News Flash

कॅफे कल्चर : कॅफे एक्सलसिअर शतकाच्या उंबरठय़ावर

 कॅफेच्या अगदी हाकेच्या अंतरावर आझाद मैदान आहे.

ल्युमिएर बंधूंनी जुलै १८९६ रोजी पहिल्यांदा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित हॉटेल म्हणून गणल्या जाणा-या वॉटसन हॉटेलमध्ये फिल्म दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. एकोणीसाव्या शतकातील ती सर्वात मोठी घटना ठरली होती. पण त्याचा एकच खेळ पार पडला नाही. त्या फिल्मसचा दुसरा खेळही झाला आणि ते ठिकाण म्हणजे फोर्ट परिसरातील नॉव्हेल्टी सिनेमा. आता हा नॉव्हेल्टी सिनेमा म्हणजे नेमका कोणता असा प्रश्न पडणं साहाजिक आहे. सांगतो. तेव्हाचा नॉव्हेल्टी सिनेमा म्हणजे आत्ता आपण ज्याला ‘न्यू एक्सेलसिअर’ या नावाने ओळखतो तो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून अगदी हाकेच्या अंतरावर १८८७ साली बांधण्यात आलेलं नॉव्हेल्टी चित्रपटगृह हे खरंतर ऑपेरा हाऊस म्हणून कार्यरत होतं.  सिनेमा तंत्राचा शोध लागल्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी बांधण्यात आलेल्या नॉव्हेल्टीमध्ये ऑपेरा आणि नाटकांचे प्रयोग होत असत. भारतात सिनेमाचं आगमन झालं आणि तिथे चित्रपटांचेही शो सुरू झाले. शेजारीच असलेल्या गेईटी (नंतरचं कॅपिटॉल) सिनेमागृहाशी त्याची स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर १९०९ साली नॉव्हेल्टीचं नामकरण ‘एक्सलसिअर’ झालं. त्याकाळी या चित्रपटगृहाची आसनक्षमता होती ११०० आणि भारतातील सर्वात मोठा म्हणजेच ८४ फूट लांबीचा पडदा ही या सिनेमागृहाची खासीयत होती. पूर्वीपासूनच या सिनेमागृहाला बाल्कनी नाही. बाल्कनीचा संपूर्ण भाग हा प्रोजेक्शन रूम म्हणून वापरला जातो. याच सिनेमागृहाच्या तळमजल्याला एकेकाळी गार्डन कॅफे होता. त्या कॅफेमध्ये मुंबईत पहिल्यांदा सिझलर्स मिळू लागल्याचं सांगितलं जातं. आणि ही सिझलर्स कुलाबाच्या पॅरेडाईज कॅफेत तयार होत असत. त्याशिवाय इथले चिकन आणि मटण रोल्स, चिकन आणि मटन बर्गर, कटलेस, खीमा पाव देखिल प्रसिध्द होता. हे पदार्थ येत असत सिनेमागृहाच्या अगदी समोरच्या फूटपाथवरून. म्हणजे ‘कॅफे एक्सलसिअर’मधून.

१९१९ साली म्हणजेच आजपासून बरोबर ९९ वर्षांपूर्वी इराणहून मुंबईत दाखल झालेल्या अर्देशिर मझकूरी यांनी ‘एक्सलसिअर’ सिनेमाच्या समोरच्या फूटपाथवर एक गाळा विकत घेतला आणि हॉटेल चालवायला सुरूवात केली. मुंबईतील इतर इराणी हॉटेलप्रमाणेच त्यांनीसुध्दा इराणी चहा, बन मस्का, खीमा, पॅटीस हे पदार्थ विकायला सुरूवात केली आणि पाहता पाहता एका गाळ्याचं दोन मजली कॅफेमध्ये रूपांतर झालं. त्याकाळी खालच्या मजल्यावर बसण्यासाठी टेबल खुर्च्या आणि वरच्या मजल्यावर कुटुंबासाठी बंद खोल्या होत्या. काळाच्या ओघात खोल्यांची पध्दत मागे पडली आणि आता वरच्या मजल्यावरदेखिल बसण्यासाठी टेबल-खुर्च्याच आहेत.

फोर्ट परिसरात पूर्वीपासूनच ब्रिटीशांचा अंमल असल्याने या भागात लष्करांचा मोठा राबता असे. त्यामुळे ‘कॅफे एक्सलसिअर’मध्येही मोठ्या प्रमाणात ब्रिटीश सैनिक येत असत. उकडलेली अंडी, केळी, टोस्ट, स्र्कॅमबल्ड एग हे पदार्थ त्यांना न्यायहरीमध्ये लागत. कॅफेतर्फे खास सैनिकांना ते तयारही करून दिले जात.

काळ पुढे सरकत होता त्याप्रमाणे कॅफेच्या समोरच्या फुटपाथवर असलेल्या सिनेमागृहाचं रूप आणि नावंही बदलत होतं. नॉवेल्टी, एक्सेलसिअर, न्यू एक्सेलसिअर आणि आता मुक्ता ए२ – न्यू एक्सेलसिअर इतकी वेगवेगळी नावं या सिनेमागृहाने आजवर धारण केलेली आहेत. १९५०-६० च्या दशकात ‘मेट्रो’मध्ये एमजीएम, ‘न्यू एम्पायर’मध्ये वॉर्नर ब्रदर्स आणि ‘न्यू एक्सेलसिअर’मध्ये ब्रिटीश स्टुडिओ रॅंकच्या संस्थांचे चित्रपट दाखवले जात. ही तीनही चित्रपगृह हॉलीवूड चित्रपटांच्या फॅन्ससाठी हक्काची ठिकाणं होती. १९६७ साली मुंबईत पार पडलेला आजवरचा अतिशय गाजलेला आणि प्रतिष्ठित फ्रेंच सिनेमांचा फेस्टीव्हलही ‘न्यू एक्सेलसिअर’ येथे पार पडला होता. सॉफ्ट स्किन, पायराईट-ले-फो, द वॉर इज ओव्हर यांसारखे प्रसिध्द चित्रपट यामध्ये दाखवले गेले होते. सांगायचा मुद्दा हा की, या सर्व गोष्टींचा एकमेव साक्षीदार म्हणजे ‘कॅफे एक्सलसिअर’. इराणी कॅफे हे साधारणपणे पार्टनरशीपमध्ये चालवले जात. परंतु ‘कॅफे एक्सलसिअर’ची सुरूवातीपासूनच संपूर्ण मालकी मझकूरी कुटुंबाकडे आहे. अर्देशिर मझकूरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा गुस्ताद यांनी तो चालवला आणि आता त्यांच्यामागे आपल्या आजोबांचंच नाव लावणारे अर्देशिर मझकूरी म्हणजेच आदि मझकूरी कॅफेची धुरा सांभाळत आहेत.

१९८० च्या सुमारास व्हिडिओ कॅसेट्स मोठ्या बाजारात आल्याने सिनेमागृहांवर त्याचा परिणाम झाला. ‘न्यू एक्सलसिअर’च्या प्रेक्षकसंख्येवरही त्याचा परिणाम झाला. हा बदल ‘कॅफे एक्सलसिअर’ जवळून टिपत होतं. कारण फोर्ट परिसरातील या सर्वात जुन्या कॅफेचा मुख्य ग्राहक हा समोरच्या फुटपाथवरील सिनेमागृह होतं. पारसी पदार्थ ही इथली सुरीवातीपासूनच खासीयत आहे. मुंबईत फार कमी ठिकाणी मिळणारी ‘पात्रानी मच्छी’ इथे आजही हमखास मिळते. शिवाय पारसी स्टाईलची बिर्याणी, खीमा समोसा, कटलेस, धनसाक या पदार्थांची चव मुद्दामहून येथे जाऊन चाखावी अशीच आहे. ब्रिटीशांना कटलेटसोबत करी आवडत असे. आजही लंडनमध्ये काही मोजक्या ठिकाणी कटलेटसोबत करी सर्व्ह केली जाते. तोच प्रकार तुम्हाला येथेही चाखायला मिळेल. हाताच्या तळव्याहून मोठ्या आकाराच्या मटण आणि चिकन कटलेटसोबत करी हा प्रकार मुंबईत कुठे खावा तर ‘न्यू एक्सलसिअर’मध्येच.

अर्देशिर यांनी अनेक पदार्थांच्या रेसिपी तयार करून ठेवलेल्या आहेत. आजही त्याच पध्दतीने पदार्थ तयार केले जातात. बाजारातून तयार मसाले न आणता खडे मसाले आणून हवे त्यापध्दतीने मसाले कुटून घेतले जातात. म्हणूनच वर्षानुवर्षे त्यांची चव कायम आहे. गेली चाळीस वर्षे उस्मान आणि मेहरान हे इथले मुख्य कूकही मोठ्या प्रेमाने आणि कुठलाही फेरफार न करता सर्व पदार्थ तयार करत आहेत. चाळीसच्या दशकात चिकन आणि मटण बर्गर येथे सर्वप्रथम सुरू करण्यात आला. शिवाय मुंबईत फार थोड्या लोकांना माहित असलेली गोष्ट म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून येथे पिस्ता कुल्फी तयार केली जाते. अतिशय रवाळ आणि संपूर्णपणे दुधापासून तयार केलेली ही कुल्फी जेवणानंतर मुद्दाम खावी अशीच आहे. पुडींग, कॅरमल कस्टर्ड हेद्खिल वर्षानुवर्षे कॅफेमध्ये तयार केलं जात आहे. इराणी कॅफे म्हटलं की पाव आला. पण ‘कॅफे एक्सलसिअर’मध्ये तुम्हाला पाव मिळणार नाही. खीमा असो वा ऑमलेट, भुर्जी त्यासोबत दिला जातो ब्रेड स्लाईस. हा ब्रेड स्लाईसही बेकरीतून खास तयार करून घेतला जातो. जाडसर, पांढरा, मऊ, लुसलुशीत ब्रेड स्लाईस पावावर मात करतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

काळाप्रमाणे चायनिज आणि शोवर्मासारखे पदार्थही मेन्यूमध्ये समाविष्ट झाले आहेत. पण मूळ पदार्थांच्या चवीवर त्याचा अजिबात परिणाम झालेला नाही, हे विशेष. कॅफेच्या अगदी हाकेच्या अंतरावर आझाद मैदान आहे. त्यामुळे फार पूर्वापासूनच येथे अनेक खेळाडू श्रमपरिहारासाठी येतात. शिवाय कलाकारांचाही राबता असतोच. फोर्टच्या प्रसिध्द डी. एन. रोड मार्गावरील ज्या वास्तूत ‘इंडो-अमेरिकन सोसायटी’ आणि ‘किताबमहल’सारखी नावाजलेली ठिकाणं आहेत, त्याच इमारतीत मागच्या बाजूला ए.के.नायक मार्गावर ‘कॅफे एक्सलसिअर’ आहे. ही इमारत हेरिटेज वास्तूत मोडत असल्याने कॅफेच्या बाह्यरूपात फारसे बदल केले गेलेले नाहीत. परंतु कॅफेचे इंटिरीअरसुध्दा साधेच आहे. इराणी कॅफेमध्ये पाहायला मिळणारे मोठाले आरसे, लटकणारे मोठाले पंखे इथेही आहेत. चौकोनी टेबल्स आहेत पण लाकडी खुर्च्यांची जागा आता लोखंडाच्या खुर्च्यांनी घेतली आहे. प्रत्येक टेबलवर काचेखाली मेन्यू नाहीए. त्याऐवजी वरच्या मजल्यावर जाणा-या लाकडी शिडिच्या छातीवर विविध पदार्थांच्या नावाच्या पाट्या लावलेल्या दिसतात. कुठल्याही टेबलवर बसून ती नावं सहज वाचता येतात. पिवळ्या भिंतीवर ठराविक अंतरावर पाच प्रकारची जुन्या पध्दतीची मोठी घड्याळं लावलेली आहेत. ती आदि मझकूरी यांच्या खासगी संग्रहातील आहेत.

पूर्वी बाहेर दरवाज्याजवळ असलेला गल्ला आता आतल्या बाजूला सरकलाय. वाघमुखी हॉटेलच्या त्या गल्ल्यावर बसून इराणी लोकं जासूसी करत असत, असं आदि गमतीने म्हणतात. गेली अनेक वर्षे नित्यानंद कारकेरा हे मॅनेजर कॅफेची जबाबदारी सांभाळत आहेत. पण आदि रोज न चुकता कॅफेमध्ये चक्कर टाकतात. आलेल्या ग्राहकांशी गप्पा मारतात. पुढील वर्षी ‘कॅफे एक्सलसिअर’ शंभराव्या वर्षात पदार्पण करतोय. आजोबा आणि वडिलांनी मोठ्या मेहनतीने मोठा केलेला हा व्यवसाय आपण टिकवून ठेवला याचा सार्थ अभिमान आदि यांच्या चेह-यावर झळकताना पाहायला मिळतो. हो असाच कायम राहो, हीच सदिच्छा.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:01 am

Web Title: article on cafe excelsior cafe culture
Next Stories
1 ‘प्लस’ फॅशन
2 ‘चष्मे’बहाद्दर
3 ‘जग’ते रहो : आपुलकीचं शहर