12 December 2017

News Flash

कल्लाकार : धातुशिल्पांचा जादुगार

ब्रॉन्झचे शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आदींसारखे पुतळे साकारायचा त्याचा विचार आहे.

राधिका कुंटे | Updated: September 29, 2017 12:37 AM

त्याची पॅशन, त्याची कला आणि त्याची कल्पना त्यानं कलाकृतीत कुशलतेनं साकारली. तिला हळूहळू लोकमान्यता मिळते आहे. धातूसारख्या माध्यमात काम करून त्यात मोठय़ा नजाकतीनं कलात्मकता पेरणारा हा कल्लाकार आहे मेटल आर्टिस्ट निशांत सुधाकरन. 

धातू हा त्याच्या आयुष्यातला जणू एक अविभाज्य घटक आहे त्याच्या लहानपणापासून. त्याचे आजोबा, बाबा आणि आता स्वत: तो.. त्याला मेटलमध्ये लहानपणापासूनच रस वाटू लागला. केवळ आवडतंय एवढय़ावर तो थांबला नाही तर भोवतालच्या भंगारातून तो कलात्मक वस्तू तयार करू लागला. अभ्यासातून वेळ मिळेल तसा तो वर्कशॉपला जात असे. काही काळातच तो पुष्कळ गोष्टी शिकला आणि अवघ्या पंधराव्या वर्षीच मेटल वर्कशॉप सांभाळू लागला. मात्र काही अडचणींमुळे वर्कशॉप बंद करावं लागलं. बीएस्सीनंतर इंजिनीअरिंगकडे वळला, पण नंतर त्याला कुटुंबाचा आधार व्हावं लागलं. नोकरीत त्याचं मन रमत नव्हतं. स्वत:चं काहीतरी करावंसं वाटत होतं. जुन्या वस्तूंपासून नवीन काहीतरी करणं सुरूच होतं, पण असं वाटलं नाही की, या क्षेत्रातच करिअर करू शके न. त्याने काही र्वष काही स्वयंसेवी संस्थांसाठी काम केलं. पण तिथे करिअरला फार वाव मिळेलसं वाटलं नाही. नोकऱ्या बदलाव्या लागत होत्या. मनाची घुसमट व्हायला लागली.. नैराश्य वाढू लागलं. एक-दोन र्वष त्याने नोकरीविना घालवली. बरं पुन्हा आणखी काही नव्याने करावं अशीही परिस्थिती नव्हती. ते दिवस आठवताना निशांत सांगतो की, ‘याच काळात मी इंटरनेट मार्के टिंग शिकून घेतलं. दरम्यान ट्रॉफीज तयार करायला सुरुवात केली. स्वत:चा ब्लॉग सुरू केला. त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला, तेव्हा कुठे या क्षेत्रात काही काम करता येईल असं वाटलं. पुन्हा मेटल आर्टचं काम करू लागलो. वेबसाइट तयार केली आणि आणखीन कामं मिळत गेली’. मला नेहमीच आव्हानात्मक काम स्वीकारायला आवडतं. काहीतरी हटके करावंसं वाटतं. आता सहाजणांची टीम माझ्यासोबत काम करते, अशी माहितीही त्याने दिली.

कलाकृती तयार करताना डोक्यात चालणाऱ्या विचारचक्राच्या वेगाइतक्याच पटापट आणि सविस्तरपणे तो सांगतो की, ‘फायबर शिल्प वगैरे नेहमीचं काम येतं तेव्हा काय करायचं ते माहिती असतं. यंदाच्या गणेशोत्सवात ‘फोर्ड’साठी केलेल्या सहा फुटी गणपतीच्या कामाचं उदाहरण देता येईल. त्यांना सहा फूट उंचीचा, ऑटोमोबाइल पार्टपासून गणपती तयार करून हवा होता. त्यात तांत्रिक अडीअडचणी होत्याच, पण वास्तवात ते करणं शक्य होईल का, यांसारख्या मुद्दय़ांचाही विचार करावा लागतो. कारण शिल्पात धातूकाम अधिक असतं, तेव्हा कोणताही भाग घेऊ न शिल्प तयार करता येत नाही. त्यासाठी ती कलाकृती व्हिज्युअलाइज करावी लागते. मी त्याच्या नोंदी करतो, टीमसोबत चर्चा करतो’. ‘फोर्ड’साठी निशांतने  तयार केलेली ही गणेशमूर्ती कुठेही खाबडखुबड नाही. एरवीच्या मूर्तीसारखीच नीटस आहे. डिस्क ब्रेक्स, स्पार्क प्लग्ज, क्लच प्लेट्स आदी गाडीच्या सुटय़ा भागांपासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. तर उंदीरमामा गिअर्स, नट्स, बोल्ट वगैरेंपासून केला आहे. क्लाएंटलाही ही मूर्ती एवढी छान होईल अशी अपेक्षा नव्हती. ही गणेशमूर्ती फेसबुकसह एकूणच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि अगदी केरळ, दुबईहून नातलग, परिचितांनी मूर्ती पाहून ती आवडल्याचं कळवल्यावर मला फार बरं वाटलं, असं निशांत सांगतो.

‘शापूरजी पालनजी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीने निशांतला एका असाइन्मेंटबद्दल भेटीसाठी बोलावलं. त्याच सुमारास काळाघोडा महोत्सवात त्याला त्याची एखादी कलाकृती असावी असं फार वाटत होतं. पण त्यासाठी आर्थिक निधीची गरज होती. कंपनीने सांगितल्यानुसार म्युरल तयार होणार नाही, हे त्याच्या ध्यानात आल्यावर त्यानं लगेच त्यांना तसं सांगितलं. तो सांगतो की, ‘थोडा धीर करून तिथल्या अधिकाऱ्यांना माझ्या कलाकृतीच्या प्रस्तावाबद्दल सांगितलं. दहा-बारा फुट धातूचा कलात्मक वृक्ष करायचा होता. त्याला फांद्या असतील आणि वाऱ्यानं पानं हलतील अशी रचना असेल. माझा प्रस्ताव मंजूर होऊ न काळाघोडा महोत्सवात ही कलाकृती साकारली गेली. तिथे आलेल्या लोकांना, जाणकारांना ती कलाकृती आवडली. झाड इन्स्टॉल केल्यावर भोवतालच्या आर्टिस्टनी तुम्ही कुठे शिकलात? जे.जे.मधले का?, अशी विचारणा सुरू केली. मी कलाशिक्षण घेतलेलं नाही हे कळल्यावर ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी कौतुकाची पावती दिली. मला फारच आनंद वाटला’. कला आणि इंजिनीअरिंगचा हा अनोखा संगम ठरलेलं झाड महोत्सवानंतर क्लाएंटच्या साइटवर उभारलं गेलं, हे तो कौतुकाने सांगतो.

कोलकत्त्याच्या एका क्लाएंटला सिंहाच्या मुखासारखे तीन मुख असलेलं परग्रहवासी प्राण्याचं शिल्प हवं होतं. एलियन तर आपण पाहिलेले नाही. मग कल्पनाशक्ती पणाला लावली. स्क्रॅप मेटलचं हे शिल्प होतं. त्याने क्लाएंटला सांगितलं की, आधी रेखाटन दाखवू शकत नाही, थेट कलाकृतीच दाखवेन. मात्र त्यांना छोटाच पीस हवा होता, जो करणं आणखीनच अवघड होतं, आव्हानच होतं. त्या शिल्पाचा सांगाडा तयार केला. हातांची लांबी ठरवली. स्क्रॅप मेटलचे कोणते भाग वापरायचे, कुठे वापरायचे आणि थ्रीडी इफेक्ट कसा द्यायचा तेही पाहिलं. ते तयार व्हायला अडीच महिने लागले. हे शिल्प सगळ्यांना आवडलंय. ही तीन सिंहमुखं फिरवता येण्याजोगी आहेत. त्याच्या डोक्यावरचं बटन दाबल्यावर सहा हात प्रकाशमान व्हायची योजना आहे. निशांतची कलात्मक दृष्टी या कलाकृतीतून व्यक्त होते. त्याला अशी आव्हानात्मक कामं करायला मजा येते. कधी त्याला नवरात्रीसाठी फायबरच्या देवीमूर्तीसाठी विचारणा होते, तीही तो करून देतो. गेल्या वर्षी कॅनडास्थित भारतीयांना अगदी कमी कालावधीत माँ शेरावालीची मूर्ती घडवून दिली होती. सध्या तो दहा ते अकरा फूट नवल वाटावं असं ‘कायनेटिक विंड स्कल्पचर’चं काम करतो आहे.

आपल्या कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचणं कोणत्याही कलाकाराला केव्हाही आवडेलच. त्या दृष्टीने स्वत:च्या कलाकृतींच्या प्रदर्शनासाठी काही कला दालनांमध्ये विचारणा करता फारसा चांगला अनुभव पदरी पडला नाही. तो म्हणतो की, ‘कला ही माझी गुरू आहे. शिवाय माझे आजोबा, बाबा, काका माझे गुरू आहेत. खरंतर कुणा एकाचंच गुरू असं नाव घेता येणार नाही. कधी कधी इतर कलाकारांच्या कलाकृतींमुळेही आपल्याला नकळत प्रेरणा मिळू शकते. नवीन गोष्टी सुचतात. हे सुचणं आणि कलाकृतींविषयीचे विचार कलाकाराच्या मनात बहुतांशी वेळा चालूच असतात’. निशांतही याला अपवाद नाही. ब्रॉन्झचे शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आदींसारखे पुतळे साकारायचा त्याचा विचार आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीसोबत प्रकल्पावर काम सुरू होणार आहे. यंदाच्या काळाघोडा महोत्सवात सामील व्हायचं आहे. कलात्मक तरीही सामान्यांच्या आवाक्यातल्या कलाकृतीही त्यानं तयार केल्या आहेत. उदाहरणार्थ पाण्याच्या नळाच्या पाइपपासून तयार केलेले आर्टपीस, लॅम्पशेड बनवल्या आहेत. वॉलआर्ट, म्युरल्स, डेकोरेटिव्ह ग्रिल्स, झुंबरं वगैरे वस्तूही घडवल्या आहेत. एनजीओमध्ये काम करतानाचा अनुभव गाठीशी जमा झाल्यानं गरीब घरातील पण कलेची जाण असणाऱ्या तरुणाईला मेटल आर्ट शिकवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं त्याचं ध्येय आहे. त्याच्या सगळ्या उपक्रमांना घरच्यांनी नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्याला त्याचा स्वत:चा स्टुडिओ उभारायचा आहे. ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांतर्गत भारतीय संस्कृतीचा ठसा शिल्पकलेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटवण्याचा त्याचा मानस आहे. निशांतच्या सगळ्या कलात्मक उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • मेटल आर्ट म्हणजे माझ्या विचारांचं प्रतिबिंब. माझ्या विचारांचे अचूक रंगढंग मला या माध्यमात पकडायचे असतात. ते हुबेहूब गवसले तर मला सुचलेल्या कल्पना त्या कलाकृतीत परावर्तित होतात जणू..

viva@expressindia.com

First Published on September 29, 2017 12:37 am

Web Title: article on metal artist nishant sudhakaran metal art