बार्बेक्यूची संस्कृती मुळात रुजली कशी, तिची पाळंमुळं नक्की कुठली आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून दरवेळी मदतीला धावून येणाऱ्या इंटरनेटची साथ घेतली, पण त्यानेच पेचात पाडलं ना राव. एकाच गोष्टीला अनेक उत्तरांचे पर्याय देणाऱ्या इंटरनेटने बार्बेक्यूच्या बाबतीबतही असाच प्रसंग समोर ठेवला. कधीकाळी गरज म्हणून सुरू केलेला हा प्रकार आज संस्कृतीचा भाग झाला आहे. हा बार्बेक्यूचा प्रवास मुळातूनच समजून घेण्यासारखा आहे..

बार्बेक्यू म्हटलं की हल्ली बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर अशी काही ठिकाणं आणि त्या ठिकाणी मिळणारं चविष्ट खाणं येतं की विचारता सोय नाही. मुळात ही संपूर्ण प्रक्रियाच इतकी लक्षवेधी आणि जिभेवर वेगळीच चव आणणारी आहे की त्याविषयी जाणून घ्याल तितकं कमीच आहे. बार्बेक्यूची संस्कृती मुळात रुजली कशी, तिची पाळंमुळं नक्की कुठली आहेत हे जाणून घेण्यासाठी म्हणून दरवेळी मदतीला धावून येणाऱ्या इंटरनेटची साथ घेतली, पण त्यानेच पेचात पाडलं ना राव. एकाच गोष्टीला अनेक उत्तरांचे पर्याय देणाऱ्या इंटरनेटने बार्बेक्यूच्या बाबतीबतही असाच प्रसंग समोर ठेवला. कधीकाळी गरज म्हणून सुरू केलेला हा प्रकार आज संस्कृतीचा भाग झाला आहे. हा बार्बेक्यूचा प्रवास मुळातूनच समजून घेण्यासारखा आहे..

paris 2024 olympics olympic torch lit in greece
खराब हवामानातही ग्रीसमध्ये ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित!
gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

बार्बेक्यू मूळचा कुठला? हा प्रश्न तसा बऱ्याच जणांच्या मनात घर करतो, पण त्या प्रश्नाचं उत्तर शोधतेवेळी नक्की काय आणि किती वाचावं, जाणून घ्यावं हाच गोंधळ; पण पाककला इतिहास तज्ञ मोहसीना मुकादम यांनी अतिशय सोप्या शब्दांत बार्बेक्यूविषयीची माहिती दिली. मुळात आगीचा शोध आणि मानवाची उत्क्रांती ज्या काळात झाली अगदी त्याच काळापासून बार्बेक्यूची मुळं रुजत गेली. आगीवर, शेकोटीवर मांस भाजून खाण्यापासून ते अगदी शिकारीला गेल्यावर राजेरजवाडय़ांच्या खाण्याची व्यवस्था करण्यासाठी शाही पद्धतीच्या जेवणातही या प्रकारच्या पदार्थाचा समावेश केला जायचा. आदिमानवापासून ते अगदी शिकारीपर्यंत आगीचा वापर करत कोणतीही गोष्ट त्या आचेवर शिजवून खाण्याच्या पद्धती काळानुरूप बदलत गेल्या. पूर्वीचे युद्धप्रसंग, पाचव्या शतकावर आधारित काही नाटकांमध्येसुद्धा चक्क बार्बेक्यू म्हणजेच आगीच्या मंद ज्वाळांवर भाजून करण्यात आलेल्या खाद्यपदार्थाचा उल्लेख आढळतो, असं मुकादम यांनी स्पष्ट केलं.

बार्बेक्यूच्या शोधात इंटरनेटच्या वाटेवर निघालं असता आफ्रिकेचा संदर्भ सहज मिळतो, पण मुळात काही संदर्भ पाहिले असता, मानव प्रजातीची सुरुवातही त्याच भागातून झाल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे जसजशी उत्क्रांती होत गेली तसतशी बार्बेक्यू आणि आगीवर भाजून खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये, त्यांच्या चवीमध्येही फार बदल घडून आल्याचे दिसून आले. गरज ते सेलिब्रेशन अशा वाटेचा वाटसरू असलेल्या बार्बेक्यूचा हा प्रवास फार रंजक असून, त्यासोबतच काही किस्से, कहाण्याही जोडल्या गेल्या.

सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनीसुद्धा सध्याच्या घडीला ट्रेंडमध्ये असणाऱ्या बार्बेक्यूविषयी आपलं मत मांडलं. ‘बार्बेक्यू नेशन’ या नावाने जी साखळी सुरू झाली, त्यामुळे भारतातही हा ट्रेंड रुजला आणि त्यात काही बदलही करण्यात आले. मुळात मांस आगीवर भाजून खाण्याच्या या पद्धतीला शाकाहारी खाणाऱ्यांसाठी एक वेगळा टचही देण्यात आला, ज्यामध्ये भाज्या आणि पनीरचा वापर करण्यात आला; पण बार्बेक्यूची खरी चव ही मांसाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणीच ठरते. सध्याच्या घडीला ‘बार्बेक्यू नेशन’ किंवा त्याच प्रकारच्या काही रेस्तराँमध्ये बार्बेक्यू पदार्थ सव्‍‌र्ह केले जातात. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही पद्धतींचा अवलंबही केला जातो. त्यातील एक प्रकार म्हणजे जपानी खाद्यसंस्कृतीतील ‘यू टेबल’ पद्धत. या पद्धतीमध्ये ‘यू’ आकाराच्या टेबलावर साधारण दहा ते बारा माणसे जेवणासाठी बसलेले असताना त्या टेबलाच्या मध्यभागी जिथे यू आकाराचा कंस असतो त्या ठिकाणी तवा आणि बार्बेक्यू असतो, जेथे तुम्हाला पदार्थ तुमच्या डोळ्यांदेखत तयार करून दिले जातात.

बार्बेक्यूमध्ये फळांचा वापर करत रसाळ फळांना काहीशी भाजकी आणि तिखट चव देत त्याचेही बार्बेक्यू करण्याला बऱ्याच ठिकाणी प्राधान्य दिले जाते. आगीचा वापर करत पूर्वापारपासून  चालत आलेला हा ट्रेंड आता तग धरण्यात असा काही यशस्वी झाला आहे की, कॉर्पोरेट इव्हेंटपासून ते अगदी लहानमोठय़ा कँपिगपर्यंत त्याचीच चर्चा सुरू असते.

बाहेरून आला नि..

बार्बेक्यूचा हा प्रवास नेमका कधी सुरू झाला याची नोंद फार क्वचितच सापडत असली तरीही हा प्रवास सध्या ज्या वळणावर आहे, ते वळण मात्र फारच रंजक आहे, कारण पाश्चिमात्य देशांसोबतच भारतातही बार्बेक्यूचं प्रस्थ आता तग धरू लागलं आहे, असं कलिनरी ऑपरेशन्स को-ऑर्डिनेटर असलेल्या ललित पाटीलचं म्हणणं आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये फूड ट्रक, हॉटेल्समध्ये बार्बेक्यूला सर्रास पसंती दिली जाते. तसं पाहिलं तर भारतात आणि परदेशात बार्बेक्यू करण्याची पद्धत जरी जवळपास मिळतीजुळती असली तरीही त्या पद्धतीमध्ये मॅरिनेशन किंवा पदार्थाना मसाले लावून ठेवण्यामध्ये बराचसा फरक असतो. आपल्याकडे मसालेदार मॅरिनेशनला पसंती दिली जाते, तर परदेशात सहसा मीठ, काळी मिरी पूड आणि क्वचितप्रसंगी लिंबाचा रस याच गोष्टींना मॅरिनेशनसाठी वापरलं जातं. त्यामुळे जर चवीचं म्हणाल तर, नव्या चवीला तुम्ही किती चटकन आपलंसं करता त्यावरच तुम्हाला पुढचे पदार्थ आवडतील की नाही याचा अंदाज सहज लावता येतो. बार्बेक्यूमध्ये आणखी एका गोष्टीची महत्त्वाची भूमिका असते. ती गोष्ट म्हणजे त्यात वापरलं जाणारं लाकूड. परदेशात सहसा ओक आणि मेपलच्या लाकडाचा वापर करून या पद्धतीने पदार्थ तयार केले जातात. काही वेळा मॅरिनेशन नसतानाही चक्क लाकडाच्या धुराची हलकी चव त्या पदार्थात मिसळलेली असते. बार्बेक्यूचं प्रस्थ बाहरेगावच्या देशांमध्ये वाढण्याचं कारण म्हणजे हल्ली पूर्ण आहार घेण्याकडे फार कमी लोकांचा कल असतो; पण आपण जे आणि जितकं खाऊ  त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्या आवडीच्या आणि जिभेचे चोचले पुरवणाऱ्या असाव्यात, असं अनेकांचं म्हणणं असतं. कधीकाळी फक्त हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचा हा प्रकार आता घराघरांतही शिरला आहे. पाश्चिमात्य देशांत घरटी हा प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे बार्बेक्यू ग्रिल किंवा अन्य प्रकारची भट्टी बनवून तयार केले जातात. आता तुम्हाला सगळीकडे अगदी छोटेखानी बार्बेक्यूही बाजारात मिळतात, त्यामुळे पिकनिकला किं वा अगदी घरच्या गच्चीवर मित्रमंडळींची मैफल जमवूनही बार्बेक्यूचा घाट घालता येतो. बार्बेक्यूचे अनेकविध प्रयोग सध्या रंगतायेत त्यातलाच ‘बार्बेक्यू राइड’ हा खास देशी प्रकार सध्या चर्चेत आहे.

बार्बेक्यू राइड

गेल्या काही वर्षांत बार्बेक्यू आपल्या जीवनशैलीचा एक भाग झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. आगीच्या मंद ज्वाळांच्या मदतीने मांस, भाज्या शिजवण्याचा हा प्रकार. त्याची चव अनेकांच्याच जिभेवर तरळण्याचे कारण म्हणजे बार्बेक्यू केलेल्या पदार्थामध्ये उतरणारी थोडी भाजकी, पण तितकीच दर्जेदार चव.

फूड इंडस्ट्रीमध्ये हा ट्रेंड गेल्या काही दिवसांमध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने रुळला आहे, की त्याचा फायदा घेत बेंगळूरुच्या अरुण वर्मा आणि त्याच्या मोठय़ा भावाने थेट त्यांच्या बुलेटला ‘बार्बेक्यू बाइक’चा अनोखा टच दिला आहे. ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणं अनेकांच्याच आवडीचं आहे. त्याच गाण्यापासून आणि ‘शोले’ या चित्रपटापासून प्रेरित होत या भावांच्या जोडीने एक नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या व्यवस्थापकीय शिक्षणाचा फायदा घेत अरुण आणि त्याच्या भावाने ‘बार्बेक्यू राइड’ सुरू केली. हैदराबाद, बेंगळूरु, चेन्नई या ठिकाणी दोन चाकांवर अस्सल स्वॅगमध्ये येणारी ही बार्बेक्यू राइड रस्त्याच्या कडेला उभी केल्यावर तिच्याकडे वळून पाहणाऱ्यांची संख्या फारच मोठी असते. जिभेची चव आणि एखादी पाककृती कोणाला अशी प्रकारेही प्रोत्साहित करु शकेल यावर सुरुवातीला कोणाचा विश्वास बसला नाही; पण ज्या वेळी या अनोख्या राइडवरून सुरू करण्यात आलेल्या बार्बेक्यूवर खिशाला चाप न लावता, आपल्याला परवडणारे पदार्थ खवय्यांच्या पुढे सादर करण्यात आले तेव्हाच अरुण आणि त्याच्या टीमला यशाचा मार्ग मिळाला. सध्या कॉर्पोरेट कार्यक्रमांपासून ते काही प्रसिद्ध मंडळींच्या घरी आयोजित करण्यात येणाऱ्या पाटर्य़ानासुद्धा बार्बेक्यू राइड पाहायला आणि तेथे मिळणारे पदार्थ चाखायला मिळतात. मसाले, चिकन, कोळसा आणि गरजेची सर्व सामग्री ठेवण्यासाठी या राइडमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आली असून, ज्या पद्धतीने ही बार्बेक्यू राइड डिझाईन करण्यात आली आहे, ती खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे. मिलिटरी ग्रीन (बॉटल ग्रीन) या रंगाचा वापर करत एक वेगळाच रॉ लुक देण्यात आलेली ही बाइक तुमच्या शहरात येण्याचीही तयारी करते आहे. फूड ट्रक किंवा मोठमोठाले रेस्तराँ या आता नेहमीच्या गोष्टी झाल्या आहेत, ‘बार्बेक्यू राइड’ ही संकल्पनाच नवीन असल्याने ती देशभर पोहोचवण्यावर सध्या आमचा भर आहे, असं अरुणने स्पष्ट केलं. कधीकाळी असा भाजका मेवा खायचा तर ‘पोपटी’ किंवा ‘हुर्डा पार्टी’ या प्रकारांचा आसरा घ्यावा लागायचा. आता थंडीचीही वाट न पाहता खुल्या शेतात, गच्चीत, नाही तर घरच्या बाल्कनीत आणि अगदीच बाहेरच खायचं असेल तेव्हा थेट मोटरसायकलवरून येणारी ही टेस्टी बार्बेक्यू राइड असे अनेक पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध झाले आहेत. ‘बार्बेक्यू’ ही खाद्यसंस्कृतीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती ‘गप्पा’संस्कृतीशी जोडली गेली असल्याने येत्या काळात याचे नवनवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतील यात शंका नाही.

viva@expressindia.com