News Flash

फॅशनदार : फॅशन रेट्रो, हिप्पींची..

आता त्याच्या पुढील वर्षांमध्ये झालेल्या नवीन फॅशन अविष्कार आणि चळवळीबद्दल जाणून घेऊ या.

सायली सोमण

मागच्या लेखात आपण फॅशन क्षेत्रातील अशा काही खास घटनांबद्दल जाणून घेतलं ज्यामुळे आपल्या रोजच्या राहणीमानावर विशेष प्रभाव पडला. साधारणत: १९३० पर्यंतच्या दशकातील अशा फॅशन ट्रेंड्स अथवा फॅशन मूव्हमेंट्सबद्दल आपण माहिती जाणून घेतली. आता त्याच्या पुढील वर्षांमध्ये झालेल्या नवीन फॅशन अविष्कार आणि चळवळीबद्दल जाणून घेऊ या.

द एरा ऑफ युटिलिटी क्लोदिंग

१९३९ ते १९४५ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सिव्हिलियन क्लोदिंग युटिलिटी स्कीमदरम्यान ब्रिटनमध्ये कपडय़ांचे रेशनिंग सुरू होते. त्या वेळी मोठय़ा उंचीचे भरजरी गाऊन्स तर बंदच झाले होते. त्याचबरोबर कपडय़ांचा योग्य तेवढाच वापर होत होता, अगदी कपडय़ांच्या बाबतीतही काटकसर सुरू होती. याच काळात तत्कालीन प्रसिद्ध डिझायनर ख्रिश्चन डिओरने पेन्सिल स्कर्ट, अम्ब्रेला, फ्लिकरसारखा दिसणारा पूडल स्कर्ट, स्वेटर, फ्लॅट बेली शूज या फॅशन आणल्या. या दशकात स्त्रियांमध्ये पॅँट्ची फॅशनच जवळपास नव्हती. या काळात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे इतक्या वर्षांत पहिल्यांदाच खासकरून तरुण मुलामुलींसाठी कपडे डिझाइन केले गेले. टीनएजर ही संकल्पना त्या वेळची आहे. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये रॉक अ‍ॅण्ड रोल प्रकारचे संगीत आणि नृत्य खूप लोकप्रिय झाले होते. या काळाच्या उत्तरार्धात एल्विस प्रिस्ले आणि जेम्सी डीन या दोघांनी पुरुषांमध्ये जीन्स पँट्स पहिल्यांदा लोकप्रिय केल्या. हीच जीन्स पँट आजपर्यंत मार्केटमध्ये फक्त टिकूनच नाही तर प्रत्येकाच्या वॉर्डरोबमधला एक अविभाज्य भाग बनली आहे.

स्विंगिंग सिक्स्टीज

या दशकात लोकांसाठी शोध लावलेले महत्वाचे फॅशन ट्रेंड्स किंवा स्टाइल्स म्हणजे मिनी स्कर्ट्स, हॉट शॉर्ट्स, डिझायनर मेरी क्वाँटने डिझाईन केलेले काँट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमधले मिनी ड्रेसेस जे लंडनहून अमेरिकेत एक्स्पोर्ट केले गेले होते. मेरी क्वाँटबरोबरच इतर काही छोटी फॅशनलेबल्स ही त्या काळात सुरू केली गेली. याच काळात व्हायनल वेअर म्हणजेच लेदर पँट्स, जॅकेट्स, टॉप्सही लोकांच्या पसंतीस पडायला लागले होते. जॉमेट्रिकल प्रिंट्स आणि चेस्टबोर्ड प्रिंट्सच्या कपडय़ाची लोकप्रियता खूप वाढली होती. एका अर्थी हे दशक संपता संपता रेट्रो फॅशनची सुरुवात झाली होती.

१९७० चा डिस्को फीव्हर आणि हिप्पी कल्चर

बूटकट स्टाइल किंवा बेल बॉटम स्टाइलच्या पँट्स आणि जीन्स, रंगीबेरंगी पॉलिस्टर कापडाचे कपडे, प्लॅटफॉर्म हिलचे बूट, फ्लोरा फॉसेटवाली हेअरस्टाइल म्हणजेच सॉफ्ट कर्ल्स आणि डिस्को स्टाइलची गाणी हे सगळं बघितल्यावर, ऐकल्यावर आपल्याला तीच सत्तरच्या दशकातली डिस्को आणि रेट्रोची धूम आठवते. याच काळात हिप्पी कल्चरही तेवढेच आघाडीवर होते. त्यामुळे बऱ्याच तरुण-तरुणींनी ढगळे कपडे, लांब केस, मोठाले गॉगल्स, गळ्यात विविध फुलांचे किंवा मण्यांचे हार ही स्टाइलसुद्धा अवलंबली होती. फॅशनच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मागील काही दशकांत सर्वात जास्त स्मरणात राहिलेलं असं हे दशक आहे.

ऐंशीची फॅशन

हे दशक म्हणजे शोल्डर पॅडिंग असलेल्या फॉर्मल सूट्ससाठी जास्त ओळखल जातं. या काळात पुरुषांबरोबर स्त्रियाही त्यांच्या तोडीस तोड फॉर्मल सूट, पॅँट्स, स्कर्ट्स आणि टाय घालून ऑफिसमध्ये मिरवत असत. एक प्रकारचे ऑफिस कल्चर या काळात सुरू झाले होते. जिथे केवळ मेरिट्स आणि कामातील कौशल्याच्या जोरावर स्त्री-पुरुष एकसमान पातळीवर आणि पोस्टवर काम करू लागले होते. त्यामुळे एक स्पर्धेचं वातावरणही निर्माण होऊ लागलं होतं. म्हणूनच मोजक्या रंगांपर्यंत सीमित न राहता स्त्रियांच्या फॉर्मल सूट्सनी लवकरच लाल, गुलाबी रंगही धारण केले. खऱ्या अर्थाने फॉर्मल सूट्सही त्या वेळी फॅशनेबल झाले.

१९४० ते १९८० या काळात समाजजीवन जसजसं बदलत गेलं तसे फॅशनच्या क्षेत्रातही जे बदल घडले त्यातले हे काही महत्त्वाचे टप्पे होते. या काळातील सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडीदेखील या बदलांना तेवढय़ाच कारणीभूत ठरल्या होत्या. यापुढच्या वर्षांमध्ये घडलेल्या सामाजिक आणि आर्थिक घटना त्या काळातील राहणीमानावर कशा प्रभाव टाकणाऱ्या ठरल्या त्याचा आढावा आपण पुढच्या लेखात घेऊ..

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 1:40 am

Web Title: article about retro fashion trends
Next Stories
1 सर्जनशीलतेची मीम्स वाट..
2 कथा रॅम्पमागची..
3 नया है यह : मोरा गोरा गोरा अंग..
Just Now!
X