तरुणाईची भाषा ही एकप्रकारची बोली भाषा असते. एक तर या भाषेला टेक्नोसॅव्ही जोड असते नाही तर थेट सिनेमा आणि मालिकांकडून उधार घेतलेली स्टायलिश अदाकारी.. भाषांची सरमिसळ करून बोलणं, हा कॉलेजमधला फंडा मालिकांनीही उचललाय.. त्यामुळे त्यांचे संवाद लोकप्रिय होऊन परत कॅम्पसमध्ये ऐकू येतायत. हा सगळा संवादांचा गोलमाल काय आहे?

कोणत्याही गोष्टीला सहज हो म्हणण्यापेक्षा आपला एखादा मित्र ‘चालतंय की’ म्हणतो किंवा ‘तुमचा हुकूम आपला एक्का ना भाई’ म्हणणारा कोणीतरी भेटतो, एखाद्या मैत्रिणीला जरा जास्त काम सांगितलं की तीही ‘एकटी बाई मी काय काय करणार?’ असं विचारू लागते तेव्हा राणादा, भपाव आणि निशा वाहिनीच आपल्याला आठवते. तसंच काहीही हाह्ण म्हटलं की, जान्हवी आणि श्री आठवल्याशिवाय राहात नाही.

कोणतीही नवीन टीव्ही मालिका, रिअ‍ॅलिटी शो, सिनेमा आला की काही दिवसांतच त्यातल्या पात्रासोबतच त्यांच्या तोंडी असणारा एखादा शब्द त्या पात्रांची ओळख बनून जातो. मालिकांमध्ये पात्रांच्या तोंडी सतत असणारे शब्द सहज प्रेक्षकांच्याही ओठावर येऊ  लागतात. अशा रीतीने ही टीव्हीतली माणसं आपल्या मनातही घर करतात. किंबहुना त्या पात्राची तीच ओळख बनून जाते.

कोणतीही व्यक्तिरेखा जेव्हा आकार घेत असते तेव्हा त्याचं दिसणं, राहणीमान, पाश्र्वभूमी लक्षात घेऊन ती व्यक्ती कशी भाषा बोलेल याचा अभ्यास केला जातो. संवाद लेखक आधी पात्राच्या तोंडी कोणती वाक्यं, संवाद द्यायचे हे ठरवत असतात. पात्र कोणत्या शहरातलं, ठिकाणचं आहे यावरून त्याच्या बोलीभाषेचा लहेजा, उच्चार, सुरावली यावर देखील भर दिला जातो. याची भट्टी जमली की ते पात्र आपल्याला जवळचं आणि आपल्यातलंच एक वाटू लागतं.

जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशातील बोली भाषा घेऊन कोणताही कार्यक्रम केला जातो तेव्हा संवाद लेखकासाठी मोठं आव्हान असतं. त्या ठिकाणच्या बोली भाषेचा वापर जसाच्या तसा केला जात नाही. त्यामध्ये थोडाफार बदल करून ती भाषा लिहिली जाते, संवाद लिहिले जातात. कारण इतर प्रदेशातल्या लोकांना ती भाषा समजेलच असं नाही. म्हणून त्यामध्ये थोडे बदल करून त्या पात्रांच्या तोंडी संवाद दिले जातात. म्हणूनच अनेक मालिकांमधले गावाकडचे किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशातले संवाद आपल्याला कधी कधी चुकीचे वाटतात. पण संवाद लेखकाचा त्यामागे वेगळा विचार असतो. याशिवाय आपण शब्द तेच वापरत असू तरीही त्याच्या उच्चारानुसार त्याची लय बदलते. हाच विचार करून संवाद लेखक, लोक वास्तवात कशी भाषा बोलतात याकडे लक्ष देतो. ते आपल्या लेखणीतून आणि कलाकार सादरीकरणातून उतरवत असतात. त्यातूनच मालिका किंवा चित्रपट अधिक वास्तववादी बनतो. उदाहरण द्यायचं झालं तर काहीजण दोन-तीन भाषा एकत्र करून बोलतात. तसंच काही पात्रंही बोलतात. सोपे पण प्रेक्षकांना आवडतील असे आकर्षक शब्द वापरून संवाद लिहिले जातात.

आता टीव्ही माध्यमामध्ये फक्त पंजाबी किंवा गुजरात फ्लेवर सोडून इतरही भाषा, प्रांत, संस्कृती येऊ लागल्या आहेत. म्हणूनच सर्वच स्तरांतील लोकांना ते आपलेसे वाटत आहेत. मग रोजच्या बोलण्यातही फूल रिस्पेक्ट भाई, रॉयल कारभार किंवा भैताड असं कुणी म्हटलं तरी आपल्याला ते वावगं वाटत नाही.

काही नवे-जुने पण प्रसिद्ध डायलॉग्ज

  • खुल जा सीम सीम!
  • खाना खाके जाना हा
  • कितने आदमी थे?
  • सस्ते चीजोंका शौक हम नहीं रखते
  • दुआ में याद रखना
  • हम काले हैं तो क्या हुआ, दिलवाले हैं
  • तेरे तेरे चाहने वाले हैं
  • बस्तीमध्ये मस्ती नाय
  • एकच अट विषय कट
  • तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकायचं

संवाद लेखनाचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. सुरुवातीला काय आणि कसं लिहावं हे समजत नव्हतं. पण हळूहळू आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या संवादातूनच शब्द उचलून मी  लिहायला लागलो. काही संवाद तर मित्रांशी बोलता बोलता सुचले, तर काही त्या पात्रांचा अभ्यास करताना सुचले. कॉलेजच्या तरुणाईच्या तोंडी जी भाषा आहे ती हेरून जर संवाद लिहिले गेले तर, तरुण वर्ग ते सहज आपलेसे करतो.

अभिषेक खणकर, संवाद लेखक – दिल दोस्ती दोबारा

viva@expressindia.com