‘संगीत’ हे एक असं माध्यम आहे ज्यातून व्यक्त होता येतं. भावनांचा बांध बांधून तोच बांध तोडण्याची ताकदही याच संगीतात आहे. शब्दांची सुरेल गुंफण जितकी सुश्राव्य असते तितकंच शांततेचं अस्त्वित्वही बऱ्याचदा एक वेगळीच तान छेडून जातं. रॅप साँगच्या साथीनं ‘यो.’ म्हणणारी पिढी जितक्या आदबीनं हे रॅप मिरवते तीच पिढी रफी, मुकेशच्या गाण्यांवर जॅिमग सेशन्सही करते. पण यापलीकडेही संगीतामध्ये काही सुरेख कलाकारांची नव्याने ओळख होत आहे. मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर संगीतकलेचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं आहे. तंत्रज्ञानाची जोड घेत हे कलाकार तरूणाईच्या प्लेलिस्टसोबतच त्यांच्या जगण्याचाही अविभाज्य भाग झाले आहेत. २१ जूनला येणाऱ्या ‘जागतिक संगीत दिन’च्या निमित्ताने जगभरात लोकप्रिय असलेले म्युझिक, गायक आणि बरंच काही..

गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय पॉप गायक जस्टिन बिबर इथे येऊन गेला आणि त्याची आधीच लोकप्रिय असलेली गाणी आणखी काहीजणांच्या प्लेलिस्टमध्ये दाखल झाली. जस्टिन,  एड शीरन यांसारख्या पॉप गायकांमुळे गेल्या काही वर्षांत म्युझिकल ट्रेंड हा सतत बदलता राहिला आहे. आपल्याकडे अजूनही जनमानसावर बॉलिवुड गीतांचा पगडा आहे ही बाब नाकारता येणार नाही. मात्र या आंतरराष्ट्रीय गायकांनी इथेही शिरकाव केला आहे हेही तितकंच खरं आहे. बॉलीवुड संगीतात सध्या ‘म्युझिकल एरा’ म्हणून ओळखल्या गेलेल्या नव्वदच्या दशकातील गाण्यांच्या रिक्रिएशन प्रकारात वाढ झाली आहे. यासाठी ‘तम्मा तम्मा’पासून ते अगदी आता नव्याने आपल्या भेटीला आलेलं युट्यूबर विद्या वॉक्सच्या आवाजातील ‘चीज बडी है मस्त मस्त’ या गाण्यांची उदाहरणं या रिक्रिएशन ट्रेंडचा वाढता जोर दाखवून देत आहेत. या गाण्यांमध्ये असणारा वाद्यांचा वापर आणि नव्या ढंगात सादर केली जाणारी ही गाणी पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकतायेत. एकीकडे हा देशी गाण्यांच्या रिक्रिएशनचा ट्रेंड आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही अफलातून गायक आणि वादक  यांचं मिक्स गारूड तरूणाईवर आहे.

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाचा ‘अ‍ॅन्टी’ किंवा मग बेयॉन्सेचा ‘लेमोनेड’ हे अल्बम सध्या अनेकांनी रिपिट मोडवर ठेवले आहेत. ही गाणी रिपीट मोडवर ठेवण्याचं कारणही तरूणाईकडे आहे. ते म्हणजे या गाण्यांमध्ये असणारी सहजता आणि त्यातून येणारे महत्त्वाचे मुद्दे. बॉलिवुडच्या गाण्यांना निशाणा करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र या गाण्यांमध्ये उगाचच अतिशयोक्ती करून भावनांना रंग चढवलेला असतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. त्या तुलनेत जेकब बँक्स आणि शॉन मेंडेसची गाणी बऱ्याचदा वेगळ्याच दुनियेत आपल्याला घेऊन जातात. ‘ट्रान्स’ का काय ते म्हणतात ना. बहुधा ते हेच असावं! या गायकांची गाणी पहिल्यांदाच ऐकणाऱ्यांना ती आवडणारही नाहीत. पण, एकदा का त्या गाण्यांची सवय लागली की त्यापासून पाठलाग सोडवणं तसं कठीणच. शकिराच्या गाण्यांची जादूही अशीच. ‘चेनस्मोकिंग’, ‘डिवाइड’ हे असे म्युझिकल अल्बम अनेकांना आपलेसे वाटतात त्यामागचं कारण म्हणजे गाणी मांडताना त्यामधून व्यक्त होणारे भाव. अशाच गाण्यांची जादू पसरवणारी आणखी एक गायिका म्हणजे बेटी वोल्फ. सध्याच्या म्युझिकल ट्रेंडमध्ये गायिका आणि गीतकार बेटी वोल्फही प्रचंड गाजत आहे. तिचं ‘विश’, ‘टू लव्हली’ ही आणि अशी बरीच गाणी म्हणजे रोजच्या जीवनातील काही प्रसंगांची सुरेल आखणी आहे. या सर्व म्युझिकल ट्रेंडमध्ये पंजाबी गाण्यांचा ‘स्वॅग’ विसरुन चालणार नाही. जेसी गिल, रंजित बावा, दिलजित दोसांज यांच्या गाण्यांचीही आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा सुरु आहे. जागतिक किर्तीचे डीजे आणि गायक, वादकांच्या साथीने रंगणारा हा ‘देसी स्वॅग’ अनेकांची मनं जिंकतो आहे.

या गाण्यांमधून व्यक्त होणारे वेगवेगळे विषय, भावभावना तरूणाईला त्यांच्याशी सहज जोडतात. आपणही असंच कधीतरी वागतो किंवा वागलो होतो अशीच भावना ही गाणी ऐकताना मनात घर करते. त्यातही अनेकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे एकांतात ही गाणी ऐकण्याची रंगत काही औरच. तसं पाहायला गेलं तर गाणं ऐकताना आपण एकटेच असतो, त्यावेळी आपल्या आजूबाजूची गर्दीही आपण विसरतो आणि तीच या गाण्याची, गायकाची ताकद असते. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर असे कित्येक गायक त्यांच्या गिटारसह युट्यूब आणि इतर समाजमाध्यमांच्या सहाय्याने त्यांची कला सादर करु पाहात आहेत. असहाय्यता, हतबलतापणा, भविष्यातील अडचणी अशा रोजच्या जीवनातील अगदी लहानसहान पण तितक्याच उत्कट भावना आणि प्रसंगाना पॉप संगीतातही जागा मिळाली आहे. त्यामुळे एकेकाळी फक्त प्रेमगीतांभोवती फिरणाऱ्या म्युझिकल ट्रेंडचं समीकरण आता पूर्णपणे बदलू पाहातं आहे. रोजच्या पठडीतून बाहेर येत, केवळ अरिजित सिंगची गाणी न ऐकता आता कुठे आपल्या कानसेनांची प्लेलिस्ट बदलते आहे. अर्थात काहीजण याला अपवाद आहेत कारण, बरेचजण त्यांची प्लेलिस्ट एखाद्या अ‍ॅपप्रमाणे सतत अपडेट करत असतात. पण, ज्यांनी हा बदल आणि ट्रेंड आता आपलासा केला आहे त्यांना म्युझिकचा बदललेला ट्रेंड ‘मुबारक हो..’!

viva@expressindia.com