हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

जगात विकता येत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. मात्र १०० वर्षांपूर्वी भारतासारख्या देशात पाणी विकता येईल असं कुणी सांगितलं असतं तर लोकांनी त्याला वेडय़ात काढलं असतं. बदलत्या काळासोबत गरजा बदलल्या आणि अगदी सहज आपण मिनरलयुक्त बाटलीबंद पाणी विकत घेऊ  लागलो. या बदलाचं कर्तेपण ज्या ब्रँडकडे जातं तो ब्रँड बिस्लेरी. या पाणीदार ब्रँडची ही कहाणी.

युरोपात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दूषित पाण्याची समस्या बिकट होऊ लागली होती. त्या काळात तिथे मिनरलयुक्त बाटलीबंद पाणी विकलं जाऊ  लागलं. त्याला उत्तम मागणी येऊ  लागली. अनेक कंपन्या या व्यवसायात शिरल्या. इटालियन संशोधक आणि व्यावसायिक फेलीस बिस्लेरी यानेही असा प्रयत्न केला. १९६५मध्ये त्याने बनवलेले बाटलीबंद पाणी बिस्लेरी या नावाने विकले जाऊ  लागले. भारतात १९६९ साली आपले हे उत्पादन त्याने विक्रीसाठी उपलब्ध केले. मात्र भारतात या बाटलीबंद पाण्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याला अनेक कारणे असू शकतात. पाणी ही गोष्ट विकत घेण्याची मानसिकता नसणे, शुद्ध पाण्याविषयी फारशी जागरूकता नसणे ही त्यातली काही. आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग फेलीस यांना जमले नाही. आपला व्यवसाय इथून गुंडाळण्याच्या बेतात ते असताना भारतीय पार्ले कंपनीने १९६९ साली हा ब्रँड विकत घेतला. त्या वेळी पार्ले कंपनीची सॉफ्टड्रिंक उत्पादनं जोरात होती. मात्र रंगरहित, गंधरहित, चवरहित पाण्याची जाहिरात कशी करायची हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. त्यामुळे हे योग्य प्रमाणातील मिनरल्सयुक्त पाणी शुद्ध व आरोग्यास पूरक आहे या मुद्दय़ावर भर देण्यात आला. या ब्रँडच्या इटालियन नावाने आधीच एक हायक्लास त्याला जोडला गेला होता. बिस्लेरीची पहिली छापील जाहिरात आली त्यात या पाण्याचा जागतिक दर्जा दाखवण्यासाठी दोन बिस्लेरी बाटल्या ट्रेमध्ये घेतलेला एक टिपिकल बटलर दाखवण्यात आला होता. पंचलाइन होती,  bisleri is veri veri extraordinari. (‘बिस्लेरी इज व्हेरी व्हेरी एक्स्ट्राऑर्डिनेरी’) या ओळीतील व्हेरी आणि एक्स्ट्राऑर्डिनेरीमधला ‘आर वाय’ जाणीवपूर्वक बिस्लेरीमधल्या ‘आर आय’ला मिळताजुळता दाखवण्यात आला होता. या जाहिरातीने सगळ्यांचे लक्ष वेधले.

सुरुवातीच्या काळात परदेशी किंवा अनिवासी भारतीय यांच्यापर्यंत हा ब्रँड पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. पण खरं लक्ष्य ग्राहक सामान्यजनच होते. पाणी विकत घ्यायची मानसिकता नसलेल्या देशात ते परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे गरजेचे होते. त्यानुसार ५०० मिली बाटलीची किंमत अवघी ५ रु. इतकी कमी ठेवण्यात आली. या स्वस्ताईने आपले काम केले आणि भारतीयांनी बिस्लेरीला स्वीकारले. हा प्रयोग यशस्वी झाला. हळू हळू उत्पादनात ४००% इतकी भरघोस वाढ झाली. अर्थात हा प्रवास फार सोपा नव्हता. हा ब्रँड स्थिरावण्यासाठी साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत वाट पाहावी लागली.

आज भारतात १२०० हून अधिक बाटलीबंद पाण्याचे ब्रॅण्ड्स आहेत. त्यातले ६०० तर तामिळनाडूत तयार होतात. या इतक्या प्रचंड मोठय़ा बाजारपेठेतला ४०% वाटा एकटय़ा बिस्लेरीचा आहे. बाटलीबंद पाण्यासोबत बिस्लेरी १२ लिटरच्या कंटेनर आणि नंतर २० लिटरच्या कॅनमध्ये मिळू लागले. त्यातून किंमत आणखीच कमी झाली.

हा ब्रँड रुजण्यासाठी काही प्रयत्न जाणीवपूर्वक झाले. एका सव्‍‌र्हेनुसार कंपनीच्या लक्षात आले की, लग्नसमारंभात ज्येष्ठ मंडळी आइस्क्रीम किंवा शीतपेये यापासून दूरच असतात. अशा मंडळींकरता बिस्लेरीची फ्री सॅम्पल्स उपलब्ध करून देण्यात आली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आज लग्नसमारंभ असो वा कोणतेही तत्सम कार्य, त्यात बिस्लेरी सहज वावरताना दिसते.

वितरणाचा विचार करता हॉटेल्स किंवा अन्य ठिकाणी या पाण्याला शीतपेयांची टक्कर मिळणार हे ओळखून उपाहारगृहांसोबत अगदी स्टेशनरी दुकानं ते केमिस्टपर्यंत सगळीकडे बिस्लेरीच्या बाटल्या ठेवण्यात आल्या. या सहज उपलब्धतेमुळे बिस्लेरीचा खप वाढला. बिस्लेरी ही प्रवासातील अत्यावश्यक गरज बनली. किंबहुना भारतीयांना या बाटलीने अधिक निर्धास्त केले. दूरच्या प्रवासाला निघताना पाण्याच्या भल्यामोठय़ा बाटल्या आठवणीने भरणारी मंडळी, कुठे ते ओझं नाचवायचं? असं म्हणत बिस्लेरीवर भार टाकत सुशेगाद झाली.

२००६ पासून निळ्या रंगाची बिस्लेरी बाटली समुद्री हिरव्या रंगात समोर आली. नैसर्गिक हिमालयीन पाण्यासह बिस्लेरी इतर असंख्य निळ्या बाटल्यांच्या ब्रँडपासून अगदी ठळकपणे वेगळी झाली. तो विशिष्ट रंग आणि स्वीट टेस्ट ऑफ प्युरिटीने निर्माण केलेला विश्वास लाखमोलाचा आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर बिस्लेरीने वेगवेगळ्या टॅगलाइन्स वापरल्या. किस टू ड्रिंक, प्रोटेक्ट द वन्स यू लव्ह,  या त्यापैकीच काही. तान्ह्य़ा बाळापासून ते आजारी व्यक्तीपर्यंत सर्वाना बिस्लेरीचं पाणी पाजताना मनात जो विश्वास असतो, तीच बिस्लेरीची खरी मोठी जाहिरात आहे. ‘‘एक मिनरल पाणी बाटली द्या हो!’’ असं न म्हणता ‘‘एक बिस्लेरी द्या’’ हे जे वाक्य आपल्या तोंडी येतं ते याच शुद्धतेच्या विश्वासामुळे.

गिला गिला पानी, पानी सुरीला पानी

होठोंने चख्खा पानी, बुंदोंमें रख्खा पानी

गुलजार यांच्या ओळींतील हे पाण्याचे थेंब शुद्धतेच्या विश्वासात न्हाऊन बाटलीबंद बिस्लेरीच्या रूपात आपल्या ओठी लागतात, तेव्हा पाण्याला जीवन का म्हणतात, हे उमगतं.

viva@expressindia.com