हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

काही ब्रॅण्ड म्हणजे स्वप्न असतात. वास्तविक उत्तम दर्जाचे आणि कमी किमतीचे स्थानिक ब्रॅण्ड शेकडय़ाने असूनही असा एखादा ब्रॅण्ड असतो, जो आपल्या खाती जमा झाला की, येस्स आय डिड इट.. अशी आपली धारणा होते. हा ब्रॅण्ड म्हणजे दर्जा, हा ब्रॅण्ड म्हणजे वरचा क्लास.. असं काहीसं वाटतं. अशाच हायफाय यादीतील श्रीमंत  ब्रॅण्ड म्हणजे गुची. इंग्रजी जी यू सी सी आय मुळे अनेकांना तो गुसी वाटत असला तरी तो आहे गुची.

फॅशनशी निगडित बऱ्याच गोष्टींसाठी हा ब्रॅण्ड ज्ञात आहे. पण पर्सेस, बॅग्ज ही या ब्रॅण्डची खरी ओळख. गुचिओ गुची हे इटालियन व्यक्तिमत्त्व या ब्रॅण्डचे सर्वेसर्वा. जगातील हा मोस्ट स्टायलीश ब्रॅण्ड कसा साकारला त्याची ही कहाणी.

मूळचे इटालियन पण कामानिमित्त लंडनमध्ये स्थायिक गुचिओ गुची ‘सेवॉय’ या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये काम करीत होते. तिथे येणाऱ्या उच्चभ्रूंच्या सामानाकडे पाहून गुची प्रभावित होत. स्वदेशी परतल्यावर त्यांनी याच व्यवसायात शिरायचं ठरवलं. इटलीतील एका सुप्रसिद्ध लेदर व्यावसायिकाकडे त्यांनी आधी काम केलं आणि १९२१ मध्ये फ्लोरेन्स या त्यांच्या जन्मगावीच त्यांनी पहिलं दुकान थाटलं. गुची यांचा उद्योग यंत्रांच्या साहाय्याने चालत असला तरी त्यांनी लेदर लगेजसाठी पारंपरिक पद्धतीच वापरली. विशेष कारागीर नेमले. अल्डो, वास्को, रोडाल्फो ही गुचिओ यांची तिन्ही मुलं या व्यवसायात सहभागी झाल्यावर खऱ्या अर्थाने हा ब्रॅण्ड विस्तारला.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चामडय़ाची कमतरता असल्याने गुचींनी कॅनव्हास बॅग बनवल्या. ज्या खूप लोकप्रिय झाल्या. १९४७-४८ दरम्यान बांबूचा वापर असलेल्या हॅण्डलच्या बॅग्ज खूप गाजल्या. त्यानंतर मिलान, पॅरिस असे टप्पे गाठत गुचींनी न्यूयॉर्क गाठले आणि हा ब्रॅण्ड आंतरराष्ट्रीय झाला. त्या काळी इटलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘गुची’ बॅग्ज अ‍ॅक्सेसरीज खरेदी करणं हा प्रतिष्ठेचा भाग बनला होता. शिवाय नामवंत व्यक्तिमत्त्व, सिनेकलावंत यांनीही गुचीचा प्रचार, प्रसार केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री एलिझाबेथ टेलर विविध फोटोंत गुची बॅग्ज वापरताना दिसल्या होत्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींच्या पत्नी जॅकलीन केनेडी यांनी जी ‘गुची’ बॅग विकत घेतली तशा स्टाइलच्या सगळ्या बॅग्जचं नामकरण ‘जॅकी’ असं करण्यात आलं होतं. मोनॅको प्रांताच्या राजकन्येने ‘गुची’कडून विशेष स्कार्फ विकत घेतला होता. अशा विविध क्षेत्रांतील मंडळींनी ‘गुची’ ला दिलेली पहिली पसंती हीच गुचीची जाहिरात बनली.

गुचीच्या लोगोचा विचार करता जगात सर्वाधिक कॉपी होणाऱ्या लोगोपैकी हा एक लोगो आहे. यातच या ब्रॅण्डचं यश आलं. ‘गुची’मधील ‘जी’ हे आद्याक्षर गोलाकार वापरून हा लोगो तयार होतो तो बॅगच्या बक्कलसारखा वाटतो. गुची हा निश्चितच जगातील एक मोठा ब्रॅण्ड आहे. २०१५ मध्ये जगातील सर्वात प्रभावी ब्रॅण्डमध्ये हा ब्रॅण्ड ३८ व्या स्थानावर होता. इटलीचा हा सर्वात जास्त विकला जाणारा ब्रॅण्ड आहे. लवकरच पर्यावरणाचे भान राखत गुची आपल्या उत्पादनांतील फरचा वापर बंद करणार आहे.

जगभरातील फॅशनप्रेमींची एक विशलिस्ट असते. अमुकतमुक ब्रॅण्ड्स कधी ना कधी माझ्या संग्रही असतील, असा विचार फॅशनप्रेमी ग्राहक करतात. या यादीतीलच वरचं स्थान असलेला ब्रॅण्ड आहे, गुची. ब्रॅण्ड म्हणजे निव्वळ फसवेगिरी मानणारा एक मोठा वर्ग आहे. उपयुक्तता हा त्यांचा निकष असतो जो योग्य आहे. पण त्याहीपलीकडे प्रतिष्ठा, नाव या गोष्टींना मानणाराही एक वर्ग आहे. हा वर्ग शेक्सपिअरलाही ठणकावून सांगू शकतो, ‘नावात बरंच काही असतं’. त्या वर्गाचं वलयांकित प्रतिनिधित्व करणारा ब्रॅण्ड म्हणजे गुची.

viva@expressindia.com