News Flash

ब्रॅण्डनामा : फ्रुटी

आंब्याच्या स्वादाची आठवण देणारं हे शीतपेय १९८५ मध्ये ‘पार्ले अ‍ॅग्रो’ने बाजारात आणलं.

 

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

फ्रुटी ब्रॅण्डिंग ही कला आहे. खूप पैसा ओतून खूप शक्ती लावून एखादा ब्रॅण्ड जे साध्य करू शकत नाही ते काही वेळा अगदी छोटय़ाशा क्लृप्तीमुळे एखाद्या ब्रॅण्डला सहज जमून जातं. फ्रुटी हे या दुसऱ्या वर्गात मोडतं.

भारतीय मंडळींचं आंबा फळावर मनापासून प्रेम आहे. बरं ! हे फळ विशिष्ट मोसमात मिळणारं. बाकीचे महिने आशाळभुतासारखे वाट पाहात राहायचे. कधी आंबे येणार? मी कधी खाणार!, अशा आंबाप्रेमींसाठी आंब्याच्या स्वादाची शीतपेयं आधीही बाजारात होती; पण ती आली आणि ती जिंकली. ती अर्थातच फ्रूटी. अनेक वर्षं कोणाही सेलिब्रिटीची मदत न  घेता फ्रुटीने मार्केट जिंकलं. हे शक्य झालं केवळ एका बदलामुळे. टेट्रा पॅक स्वरूपात बाजारात आलेलं फ्रुटी हे भारतातील पहिलं शीतपेय. कितीही तहान लागली तरी तिथेच बसा आणि तिथेच शीतपेय प्या.. या अपरिहार्यतेला फ्रुटीने धुडकावून लावलं. आंब्याच्या स्वादाची आठवण देणारं हे शीतपेय १९८५ मध्ये ‘पार्ले अ‍ॅग्रो’ने बाजारात आणलं. आणि शीतपेय उद्योगाची गणितंच बदलून गेली. ते पकडायला सोपं होतं, सोबत कुठेही नेणं शक्य होतं. मुख्य म्हणजे त्याची चव आंब्याची आठवण जागवणारी होती. सर्वात आधीचा हिरवा टेट्रा पॅक आठवत असेल तर लहान वयात त्याचं खूप अप्रूप होतं. सोबत स्ट्रॉ असायचा. पॅकवरच्या छोटय़ाशा चंदेरी गोलात तो स्ट्रॉ खूपसून शेवटच्या थेंबापर्यंत अगदी तो टेट्रा पॅक आत आक्रसेपर्यंत फ्रूटी शोषून घेणं अवर्णनीय होतं. त्या टेट्रा पॅकचं इतिकर्तव्य संपल्यावर तो रस्त्यात ठेवून जोराचा आवाज करत फोडणं हे फ्रुटी पिण्याचाच भाग असायचा. त्याकाळी काचेच्या बाटल्यांऐवजी हे अनोखं पॅकिंग अधिक आकर्षक असल्याने फ्रूटी इतर आंबास्वादाच्या शीतपेयांपेक्षा लोकप्रिय झालं. फ्रुटीच्या यशात त्या पॅकेजिंगचा मोठा वाटा आहे.

कालांतराने हा हिरवा रंग बदलून तो ठळक उठून दिसावा या हेतूने पिवळा झाला. त्रिकोणी टेट्रा पॅकचा वापर जगात पहिल्यांदा फ्रुटीने केला. स्वस्त आणि मस्त अशा या ब्रॅण्डची कीर्ती भारताबाहेर पसरत गेली. आज अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, सौदी, मलेशिया, मालदीव, सिंगापूर, थायलंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, घाना, झांबिया, जपान, आर्यलड इतक्या देशांत फ्रुटी जातं.

फ्रूटीच्या जाहिराती म्हणजे आदर्श जिंगलचा नमुना! इतक्या वर्षांनंतरही फ्रुटीची ‘मॅन्गो फ्रुटी, फ्रेश अ‍ॅण्ड ज्युसी’ ही जिंगल लोकप्रिय आहे. आधीच्या काळात फ्रुटीचं ब्रॅिण्डग लहान मुलांचं आवडतं पेय असं झालं पण नंतरच्या जाहिराती या आबालवृद्धांना आवाहन करणाऱ्या होत्या. फ्रूटी – जस्ट लाईक दॅट, फ्रूटी – फ्रेश अ‍ॅण्ड ज्युसी व्हॉट अ ब्युटी, ज्युस अप युअर लाइफ अशा अनेक पर्यायांचा विचार करत फ्रुटी पुन्हा आपल्या जुन्या टॅगलाईनवर आलं आहे.

जाहिरातीतला ठळक बदल? म्हणजे सुरुवातीपासून कोणाही सेलिब्रिटीच्या कुबडय़ा न घेणाऱ्या या ब्रॅण्डने मध्यंतरी शाहरुख खानला आपला ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नेमलं. तरुणाईला आकर्षित करणं हा त्यामागचा हेतू स्पष्ट होता. वास्तविक ज्यांचं बालपण फ्रुटीने गोड केलंय त्यांना या सेलिब्रिटी हाकेची गरजच नाही. कारण वर्षांनुवर्षे तो फ्रुटीचा विश्वासू असा  ग्राहक आहे तर नवी पिढी देखील या फ्रेश आणि ज्युसीच्या प्रेमात आहेच.

आंब्याच्या स्वादातील शीतपेयांत ‘माजा’ आणि ‘स्लाईस’ला तगडी टक्कर देत फ्रुटीने आपलं स्थान अव्वल राखलंय. आता टेट्रा पॅकच्या जोडीला छोटय़ा मोठय़ा बाटल्यांवर फ्रूटीचा जास्त भर आहे. फ्रूटीच्या बाटल्यांचा वैशिष्टय़पूर्ण आकार रंग यांची भ्रष्ट नक्कल अनेक स्थानिक ब्रॅण्डना करावीशी वाटते यातच सगळं आलं.

३३ र्वष हा जुना ब्रॅण्ड नेमकं काय करतो? तर तो आंब्यांच्या गोड आठवणींकडे आपल्याला घेऊ न जातो. त्या पॅकबंद शीतपेयाचे कण न् कण टिपताना आहे का संपलं?, ही हुरहुर वाटायला लावतो. मिट्ट गोड स्वादातून किती साखर पोटात जातेय याचं भान विसरायला लावतो. खऱ्याखुऱ्या आंब्याचा रस न परवडणाऱ्या, न मिळणाऱ्या जिवाला ‘आम नहीं तो येही सही’ असा दिलासा द्यायला लावतो. आणि म्हणूनच भर आंब्यांच्या दिवसांत हे पॅकबंद फ्रेश अ‍ॅण्ड ज्युसी आम्रपुराण त्या धम्मक रंगासह खुलवा

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:04 am

Web Title: article on frooti largest selling mango flavoured drink
Next Stories
1 उन्हाळ्यात मेकअप करताय?
2 फॅशनदार : फॅशन करिअर?
3 कॅफे कल्चर : कॅफे एक्सलसिअर शतकाच्या उंबरठय़ावर
Just Now!
X