नचिकेत उत्पात, जोहान्सबर्ग, द. आफ्रिका

एके काळी ब्रिटिशांनी भारतातील काही लोकांना तिथे आणलं होतं. त्यापैकी काहींच्या पुढच्या पिढय़ा तिथेच नांदत आहेत. अनेकदा हे लोक रस्त्यात भेटतात, ते आपल्यासारखे दिसतात, पण त्यांची बोली स्थानिक असते. तिथल्या गोऱ्या लोकांची भाषा आफ्रिकान्स असून आणि स्थानिकांच्या खोसा, झुलू आदी भाषा आहेत. त्यांच्याकडे हुंडापद्धत आहे. मुलाला मुलीच्या घरी हुंडा द्यावा लागतो. सुशिक्षितांना ही पद्धत अमान्य असली तरीही नाइलाजाने समाजमान्य बाब म्हणून तसं वागावं लागतं.

गेली दीड र्वष मी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये राहातो आहे. जोहान्सबर्ग तिथल्या प्रमुख शहरांपैकी एक असून पुष्कळसं मुंबईसारखं आहे. उच्चभ्रूंपासून ते गरिबांपर्यंत दोन्ही टोकांची परिस्थिती तिथे दिसते. जाण्याआधी अनेकांकडून कळलं होतं की, फार असुरक्षित वातावरण आहे, उगीच कोणाशी बोलायचं नाही वगैरे. पण चांगल्या भागात राहायला मिळाल्याने ऐकलेल्या गोष्टी वाटय़ाला आल्या नाहीत. गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्या भागात राहिल्यावर मात्र आधी ऐकलेल्या गोष्टी खऱ्या असाव्यात, असं वाटलं. त्या भागात काही जणांची थोडीशी दादागिरी चालते.

इथे अजूनही ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव जाणवतो आणि काही प्रमाणात गोरे लोकही राहतात. स्थानिकांना तिथे अजूनही राहणाऱ्या गोऱ्यांबद्दल काहीसा राग मनात आहे. त्यामुळे ते आपणहून त्यांच्यात मिसळताना दिसत नाहीत. भारतीयांशी कामानिमित्त दोघंही संवाद साधतात. भारतीयांचं प्रमाण बरंच आहे. एके काळी ब्रिटिशांनी भारतातील काही लोकांना तिथे आणलं होतं. त्यापैकी काहींच्या पुढच्या पिढय़ा तिथेच नांदत आहेत. अनेकदा हे लोक रस्त्यात भेटतात, ते आपल्यासारखे दिसतात, पण त्यांची बोली स्थानिक असते. तिथल्या गोऱ्या लोकांची भाषा आफ्रिकान्स असून आणि स्थानिकांच्या खोसा, झुलू आदी भाषा आहेत. त्यांच्याकडे हुंडापद्धत आहे. मुलाला मुलीच्या घरी हुंडा द्यावा लागतो. सुशिक्षितांना ही पद्धत अमान्य असली तरीही नाइलाजाने समाजमान्य बाब म्हणून तसं वागावं लागतं. एक किस्सा सांगतो की, माझ्या तिशीच्या आतल्या सहकाऱ्याला आठ वर्षांचा मुलगा होता. तो बायको नव्हे तर गर्लफ्रेंडसोबत राहात होता. बायकोला त्याने घटस्फोट दिलेला नाही. त्याच्या वडिलांनी त्यांच्या मुलीच्या वयाच्या स्त्रीशी लग्न केलं आहे. त्यांना आधीच्या पत्नींची १२ मुलं आहेत. आपल्याला हे सगळंच विचित्र वाटतं, पण त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यावर नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेचे दरवाजे अन्य आफ्रिकन देशांसाठी खुले केले. त्यामुळे त्या देशांतील बरेच लोक इथे आले. त्यापैकी बहुतांशी लोक मुख्य शहारांमध्ये राहू लागले. मूळ स्थानिकांच्या मते, तिथली गुन्हेगारी वाढण्याचं कारण हे बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचं धड साधन नाही. इथली कायदा-सुव्यवस्था कडक आहे. इथे ओळखपत्र वगैरे कागदपत्रं असावीच लागतात.  इथला निसर्ग खूपच सुंदर आहे. एरवी चित्रपटांतच पाहिलेली निसर्गरम्य दृश्यं प्रत्यक्षात दिसतात. तरुणाईला म्युझिक आणि पार्टीकल्चर खूप आवडतं. लाइफ एन्जॉय करतानाच आपापल्या जमातीचे सणवार ते आवर्जून साजरे करतात. त्याचा त्यांना अभिमान वाटतो. कुटुंबाला भरपूर वेळ देतात. ऑफिसचं काम ठरावीक वेळीच करतात आणि ऑफिसबाहेर कटाक्षाने काम करत नाहीत. इथे तमीळ, तेलुगू, गुजराती लोक अधिक आहेत. वाडवडिलांनी दिलेला सांस्कृतिक वारसा त्यांनी जपला आहे. जोहान्सबर्गमधल्या गणपती, शंकराच्या देवळांतही काही सण साजरे होतात. दिवाळीत स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळून फटाके लावले जातात. शाकाहारी लोकांची इथे थोडी गैरसोय होते, पण मांसाहारींना बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

इथलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्ते चांगले असल्यामुळे परका माणूसही आपापला फिरू शकतो. चांगले रस्ते, सूचना फलक आणि सोयी असल्याने स्वत:ची ट्रिप स्वत: प्लॅन करता येते. त्यांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून असल्याने ते पर्यटनाला चालना मिळेल असं बघतात. नेल्सन मंडेला यांचं घर आम्ही स्थानिक मित्रांसोबत जाऊन पाहिलं. जोहान्सबर्गजवळ वीस लाख वर्षांपूर्वीचा मानवी सांगाडा सापडला आहे. जगात आजवर उपलब्ध असलेला हा सर्वात जुना अवशेष मानला जातो. त्याला ‘क्रेडल ऑफ ह्य़ुमनकाइंड’ म्हटलं जातं. आपल्या फॅशन स्ट्रीटसारखं स्ट्रीटकल्चर इथेही आहे. मण्यांच्या माळा, ज्यूट बॅग या त्यांची ओळख ठरणाऱ्या वस्तू आहेत. प्रिटोरियाला युनियन बिल्डिंगमधून राष्ट्राध्यक्ष कामकाज पाहातात. तर केपटाऊन अधिक पर्यटकस्नेही आहे.  इथे राहायचं तर ड्रायव्हिंग यायलाच पाहिजे कारण सार्वजनिक वाहतूक तेवढी सुरक्षित नाही. खाणव्यवसाय मुख्य असून रोजगारावर अवलंबून असणारे भरपूर आहेत. शिक्षणविषयक जागरूकता वाढली असून करिअरच्या दृष्टीने सध्या बॅंकिंग आणि आयटीकडे जास्ती कल आहे.  इथल्या लोकांचा फिटनेसकडे खूप कल आहे. जिम कायम भरलेली असतात. मुळातली त्यांची धट्टीकट्टी शरीरयष्टी ते फिट ठेवतात. मॅरेथॉन रनर्स खूप आहेत. सायकलिंगची आवड अनेकांना असून आठवडय़ाला सायकलिंग रॅलीज होतात. जुगाराची आवड असल्यानं कॅसिनो वगैरेंचं प्रमाण बरंच आहे. कमावणाऱ्या सगळ्यांना कॅसिनोत जायला आवडतं. त्यांची वृत्ती पुंजी जमा करण्याची नाही. आला क्षण साजरा करायचा, भविष्याचा फार विचार करायचा नाही, अशी त्यांची मनोधारणा दिसते. त्यांच्या महिनाभराच्या ख्रिसमसच्या सुट्टीत ते आरामात परदेशी फिरायला जायचा बेत करतात.

इथल्या गावागावात गरिबीचं प्रमाण अधिक आहे.  इथल्या तरुणाईला महात्मा गांधीजी, त्यांनी वर्णसंघर्षांविरुद्ध उठवलेला आवाज वगैरे गोष्टी माहिती असतात. आपल्याकडे महात्मा गांधींबद्दल दोन मतप्रवाह आहेत, तसे इथे मंडेलांबद्दल आहेत. स्थानिक आफ्रिकन लोक मंडेलांनी इतर आफ्रिकन लोकांना तिथं यायची परवानगी दिल्याने अद्यापही बरेच नाराज आहेत.

शहरांत फास्टफूड खाण्याचं प्रमाण वाढतं आहे. त्यांचे पारंपरिक पदार्थ गावांत मिळतात. गाडय़ांची खूप आवड आहे. वेगवेगळ्या डिझाइन्सचे चष्मे त्यांना आवडतात. नंबर नसलेली व्यक्तीही केवळ फॅशन म्हणून चष्मा लावते. मुली मण्यांच्या माळा, भडक रंगाची लिपस्टिक आणि नेलपॉलिश लावतात. हे सगळं सुरुवातीला ऑड वाटतं, मग सवय होते. नृत्यकला त्यांच्या रक्तातच आहे. गाणं लागलं की ठेका धरतातच. त्यांच्या एकूण जीवनशैलीवर पाश्चात्त्य पद्धतींचा प्रभाव पडलेला दिसतो. मात्र त्यांची संस्कृती, सणवार, कपडे घालायची पारंपरिक पद्धत त्यांनी जपलेली दिसते. कपडय़ांचे रंग काहीसे भडक असतात. पण ते कपडे चांगल्या पद्धतीनं कॅरी करतात. तिथं विग इंडस्ट्रीचं प्रमाण मोठं आहे.

इथलं सगळ्यात मोठं वैशिष्टय़ं म्हणजे वाइल्ड लाइफ. इथले बिग फाइव्ह पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. हत्ती, गेंडा, सिंह, बिबटय़ा आणि जंगली म्हैस हे त्यांचे पाच प्राणी दक्षिण आफ्रिकेच्या नोटांवरसुद्धा आहेत. वाइल्ड लाइफची आवड असल्यामुळे मी भरपूर वेळा अनेक नॅशनल पार्क मध्ये भेट दिलेली आहे. प्रत्येक वेळी नवा अनुभव मिळायचा. त्यातला एक अनुभव फारच थ्रिलिंग आणि थोडासा भीतिदायकही आहे. मित्रांबरोबर इमफलोझी या नॅशनल पार्कला गेलो होतो. आम्ही पार्कमध्ये शिरलो तर भलीमोठी गाडय़ांची रांग लागली होती. एका हत्तीने या गाडय़ांचा रस्ता अडवला होता. ‘अ‍ॅनिमल्स हॅव द राइट ऑफ वे’, हे तत्त्व प्राधान्याने इथे पाळलं जात असल्याने सगळे जण तो रस्त्यापासून बाजूला व्हायची वाट पाहात होते. ५-१० मिनिटांनी तो बाजूला झाला आणि गाडय़ा हलू लागल्या. आमची गाडी पंचविसावी असल्याने मला त्या हत्तीचे नीट फोटो काढता येत नव्हते. म्हणून मी आमची गाडी हत्ती गेलेल्या दिशेने वळवली. घनदाट जंगलामुळे हत्ती आम्हांला दिसत नव्हता. पण त्याचं वावरणं कानाला जाणवत होतं. थोडा वेळ थांबल्यानंतर आता तो हत्ती बाहेर येणार नाही अशा विचाराने आम्ही तिकडून निघालो, तोच हत्ती समोर रस्त्यावर आला आणि आमच्या दिशेनं चालू लागला. आमच्या मागे प्राण्यांसाठी केलेला पाण्याचा हौद असल्याने गाडी मागे घेणं शक्य नव्हतं. आता फक्त एकच उपाय होता, तो म्हणजे आवाज किंवा हालचाल न करता गाडीत बसून राहाणं. तो ४-५ पावलं जोरात पुढं आला आणि कान हलवत डाव्या बाजूच्या झुडुपांत निघून गेला.  तो जाता क्षणी आम्ही तिथून पळ काढला. हा अनुभव कायमच माझ्या लक्षात राहील..

viva@expressindia.com