पंकज भोसले

फेसबुक आणि इतर समाजमाध्यमांचा पहिला टप्पा आपल्या भवतालाचा पसारा वाढविण्यास उपयुक्त ठरणारा असला, तरी सध्या एक पिढी त्याद्वारे शाळा-कॉलेजच्या आठवणी आळवण्यात रमली आहे. यूटय़ूबवर हिंदुस्थानी पॉप संगीताच्या व्हिडीओजखालील प्रतिक्रियांमध्ये नव्वदीचे ते दशकच कसे संगीतासाठी सर्वोत्तम होते, याचे हजारो दाखले सापडतील.

नव्वदीच्या दशकात ऐन तारुण्यात असलेले, एमटीव्हीने संगीतभान विस्तारलेले मुंबई, पुण्यातील तरुण बॅकस्ट्रीट बॉईज किंवा बॉयझोनची गाणी कॅसेट्सद्वारे आपल्या म्युझिक सिस्टमवर उच्चरवात लावत. भारतीय संगीतातील रेहमानी प्रयोग आणि येणारी बरी गाणीही तुच्छ लेखत संपूर्ण इमारतीला किंवा परिसराला या बॅँड्सचे आंग्ल प्रेमकिर्तन ऐकवणे हा या ‘देशी संगीतछोडो’ संप्रदायाचा दिनक्रम होता. ‘यू आर माय’, ‘ओ बेबी’, ‘हनी’सारख्या प्रेमोत्कट शब्दांच्या सरीवर सरी असलेली ही गाणी कळत नाहीत, असे म्हणणे कॉलेजवयीन मुलांना कमीपणाचे वाटायचे. दोन्ही बॅण्डचा जन्म १९९३ याच सालात झाला. बॉयझोनचा महान संगीतसेनांची परंपरा असलेल्या आर्यलडमध्ये तर बॅकस्ट्रीट बॉईजचा महान कानसेनांची परंपरा असलेल्या अमेरिकेत. यंदा या दोन्ही बॅण्ड्सना पंचवीस वर्षे झाली असून त्यांना वेडय़ासारखे ऐकणारी पंचविशीतील जगातील पिढी पन्नाशीत पोहोचली आहे. बॉयझोन या बॅण्डने तयार केलेली आणि कव्हर व्हर्जनमधील सगळी गाणी आजच्या काळातही गाजली असती इतकी खणखणीत आहेत. अतिप्रसिद्धी, एका सदस्याचा अकाली मृत्यू आणि यूटय़ूबोत्तर स्टारयुगातील संगीतशैली यांच्याशी न जुळवता हा बॅण्ड आता फक्त कन्सर्टपुरता उरला आहे. याच आठवडय़ात त्यांच्या पंचवीस वर्षांतील गाण्यांचा ‘ग्रेटेस्ट हीट’ अल्बम प्रसिद्ध होणार आहे. बॅकस्ट्रीट बॉईज मात्र पुनरागमनाच्या नव्या पर्वासह सध्याच्या संगीत पटलावर दाखल झाली आहेत. पंचेचाळीस-पन्नाशीच्या घरातील या बॅकस्ट्रीट बाळांनी पुढील वर्ष आपल्या म्युझिक टुअरचे ठेवले असून ९ नोव्हेंबरला त्यांचे ‘चान्सेस’ हे गाणे प्रसिद्ध होऊन जगातील म्युझिक चार्ट्समध्ये दाखल झाले आहे. या बॅण्डने सध्या आघाडीचा तरुण गीतकार आणि गायक शॉन मॅण्डिस याच्याकडून गाणे लिहून घेतले आहे.

आजच्या काळातील तरुणाईची भाषा आणि विचार मांडणारे गाणे व्हावे म्हणून केलेला हा खटाटोप यशस्वी झाला असून, गाणे पंचवीस वर्षांपूर्वीच्या या बॅण्डच्या शैलीची जराही आठवण करून देत नाही. या बॅण्डच्या नव्वदीतील भारतीय चाहत्यांना राठ झालेल्या चेहऱ्यांतील किंवा दाढी-मिशीमधील आपले एका काळातील आवडीचे संगीत पंचक यानिमित्ताने अनुभवता येणार आहेत. मधल्या वर्षांत बॅकस्ट्रीट बॉईजची गाणी आली, मात्र त्यांचा श्रोतावर्ग पूर्वीइतका राहिला नव्हता. ‘चान्सेस’ हे या आठवडय़ातील गाणे आणि पुढील वर्षी नव्या अल्बमच्या प्रसिद्धीसाठी केली जाणारी युरोप आणि अमेरिकी शहरांतील प्रवासवारी यांमुळे नव्वदीच्या दशकासारखी जादू करतील का, हा प्रश्न मात्र कायम आहे. एकीकडे या मुख्य धारेतील आणि गाणी विक्रीचा विक्रम केलेल्या कलाकारांची पंचवीशी या आठवडय़ामध्ये जोरदार साजरी होत असताना याच दशकात प्रचंड गाजलेल्या ‘ट्रेन’ आणि ‘गू गू डॉल्स’ यांनीही नव्या अल्बम्स आणि कन्सर्ट्सच्या घोषणा केल्याने संगीत वर्तुळाचे आठवडी याद्यांवरील लक्ष काहीसे विचलीत झाले.

‘ट्रेन’ या बॅण्डची गाणी ऐकणे म्हणजे उत्साहाचा झरा आपल्या आत सामावून घेणे. या बॅण्डच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये ‘ड्रॉप्स ऑफ ज्युपिटर’, ‘फिफ्टी वेज टू सेज गुडबाय’ किंवा ‘हे, सोल सिस्टर’ ही वर असली तरी ही गाणी ऐकण्याआधी ‘शीज ऑन फायर’ हे गाणे आवर्जून ऐकून पाहा. आपल्या संगीत माध्यमांनी या बॅण्डचे हे गाणे बऱ्यापैकी लोकप्रिय केले असले, तरी मधल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या गाण्यांची अजिबात दखल घेतली गेलेली नाही. ‘गू गू डॉल्स’ या १९८० पासून अमेरिकेत कार्यरत असलेल्या बॅण्डच्या नावाची आपल्या कानांना सवय नसली, तरी त्यांच्या ‘आयरिस’ या गाण्याने १९९८-९९ प्रचंड गाजविले होते.

आपल्याकडच्या इंग्लिश एमपीथ्री संग्रहकांच्या ताफ्यात हे समूहगीत अनिवार्य होते. भारतीय माध्यम आणि श्रोत्यांपुरता हा बॅण्ड या एका गाण्यासाठीच माहिती आहे. पण डझनांच्या आसपास अल्बम असलेला हा बॅण्ड येत्या वर्षांत पुन्हा नव्वदीतील आपला चार्म शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत. नव्वदीच्या काळात अक्षरश: शेकडोच्या संख्येने उत्तम गाणी बनविणाऱ्या कलाकारांची संख्या होती. आज स्वस्त आणि सोप्या तंत्रज्ञानामुळे त्या आकडेवारीत दहा पटींनी वाढ झाली आहे. या स्पर्धेत, श्रोत्यांच्या बदललेल्या श्रवणसवयीत नव्वदीचे दशकातील हे कलाकार कोणती मजल मारतील ते पाहणेही एक चांगला अभ्यास असेल.

म्युझिक बॉक्स

Backstreet Boys – Chances

Backstreet Boys – Shape Of My Heart

Train – She’s On Fire

Train – Hey, Soul Sister

Boyzone – Words

Boyzone – Baby Can I Hold You Tonight

Iris – The Goo Goo Dolls

viva@expressindia.com