हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

वापरून लगेच संपणाऱ्या उत्पादनांचाही एक वर्ग असतो. त्यातही पुन:पुन्हा ज्यांच्याकडे पावलं वळतात असे ब्रॅण्ड कमीच. अनेक उणिवा असूनही, खूप मोठय़ा प्रमाणावर विनोद होऊनही दर वेळेस नव्याने आपल्याला स्वत:कडे खेचणाऱ्या वर्गातला ब्रँड म्हणजे लेयज्. जगभरातील आबालवृद्धांना प्रिय असा हा ब्रॅण्ड. त्याची ही कहाणी.

अमेरिकेतील डॉरसेट ओहिओ प्रांतात हर्मन लेयज् एका बिस्किट कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असे. जागतिक मंदीच्या काळात ती नोकरी गेली. मग त्याने अमेरिकेतील बॅरेट फूड या सुप्रसिद्ध कंपनीत बटाटा चिप्स विक्रेता म्हणून काम सुरू केले. आपल्या कारमध्ये चिप्सची पाकिटं भरून तो विक्री करत असे. दिवसागणिक वाढती विक्री आणि एकूणच या उत्पादनाला मिळणारा प्रतिसाद बघून त्याने या व्यवसायात उतरायचं ठरवलं. १०० अमेरिकन डॉलर्सचं कर्ज काढून आधी तो वितरक झाला. त्या दरम्यान आपला व्यवसाय वाढवत १९६१ मध्ये त्याने फ्रिटो नामक कंपनी लेयज्मध्ये सामील करून घेतली. फ्रिटो लेयज् हे पोटॅटो चिप्स क्षेत्रातलं एक मोठं समीकरण जुळलं. त्यानंतर लगेचच पेप्सिको कंपनीने फ्रिटो लेयज् कंपनी विकत घेतली आणि लेयज् या नावाखाली हा ब्रॅण्ड विकला जाऊ  लागला.

बटाटा चिप्स या उत्पादनात स्वत:चं खास पाककौशल्य दाखवावं असं काही नाही. ठरलेल्या कृतीने चिप्स बनवणं आणि विकणं हा साधा व्यवहार, पण त्यातही जगभर पसरणारं ब्रॅण्डनेम तयार करण्यात लेयज् यशस्वी झालं, त्याची अनेक कारणं दाखवता येतात. १९९१ मध्ये त्यांनी आणलेला नवा अधिक क्रिस्पी फॉम्र्युला हे एक कारण. दुसरं म्हणजे जगातील महत्त्वाच्या देशात आपलं उत्पादन नेताना लेयज् त्या त्या खाद्यसंस्कृतीचा विचार करून काही प्रयोग करतं. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतात क्लासिक सॉल्टेड, अमेरिकन स्टाइल क्रीम अ‍ॅण्ड ओनियन, स्पॅनिश टोमॅटो टॅन्गो हे प्रकार उपलब्ध करून देताना इंडियन मॅजिक मसालादेखील आवर्जून तयार केला जातो.

याशिवाय त्या त्या देशात तिथल्या लोकप्रिय पोटॅटो चिप्स ब्रॅण्डशी केलेली हातमिळवणी यामुळे आपलं साम्राज्य विस्तारणं लेयज्साठी सहज शक्य झालं आहे. युकेमध्ये ‘वॉकर्स’, ऑस्ट्रेलियात स्मिथ्स, इजिप्तमध्ये ‘चिप्सी’, व्हिएतनाममध्ये ‘पोका’, इस्रायलमध्ये ‘टापूचिप्स’, कोलंबियात ‘मार्गारिटा’ अशा असंख्य नावाने लेयज् खाल्लं जातं. ही नावं तिथल्या सुप्रसिद्ध चिप्स ब्रॅण्डची आहेत. त्यांच्याशी केलेल्या हातमिळवणीमुळे लेयज् हा ब्रॅण्ड जगभर पोहोचू शकला आहे. अलीकडच्या डाएट दक्ष मंडळींसाठी लोअर कॅलरी, बेक्ड, फॅट फ्री स्वरूपात लेयज् मिळतं. कितीही सोपस्कार केले तरी बटाटा आपलं काम करतोच. आपल्या तब्येतीसाठी, वाढत्या वजनासाठी हे चिप्स हानीकारक आहेत हे कितीही ओरडून सांगितलं तरी लेयज् खाणाऱ्यांची संख्या कायम आहे. कारण हा एक चस्का आहे. एक चिप तोंडात टाकून नंतर स्वत:वर संयम ठेवणारा योगी पुरुष विरळा!

याच गोष्टीला समोर ठेवून टॅगलाइनमधून लेयज् आपल्याशी पैज लावते. ‘बेट्चा (बेट यू) कान्ट इट जस्ट वन’ ही टॅगलाइन लेयज् अनेक वर्षे सांभाळून आहे. बदलत्या जाहिरातीनुसार काही वेळा टॅगलाइन बदलते. ‘हर पल बनेगा मॅजिकल’ किंवा ‘लव्ह टू लव्ह इट’ असं जाहिरातीच्या माध्यमातून सैफ अली खान, महेंद्रसिंग धोनी किंवा अलीकडे रणबीर कपूर आपल्याला बजावत असतात.

वास्तविक लेयज् पाकिटातील चिप्सच्या संख्येवर अतिरेकी विनोद झालेले आहेत. रविवार हा लेयज् पाकिटासारखा असतो. उघडताक्षणीच संपलेला किंवा लेयज् पाकिटातील हवा हे इतक्यांदा ट्रोल झाले आहेत. तरीही बालक, तरुण आणि वृद्ध अशा सर्व थरांतील मंडळी लेयज्ला पसंती देतात. काही ब्रॅण्ड दर्जापेक्षा सवयीचा भाग असतात. खाण्याचा फारच सुंदर अनुभव म्हणून कोणीही लेयज् विकत घेत नाही. ते फावला वेळ घालवण्याचे साधन किंवा भुकेची तात्पुरती सोय एवढय़ापुरतंच मर्यादित आहे; पण तरीही असंख्य चिप्सच्या जंजाळात मार्केटिंग आणि उपलब्धता या जोरावर लेयज् सवयीचा भाग बनले आहे. अगदी सहज रेल्वे, बस स्थानकांवर ते उपलब्ध होतं म्हणून सवयीचा भाग होतं इतकंच. हे पाकीट उघडताच हाताला लागणारे चिप्स आपल्याला तात्पुरत्या कुरकुरीतपणाची खात्री देतात. खायला सुरुवात करेकरेपर्यंत त्यांचं संपणं हुरहुर लावतं. त्यामुळे पाच किंवा दहा रुपयात इतकंच या व्यवहारापलीकडे पुन्हा नव्याने ते पाकीट घ्यायला आपण वळतो. ‘गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा’ या ओळीत लेयज्ची खरी गंमत दडलेली आहे.