प्रशांत ननावरे

‘सर्कस’ या शब्दाचा लॅटिन भाषेतील अर्थ ‘सर्कल’ असा होतो. त्यावरूनच फार पूर्वीपासून जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी असलेल्या चौकाला ‘सर्कल’ म्हणण्याची प्रथा रूढ झालेली पाहावयास मिळते. लंडनच्या ‘सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर’मधील ‘वेस्ट एन्ड’ येथील जंक्शन हे ‘पिकाडिली सर्कल’ म्हणून ओळखलं जातं. १८१९ साली ‘रिगल स्ट्रीट’ला ‘पिकाडिली’सोबत जोडण्यासाठी या जंक्शनची निर्मिती करण्यात आली. लंडनचं हे जंक्शन आजघडीला अतिशय वर्दळीचं असलं तरी लंडनला गेला आणि ‘पिकाडिली सर्कस’ला भेट दिली नाही म्हणजे पॅरिसला जाऊ न ‘आयफेल टॉवर’ किंवा आग्र्याला जाऊन ‘ताज महाल’ला भेट न देण्यासारखं आहे.

‘पिकाडिली सर्कस’चा इतक्या प्रामुख्याने इथे उल्लेख करण्याचं कारण म्हणजे कुलाबा कॉजवेवर बेस्टच्या ‘इलेक्ट्रिक हाऊस’ या मुख्यालयासमोर असलेल्या ११५ वर्षे जुन्या ‘डोनाल्ड हाऊस’ या इमारतीच्या तळमजल्यावर वाघमुखी असलेली एक जागा. गेल्या ६२ वर्षांपासून ‘पिकाडिली रेस्टॉरंट’ म्हणून ही जागा सर्वाच्याच परिचयाची आहे. कुलाबा कॉजवेवर फिरायला येणारा प्रत्येकजण ‘डोनाल्ड हाऊस’च्या फुटपाथवरून जाताना भल्या मोठय़ा दरवाजांमधून ‘पिकाडिली’च्या आत डोकावण्याचा प्रयत्न करत असतो आणि रेस्टॉरंटच्या आत बसलेला ग्राहक इराणी किंवा लेबनिज पदार्थाचा आस्वाद घेत त्याच दरवाजांमधून बाहेरच्या पादचाऱ्यांना न्याहाळत असतो.

विसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीपासूनच म्हणजेच अर्देशीर के. बुझोर्ग हे आपल्या इराणमधील तफ्त या गावातून पाकिस्तानमार्गे भारतात येत असत. तेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झालेली नव्हती. त्यामुळे सीमारेषा सहज ओलांडता येत असे. मुळात अशी काही सीमारेषाच नव्हती. पण भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि भारतात दाखल झालेल्या अर्देशीर यांचा हा प्रवास थांबला. भारतात दाखल झालेले बहुतांश इराणी पुर्वीपासूनच हॉटेल व्यवसायात होते. अर्देशीर यांनाही त्याचं आकर्षण होतं. तेव्हा त्यांनी १९५७ साली गुलरूका ए. अर्देशिरी यांच्या साथीने ‘पिकाडिली रेस्टॉरंट’ची सुरुवात केली. १९४७ साली ब्रिटिश भारतातून गेले असले तरी पुढील काही काळ त्यांचा प्रभाव कायम होता. ‘पिकाडिली’ हे त्याचं ठसठशीत उदाहरण म्हणावं लागेल.

‘पिकाडिली’ सुरू झालं तेव्हा कुलाबा कॉजवेवरील रिगलपासून ते स्ट्रॅन्ड सिनेमापर्यंत ८ ते ९ इराणी रेस्टॉरंट होती. माँडेगर, लिओपोल्ड, युनियन जॅक, अटलांटिक स्टोर्स, एडवर्ड दि एथ, कॅ फे पॅराडाईज, शिहाय हे चायनीज रेस्टॉरंट आणि पिकाडिली ही त्यांची नावं. त्यापैकी आता केवळ माँडेगर, लिओपोल्ड आणि पिकाडिली ही तीनच रेस्टॉरंट शिल्लक आहेत. तसं पाहायला गेलं तर लिओपोल्डच्या समोर ऑलिम्पियादेखील आहे. पण ते आता चिलिया रेस्टॉरंट झालंय.

वाघमुखी जागा, उंच छत, फ्रेंच पद्धतीच्या मोठाल्या खिडक्या, दरवाजे, छताला लटकणारे पंखे, बेंडवूडच्या लाकडी खुच्र्या, टेबलं, त्यावर चेकार्ड टेबलक्लॉथ, वर मेन्यू आणि काच, इराणी रेस्टॉरंटची ओळख असलेल्या पपई रंगाने रंगवलेल्या भिंती या वैशिष्टय़ांसह ‘पिकाडिली’चीही सुरुवात झाली होती. एक गोष्ट मात्र इथे नव्हती ती म्हणजे इराणी हॉटेलमध्ये भिंतींना दिसणाऱ्या मोठाल्या काचा. पण ‘पिकाडिली’ची रचना पाहता त्याच्या एकाच बाजूला मोठी भिंत आहे आणि इतर दोन बाजूंना खिडक्या आणि दरवाजे. त्यामुळे कदाचित अर्देशीर यांनी काचा लावण्याचा मोह टाळला असावा. त्याऐवजी भिंतीवर दिसतं इराणमधील पर्सोपोलिस येथील दार्युशच्या पॅलेसचा भलामोठा फोटो. अर्देशीर यांचा मुलगा परवेझ यांचा जन्मही १९५७ सालचा म्हणजेच रेस्टॉरंटच्या स्थापनेच्या वर्षांतला. परवेझ यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऐंशीच्या दशकात रेस्टॉरंटची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. खरं तर ग्रॅज्युएशननंतरच त्यांच्या वडिलांनी त्यांना व्यवसायात लक्ष घालायला सांगितलं होतं. पण त्यावेळी त्यांनी प्रांजळपणे त्याला नकार दिला. परंतु ऐंशीच्या दशकात वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांनी यामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. त्यानंतरही काही काळ रेस्टॉरंटची जबाबदारी भागीदारावर सोपवून परवेझ कॅनडामध्ये स्थायिक झाले होते.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला परत भारतात येत त्यांनी ‘पिकाडिली’चा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. कारण काळाप्रमाणे आपणही बदलायला हवं हे त्यांनी जाणलं. पूर्वीच्या लाकडी खुच्र्या आणि टेबलं जाऊन आता त्याची जागा स्टीलच्या खुच्र्या आणि टेबलांनी घेतली आहे. पण त्यांची रचना इराणी कॅ फेसारखीच ठेवलेली आहे. सुरुवात झाली तेव्हा बन मस्का, ब्रून मस्का, खिमा पाव आणि इराणी चहा यांसारखे पदार्थच येथे मिळत असत. पण जसजसा काळ पुढे सरकला तसतसे नवीनवीन खाद्यपदार्थ मेन्यूमध्ये दाखल होत गेले. आजघडीला पारशी, लेबनीज, इराणी पदार्थासोबतच सँडविच, रोल्स, बर्गर, पिझ्झा, पास्ता आणि इतर नॉनव्हेज पदार्थही येथे मिळतात. मेन्यूमध्ये नवीन पदार्थ दाखल झालेले असले तरी कोणत्याच पदार्थाची प्रत खालावलेली नाही हे विशेष. खवय्यांना पदार्थाची पारंपरिक चव अनुभवता यावी यासाठी त्यांनी स्वत: इराणला जाऊन तिथल्या चवीचे पदार्थ कसे तयार होतात याचं प्रशिक्षण घेतलं आणि इथे येऊन आपल्या आचाऱ्यांना ते शिकवलं. अशा प्रकारे परवेझ यांनी त्यांची खाण्याची आणि लोकांना खाऊ  घालण्याची आवड जपलेली आहे.

‘डोनाल्ड हाऊ स’ या इमातीमध्ये ‘पिकाडिली’सोबत कॅनन बार आणि कामत रेस्टॉरंटही होतं. पण अलीकडे इमारत जर्जर झाल्यामुळे दुरुस्ती करून त्याचं निवासी हॉटेलमध्ये रूपांतर करण्याचा चंग मालकाने बांधला. त्यावरून जागामालक आणि भाडोत्री यांच्यात संघर्ष उभा राहिला. भाडोत्रींनी मिळून मालकाकडे दुरुस्तीसाठी धोशा लावला. मालकाने त्यास नकार दिल्याने वाद न्यायालयात गेला. पण शेवटी त्याला आवश्यक ती दुरुस्ती करावीच लागली. २०१५ सालात ‘पिकाडिली’ बंद होतं. पण २०१६ च्या शेवटी रेस्टॉरंट पुन्हा सुरू झालं आणि पुन्हा एकदा दर्दी खवय्यांची येथे गर्दी होऊ  लागली.

परवेझ यांची पुढची पिढी कॅनडात स्थायिक झालेली आहे. त्यांना या व्यवसायात रस नाही. त्यामुळे जोवर मी आहे तोपर्यंत ‘पिकाडिली’ आहे, असं परवेझ सांगतात. एकेकाळी कुलाबा म्हणजे मुंबई होती. पण शहराची हद्द वाढत गेली आणि कुलाबा अज्ञातवासात गेल्यासारखं झालं. पण या परिसराच्या अनेक जागा आपल्याला इतिहासाची पानं उलगडायला मदत करतात. ‘पिकाडिली’ हेसुद्धा त्यापैकीच एक. लंडनच्या ‘पिकाडिली सर्कस’ला कधी जाणं होईल न होईल. पण तोवर त्याची आठवण मुंबईत जागवणाऱ्या रेस्टॉरंटला त्याचं शटर पुन्हा डाऊ न व्हायच्या आधी एकदा आवर्जून जाऊन यायला हवं.

viva@expressindia.com