्री वायफाय उपलब्ध करून दिले आहेत. इकडचे सव्‍‌र्हर कधी डाऊ न होत नसतात आणि होणार असतील तर त्याची अ‍ॅडव्हान्स नोटीस मिळते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकदम परफेक्ट आणि इंटरकनेक्टेड आहे. बस, ट्रेन, ट्राम यांचं वेळापत्रक असं आखलं गेलं आहे की प्रवाशांना फार वेळ वाहनासाठी ताटकळत राहावं लागणार नाही. त्यामुळे इकडचे ६० ते ७० टक्के लोक मग ते वर्किंग क्लासपासून ते ऑफिसमध्ये डेस्कजॉब करणाऱ्यांपर्यंत असे सगळेच सार्वजनिक वाहतूक वापरतात.

एकदा ट्रेनमधून येताना घाईगडबडीत माझं पाकीट ट्रेनमध्ये राहिलं. त्यात माझं बँक कार्ड, आयडी कार्ड अशा महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मला खूप टेन्शन आलं. कारण या सगळ्या गोष्टी पुन्हा मिळवण्यासाठी खूप वेळ लागला असता. पण मित्रांनी दिलासा देत सांगितलं की मेट्रो ट्रेनच्या लॉस्ट आयटम्समध्ये तक्रार रजिस्टर कर आणि सगळे डिटेल्स दे; मिळेल तुझं पाकीट होतं तसं. आणि खरंच दोन दिवसांत त्यांचा फोन आला की तुमचं पाकीट लॉस्ट अँड फाउंड डिपार्टमेंटमध्ये आहे. आता याला नशीब म्हणावं की इथल्या लोकांचा प्रामाणिकपणा.. आणि देवकृपेने आतापर्यंत तरी मला असा कुठलाच वाईट अनुभव आलेला नाही. यंदा पहिल्यांदाच इथले ख्रिसमस सेलिब्रेशन अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे तेव्हाचा माहौल कसा असेल अशी उत्सुकता वाटते आहे. काही प्लॅन्स ठरत आहेत, बघूया कसं काय जमतं आहे ते..

माझे बरेच ऑस्ट्रेलियन, ब्रिटिश, कोलंबियन फ्रेंड्स झाले आहेत. त्यातले काही युनिव्हर्सिटीमधले आहेत, काही फुटबॉल क्लबमधले आहेत तर काही ऑफिसमधले आहेत. मित्रमंडळींच्या गप्पांमधला सर्वात महत्त्वाचा विषय असतो, तो म्हणजे वीकएण्डला काय करणार? कारण वीकएण्ड म्हणजे सुट्टी आणि धमाल! कधी बाहेर जायचे प्लॅन ठरतात. कधी कुणाच्या घरी पार्टी करायचं ठरतं. तर कधी बाहेर खायला-प्यायला जायचं ठरतं. स्पोर्ट्स हा तर केवळ महाचर्चेचाच विषय असतो आम्ही भेटलो की. मग तो फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, नाही तर कुठलाही स्पोर्ट्स असू दे. दुसरा एक ग्रुप म्हणजे आमचा पुण्याचा ग्रुप. आम्ही जवळपास पंधराजण पुण्याचे आहोत. बराच वेळ त्यांच्याबरोबरच जातो. आम्ही मराठी बोलत असल्यामुळे आपण परदेशात आहोत, असं वाटतच नाही. अर्थातच घरची आठवण येतेच. ही गोष्ट बदलू शकत नाही. मी इथे यायच्या आधी आईने जणू एक अटच घातली होती की काहीही झालं तरी दिवसातून एकदा तरी फोन करायचाच आणि ती मी अट कायमच पाळत आलो आहे.

इथली जीवनशैली आणि राहणीमान एकदम आधुनिक विचारांचं आहे. सोमवार ते शुक्रवार काम आणि वीकएण्ड मनोरंजनासाठी राखीवच असतात. सुट्टीच्या काळात लोक स्पोर्ट्स, म्युझिक, कॅम्पिंग, हायकिंग, अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिविटीज अशा खूप काय काय गोष्टी करतात. मी स्वत: फुटबॉल खेळतो, आणि तो इथेही खेळायला मिळाल्यामुळे मला अर्थातच बरं वाटलं. इथे नजर जाईल तिथपर्यंत हिरवीगार मैदानं असतात. खेळात राजकारणाला जागाच नसते. तर आपला परफॉर्मन्स पारखला जाऊन आपल्याला संधी दिली जाते आणि आपण मेहनतीच्या जोरावर पुढे जाऊ  शकतो. मी सध्या थ्रॉनबरी युनायटेड क्लबतर्फे खेळतो आहे. मेलबर्नमध्ये आणि आजूबाजूला बघण्यासारखी खूप छान ठिकाणं आहेत. उदाहरणार्थ मेलबर्न झू, फिलीप आयलँडवरची पेंग्विन परेड, विंटरमध्ये माउंट होथामलवर होणारा स्नो फॉल, ग्रेट ओशन रोड, पेनिसुला हॉट वॉटर स्प्रिंग्ज, सेंट किल्डा बीच, सोरोंटो बीच आणि बरंच काही. यापैकी मी फिलीप आयलँड आणि माउंट होथामलला जाऊ न आलो आहे. छान रिफ्रेशिंग एक्सपिरियन्स होता तो. इकडे खूपच निसर्गसौंदर्य आहे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे हे सौंदर्य अद्यापही टिकून आहे. एकूणातच इकडची शिक्षणपद्धती, वर्क कल्चर, संस्कृती, जीवनशैली आणि निसर्गसौंदर्य बघून पटतं की जगभरातली मेलबर्न ही मोस्ट लिव्हेबल सिटी आहे. पण शेवटी कितीही, काहीही म्हणा, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा.. हेच खरं आहे!

संकलन : राधिका कुंटे.

viva@expressindia.com