15 December 2018

News Flash

कॅफे कल्चर : कॅण्डीज कॅफे

अ‍ॅलन परेरा यांचे आजोबा सांतन परेरा हे स्वत:च्याच नावाने वांद्रे येथे बेकरी चालवत असत.

सुंदरता आणि समाधानाची नवी व्याख्या

पहिल्या भेटीतच ‘कॅण्डीज’ मनात घर करून राहतं. इथे वारंवार जावंसं वाटतं. एकदा भेट देऊन समाधान होतंच असं नाही. मुंबई शहरातील जवळचे मित्रमैत्रिणी असो वा परदेशी पाहुणे.. भेटण्यासाठी हीच जागा कशी योग्य आहे यासाठी कारणं द्यावी लागत नाहीत. मुंबईतील नाक्यानाक्यावर स्वत:ला कॅ फे म्हणून बोंब ठोकणाऱ्या जागांच्या तुलनेत ‘कॅण्डीज’ हा ‘ऑड मॅन आऊ ट’ ठरावा इतका वेगळा आहे. कारण फक्त वेळ घालवण्यासाठी आणि वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मिळण्याच्या जागेपलीकडे मुंबईच्या कलकलाटात निवांत क्षण आणि सौंदर्याची एक वेगळी व्याख्या तुम्हाला इथे अनुभवायला मिळते.

अ‍ॅलन परेरा यांचे आजोबा सांतन परेरा हे स्वत:च्याच नावाने वांद्रे येथे बेकरी चालवत असत. तर वडील काजेटन परेरा हे मॅक रोनेल्समध्ये बेकरीचे पदार्थ विकत असत. साहजिकच अ‍ॅलन यांची या व्यवसायातील गोडी वाढत गेली. दादरच्या कॅटरिंग कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी या व्यवसायात पूर्ण वेळ उडी घेतली. अ‍ॅलन यांनी १९८४ साली लोखंडवाला येथे ‘कॅण्डीज’ची सुरुवात केली. वर्षभरातच १७ वी गल्ली, खार येथे कॅण्डीजचं बस्तान हलवण्यात आलं जे साधारण दोन ते अडीच वर्ष होतं. १९९२ साली युनियन पार्क , पाली हिल येथे कॅण्डीज हलवण्यात आलं जे आजतागायत सुरू आहे. पण कॅण्डीजला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली २००८ साली पाली हिल येथील ‘लर्नर्स अकॅडमी’शेजारील मॅक रोनेल्समध्येच पोर्तुगीज स्टाईलमध्ये तयार करण्यात आलेल्या व्हिंटेज व्हिलामुळे.

कॅण्डीजची नयनरम्य वास्तू परेरा कुटुंबीयांच्याच मालकीची आहे. अ‍ॅलन याच वास्तूमध्ये लहानाचे मोठे झाले. दशकभरापूर्वी जेव्हा मुंबईत परदेशी धर्तीवरील कॅ फेजचं प्रस्थ वाढू लागलं तेव्हा अ‍ॅलन यांच्या मनातदेखील कॅ फे उघडण्याची इच्छा जागृत झाली. पण त्यांना केवळ व्यावसायिक तत्त्वावर कॅफे सुरू करायचा नव्हता. अ‍ॅलन यांच्यावर सुरुवातीपासूनच स्पेन, पोर्तुगाल आणि फ्रोन्ससारख्या युरोपियन देशांच्या संस्कृतींचा पगडा आहे. त्यामुळे युरोपीय पद्धतीची वास्तुरचना, कला, संगीत आणि पदार्थ यांची सांगड घालून त्यांनी कॅण्डीजचा आराखडा तयार केला. आणि बघता बघता तीन मजली बंगल्याचं रूपडं पालटून त्याचं पोर्तुगीज स्टाईल व्हिंटेज व्हिलात रूपांतर झालं. कुठलीही गोष्ट बारीकसारीक कलाकुसर करून सुंदररीत्या सजवणं यात अ‍ॅलन यांचा हातखंडा आहे. त्यामुळे इथला प्रत्येक कोपरा तुम्हाला भारावून सोडेल.

कॅण्डीजमध्ये प्रवेश करतानाच त्याच्या वेगळेपणाची चाहूल लागते. पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या भिंती, निळ्या रंगाचे खांब आणि त्यांच्या मध्ये मोझ्ॉक पद्धतीची हाताने तयार केलेली चित्रे. डोक्यावर झाडं आणि वेलींमुळे तयार झालेलं घुमटाकार छत आणि दोन्ही बाजूंना बसण्यासाठी लोखंडी, लाकडी नक्षीदार बैठका. आत शिरताच मंद प्रकाशात दोन्ही बाजूंना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि दहा पावलांवरच उजव्या बाजूला आहे भले मोठे फुड काऊं टर. समोरूनच उजव्या हाताला काही पायऱ्या वर जाताना दिसतात आणि तिथून सुरू होतं कॅण्डीजचं वेगळेपण. कॅण्डीजच्या पहिल्या भेटीत तुम्ही या जागेत अक्षरश: हरवून आणि हरखून जाल अशी त्याची रचना आहे. कारण सरधोपट एकावर एक चढवलेले मजले येथे नाहीत. प्रत्येक मजल्यावर बसण्यासाठी ऐसपैस आणि हवेशीर जागा तयार करण्यात आलेल्या आहेत. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याच्या मोकळ्या वाटेवरच भिंतीला बिलगून जोडप्यांना बसण्यासाठी जागा तयार केलेल्या आहेत. तर काही ठिकाणी पाच-सहा जणांच्या ग्रुपने बसून तासन्तास गप्पा ठोकाव्यात अशी कोपऱ्यांची नितांतसुंदर रचना आहे.

इथल्या ‘अल-फ्रे स्को झोन’मध्ये बसून तुम्ही दिवसा सूर्यकिरणांची आणि रात्री चांदण्याची मजा लुटत पदार्थाचा आस्वाद घेऊ  शकता किंवा वातानुकूलित ‘रूम ऑफ लॅम्प’मध्ये बसून वेगवेगळ्या प्रकारच्या मोरक्कन काचेच्या दिव्यांखाली रोमँटिक गप्पा मारू शकता. तळमजला आणि पहिल्या मजल्यावर फूड काऊं टर आहेत. तिथून आपल्या आवडीचे पदार्थ घेतल्यावर जागा निवडण्यात तुमचं कौशल्य पणाला लागतं. तीन मजल्यांच्या व्हिलामध्ये एका वेळी केवळ पासष्ट माणसंच बसू शकतील अशा पद्धतीने सुटसुटीत व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे. जागा आहे म्हणून उगीचच खेटून टेबल-खुच्र्या मांडण्याचा अट्टहास केलेला नाही. लोखंडी पाया असलेल्या टेबलांचे पृष्ठभाग रंगीत आणि विविध प्रकारच्या टाईल्सपासून तयार करण्यात आले आहेत. त्याच्याभोवती हेरिटेज पद्धतीच्या लाकडी पृष्ठभाग असलेल्या आणि लोखंडी नक्षीकाम, चित्राच्या खुच्र्या व आरामदायी सोफे मांडलेले पाहायला मिळतात.

प्रवेशद्वारापासून ते छतावरील बसण्याच्या मोकळ्या जागेतील इथल्या प्रत्येक भिंतीवर मोझ्ॉक पद्धतीने तयार केलेली चित्रे आणि प्रतिमा आहेत. जगभरातून आणलेल्या विविध प्रकारच्या रंगीबेरंगी टाइल्स आणि विशेषत: टर्किश टाइल्सचा त्यामध्ये वापर करण्यात आलाय. येशू ख्रिस्त, दलाई लामा, मायकल जॅक्सन, बिटल्सचे शिलेदार, आयफेल टॉवर, सॅक्सोफोनवादक, काही चेहरे तर काही नुसत्याच नक्षीदार रचना. पर्शियन थीम असेलेली जुनी पेंटिंग्ज, पोस्टर्स नॉस्टॅल्जिक फिल देतात. फक्त भिंतीच नाही तर प्रत्येक मजला आणि कोपऱ्यातील जमिनीचा पृष्ठभागही तितकाच रंगीबेरंगी आणि वेगळ्या धाटणीच्या फरश्यांनी सजलाय. त्यामुळे प्रत्येक वेळी आपण एका वेगळ्याच झोनमध्ये प्रवेश करत असल्याचा भास होतो.

कॅण्डीजमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ मिळतात. सकाळचा नाष्टा, चिकन, मटण, व्हेज पफ, टुना, एग, चिकन सॅन्डविचेस, तंदुरी पदार्थ, ड्रॅगन चिकन, फ्राइड राइस. त्याशिवाय इथला सलाड बारदेखील अतिशय लोकप्रिय आहे. बहुतेक रेसिपी या परेरा कुटुंबीयांच्याच आहेत. त्यात ग्रिक चिकन, चीज केक, मॅकरोनी सलाड, पोटॅटो सलाड, रिच चॉकलेट केक, लसानिया, स्पगेटी बोलोनिज, चिकन स्निटझेल आणि गोवन पदार्थामध्ये गोवा सॉसेजेस, कोलंबी आणि माशांची करी, चिकन कॅफनल यांचा समावेश होतो. कॅ फेमध्ये लागणारे बन, गार्लिक बटर बगेट, सर्व प्रकारचे ब्रेड त्यांच्या स्वत:च्याच बेकरीत तयार होतात. ठरावीक अंतराने नवीन पदार्थ मेन्यूमध्ये समाविष्ट केले जातात. अलीकडेच वेगवेगळ्या प्रकारची क्रोसन्ट सॅन्डविचेस, चिकन शोर्मा रॅप आणि बर्मीज खोसींचा समावेश करण्यात आलाय. ‘नाताळ’च्या आठवडय़ात इथे रोस्ट चिकन आणि प्लम पुडिंग लोकांना खायला आवडतात. तर ‘इस्टर’ला मार्झिपॅन आणि चॉकलेट इस्टर एगला खूप मागणी असते. विविध प्रकारचे कप केक, थंड पेय, कॉफी, मिनी मील्स, पिझ्झा, गोड पदार्थ, ज्युसचे प्रकार यांची यादीही खूप मोठी आहे. कॅफेच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलात तरी सौम्य आवाजातील संगीत तुमच्या कानी पडेल. विशेषत: स्पॅनिश फ्लमेंको, इलेक्ट्रो-पॉप आणि काही समकालीन पॉप आर्टिस्टची गाणी आणि वाद्यांचा त्यामध्ये भरणा आढळेल.

‘मॅरी मी’ हे भेटवस्तूंचं शॉपही पहिल्या मजल्यावर आहे. कॅण्डिस परेरा आणि जॅरेट डी’ब्रेओ या वेडिंग प्लॅनर असलेल्या जोडप्याने लोकांच्या वैयक्तिक आवडीच्या आणि विविध प्रसंगी भेट देता येतील अशा सुंदर वस्तूंचं कलेक्शन इथे विक्रीसाठी ठेवलंय. व्हॅलेंटाइन डे आणि दिवाळी असं वर्षांतून दोनदा ‘बझार अ‍ॅण्ड ब्लिंग’ नावाने ओपन एअर मार्केट भरवलं जातं. फॅशन, स्टेशनरी, घर सजावट आणि तरुण डिझायनर्सनी तयार केलेल्या वस्तू इथे विक्रीला असतात. सायंकाळी सांगीतिक मेजवानी असते. नाताळच्या काळात स्थानिक लहान मुलं ख्रिसमस कॅरोल गातात. ‘रॉक ऑन’ चित्रपटामुळे सर्वपरिचित झालेल्या ल्युक केनीनेदेखील ख्रिसमसच्या आठवडय़ात येथे संगीताचे कार्यक्रम केले आहेत.

सामाजिक उपक्रमांनादेखील कॅण्डीजचा नेहमी पाठिंबा असतो. आपल्या ग्राहकांची आदर्श भारताबद्दल काय स्वप्नं आहेत हे जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडून पत्र आणि कवितालेखनाचा कार्यक्रम ‘डिअरेस्ट इंडिया’ या संस्थेमार्फत राबवण्यात आला होता. वापरातील जुने चांगले कपडे गरजूंना दान करण्यासाठीही वेळोवेळी कार्यक्रम केले जातात. कॅण्डीजमध्ये कधीच तुम्हाला विजेचा झगमगाट दिसणार नाही. मंद प्रकाश, सौम्य संगीत, चविष्ट पदार्थ आणि आवडत्या व्यक्तीसोबत मनसोक्त गप्पा ही कॅण्डीजमधील आदर्श संध्याकाळ म्हणता येईल. म्हणूनच विजेच्या वापराचं महत्त्व स्वत: जाणतानाच इतरांनाही पटवून देण्यासाठी ‘बत्ती बंद’ या उपक्रमातही त्यांचा सहभाग कौतुकास्पद ठरतो. त्या वेळेस लोकांनी इथे कॅण्डल लाइट डिनरचा सुखद अनुभव घेतला होता.

कल्याण करमाकर यांच्यासारखे नावाजलेले फूड ब्लॉगर आणि लेखक नियमितपणे आपल्या मुंबईच्या फूड टूरमधील लोकांना कॅण्डीजला भेट देण्यासाठी आवर्जून घेऊ न येतात. यावरूनच शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या वास्तूचं आणि येथील पदार्थाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. ‘कॅण्डीज कॅफे’ संपूर्णपणे परेरा कुटुंबीयांमार्फत चालवला जातो. सुरुवातीपासूनच चांगलं खाणं, उत्कृष्ट संगीत आणि त्याला साजेसं वातावरण देण्यावर त्यांचा भर आहे. भविष्यातही खवय्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणं हे प्राथमिक ध्येय ठेवून वाटचाल करण्यातच आपलं समाधान असल्याचं ते सांगतात. शहराच्या मध्यभागी असलेल्या पाली हिलसारख्या उच्चभ्रू वस्तीत असूनदेखील कॅण्डीजला प्रत्येक सामान्य मुंबईकर खिशाला किती चाप बसेल याचा क्षणभरदेखील विचार न करता भेट देऊ  शकेल, अशी त्याची बैठक आहे. अट फक्त एकच, तिथल्या प्रत्येक रंगीत कोपऱ्याचा, शांततेचा आणि मोकळ्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटण्याची सौंदर्यदृष्टी तुमच्यात असली पाहिजे.

First Published on March 9, 2018 12:32 am

Web Title: article on candies cafe bandra