17 December 2017

News Flash

कल्लाकार : कोशिश करनेवालों की..

दहावीपर्यंत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये १३ राष्ट्रीय स्पर्धामधून ती खेळली.

राधिका कुंटे | Updated: October 6, 2017 4:37 AM

जिम्नॅस्टिकपटू आणि कथ्थक नृत्यांगना पूजा सुर्वे.

जिगरबाज जिद्द, मेहनत आणि सकारात्मक विचारांच्या साथीने तिने क्रीडा आणि कलागुणांमध्ये प्रावीण्य मिळवलं. केवळ तेवढय़ावरच न थांबता युवकांना त्याचं प्रशिक्षणही ती देते आहे. ही कल्लाकार आहे हिृदमिक जिम्नॅस्टिकपटू आणि कथ्थक नृत्यांगना पूजा सुर्वे.

खरं तर कथ्थक आणि बॅले डान्सर असणाऱ्या आणि हिृदमिक जिम्नॅस्टिकच्या क्षेत्रात भारताचं प्रतिनिधित्व करीत देशाचं नाव उंचावणाऱ्या पूजा सुर्वेशी बोलायचं म्हणजे थोडं दडपणच होतं. पण सुसंवादाचा पूल काही क्षणांत साधला गेला आणि पूजा परफॉर्म करताना ज्या गतीनं लीलया तिच्या हातातली रिबिन फिरते, तितक्याच सहजगतीनं तिच्याशी गप्पा रंगल्या.. पूजानं पाचव्या वर्षी दादरच्या ‘श्री समर्थ व्यायाम मंदिरा’त प्रवेश घेतला. तिथे सगळे खेळ खेळताना मुला-मुलींची खेळातली योग्यता निरखून त्यात त्यांना तयार करण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातात. त्यानुसार तिला जिम्नॅस्टिकमध्ये प्रवेश मिळाला. तिला फुलवा खामकर आणि वर्षां उपाध्ये या गुरूंचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. पहिल्याच वर्षी राज्य पातळीवरचं पहिलंवहिलं ताम्रपदक तिला मिळालं आणि तिच्या यशाची घोडदौड सुरू झाली. त्याच सुमारास तिच्या आईने कथ्थकच्या प्रशिक्षणाबद्दल विचारपूस केली होती. तिने कायम अभ्यासात गुरफटावं, असं त्यांना वाटत नव्हतं. तिने अष्टपैलू व्हावं, असं त्यांना वाटे. त्यामुळे पूजा पाच वर्षांची असताना त्यांनी कथ्थकची चौकशी केली, पण सातव्या वर्षांनंतरच कथ्थकला प्रवेश मिळत असल्याने तेव्हाच प्रवेश घेतला. तेव्हा बालमोहन विद्या मंदिरात आशाताई जोगळेकर यांचे क्लासेस चालायचे. तिथे पूजाला गुरू राधिका फणसे यांचं मार्गदर्शन लाभलं. पुढे कथ्थक आणि जिम्नॅस्टिकच्या सरावाची वेळ जुळेनाशी झाली. दरम्यान, राधिका यांनी घरी क्लासेस सुरू केल्याने पूजाही तिच्या सोयीच्या वेळेनुसार तिथे जाऊ  लागली. राधिका यांनी पूजाला वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे कथ्थक आणि जिम्नॅस्टिक दोन्हींचा मेळ तिला घालता आला.

दहावीपर्यंत आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये १३ राष्ट्रीय स्पर्धामधून ती खेळली. अनेक पदकं मिळवली. कथ्थकमध्ये विशारद प्रथमा केलं. आणि त्यानंतर ती हिृदमिक जिम्नॅस्टिककडे वळली. कथ्थक हे त्याकडे वळण्याचं मुख्य कारण होतं. कारण या खेळासाठी साजेसं नृत्यही तितकंच महत्त्वाचं ठरतं, असं ती म्हणते. दरम्यान, विलू भरुचा यांच्याकडे ती बॅलेही शिकत होती. पुढे ती हिृदमिक जिम्नॅस्टिकमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरली. वर्ल्ड चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्ससह अनेक स्पर्धामध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं. तेव्हा चार सेटमध्ये केलेलं एक रुटिन हे शास्त्रीय नृत्यावर आधारित होतं. जिम्नॅस्टिक आणि कथ्थकचा हा मिलाफ आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेला. २०१० मध्ये बेलारूसला झालेल्या ‘हिृदमिक जिम्नॅस्टिक वर्ल्डकप’मध्ये तिला ‘मिस एक्झोटिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तो तिच्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण ठरला, असं तिने सांगितलं.

लहानपणी आजारपणामुळे तिची प्रकृती खूपच नाजूक झाल्याने तिला घरच्यांनी बाहेर पाठवायचं टाळलं. शरीरातील ताकद वाढवण्यासाठी तिला खेळायला पाठवण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला. शाळा-महाविद्यालयांतील वक्तृत्व स्पर्धासाठी सहस्पर्धक पाठांतर करायचे तर तिला एकदा वाचून लक्षात राहायचं. नृत्यामुळे आपसूकच एक ग्रेस आली. आजच्या जगात स्वत:ला प्रेझेंट करणं हे महत्त्वाचं असतं, ते कथ्थकमुळे शक्य झाल्याचं ती म्हणते. पूजाला ‘बालश्री’ पुरस्कार मिळाला आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे’सह काही रिअ‍ॅलिटी शोज आणि विविध नृत्य स्पर्धामध्येही ती सहभागी झाली होती. आजही वेळात वेळ काढून ती डान्स शो करतेच.

हिृदमिक जिम्नॅस्टिकमध्ये वळल्यानंतर पहिल्या सगळ्याच स्पर्धामध्ये तिला सुवर्णपदकं मिळाली होती. पूजा सांगते की, ‘त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान माझा गुडघा दुखावला गेला. त्या वेळी स्ट्रेचरवरून मला बाहेर नेण्यात आलं. दुखापतीचं स्वरूप माहिती नव्हतं, त्यामुळे मला स्पर्धा खेळायची आहे, असं मी डॉक्टरांना सांगत होते. मग त्यांनी सांगितलं की, ‘मी तुला स्पर्धा खेळायला देतो, पण दोन्ही पायावर नीट उभी राहून दाखव’. मी प्रयत्न केला, पण शक्य झालं नाही.. हे सांगतानाही पूजाच्या अंगावर शहारे आले. कदाचित तो प्रसंग तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला असावा. मात्र ‘लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की कभी हार नहीं होती’, हे हरिवंशराय बच्चन यांचे शब्द तिने खरे करून दाखवले. त्या वेळी आई-बाबा पाठीशी होते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय संघटनाही तिच्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. स्वामी समर्थावर तिची श्रद्धा आहे. हिृदमिक जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं, हे तिनं मनाशी पक्कं केलं होतं. डॉक्टरांकडून उपचार घेऊ न वर्षभराने पुन्हा पहिल्यापासून खेळाचा श्रीगणेशा केला. हा तिच्या आयुष्यातला मोठा टर्निग पॉइंट होता, असं ती सांगते. त्यानंतर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करीत २००९ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आपली निवड झाल्याची माहिती तिने दिली. त्याच वर्षी नवी दिल्लीत झालेल्या ‘कॉमनवेल्थ गेम’मध्ये तिचा देशातून पहिला आणि विश्व क्रमवारीत १६ वा क्रमांक आला होता. हा तिचा विक्रम अद्याप कोणालाही मोडता आलेला नाही. ती म्हणते की, ‘आपण स्पर्धेच्या पोडिअमवर जातो. हजारो माणसं ‘इंडिया, इंडिया’चा जयघोष करीत असतात. आपण भारताचं प्रतिनिधित्व करतो आहोत आणि ही कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडायला हवी, ही एकच भावना मनात घर करते. खरं तर हे सगळं शब्दांत सांगणं कठीण आहे’, असं म्हणतच ती हा भावनांचा पट आपल्यासमोर उलगडायचा प्रयत्न करते.

पूजाने ‘डी. जी. रुपारेल’ महाविद्यालयातून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एस्सी. केलं आहे. कला नि क्रीडा क्षेत्रातील अव्वल कामगिरी करताना तिचं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं नाही. तिने सलग तीन वर्षे ‘गोल्डन ट्रॉफी ऑफ द इयर’ हा पुरस्कार पटकावला आहे. एरवी पदवीनंतर काय, या दुविधेचा सामना तिला करावा लागला नाही. ती सांगते की, ‘जिम्नॅस्टिक आणि कथ्थक हे माझे छंद आहेत. पुढे जिम्नॅस्टिकची गोडी लागल्यामुळे त्यातच करिअर केलं. २०११ मध्ये जिम्नॅस्टिक प्रशिक्षक व्हावं असं काही ध्येय डोळयापुढे ठेवलं नव्हतं खरं तर.. ठाण्याच्या काकांनी याबद्दल कळकळीनं सुचवलं. मग वर्षभराने ‘फिनिक्स जिम्नॅस्टिक अ‍ॅकॅडमी’ सुरू झाली. तिथं जिम्नॅस्टिकसह कथ्थक आणि बॅलेही शिकवलं जातं. दोन मुलांपासून सुरुवात झालेल्या या अ‍ॅकॅडमीत सध्या अडीचशेहून अधिक मुलं जिम्नॅस्टिक शिकत आहेत. त्यातील सहा मुलं आंतरराष्ट्रीय स्तरावरील, २७ राष्ट्रीय स्तरावरील आणि ७०हून अधिक राज्य स्तरावरील खेळाडू आहेत’, अशी माहिती तिने दिली. अल्प काळात एवढं यश मिळवणं खरोखरच कौतुकास्पद आहे.

‘आपल्याकडे क्रीडा संस्कृती म्हणावी इतकी विकसित झालेली नाही. बाहेरच्या देशांत एखादा तरी खेळ खेळायची सक्ती असते. त्यात विद्यार्थी प्रावीण्य मिळवू लागल्यावर त्याला त्या खेळात शिक्षण दिलं जातं. त्यामुळे अभ्यास आणि खेळ हा ताण त्यांच्यावर नसतो. ‘खेलो इंडिया’ उपक्रमामुळे युवा खेळाडूंना थोडा आर्थिक मदतीचा हात मिळेल, असं दिसतं आहे’, अशी आशा पूजा व्यक्त करते. २०१६ मध्ये झालेल्या ‘रिओ ऑलिम्पिक गेम्स’साठी पूजाची ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीवर ‘टेक्निकल हेड’ म्हणून निवड झाली होती. पूजा भारतातील हिृदमिक जिम्नॅस्टिक्समधील सर्वोच्च कॅटेगरी मिळवणारी जज ठरली आहे. तिची बहीण मानसीही जजची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. या स्पर्धेत रशिया, चीन, इजिप्त, इंडोनेशिया, फिलिपिन्स अशा विविध देशांमधून ४५ खेळाडू सहभागी झाले होते. ही अत्यंत कठीण परीक्षा असून ती उत्तीर्ण होणं सोपं नसतं, असं तिने सांगितलं.

या सगळ्या प्रवासात आईच आपली रोल मॉडेल आहे, असं ती म्हणते. तिला घडवताना तिने केलेल्या अविरत मेहनतीमुळे पूजाला प्रेरणा मिळाली. तिच्या आईच्या या प्रयत्नांना बाबांची नेहमीच साथ लाभली. महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचा मानला जाणारा ‘श्री शिवछत्रपती पुरस्कार’ही पूजाला मिळाला आहे. सध्या जिम्नॅस्टिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या खेळाडूंचं ती मोकळेपणाने कौतुक करते. जिम्नॅस्टिक हा खेळ सर्वदूर पोहोचला पाहिजे असं तिला मनापासून वाटतं. ती म्हणते की, ‘आपल्याकडे फार टॅलेंट आहे, पण ते पुढे येत नाही. त्यामुळे गरीब, होतकरू खेळाडूंना मी मोफतही शिकवते. त्यांचा सर्व खर्च करते, कारण टॅलेंटला वाव मिळायला हवा. यासाठी आम्ही ‘पूजा ट्रस्ट’ संस्था काढली आहे.’ एकुणात जिम्नॅस्टिकमधले चित्र आशादायी आहे, असं तिला वाटतं. कला आणि क्रीडा या गुणांचा सुरेख मिलाफ साधणाऱ्या पूजाला हार्दिक शुभेच्छा!

स्पर्धेत पोडिअमवर उभी राहते तेव्हा काहीच आठवत नाही. फक्त इतक्या वर्षांचा सराव, जागा, साधनं (रिंग/ बॉल/ रिबिन) आणि स्वत: इतक्याच गोष्टी अस्तित्वात राहतात..

ते कसं होतं, हे शब्दांत सांगणं कठीण आहे.. इट्स ब्लँक माइंड विथ किन परफॉर्मन्स.

viva@expressindia.com

First Published on October 6, 2017 12:36 am

Web Title: article on dancer pooja surve kathak dancer belly dancer