सायली सोमण

मागील लेखात आपण १९४० ते १९८५ या काळात आर्थिक आणि सामाजिक घडामोडींमुळे लोकांच्या रोजच्या राहणीमानात, कपडे, दागिने, पायातील वहाण इत्यादी रोजच्या सवयींमधल्या गोष्टींवर कसा परिणाम झाला आणि कुठल्या प्रकारच्या

फॅशनशी आपली ओळख झाली, हे सर्व बघितलं. आता आज आपण बघणार आहोत की त्या पुढच्या काळात अजून नावीन्यपूर्ण फॅशनचा उगम कसा झाला आणि लोकांच्या तो किती आणि कसा पसंतीस पडला..

साधारणत: १९८५ नंतरच लोक हळूहळू फॅशनबद्दल जागरूकव्हायला लागले होते. त्यामुळेच सुरू असलेल्या किंवा पुढे येऊ घातलेल्या फॅशनबद्दल त्यांच्या मनात आणखी उत्सुकता निर्माण झाली. दोन फॅशन ट्रेण्ड्समधला काळ हळूहळू कमी होत गेला, शिवाय फक्त कुठल्या तरी मोजक्या पॅटर्नचेच कपडे प्रसिद्ध न होता काही फॅशनच्या व्याख्या, थीम्स किंवा संकल्पनांशी नव्याने लोकांची ओळख झाली. आणि त्या संकल्पनांच्या अवतीभवती बसणारे कपडे आता लोक परिधान करू लागले होते.

ग्रंज (Grunge) : ही फॅशन संकल्पना १९८५ नंतर लोकांनी अजमावून बघितली. फॅशनचे प्रकार, नियम तसेच्या तसे पाळण्यात कंटाळा आल्यामुळे मग या नव्या उलटय़ा प्रकाराचा वापर सुरू झाला. जिथे काहीही घालण्याची मुभा होती. ना कुठली रंगसंगती पाळली जात होती ना इतर फॅ शन एटिकेट्स. पण ही संकल्पना मुळातच खूप साचेबद्ध नसल्यामुळे लोक खूपच विचित्र कपडे आणि इतर अ‍ॅक्सेसरीजची संगती लावून त्याचा वापर करू लागले. या लुकला मुळातच खूप मर्यादा असल्यामुळे हा लुक फक्त महाविद्यालयातील तरुण मुले आणि मुलींवरच शोभून दिसला. एकूण ही फॅशनची ही संकल्पना मुळातूनच फसली. मुश्किलीने वर्षभरच ही फॅशनटिकली. आज ‘ग्रंज’ हा शब्द फॅशन क्षेत्रात एका वेगळ्या कारणासाठी वापरला जातो तो म्हणजे कुठल्याही प्रकारच्या चुकलेल्या फॅशनला किंवा कुठल्या व्यक्तीने जर वाईट कपडे घातले असतील तर त्याला या ग्रंज शब्दाने संबोधले जाते.

डिकन्स्ट्रक्शनिझम

डिकन्स्ट्रक्शनिझम म्हणजे पारंपरिक फॅशन पद्धतींना आव्हान देणारी अशी संकल्पना. उदाहरणार्थ जे घटक कपडे अंगात घालण्यासाठी उपयोगी असतात पण कपडय़ाची शोभा जाऊ  नये म्हणून आतील किंवा मागील बाजूस लावले जातात म्हणजेच चेन, उलटी बाजूची शिवण, बटण इत्यादी. मूळ कपडय़ातील तो एक महत्त्वाचा भाग असल्यासारखा त्याचा वापर केला जातो. डिकन्स्ट्रक्शनिझम हा रिसायकल फॅशनचा मूळ पाया मानला जातो तो त्यासाठीच..

मिनिमलिझम

१९७० आणि १९८० च्या दशकातील खूप ग्लॅमरस फॅशननंतर एका विशिष्ट ठेहराव असलेल्या फॅशनची गरज होती. ज्यात साधेपणातून एक अतिशय भरीव फॅ शनचा सेन्सलोकांमध्ये निर्माण होणं ही त्या काळाची गरज बनली होती. म्हणूनच मिनिमलिझम ही संकल्पना निर्माण केली गेली. जिथे अतिशय बेसिक नॅचरल टोन आणि रंगांचे चांगले, उच्च दर्जाचे फॅब्रिक निर्माण केले गेले आणि मग अतिशय साध्या सिल्हाऊट्समधील कपडे बनवले गेले. यामागचा एक उद्देश असाही होता की जर मुळातच फॅब्रिक म्हणजे सूत आणि त्याचा रंग चांगला असेल तर पॅटर्न्‍सवर जास्त लक्ष द्यायची गरजच भासत नाही. आपल्या संपूर्ण पेहरावात कुठे तरी एकच विशिष्ट लक्ष्यवेधक घटक असावा. आजही ही फॅशनचीसंकल्पना काही कार्यक्रमांपुरती किंवा काही ठरावीक प्रसंगांसाठी आवर्जून वापरली जाते.

बोहो हिप्पी

१९९० च्या दशकात आलेली ही फॅशनची संकल्पना साठ आणि सत्तरच्या दशकातील हिप्पी फॅशन ट्रेण्डची पुढील आवृत्ती मानली जाते. आधीच्या हिप्पी काळातील सिल्हाऊट्स आणि पॅटर्न्‍सप्रमाणेच या काळातही थोडे ढगळ आणि असमान हेमलाइनवाले कपडे तर होतेच पण या प्रकारात वेल्व्हेट फॅब्रिक, लेसेस आणि आणि वेगवेगळ्या फ्लोरल, अ‍ॅनिमल प्रिंट्सचाही वापर केला जायचा. एवढंच नाही तर ही अतिशय प्रयोगशील फॅशन संकल्पना मानली जाते, ज्यात सरफेस ऑर्नमेंटेशनवरही तितकाच भर दिला गेला आहे. मग ते विविध प्रकारचे पॅचवर्क वापरणे असो किंवा फर, लेसेस वापरणे असो. ही संकल्पना मिनिमलिझम फॅशनच्या अगदी उलट आहे.

या वरील फॅशन संकल्पना आणि संज्ञांव्यतिरिक्त अजून बरेच काही गार्मेट आणि टेक्स्टाइल इंडस्ट्रीतील आविष्कार, इतर फॅशन ट्रेण्ड्स, त्यांचे वेगवेगळे प्रयोग लोकांसमोर येऊ  लागले. पेस्टल रंगसंगतीमधील कपडे अंदाजे १९९५ नंतर खूप जास्त लोकप्रिय होऊ  लागले आणि ते आजही तेवढेच लोकप्रिय आहेत. शिवाय काही नव्या तांत्रिक संशोधनांमुळे आज कपडे विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. इतर तयार कपडय़ांच्या बाबतीत म्हणायला गेलो तर खूप प्रमाणात कपडे बनवण्यासाठी तितक्याच ताकदीची साधने तर आहेतच शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे सूत किंवा फॅब्रिकवरही तेव्हापासून सातत्याने प्रयोग होत आहेत. उदाहरणार्थ, साधारणत: २००७ मध्ये स्लॅक्स आणि चुडीदारचे फ्यूजन असलेले लेगिंग्ज किंवा मग त्यानंतरच्या काही वर्षांतच जीन्स आणि लेगिंग्जचे फ्यूजन असलेले जेगिंग्ज आले.  हे एकविसाव्या शतकातले अजरामर फॅशनट्रेण्ड्स आहेत. साधारणपणे २००० पासूनच प्रत्येक वर्षी फॅशन ट्रेण्ड्स सतत थोडे थोडे बदलत गेले. मग ते सध्या जीन्सच्या फिटिंगमधले प्रकार असो, फ्रॉकच्या उंचीमधले किंवा मग पुरुषांमधील सूट्सच्या पद्धतीचे प्रकार असोत.

गेल्या पाच वर्षांतील फॅशन ट्रेण्ड्सवर नजर टाकली तर सध्याची फॅशन ही सर्वाधिक कन्टेम्पररी आणि वैयक्तिक आवडीनिवडींवर केंद्रीभूत असलेली अशी झाली आहे हेच सर्वाचे म्हणणे आहे. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे, रोजच्या कामाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याला लागणारे कपडे ठरवतात. आज आपण कुठल्याही मॉलमध्ये जातो, दुकानात जातो एवढंच नाही तर घरबसल्या ऑनलाइन शॉपिंगसुद्धा करतो. सध्याच्या बदलत्या काळाबरोबर लोकांच्या गरजाही तेवढय़ाच वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वैविध्य (व्हरायटी)असणं हा फॅ शनच काय अन्यकुठल्याही प्रकारच्या उत्पादनाचा स्थायीभाव झाला आहे. या बदलाचे मुख्य कारण आहे ते म्हणजे ग्लोबलायझेशन, बदललेले वर्किंग कल्चर, अधिकाधिक वापरलं जाणारं इंटरनेट, हल्ली सर्व वर्गातील, वयोगटांतील, खंडातील, देशातील लोकांचा इंटरनेट वापर वाढला आहे आणि तो फक्त संगणक-लॅपटॉपपर्यंत मर्यादित राहिलेला नसून हातात मावणाऱ्या टॅब आणि मोबाइल फोनवर अवलंबून आहे.

त्यामुळे फॅशनच्या चवीत सातत्याने बदल होणे हेच साहजिक आहे.किंबहुना म्हणूनच फॅशन ही सध्या अत्यंत बदलत्या स्वरूपाची संकल्पना मानली जाते. कुठलाही एक सामाजिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय बदल नवीन फॅशन ट्रेण्ड सुरू करायला पुरेसे असते!

viva@expressindia.com