20 February 2019

News Flash

ब्रॅण्डनामा : अमेरिकन टुरिस्टर

नावासकट पूर्णपणे अमेरिकन ब्रॅण्ड म्हणजे अमेरिकेन टुरिस्टर.

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

आपल्या देशाचा अभिमान नावात बाळगत वैश्विक होणारे ब्रॅण्ड म्हणजे मातीशी इमान राखणाऱ्या मुळांसारखे असतात. ज्याची मातीशी नाळ घट्ट तो बहरल्याशिवाय राहात नाही. असाच नावासकट पूर्णपणे अमेरिकन ब्रॅण्ड म्हणजे अमेरिकेन टुरिस्टर.

१९२० साली सोल कॉफलर नामक युवक अमेरिकेत आपलं नशीब आजमावून पाहत होता. तो एका अशा प्लांटमध्ये काम करत असे जिथे सामानाच्या ट्रंका तयार होत. ज्यांच्या संग्रही जुन्या ट्रंका ( ट्रंक्सचं भारतीय बहुवचन) आजही आहेत त्यांना नव्याने सांगायला नको की ट्रंक किती अवाढव्य आणि जड असायची. टिपीकल पद्धतीने तयार होणाऱ्या या ट्रंकांकडे पाहताना कॉफलर विचार करायचा की यापेक्षा वजनाने हलक्या आणि सुटसुटीत बॅग्ज तयार व्हायला हव्यात. त्याच विचाराने प्रेरित होऊन सोल कॉफलरने स्वत: काही प्रयोग करून पाहिले. डिझाइन्स केली आणि आपली आयुष्याची जमापुंजी घालून लगेज बॅग्जचं उत्पादन सुरू केलं. या बॅग्ज विकण्यासाठी ऱ्होड आयलंड प्रांतातील एक रिकामे पडलेले भांडय़ांचे दुकान त्याने स्वस्तात भाडय़ाने घेतले आणि आपल्या बॅग्जची विक्री सुरू केली. यात कुठेही नफेखोरीचा विचार नव्हता. या वजनाने हलक्या पण मजबूत बॅग्जची किंमत होती फक्त एक डॉलर. त्यामुळे लवकरच बॅग्जचा बोलबाला झाला. पहिल्याच वर्षी पाच हजार बॅगांची विक्री झाली. सोल कॉफलरने आपल्या या ब्रॅण्डचे नामकरण केले ‘अमेरिकन टुरिस्टर’.

हळूहळू बॅगांचा आकार कॉफलर यांनी वाढवत नेला. त्यानुसार २ आणि ३ डॉलर्स इतकी किंमत निश्चित केली. त्याकाळात या बॅग्ज दोनच रंगात उपलब्ध होत्या. काळ्या आणि ब्राऊ न. १९३३ साली या उद्योगास सुरुवात झाली. १९४५ पर्यंत हवाई वाहतुकीने गती घेतली. त्यामुळे भल्यामोठय़ा आकाराच्या बॅगांऐवजी वजनाने हलक्या, सुटसुटीत आणि भरायला सोप्या बॅगांची गरज निर्माण झाली. अमेरिकन टुरिस्टरने ही गरज अचूक लक्षात घेऊ न बॅगांची निर्मिती केली. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत अमेरिकन टुरिस्टरने एक लाख डॉलर्सचा टप्पा गाठून अमेरिकेतील मोठा लगेज ब्रॅण्ड म्हणून शिक्कामोर्तब केलं.

नव्या मटेरिअलसह जगातील पहिलं मोल्डेड लगेज व्हायचा मानही याच ब्रॅण्डकडे जातो. हा जगातील सर्वात असा पहिला लगेज ब्रॅण्ड जो एअरलाइन्सच्या फ्लाइट अटेंडंटसोबत तुम्हाला बॅग्जची ‘फ्लाइट टेस्ट’ करून घ्यायची मुभा देत असे.

अमेरिकन टुरिस्टरची सगळ्यात गाजलेली जाहिरात म्हणजे गोरिलाची. अमेरिकन टुरिस्टरच्या बॅगवर उडय़ा मारणारा गोरिला, खाली तस का मस न होणारी अमेरिकन टुरिस्टर बॅग आणि सोबत एक ओळ – ब्युटीफूल इवन अंडर प्रेशर. त्या जाहिरातीने अधोरेखित केलं की फ्लाइट वा ट्रेनमध्ये तुमची बॅग कितीही धसमुसळेपणाने वापरली गेली तरी तिला काही होणार नाही. याच संकल्पनेवरील भारतीय जाहिरात आठवा. मुंबई लोकल ट्रेनमध्ये घुसळून निघणारा परदेशी पर्यटक आणि सतरा वेळा आपटली जाणारी त्याची लगेज बॅग. अखेर दोघंही सही सलामत उतरतात. आणि वाक्य कानावर पडतं. ‘सर्वाइव्ह मुंबई सर्वाइव्ह वर्ल्ड’. आता अलीकडे विराट कोहलीबरोबर अमेरिकन टुरिस्टरने केलेली नवी जाहिरात म्हणजे हातात अमेरिकन टुरिस्टरची बॅग घेतलेला विराट कोहली आणि टॅगलाइन, ‘आय अ‍ॅम रेडी’. या ब्रॅण्डच्या लोगोत अमेरिकन राष्ट्रध्वजाचा केलेला वापर या ब्रॅण्डचं अस्सल अमेरिकन असणं दर्शवतं. आज ८० देशांत हा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे.

सोल कॉफलरचं तत्त्वज्ञान होतं, ट्रॅव्हल शुड बी फन. तेच वापरून हा ब्रॅण्ड म्हणतो ‘पॅक द फन’. आज इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसारख्याच या ब्रॅण्डच्या किमती आहेत; पण ८५ वर्षांचा दीर्घ अनुभव त्या किमतीत उतरलेला आहे. जुन्या ट्रंकांपासून ते अत्याधुनिक स्लीमट्रीम स्टायलीश लगेज बॅगपर्यंतच्या या ब्रॅण्डच्या प्रवासाकडे पाहता आपण निश्चितच म्हणू शकतो की हा आहे टफ इंटरनॅशनल लगेज ब्रॅण्ड!

viva@expressindia.com

First Published on February 2, 2018 12:33 am

Web Title: article on american tourists american tourister bags