पंकज भोसले viva@expressindia.com

याकडे कुणी फारसे लक्ष दिल्याचे लक्षात आले नाही. म्हणजे एकटय़ा भारतीय चित्रपट संगीतपटलाकडे पाहिले तरी पुरुषी विचारांच्या गाण्यांचे वर्चस्व सहज समजून येईल. म्हणजे नायिकेला गटविण्यास उपयुक्त उपमाप्रधान गाणी के. एल. सेहगल काळापासून दरसाल दरशेकडा या प्रमाणात निर्मिली जात होती. चंद्र-तारे-फुले आणि प्राण्यांमधली हरणी यांना चालीच्या मीटरमध्ये बसविणारी हजार हिंदूी गाणी निव्वळ रोज काही काळ रेडिओ ऐकणाऱ्यालाही शोधून काढता येतील. बरे या प्रेमपुजारी गीतांच्या विरुद्धअर्थी गाण्यांमध्येही चित्रआरंभापासून पुरुषी वर्चस्वाची झलक अधिक राहिली. ‘ओ बेवफा’ नामक हंबरडा फोडून नायिकेची जाहीर निंदा-नालस्ती करणारी सॅड साँग्ज कैक पिढय़ांतील प्रेमकफल्लकांना दिलासा देणारी ठरली.

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

गंमत म्हणजे या सर्व काळामध्ये येणारी स्त्रीगीते म्हणजे निव्वळ हवेशी गप्पा होत्या. ‘ऐ री पवन’ म्हणत ‘घडी घडी मेरा दिल धडके’ छापाची गाणी अगदी दोन हजारचे दशक सुरू व्हायला आले तरी ‘क्यू नये लग रहे है ये धरती गगन’, ‘आज मै उपर’, ‘अरेरे अरे ये क्या हुवा’पर्यंत गाण्यांच्या शब्दांमध्येही संस्कारहट्ट कोंबायचा अट्टहास होता. म्हणजे पुरुषी गाण्यांतून स्त्रियांच्या स्वभावाचे कितीही वाभाडे निघत असले, तरी स्त्रियांच्या दु:ख गीतांमध्ये ‘वो मेरी निंद, मेरा चैन मुझे लौटा दो’ इतका नेमस्त पवित्रा राहिला.

या दशकातील गाण्यांमध्ये जो सुसह्य़ बदल झाला, त्यात स्त्रीगीतांमध्ये संस्कार आणि मूल्यांची अनावश्यक ओझी उतरवून टाकण्यात आली. त्यामुळे लिंगसमानता चित्रसंगीतात खऱ्या अर्थाने आली असे म्हणता येईल. ‘मेरे सैयाजीसे आज मैने ब्रेक अप कर लिया’ हे बदलत्या भारतीय स्त्रीविचारांचे सर्वार्थाने प्रतिनिधित्व करणारे गाणे आहे. त्यासोबत ‘हायवे’मधील ‘पटाखा गुड्डी’, ‘डियर जिंदगी’मधील ‘लव्ह यू जिंदगी’, ‘उडता पंजाब’मधील ‘डर डा डा डस्से’, ‘खुबसुरत’ (सोनम कपूर हिचा) चित्रपटातील ‘जो मै जानती’ ही गाणी खास ऐकून पाहावीत. गीतांमधील पाच-सात दशकांमधील पुरुषी वर्चस्व संपुष्टात आल्याची खात्री पटेल.

भारतीय चित्रसंगीतात अलीकडे ठळक जाणवत असलेला हा बदल अमेरिकी-ब्रिटिश पॉप संगीतामध्ये मात्र दीड-दोन दशकांआधीच झालेला दिसतो. बिलबोर्डच्या ताज्या शंभर गाण्यांच्या यादीत चार आठवडय़ांपासून ठिय्या मांडून बसलेल्या अरियाना ग्राण्डे हिच्या ‘थँक्यू, नेक्स्ट’ या गाण्यामध्ये नव-स्त्रीविचारांचा सारा अर्क आलेला दिसतो. हे गाणे प्रेमाच्या पूर्वसुरींच्या साऱ्या कल्पनांच्या चिंध्या करते. शॉन नावाच्या कुणा व्यक्तीशी प्रेमाचा काडीमोड केल्यानंतर रिकी नावाच्या मुलावर गाणी लिहून पेट नावाच्या व्यक्तीशी लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच माल्कम नावाची व्यक्ती देवदूत बनून आयुष्यात कशी आली हे सांगणाऱ्या या आभारगीताच्या आरंभीच्या चार ओळीच गमतीशीर आहेत. ‘यू आर माय’ छाप गाण्यांची तसेच टेलर स्विफ्टच्या गीतांची खिल्ली उडविणारे हे गाणे पहिल्या क्रमांकावर का आहे, हे अधिक प्रमाणात फोड करून सांगायला नको. अरियाना ग्राण्डे ही गायिका मुख्यधारेत वावरणारी म्हणून जगात परिचित आहे. या जगापासून पूर्णपणे वेगळे इंडिपेण्डण्ट संगीतातील कलाकार आहेत. त्यांची कलात्मक ताकद अफाट असूनही श्रोतावर्ग फक्त इंटरनेटमुळे लाभलेला चोखंदळ रसिक आहे. याच आठवडय़ामध्ये या संगीत पटलावर ‘गेटआऊट ऑफ माय हेड’ हे गाणे गाजत आहे. भारतीय चित्रसंगीतातील ‘अब तेरेबिन जी लेंगे हम’ या नायकी धाटणीसारखी येथे ही गायिका सूर आवळताना दिसते. इलेक्ट्रिक गिटारमधील काही चांगले तुकडे यासह पुरुषविषयक पारंपरिक भावनांना टाळणारी भूमिका यांसाठी हे गाणे ऐकावे गटात मोडणारे आहे.

ससामी नावाची आणखी एक गायिका इंडिपेण्डण्ट संगीताच्या व्यासपीठावरून सध्या मुख्य प्रवाहाकडे वाटचाल करीत आहे, दक्षिण आशियाई वंशाची वाटणारी ससामी ही पुरती अमेरिकी आहे. ‘कॅलस’ या तिच्या गाण्याला यंदा पिचफोर्क या संगीतमासिकाने गौरविले आहे. त्यानंतर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच गाणी तिच्या नावावर आहेत. पुढे अरियाना ग्राण्डेइतपत प्रसिद्धी मिळण्याआधीची तिची आत्ताची गाणी खरेच ऐकत राहावीत अशी आहेत.

लिटिल मिक्स हा ब्रिटिश मुलींचा ग्रुप २०११ संगीत स्पर्धेतून स्थापन झाला होता. निकी मिनाज या हिप-हॉप स्टारसोबत त्यांनी केलेले ‘वुमन लाइक मी’ हे गाणे बरेच गाजले आहे. दहा वर्षांमध्ये महिलांच्या गाण्यांमध्ये बदललेल्या जगण्याचा स्तर शब्दांतून उतरला आहे.

हवेशी गप्पा मारणाऱ्या आणि पक्षी-फुलांना आपल्या मनातील हळुवार भावना सांगणारा आजचा स्त्री-काव्यविचार नाही. तो कसा आहे, हे या काही मासल्यांमधून थोडय़ा प्रमाणात कळू शकेल.

म्युझिक बॉक्स

Ariana Grande – thank u, next

Ariana Grande – Side To Side

Sofia Bolt: “Get Out Of My Head”

SASAMI – Callous

Little Mix – Woman Like Me

Dua Lipa – New Rules

Cardi B, Bad Bunny & J Balvin – I Like It