24 January 2019

News Flash

‘कट्टा’उवाच : डूडल

डूडल हे माध्यम शिकून किंवा शिकवून येण्यासारखं नाही आणि शिकण्यासारखंही नाही.

एकदम लहानपणी आपल्या हातात नुसते रंगीत खडू आणि समोर एक कागद देऊन आपल्याला मोकाट सोडलं जायचं. त्यावेळी रंग म्हणजे काय, स्ट्रोक म्हणजे काय, रंगांचा वापर कसा करायचा वगैरे काहीच माहीत नसायचं. मात्र कधी कधी खूप सुंदर कलाकृती या रेखाटनामधून जन्माला येते. काही वेळा काही मानसशास्त्रज्ञ त्यांच्याकडे आलेल्यांना कोरे कागद आणि रंग देतात आणि तयार झालेल्या रेखाटनावरून समोरच्याची मन:स्थिती ओळखतात. याच ‘रॅन्डम’ रेखाटनाला डूडल म्हटलं जातं. कट्टय़ावर या डूडलचा उल्लेख करण्यामागचं कारण हा त्याचा तरुणाईतील वाढता वापर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अनेकदा शब्दांशिवाय नानाविध माध्यमांतून अभिव्यक्ती होते. ‘डूडल’ हे कट्टय़ावरचं आजचं शब्दांविना सारं काही बोलणारं, सांगू पाहणारं माध्यम आहे.

स्वत:चं लक्ष नसताना किंवा खरं तर जाणूनबुजून संपूर्ण लक्ष न देता जे सहजतेने तयार होईल त्याला ‘डूडल’ म्हटलं जातं. ही डूडल अनेकदा फक्त प्रतीकात्मक चित्र असतात. त्यात कोणत्याही रंगांचं बंधन नसतं, कोणत्याही माध्यमाची मर्यादा नसते आणि कोणत्याही विषयाची चौकट नसते. एखाद्या विषयावर वेगवेगळ्या अंगांची मतं असतात. हे मतवैविध्य एकाच चित्रातून, एकाच डूडलमधून सहज व्यक्त करता येतं. कोणतीही गोष्ट नुसत्या चित्रातून व्यक्त करणं हे वाटतं तितकं सोपं नसतं, मात्र डूडलमुळे हे काम सोपं होतं हेही तेवढंच खरं आहे.

‘गुगल’ या सर्च इंजिनने गेल्या एक-दोन वर्षांपासून दररोज डूडलमधून काही महत्त्वाच्या गोष्टींची आठवण करून देण्याचा चंग बांधला आहे. दररोज काही ना काही नवीन डूडल करून, काही ना काही नवीन निमित्त शोधून त्याचं महत्त्व उद्धृत केलं जातं. अनेकदा या गोष्टी खूप वर्षांपूर्वी घडून गेलेल्या असतात, वर्तमानातल्या गोष्टींचा त्यात फार कमी वेळा समावेश असतो. ‘चिपको आंदोलना’पासून ते भारताने सोडलेल्या पहिल्या सॅटेलाइटपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या जातात. डूडलचा वापर हा फॅशन डिझायनिंग क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर केला जाऊ  लागला आहे. कपडय़ांवर काहीतरी लिहिण्याचा ट्रेण्ड आला त्याच्यामागोमागच कपडय़ांवर डूडल करण्याचीही लाट आली.

डूडल हे माध्यम शिकून किंवा शिकवून येण्यासारखं नाही आणि शिकण्यासारखंही नाही. डूडल हे एखाद्याचं ‘फ्री एक्स्प्रेशन’ अर्थात ‘मुक्त सर्जनशीलते’च्या अभिव्यक्तीचं माध्यम आहे. जी कलाकृती सहजतेने घडते ती नेहमीच अस्सल असते. त्यामुळे माणसाच्या कलाकृतीमधला अस्सल खरेपणा दाखवणारी ही ‘डूडल्स’ कदाचित येत्या काळात सर्वाच्या अभिव्यक्तीचं प्रतीक बनतील.

viva@expressindia.com

First Published on April 6, 2018 12:30 am

Web Title: article on doodle