विनय नारकर

दर वर्षी ७ ऑगस्टला आपण राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करतो. हे साजरं करणं म्हणजे नेमकं काय असतं.. तर आपण आपल्या पारंपरिक वस्त्र आणि वस्त्रकला यांचा अभिमान बाळगला पाहिजे, त्यांचे जतन केले पाहिजे.. त्यांचे जतन करणे म्हणजे काय.. तर त्यांच्यावर प्रेम करणे, ती पारंपरिक वस्त्रे वापरणे, त्यांचा आनंद घेणे, म्हणजेच त्यांचं आपल्या जीवनात असलेलं अस्तित्व असणं साजरं करणे होय.

भारतीय म्हणून आपल्याला असंख्य संपन्न वस्त्रपरंपरेचा वारसा मिळाला आहे. आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंना या हजारो वर्षांच्या परंपरेने स्पर्श केला आहे. भारतात ज्याप्रमाणे अनेक हातमाग परंपरा निर्माण झाल्या त्याप्रमाणे अनेक नृत्य परंपराही विकसित होत गेल्या. भारतात काही नृत्य प्रकार आणि काही वस्त्रकला यांचं अद्वैत झालेलं पाहायला मिळतं.

वस्त्र विणतानाची विणकरांच्या हातांची, पायांची लयबद्ध हालचाल, त्यांचं विणकामात रममाण होणं आणि हे सगळं हातमागाच्या ध्वनीच्या तालावर होणं हेही एक नृत्यच असतं. नर्तक हा त्याच्या अवकाशात त्याच्या नृत्याने कथनाचे, भावनांचे तलम वस्त्रच विणत असतो. या दोन्ही कलांमध्ये मला एक अदृश्य धागा दिसत आला आहे.

नर्तक आपल्या हालचालींमधून वस्त्रांशीसुद्धा एक प्रकारे संवाद साधत असतात. काही वेळा नृत्य बघताना नृत्याचं आणि वस्त्राचं एकत्व अनुभवायला मिळतं. नृत्यकलेत महत्त्वाचे असलेले नाटय़, तरलपणा, प्रवाहीपणा हे गुण साध्य करण्यासाठी भारतातल्या वस्त्र परंपरांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांची नृत्यातील दृश्य रचना आणि प्रतिमा मनावर प्रभावीपणे ठसण्यासाठी मदत होते. नर्तकांच्या हालचालींमध्ये आणि एकूण नृत्याच्या दृश्य रचनेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपल्या वस्त्र परंपरा सक्षम ठरल्या आहेत.

भारतीय नृत्यकलांना इथल्या संपन्न वस्त्र परंपरांमुळे विकसित होताना एक वेगळी मिती मिळाली. भारतीय नृत्यशैलींची ओळख निर्माण होण्यात त्या त्या भागातल्या वस्त्र परंपरांचा मोठा वाटा आहे. भारतीय नृत्यांची प्रादेशिक अस्मिता तिथल्या वस्त्र परंपरेला मिरवत, बहरत गेली. यामुळे आणखी एक गोष्ट घडून आली. ती म्हणजे, नर्तक वस्त्रकलेला आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून सादर करू लागला.

आपल्या काही नृत्य परंपरा आणि वस्त्र परंपरांमधील अन्योन्यसंबंध पाहणे रोचक आहे.

कथक नृत्याचा विचार येताच, ते ज्या उत्तर भारतात बहरले, तिथल्या बनारसी आणि चंदेरी वस्त्रांसोबतच कथक डोळ्यांसमोर येते. कथक नृत्यातल्या नजाकतीला बनारसी रेशमाची सळसळ आणि चंदेरी रेशमाची पारदर्शकता अगदी पूरक ठरते. पारदर्शक आणि तलम चंदेरी वस्त्रांचे अनेक स्तर वापरून बनवलेल्या पोशाखामुळे कथक नर्तकाच्या हालचालींनादेखील उठाव येतो.

ओडिसी नृत्याचा गोडवा तिथल्या फिकट रंगातल्या संभलपुरी साडय़ांनी किंवा खंडुवा साडय़ांनी विशेष खुलून येतो. ओडिसी नृत्यात ‘त्रिभंग’ या शारीर रचनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्रिभंग म्हणजे तीन भागांत विभागणे. या नृत्यात नेसल्या जाणाऱ्या साडय़ा ‘फोडाकुंभ’ या विणण्याच्या पद्धतीने विणल्या जातात, ज्यामुळे त्या साडीची रचना तीन भागांत होते.

तमिळनाडूतील भरतनाटय़म्चे बांधीव आणि भौमितिक रचना हे ठळक वैशिष्टय़ आहे. तिथल्या कांजीवरम आणि कोरनाड वस्त्रांचा ठाशीवपणा, त्यातल्या चौकडय़ांच्या विविध रचना हे भरतनाटय़म्च्या व्यक्तिमत्त्वाशी आणि स्वभावाशी सुसंगत ठरल्या. भरतनाटय़म्च्या सादरीकरणात बऱ्याचदा विष्णू, श्रीकृष्ण, कामदेव, लक्ष्मी अशा देवता नर्तक साकारत असतो. त्या देवतांना कांजीवरमचा भरजरीपण

साजेसा असतो. भरतनाटय़म्चा सराव सोप व्हावा यासाठी, या नृत्याच्या प्रणेत्या रुक्मिणदेवी अरूंडेल यांनी त्यांच्या कलाक्षेत्र या संस्थेत कमी रुंदीची सुती साडी विणून घ्यायला सुरुवात केली. रोजच्या सरावासाठी हीच साडी वापरली जाते. ‘कलाक्षेत्र साडी’ या नावानेच ती प्रसिद्ध झाली आहे.

आसाम हा वस्त्र परंपरांच्या बाबतीत अतिशय प्रगत असलेला प्रदेश. इथल्या सत्रीय या नृत्यशैलीमध्ये पांढऱ्या सुती आणि कोऱ्या मुगा रेशमाची वस्त्रे परिधान केली जातात. सत्रीय संत परंपरा आणि आसामी वस्त्रे या त्यांच्या खास अस्मिता आहेत. सत्रीय नृत्यात या दोन्ही अस्मितांच्या संगमातून साकारलेला अपूर्व आविष्कार पाहायला मिळतो.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही राज्ये वस्त्र परंपरेच्या बाबतीत विलक्षण प्रगत आहेत. इथे जिल्ह्य़ागणिक वेगवेगळ्या वस्त्र परंपरा आहेत. सुती, रेशमी, खादी सर्व प्रकारांमध्ये वस्त्रे इथे बनतात. इथल्या कुचिपुडी या नृत्यशैलीमध्ये या विविध वस्त्र परंपरांचा जाणीवपूर्वक वापर केला जातो. केरळचे मोहिनीअट्म हे नृत्य तिथल्या शुभ्र आणि सोनेरी काठांच्या सुती कसवू मुंडू साडय़ांशिवाय अपूर्ण आहे. सहजीवनातून समृद्ध होणे अभिप्रेत असते. भारतातल्या वस्त्र परंपरा आणि नृत्य परंपरा या आदर्श सहजीवनाचे उत्तम प्रमाण ठरल्या आहेत.