वेदवती चिपळूणकर

कधीकाळी माणसं गोष्टी शोधायची, त्यासाठी ठिकठिकाणी जायची, कोणाकोणाला भेटायची, पुस्तकं वाचायची, प्रश्न विचारायची आणि अनेक इतर प्रयत्न करायची. कोणतीही गोष्ट किंवा माणूस शोधणं यासारखी कठीण कामं काही नसायची. त्यामुळे अनेक गोष्टींची माहिती असलेल्या माणसांना त्याकाळी फार मागणी होती आणि त्यांच्याबद्दल आदरही होता. अशा माणसांना बहुश्रुत वगैरे म्हणायचे, अनुभवी म्हणायचे. अनुभवाची सर अजूनही इतर कशाला नसली तरी माहिती देणारे स्रोत मात्र बदलले आहेत. माणसाला सोप्या गोष्टी नेहमीच हव्या असतात. त्यामुळे ‘शोधाशोध’ करण्याचा सोपा मार्ग अस्तित्वात आला आणि तरुणाईने तो सगळ्यात जास्त डोक्यावर घेतला. ‘वर्क स्मार्ट अ‍ॅण्ड नॉट हार्ड’ या तत्त्वावर विश्वास ठेवून वागणारी ही पिढी ‘गुगल’ बाबाला खिशात घालून वावरू लागली.

गुगल हे आलं तेव्हा केवळ सर्च इंजिन म्हणून आलं आणि काही वर्षांतच आता एक क्रियापद म्हणून आपल्या शब्दकोशात आणि दैनंदिन आयुष्यात समाविष्ट झालं आहे. कोणत्याही रेसिपीपासून ते गणितातल्या कोणत्याही सिद्धांतापर्यंत आणि अणुऊर्जेपासून ते पिकावरच्या कीटकनाशकांपर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती गुगलबाबा आपल्या अध्र्या मिनिटांत देऊ लागला. त्याला त्या माहितीची यादी शोधायला किती वेळ लागला हेसुद्धा तो स्क्रीनवर दाखवू लागला. कधीकाळी जास्तीत जास्त १०-१२ पानांची यादी देणारा गुगलबाबा आता शेवटचा आकडा काय आहे हे पाहण्याचा कंटाळा येईल एवढी खंडीभर पानं देऊ  लागला. आपल्याला मदत करायची एवढी हौस असलेला गुगलबाबा आपण पूर्वी काय शोधलेलं हे लक्षात ठेवू लागला, आपल्या नेहमीच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून त्यानुसार गोष्टी सुचवू लागला, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींच्या किमतींची तुलना करू लागला, आपल्याला बर्थडे विश पण करू लागला. आजकाल दररोज काही नवीन गोष्टींवर आधारित, दिनविशेषावर आधारित माहितीही देऊ लागला आणि तेही स्वत:हून!

आता तर गुगल आपल्याला मदतही करू लागलाय. आपल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी रिमाइंडर ठेवू लागलाय, आपल्यासाठी गजर लावू लागलाय, नुसतं बोलून आपण सांगू ते फंक्शन करू लागलाय, आपले फोन लावून देऊ  लागलाय, आपले मेसेज पाठवू लागलाय आणि कंटाळा आला म्हटलं की आपल्याशी गप्पा मारून आपल्याला जोकही सांगू लागलाय. गुगल आता आपला असिस्टंट म्हणून काम करू लागलाय. कोणतीही गोष्ट ‘गुगल कर’ अशी सोय आपल्याला करून देणारा आणि आपल्या रोजच्या भाषेत, संभाषणात, बोलण्यात जागा पटकावणारा ‘गुगल’ आता आपल्या गळ्यातला ताईत होऊ न राहिला आहे.

viva@expressindia.com