काळा शर्ट, रोल केलेले स्लीव्हज, ग्लेअर्स अशा प्रकारचं स्टायलिंग करून प्रचंड आकर्षक दिसणाऱ्या मुलांना कधीकाळी ‘हॉट’ म्हणण्याची पद्धत होती. एखाद-दुसऱ्या डिओच्या जाहिरातीतसुद्धा तो डिओ लावलेला मुलगा नुसता समोरून जातानाही ‘हॉटनेस’ पसरवतो वगैरे असा काहीतरी प्रकार दाखवलेला दिसला. आपल्या बॉयफ्रेंडला पाहून इतर मुलींना ‘जेलसी’ जाणवली.. ज्याला हिंदीत ‘जलन’ म्हणतात, तर आपला बॉयफ्रेंड ‘हॉट’ आहे असाही समज बाळगला गेला. मात्र हे ‘हॉटनेस’चं वर्णन फेटा बांधलेल्या, कुर्ता घातलेल्या रांगडय़ा ‘देसी बॉइज’ना काही फार शोभून दिसेना. ‘हॉट’ हा शब्द आणि संकल्पना मुळात पश्चिमेकडून आल्याने आपल्या देसी ढंगाला ते फार मुळमुळीत वाटायला लागलं.

मग फेटा बांधलेले, कुर्ता घातलेले, धोतर नेसलेले, कानात भिकबाळी घातलेले देसी लुक्सही तरुणाईला तितकेच आवडायला लागले आणि ‘हॉट’पेक्षा प्रभावशाली एक्स्प्रेशन तरुणाईने शोधून काढलं. ‘भावा, निस्ता धुर्र्र्र..’ किंवा ‘धुरळा राव.. लय भारी’ अशा उद्गारांनी त्यांचं कौतुक व्हायला लागलं. मुलींना केवळ रोल्ड-अप स्लीव्हज आणि टाय नाही तर फेटा आणि भिकबाळीही आवडते हे मुलांना जाणवलं असावं आणि कदाचित म्हणून त्यांची मराठी अस्मिता जागी झाली असावी. कदाचित वेस्टर्न पद्धतीचं हे स्टायलिंग अनेकांनी वापरुन वापरुन ‘कॉमन’ केलं असेल म्हणूनही पारंपरिक पोषाखाला मुलांनी झुकतं माप दिलं असेल. खरं कारण काहीही असलं तरी ‘आम्हाला ट्रॅडिशनल नेहमीच आवडतं आणि आम्ही आमच्यासाठीच पारंपरिक कपडे घालतो, इतर कोणासाठी नाही’, असं अखेरीस सगळीच मुलं म्हणायला लागली आहेत.

हॉट दिसण्यासाठी पाश्चात्त्य कपडे घालण्यापेक्षा आपल्या पारंपरिक कपडय़ातच ‘हॉट’ कसं दिसायचं हे मुलांनी आत्मसात केलं. मुलंच मुलांना ‘कॉम्प्लिमेंट’ देताना वापरला जाणारा हा शब्द अस्सल गावरान मातीतून आलेला असावा. बुलेटवर बसून पायात कोल्हापुरी चप्पल घालून ऐटीत गावातून हिंडणाऱ्या मुलांनी बुलेटच्या वेगात उडवलेला धुरळा लोकांच्या डोळ्यात जात नाही तर मनात भरतो! कानात भिकबाळी घातलेल्या मुलाला पाहून अस्सल मराठीपणाचा अभिमान वगैरे जागा होतो. या अस्सल मराठी ‘सौंदर्या’ची तारीफही अस्सल मराठी शब्दांतच झाली पाहिजे. ज्या सौंदर्याला आणि रुबाबाला इंग्रजीत ‘हॉट’ म्हटलं जातं त्याच रुबाबाला मराठीत ‘धुर्र्र्र..’ म्हणून तरुणाईने डोक्यावर घेतलं.

कारण काहीही असलं तरी हा ‘हॉटनेस’ ते ‘धुर्र्र्र..’ हा प्रवास सगळ्या ‘प्रेक्षक’ मुलींना मात्र खूप भावलाय !

viva@expressindia.com