अनेकदा अनेक खास गोष्टी आपल्या मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जपल्या गेलेल्या असतात, कळत किंवा नकळतपणे! मनात राहिलेल्या अशा गोष्टी खरं तर आपण स्वत:हून बाहेर काढत नसतो, व्यक्त करत नसतो. कारण आपल्यालाच त्या गोष्टींची अनेकदा जाणीव नसते. जेव्हा सहज आपलीच फोटो गॅलरी बघताना काही वर्षांपूर्वीचे, मनात घर करून राहिलेले, पाहून प्रसन्न वाटणारे फोटोज दिसतात आणि प्रत्येक फोटोसोबत असलेली आठवणही ताजीतवानी होते. आपला किती वेळ त्या फोटोंमध्ये जातो हे आपल्यालाही कळत नाही, आणि त्यात हरवलेला वेळ ‘वाया’ गेला असंही वाटत नाही. डिलीट न करता फोनमध्ये शिल्लक असलेले फोटोज अनेकदा चांगल्याच गोष्टींची आठवण करून देतात. असे अचानक सापडलेले फोटो, जाग्या झालेल्या आठवणी मग एकटय़ापाशी ठेवणं जड जातं. हेच फोटो, याच आठवणी मग सोशल मीडियावर ‘थ्रोबॅक’ या हॅशटॅगने अपलोड होतात.

‘थ्रोबॅक’ची ही गोष्ट अगदी कधीतरीच शक्य होते. मुद्दामहून फोनमधले फोटो पाहात बसायला कोणाला वेळही नसतो आणि तेवढा उत्साहही नसतो. सगळ्याच गोष्टींच्या, घटनांच्या तारखा लक्षात राहतातच असंही नाही. त्यामुळे फेसबुकने दररोज आपल्याला आठवण करून द्यायचा जणू निश्चयच केला आहे. ‘ऑन धिस डे’ म्हणून ‘१ इयर अगो’ पासून सुरू झालेल्या या आठवणींची रांग आपण जितक्या वर्षांपासून फेसबुकवर आहोत त्या सगळ्या वर्षांच्या त्या त्या दिवसाची पोस्ट दाखवत सुटते. मात्र या फेसबुकच्या थ्रोबॅकने आपण काही वर्षांपूर्वी किती वेगळे होतो, किती बालिश होतो, काहीही वेडय़ासारखं शेअर करायचो इथपासून ते तेव्हा मी जरा बारीक होते, असाच हेअरकट मला चांगला दिसायचा इथपर्यंत सगळ्या प्रकारच्या, सगळ्या छटांच्या आठवणी डोळ्यांसमोरून तरळून जातात.

चांगल्या आठवणींमध्ये रमणं हा माणसाचा सहज स्वभाव आहे. तोच स्वभाव बरोबर ओळखून फेसबुकने ही रोजची आठवणींची दिनदर्शिका आपल्यापुढे मांडायला सुरुवात केली. या फेसबुकवरच्या आठवणी आणि सहज मनात चमकून जाणारे भूतकाळातील काही आनंदी क्षण इतरांना सांगितल्याशिवाय आपल्याला राहवेना म्हणून आपण ते पोस्ट करायला लागलो, आपला आनंद सगळ्यांशी शेअर करायला लागलो आणि या आपल्या सवयीला, आवडीला आपण ‘थ्रोबॅक’ हा हॅशटॅग दिला. वर्षांच्या शेवटी वर्षभरात घडलेल्या, आपल्याला आवडलेल्या, न आवडलेल्या, पटलेल्या, न पटलेल्या, चुकलेल्या, जमलेल्या अशा सगळ्याच गोष्टींचा एकदा आढावा घेऊन नवीन वर्षांची सुरुवात करायची अशी आत्तापर्यंतची आपली पद्धत आपण रोजच्या ‘थ्रोबॅक’ने बदलली आणि आता आपण रोजच आपल्या आठवणींना उजाळा देत असतो. ‘थ्रोबॅक’ हा आता आपल्या आयुष्यातला परवलीचा शब्द झाला आहे जो सतत आपल्याला थोडं मागे नेऊन ताजंतवानं करत पुढे जाण्याचा उत्साह देत राहतो.

viva@expressindia.com