News Flash

कल्लाकार : संवेदनांचा कोलाज

अभिनयात रस असलेला तेजपाल आज या मालिकेच्या निमित्ताने लेखक म्हणूनही प्रसिद्ध झाला आहे

मालिका, चित्रपट माध्यमांत अभिनयासह कथा-पटकथा-संवादाच्या क्षेत्रात मुशाफिरी करणारा आणि आपल्या स्वप्नांना भन्नाट कल्पनांचे पंख लावून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा हा कल्लाकार आहे लागिरं झालं जीचा लेखक आणि क्रिएटिव्ह हेड तेजपाल वाघ.

काही माणसं संवेदनशील असतात. टिपकागदासारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी त्यांचं मन टिपू शकतं. त्या गोष्टींचा होतो एक कोलाज आणि मग मिळतो सर्जनशीलतेला वाव. त्यातूनच मग मालिका, चित्रपटांची कथा आकारत जाते. असाच काहीसा प्रकार तेजपाल वाघ या तरुणाच्या बाबतीत घडला आहे. कधीतरी अभिनेता म्हणून स्ट्रगल सुरू केलेला तेजपाल सध्या ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला आहे.

सातारा आणि परिसराला लढवय्यांची परंपरा आहे. ऐतिहासिक पाश्र्वभूमीखेरीज सातारा जिल्हा माजी सैनिकांचा म्हणूनही ओळखला जातो. आजच्या घडीला काही हजारांच्या घरात इथले सैनिक सक्रिय आहेत. तेजपाल खटाव गावचा. हा भाग दुष्काळग्रस्त आहे. शेती पिकत नाही आणि सरकारी नोकरीची वाट बघण्यापेक्षा सैन्यात जायला प्राधान्य दिलं जातं. तो सांगतो की, ‘ही गोष्ट सुचली काही जिवलगांच्या घटनांवरून. एका उच्चशिक्षित मोठय़ा कुटुंबातील मुलीला स्थळं सांगून येत होती. एका स्थळाची सगळी माहिती उत्तम होती फक्त ‘पण’ पुढे आला ते तो मुलगा सैन्यात असल्याचं कळल्यावर. कुटुंबीयांची प्राथमिक प्रतिक्रिया होती की ‘कशाला..?’ मुलीच्या आईने विचार मांडला की, ‘त्याला का नाकारावं? फक्त तो सैन्यात आहे म्हणून? त्यांना मुली द्यायच्याच नाहीत का?’ कुटुंबाने या मतावर विचार केला. हे लग्न झालं, आता सगळं सुखा-समाधानात आहे. हे पाहिल्यावर तेजपालला यावर काहीतरी लिहायला पाहिजे, असं वाटलं. दुसरं त्याचा एक मित्र मेजर आहे, पण त्याचं लग्न चटकन जमत नाहीये. कारण मुलीकडचे सैन्याखेरीज इतर करिअरचा विचारच अधिकांशी करतात.. हे ऐकल्यावर सैनिकांबद्दलची उदासीनता आणि भोवतालचं समाजमन बदलायला पाहिजे’, असं तेजपालला प्रकर्षांनं जाणवलं.

दरम्यान, तेजपालची आजी गेली. त्यानंतर दोनच दिवसांत त्याला एका कार्यक्रमाचं निवेदन आधीच ठरल्यानुसार करणं भाग होतं. तिथं त्याची भेट अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदेशी झाली. सैनिकांच्या संदर्भात डोक्यात घोळणारी गोष्ट तेजपालनं तिला सांगितली. तिने लगेचच ही कल्पना उचलून धरली. त्यानंतर सात-आठ महिन्यांनी श्वेताने फोन करून त्या गोष्टीवर मालिका करायची असं सांगितलं. तेजपाल सांगतो की, ‘मी सुरुवातीला विरोधच केला, कारण मी मालिकेच्या धावपळीतून नुकताच बाहेर पडलो होतो आणि मला चित्रपट करायचा होता. त्यावर तिने माझी समजूत काढत, ही गोष्ट मालिकेच्या माध्यमातून लोकांसमोर येणं, त्यातले विचार हळूहळू पाझरण्यासाठी आणि ते बदलण्यासाठी मालिका करणं कसं आवश्यक आहे ते सांगितलं. दुसऱ्याच दिवशी ही गोष्ट ‘झी मराठी’च्या ऑफिसमध्ये ऐकवायची होती. त्यांना विषय आवडला आणि मालिका करायचं ठरलंही. नात्यातल्या, परिचयातल्या काही सैनिकांचं जीवन, त्यांचं कुटुंब, त्यांची जीवनशैली आणि त्यांचे किस्से माहिती होते. त्यातल्या काहींची सैन्यभरतीसाठीची धडपड आणि जिद्द या गोष्टी मी जवळून पाहिल्या होत्या, त्याही या कथेत गुंफायचं ठरवलं आणि मालिका आकार घेऊ  लागली.’

मुळात, अभिनयात रस असलेला तेजपाल आज या मालिकेच्या निमित्ताने लेखक म्हणूनही प्रसिद्ध झाला आहे आणि ‘क्रिएटिव्ह हेड’ हे नवं आव्हानही पेलतो आहे. महाविद्यालयात असताना तेजपाल युथ फे स्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षा द्यावीशी वाटली आणि तसा अभ्यासही काही काळ केला. त्याचदरम्यान पुण्यातल्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रिअ‍ॅलिटी शोसाठीच्या ऑडिशनमध्ये तो सहभागी झाला. दुसऱ्या फेरीत बाहेर पडला. पुन्हा मुंबईतल्या फेरीत सहभागी झाल्यावर त्याची निवड झाली. त्याला पहिली संधी मिळाली ‘साडेमाडेतीन’ या कथाबाह्य़ कार्यक्रमाच्या निवेदनाची. दरम्यानच्या काळात ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधले त्याचे मेंटॉर सचिन मोटे यांनी त्याला लिखाणासाठी प्रोत्साहन दिलं. दूरचित्रवाणीसारख्या माध्यमात काय लिहू नये, हे त्यांनी सांगितलं. पुढे त्याने त्यांच्याबरोबर अनेक शोज आणि खूप इव्हेंटस् केले. ‘शेजारी शेजारी, पक्के शेजारी’ मालिकेसाठी प्रियदर्शन जाधवसोबत संवादलेखन केलं. नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुमच्यासाठी काय पण’ या कथाबाह्य़ कार्यक्रमाचं लिखाण केलं. हे सगळं लिखाण करताना मालिकेसाठीच्या लिखाणाची धाटणी त्याला कळली. आज त्याचा फायदा ‘लागिरं झालं जी’ या मालिकेसाठी होतो आहे, असं तो सांगतो.

या मालिकेतील अनेक प्रसंग सैनिकांच्या जीवनाशी तंतोतंत जुळत आहेत, असा खुद्द सैनिकांकडून अभिप्राय मिळतो आहे. तेजपाल एक किस्साच सांगतो की, ‘सैनिकांसाठी परिचितांचा रोलकॉल संध्याकाळी सात वाजता असायचा. नाईट डय़ुटी सुरू होण्याआधी आणि जेवणाच्या आधी त्यांना तासभर मनोरंजनासाठी ठरलेला असतो. या मालिकेची वेळ कळल्यावर त्यांनी रोलकॉल पावणेसातला केला. त्यानंतर तिथल्या चार मराठी आणि इतर सैनिकांनी मालिका पाहायला सुरुवात केली.. मालिका सुरू होऊन आठवडाच झाला होता आणि सुट्टीवर आलेल्या सैनिकाचा फोन आला, ‘ही तिसरी सुट्टी आहे मी स्थळं बघायला यायची.. पुढच्या सुट्टीत मला नक्की होकार मिळेल कारण मालिका पाहून एखादी तरी मुलगी तयार होईल.’ एकदा आमच्या चित्रीकरणस्थळी तिघंजण जिजीसोबत फोटो काढत होते. मग कळलं की, विटय़ाजवळच्या गावाहून आलेल्या या मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केलं होतं आणि ते जिजीचा आशीर्वाद घ्यायला आले होते. जिजीला ते फेसबुकवर फॉलो करत होते. या झाल्या मोठय़ांच्या गोष्टी. एका सुखवस्तू मित्राचा सात वर्षांचा मुलगा म्हणतोय की ‘मी सैन्यात जाणार..’, असे अनेक अनुभव या मालिकेने दिले असल्याचे तो म्हणतो.

लेखनात त्याला सूर गवसला असला तरी अभिनयही त्याने सोडला नाही. त्याने ‘कलर्स मराठी’वरील ‘माझिया माहेरा’ मालिकेत भूमिका केली. आईच्या मोठय़ा आजारपणामुळे थोडी गॅप घेतल्यानंतर तो पुन्हा अभिनय करू लागला. त्यानंतर पुन्हा स्वत:च्या आजारपणामुळे त्याला मालिका सोडावी लागली. मग ‘टीटीएमएम’ (तुझं तू माझं मी) हा चित्रपट केला. त्याची कथा, पटकथा आणि संवाद तेजपालचेच होते. हा चित्रपट या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित झाला. आजी गेली, तेव्हा या चित्रपटाच्या लेखनाचं काम सुरू होतं. तेव्हाच्या इव्हेंटमध्ये श्वेताची भेट झाली आणि पुढे ‘लागिरं..’ आकारास आली. ‘टीटीएमएम’ चित्रपटातली सगळ्यात जास्त मार खाणारी व्यक्तिरेखा नेमकी तेजपालच्याच वाटय़ाला आली. तेव्हा नेहा महाजन आणि सागर कारंडेकडून त्याला खूप मार खावा लागला होता. कधी कधी आपल्या व्यक्तिरेखा आपल्यालाच कशी भोवते, याचं सोदाहरण अनुभव घेतल्याचं तो गमतीने सांगतो.

खरंतर चित्रपटात काम करणं आधीपासूनच सुरू होतं. तो सांगतो की, वाईतल्या ‘अगंबाई अरेच्चा’मधल्या चित्रीकरणात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून आम्ही कॉलेजमधली पोरं सहभागी झालो होतो. त्या गर्दीत पत्रकार म्हणून माझं एक वाक्य होतं फक्त. मग ‘निशाणी डावा अंगठा’ या चित्रपटात काम केलं. त्यात पोस्टमनची भूमिका केली होती. पुढे पुरुषोत्तम बेर्डे यांना भेटल्यावर ते म्हणाले की, ‘तू लक्षात ठेव, माझ्या चित्रपटांतून अनेक मोठमोठय़ा कलाकारांची सुरुवात झालेली आहे. नकळत का होईना माझ्या चित्रपटातून तुझीही सुरुवात झालेली आहे. तुझाही चित्रपट गाजेल.’ मधल्या काळात त्याने ‘झी मराठी’च्या ‘सारेगमप’ दहाव्या पर्वाची ऑडिशन, ‘स्टार प्रवाह रत्न’ पुरस्कार सोहळा, ‘नक्षत्राचं देणं’ कार्यक्रमातील रेड कार्पेटवरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. काही वेळा खरी दाद आपल्या सहकाऱ्यांकडून मिळते, असं तो म्हणतो. अमोल गोळेचा ‘रंगापतंगा’ हा चित्रपट केला होता. त्याच्याच आगामी ‘नशीबवान’ चित्रपटात तो काम करतो आहे. आता माझ्यासोबत मोठं प्रोजेक्ट करायचा त्याचा विचार आहे. या गोष्टी अनेकदा प्रेरणादायी ठरतात. ‘पळशीची पीटी’ या आगामी चित्रपटातही तो काम करतो आहे. तेजपालला दिग्दर्शन करायचं आहे. डोक्यातल्या भन्नाट गोष्टी पडद्यावर आणण्याच्या दृष्टीने त्याचा विचार सुरू आहे. स्वत:चं पब्लिक स्कूल असावं, असं त्याला वाटतं. तो एमएस्सी बीएड असून या शाळेत चांगले विद्यार्थी घडावेत आणि त्यांनी यशाचं शिखर गाठावं, अशी त्याची इच्छा आहे. त्याला मुळात प्राण्यांची खूप आवड असून त्यातही घोडय़ांबद्दल खूपच वेड आहे.

त्याच्या दोन मोठय़ा चित्रपटांची कामं सुरू आहेत. नवीन मालिकाही येणार आहे. सध्या तरी तो ‘लागिरं..’चं यश अनुभवतो आहे. या मालिकेतील संवादाचं खूप वेड पसरलं आहे लोकांमध्ये, असं तो म्हणतो. ‘मला स्वत:ला त्यातल्या ‘कॉन्फिडोण्स’ या शब्दाची मोठी गंमत वाटतेय. मुळात टाईपिंगची चूक आहे ती. पण राहुलने हा शब्द झकास पेलला आहे. किंवा ‘लाखात एक माझा फौजी’ अशी वाक्यं हिट झाली आहेत. विविध प्रादेशिक भाषा-बोलींचा वापर मालिकांच्या माध्यमातून वाढतो आहे. आतापर्यंत मुंबई-पुण्यापलीकडच्या कलाकारांना अनेकदा भाषिक न्यूनगंड वाटत होता. हा भाषिक दुरावा हळूहळू कमी होऊ  लागला असून आपलेपणा वाढतो आहे. त्या त्या मालिका-पात्रांशी तिथले लोक आपसूक जोडले जातात,’ असं तेजपाल सांगतो. ‘लागिरं झालं जी’ मालिका सुरू झाल्यानंतर एका मुलीनं कळवलं की, आता मला ऑफिसमध्ये ‘घाटी’ म्हणून चिडवत नाहीत.. भाषा ही भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, हेच आपण विसरलो आणि भाषाभेदात अडकू लागलो. पण परिस्थिती बदलते आहे. मराठीच्या विविध भाषिक छटा छोटय़ा पडद्यावर दिसू लागल्या असून अनेकदा अभिनयात येणारा भाषेचा अडथळाही दूर होतो आहे,’ याबद्दल एक लेखक-अभिनेता म्हणून तो आनंद व्यक्त करतो. अभिनयापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास या वळणावर येऊन अधिकच गतिमान झाला आहे. त्याच्याकडे असलेले हे सर्जनशीलपणाचे संचित शब्द आणि कलेच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचावेत यासाठी तेजपालला शुभेच्छा.

सर्जनशीलता म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं संचित’

तेजपाल वाघ

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 12:52 am

Web Title: article on lagir zala ji writer and creative head tejpal wagh
Next Stories
1 आऊट ऑफ फॅशन : जांभूळ आख्यान
2 ब्रॅण्डनामा : नॅचरल आइस्क्रीम
3 Watchलेले काही : फॅशनमय जगत!
Just Now!
X