19 September 2020

News Flash

बॉटम्स अप : नितळ व्होडका

ज्या पदार्थात ग्लुकोज वा साखरेचे प्रमाण अधिक आहे. त्यापासून व्होडकाची निर्मिती केली जात असावी.

(संग्रहित छायाचित्र)

शेफ वरुण इनामदार

व्होडका. स्पीरिटचा अंश असलेले एक पेय. आजकाल अनेक जण उसनवारी केलेल्या चवीने मंद प्रकाशात व्होडकाचे घुटके घेत बसलेले असतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, उसनी चव म्हणजे काय? का सांगतो. व्होडकाला स्वत:ची अशी चव नाही. तो ज्या पेयात मिसळाल त्यात बुडून जातो आणि ती त्याची चव बनून जाते. असे का, तर त्याची निर्मितीच तशी आहे. कारण व्होडकाला चव, गंध नाही. अर्थात यासाठी तो परधार्जिणा आहे.

व्होडकाच्या जन्माची कहाणी सविस्तर कुणी लिहून ठेवलेली नाही. म्हणजे त्याच्या निर्मितीविषयीची जी काही त्रोटक माहिती आजवर तज्ज्ञांच्या हाती लागली आहे, त्याविषयीसुद्धा वाद आहेत. म्हणजे व्होडका हा पूर्वी कधी काळी औषध म्हणून वापरला जात होता, असं काही जणांनी लिहून ठेवलंय. व्होडकात अगदी कमी प्रमाणात म्हणजे १४ टक्के अल्कोहोल असतं. साधारण आठव्या शतकात व्होडकाचा उगम झाला आणि त्याच्या निर्मितीला रशियात सुरुवात झाली. आजघडीला रशियात जितकी दारू प्यायली जाते. त्यापैकी ७० टक्के व्होडका प्यायला जातो.

इतिहासातील दुसरी संदिग्ध नोंद अशी आहे की, नवव्या शतकाच्या अखेरीस व्होडका पहिल्यांदा रशियात तयार झाला. परंतु पुराव्यानिशी सिद्ध होणारी पहिली व्होडका निर्मिती ही साधारण अकराव्या शतकात झाली. रशियातील खिल्नोव्हस्क गावात ही डिस्टिलरी उभारण्यात आली होती. त्यानंतर मद्यनिर्मिती उद्योगाबद्दल लिहिणाऱ्या अनेकांनी व्होडकाविषयी थोडी उलटसुलट माहिती प्रसारित केली. परंतु त्या खोलात जायची इथे गरज नाही. ‘व्होडका’ हे नाव ‘वॉटर व्होडा’ या शब्दापासून तयार झाल्याचे बोलले जाते. मध्ययुगात व्होडकाचे बरेच उपयोग होते. त्यातील एक म्हणजे व्होडकापासून ‘शोभेची दारू’ (गनपावडर) तयार केली जात होती.

ब्रिटिशांची एक खासियत होती. ती म्हणजे, ते प्रत्येक गोष्ट स्वत:च्या बुद्धीला पटेल आणि ती इतरांनाही रुचेल अशा पद्धतीने करायचे. म्हणजे ब्रिटिश वकिलातीने व्होडका हे रशियाचे राष्ट्रीय पेय म्हणून जाहीर केले. यामागे त्यांची रसिकता दिसून येते. म्हणजे फिनलँड आणि पोलंडमध्ये दोन शतके आधी व्होडकाला तशी मान्यता मिळाली होती. १५०५ मध्ये रशियाहून जहान भरून व्होडका स्वीडनला नेण्याता आल्याची नोंद आहे. १८व्या व्होडका निर्मितीवर काही बंधने घालण्यात आली. त्यातही उदारता आणि गर्भश्रीमंतीचे प्रतीक म्हणून काही वतनदार आणि सरंजामदारांना व्होडका भेट म्हणून देण्याची मुभा देण्यात आली होती.  याच काळात व्होडका भेसळीचा शिकार ठरला. म्हणजे त्यात किती प्रमाणात अल्कोहोल मिसळायचे, याचे काही निश्चित मापदंड घालून देण्यात आलेले नव्हते. पण कोणीतरी कल्पकतेच्या जोरावर काही म्हणून मानके घालून देतो. रसायनतज्ज्ञ दिमित्री मेन्देलीव्ह हा त्यातील एक. या मद्यनिर्मितीकाराने व्होडकामध्ये ४० टक्के अल्कोहोल असावे, असे मत मांडले. पण याबाबतच्या ऐतिहासिक नोंदी काही वेगळंच सांगतात. म्हणजे व्होडकात किती प्रमाणात अल्कोहोल असावे, याचे निश्चितीकरण १८४३ मध्ये करण्यात आले. पण दिमित्री त्या वेळी नऊ वर्षांचा होता, असे एके ठिकाणी नमूद करण्यात आले आहे.

रशियात झारच्या जुलमी सत्तेचा वरवंटा सर्वत्र फिरत होताच. १९०१ साली झारने मॉस्को शहरात व्होडकाच्या निर्मितीवर नियंत्रण आणले. त्यानंतर झारची सत्ता उलथवण्यात आली. बोल्शेविक गटाच्या सदस्यांनी व्होडकाच्या साऱ्या डिस्टिलरी ताब्यात घेतल्या आणि त्यांच्यावर विविध बंधने आणली. याचा परिणाम असा झाला की व्होडकानिर्मिती करणारे उद्योजक रशिया सोडून परदेशात गेले. यातील एक मद्यनिर्माता थेट फ्रान्समध्ये जाऊन पोहोचला. त्याने तेथे स्वत:ची डिस्टिलरी उभारली आणि त्याचा व्यवसाय जोमात चालला. व्होडका उत्पादन करणारी ‘स्मिर्नोफ’ ही ती कंपनी. आज जगभरात एकमेव कंपनी म्हणून ‘स्मिर्नोफ’चा लौकिक आहे. कदाचित दारूबंदीच्या कुठल्यातरी भावनिक निर्णयातून रशियात सत्ताधारी पक्षाने व्होडकाचा गळा घोटला असावा आणि एका चांगल्या ब्रँडपासून रशिया दुरावला.

ज्या पदार्थात ग्लुकोज वा साखरेचे प्रमाण अधिक आहे. त्यापासून व्होडकाची निर्मिती केली जात असावी. नितळ दारू अशी व्होडकाचे स्वरूप आहे. आजकाल गहू, ज्वारी, मका आणि राइपासून व्होडका बनवला जातो. याशिवाय बटाटा, उसाची मळी (काकवी), सोयाबीन, द्राक्षे, तांदूळ, गोड बीट आणि अंजिरांपासूनही या ‘पारदर्शी दारू’ची निर्मिती केली जाते.

व्होडका हा मुखशुद्धी म्हणून वापरता येतो, हे लक्षात ठेवा. कारण यातील अल्कोहोलचे प्रमाण तोंडातील अतिसेवनामुळे निर्माण झालेले जिवाणू मारून टाकते. त्यामुळे मुखाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. म्हणजे र्निजतुकीकरणात व्होडकाचा वाटा मोठा आहे. काही जण पूर्वी जखमेवर व्होडकाचा वापर करायचे. व्होडका प्यायल्याने चरबी वाढण्याचाही धोका संभवत नाही. आता थोडं थांबा, माझा हा सल्ला माना हवंतर. पण कुठलीही दारू ही माफक प्रमाणात प्याली तर तिचे फायदेच अधिक असतात. तसेच व्होडकाच्या बाबतीत आहे. व्होडकाचा पहिला फायदा म्हणजे तो रोज थोडा थोडा करून घेतला तर हृदयाशी संबंधित कार्य व्यवस्थित चालते आणि त्वचा अधिक नितळ होते. व्होडका हा पचनाला मदत करतो. त्यामुळे पोटाशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. खास करून खाद्यपदार्थामध्ये व्होडकाचा वापर नेहमीच करण्यात येतो. स्वाद आणि गंध वाढविण्यास याची मदत होते. तरीही व्होडकामधील अलीकडचे अल्कोहोल प्रमाण हे निश्चित मापदंडानी ठरवलेले नसते. त्यामुळे दर्जेदार व्होडका पिण्याचे जे काही फायदे आहेत, ते आजच्या धेडगुजरी व्होडकाच्या सेवनाने मिळणार नाहीत. उलट त्याने नुकसानच अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भान ठेवूनच व्होडका प्या.

(अनुवाद : गोविंद डेगवेकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 12:16 am

Web Title: article about vodka beverage
Next Stories
1 क्रिस्पी नाचोजचा देशी अवतार
2 व्हिवा दिवा : तृप्ती चव्हाण
3 फिटनेसवाला डान्स
Just Now!
X