नव्वदीच्या दशकापूर्वी कॅसेट आणि रेकॉर्ड युगात उच्चभ्रू आंग्लभाषीय समुदायापुरता मर्यादित असलेला इंग्रजी गाण्यांचा चाहतावर्ग ठरावीक लोकप्रिय गाण्यांचे वादन करीत असे. मायकेल जॅक्सन, मॅडोना, बोनी एम, रॉक्सेट ही एमटीव्हीपूर्व काळातील भारतीय गानरसिकांची दैवते होती. त्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातले कलाकार पोहोचणे अवघड होते. शिवाय इंग्रजी गाण्यांच्या कॅसेट्स या भारतीय गाण्यांच्या तुलनेत खूप महाग असत. (पंचवीस ते तीस रुपयांत सिनेमातील गाण्यांची कॅसेट मिळे, तेव्हा इंग्रजी गाण्यांची कॅसेट शंभर ते दीडशे रुपयांना मिळत) चोर बाजारामध्ये सर्वाधिक विक्री कॅसेट्सची होत असे आणि तिथे इंग्रजी कॅसेट्सचा स्टॉक प्रचंड एमटीव्ही आल्यानंतरच्या दशकभरातच कॅसेट्स हद्दपार झाल्या. एमोठा असे.

एमटीव्ही आल्यानंतरच्या दशकभरातच कॅसेट्स हद्दपार झाल्या. एमपीथ्री व्हर्शन्सनी धुमाकूळ घालून सीडीयुगालाही संपवून टाकले. पेनड्राइव्ह किंवा हार्डडिस्कमधून हजारो-लाखो गाण्यांचा संग्रह करणे शक्य झाले आणि खरे तर गाणी ऐकण्याची किंमत आणि हव्यास आटण्यास सुरुवात झाली. यूटय़ूबवरून माहिती नसलेल्या भाषेतील गाणी केवळ चमत्कृतीपूर्ण लकबींनी लोकप्रिय झाली. पण या सगळ्या प्रवाहाआधी कॅसेटयुगात १९९२ साली एका बिगरइंग्रजी गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला होता. खलीद या अल्जेरियन गायकाचे अरेबिक भाषेतील दीदी हे गाणे अलीकडे यूटय़ूबमुळे तुफान गाजलेल्या दक्षिण कोरियातील गन्नम स्टाइलइतकेच तेव्हा लोकप्रिय झाले होते. अरेबिक न कळणाऱ्या साऱ्याच जगात ते तुफान गाजत होते आणि त्याच्या कॅसेट्सवर भारतीय तरुणाईच्या उडय़ा पडत होत्या. या गाण्याच्या प्रभावावरून बॉलीवूडमध्येही तेव्हा दोन भीषण हिंदी गाणी तयार झाली होती. अन् दोनेक वर्षांपूर्वी ‘एअरलिफ्ट’ सिनेमात ‘दिल चिझ तुझे दे दी’ नावाचे गमतीशीर गाणे तयार झाले होते. तर दीदी या गाण्याचे वर्ल्ड कप फुटबॉलच्या एका सोहळ्यामध्ये अलीकडे सादरीकरण होऊन या गाण्याचे अजरामरपण सिद्ध होत असतानाच, ते गाणे १९८८ सालातील एका अरेबिक गाण्यातून चोरण्यात आल्याचा दावा खलीदवर टाकण्यात आला आणि त्यात तो दोषी ठरला. अलीकडेच मग पुन्हा त्या आरोपातूून मुक्तही झाला. खलीद याच्या गाण्याची आठवण यासाठी झाली की, दीदी हे गाणे तीन दशकांपूर्वी पठडीबाहेरचे असूनही जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही लोकप्रिय झाले. बाहेरच्या संगीतजगतातून अत्यंत कमी साधनसामग्री भारतात येत असताना आणि थोडेच कमी इंग्रजी शब्द असतानाही हे गाणे ग्लोबल हिट बनले. यूटय़ूबच्या जन्मानंतर भारतीयांना दीदीसारख्या पठडीबाहेरची गाणी ऐकण्यासाठी अमर्याद पर्याय उपलब्ध झाले. मग कोणत्याही खंडातील अगदी स्थानिक कलाकारांचे लाइव्ह कन्सर्ट ऐकणेही शक्य बनले. पठडीबाहेरची म्हणता येतील अशा दीड-दोन दशकांतील गाण्यांमध्ये डिवॉच्का या अमेरिकी बॅण्डची सारी गाणी नोंदविता येतील. या बॅण्डचे नाव रशियन आहे. अन् तो अमेरिकेतल्या उत्तम गाणी तयार करणाऱ्या बॅण्ड्सपैकी एक असला तरी प्रसिद्धीच्या पातळीवर त्यातील कलाकारांचा झगमग सोस फार कमी आहे.

‘लिटिल मिस सनशाइन’ या सिनेमासाठी या बॅण्डच्या गाण्यांना थेट ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले तेव्हा या बॅण्डची गाणी प्रकाशझोतात आली. या बॅण्डची गाणी, त्यांच्या वाद्यांचा ध्वनी आणि वापर यातील वेगळेपणा एका श्रवणातच ठसणारा आहे. ‘विनर इज’, ‘हाऊ इट एण्ड्स’, ‘टिल द एण्ड ऑफ द टाइम’ या गाण्यांच्या चालींपासून त्यांतील गायकीचा ढंग नेहमीच्या पॉप गाण्यांसारखा नाही. कोरसपासून वाजविल्या जाणाऱ्या समूहशिटीने यातील काही गाण्यांचे सौंदर्य वाढविण्यात आले आहे. ‘क्वीन ऑफ सरफेस स्ट्रीट’ आणि ‘हण्ड्रेड अदर लव्हर्स’ या त्यांच्या गाण्यात वापरला गेलेला वाद्यमेळ खास अभ्यासावा इतका भिन्न आहे. पठडी सोडून उत्तम गाणी देणाऱ्या कलाकारांपैकी ‘सिक्सपेन्स नन द रीचर’ या बॅण्डचाही समावेश करावा लागेल.

‘किस मी’ या गाण्यातील गिटारच्या सस्पेन्शन कॉर्ड्सचा (आरडी बर्मन यांच्या बहुतांश लोकप्रिय गाण्यांचा जीव गिटारवरचे हे कॉर्ड्स होते.) वापर हे गाणे ऐकणाऱ्याला सुखावून टाकतो. याच कॉर्ड्सचा वापर करून या बॅण्डने ‘ब्रीद युवर नेम’ हे आणखी एक सुंदर गाणे तयार केले. ‘देअर शी गोज अगेन’ हे कव्हर व्हर्शनही मूळ गाण्याहून सुंदर आहे. २००५ ते १० या काळात डायडो या ब्रिटिश गायिकेची गाणी एमटीव्हीवरून गाजत होती. या गायिकेने कधी तिच्या समांतर कलाकारांसारखी धांगडधिंगायुक्त गाणी बनविली नाहीत. तिच्या ‘व्हाइट फ्लॅग’, ‘लाइफ फॉर रेण्ट’ या परिचित गाण्यांपेक्षा ‘डोण्ट लिव्ह होम’, ‘सॅण्ड इन माय शूज’ ही आपल्या म्युझिक वाहिन्यांवर तितक्या न वाजलेल्या गाण्यांना ऐकाल, तर या गायिकेच्या गाण्यांतील सौंदर्य लक्षात येईल. या गाण्यांतील उत्तम गिटारस्ट्रोक्स खूप काळ कानांमध्ये वाजत राहतील. पठडीबाहेरची गाणी हुडकण्यास निघालात तर इतके पर्याय आहेत, की शोधाचा ‘कोलंबसी’ आनंद मिळू शकेल.

म्युझिक बॉक्स

  • DeVotchKa Till the End Of Time
  • Devotchka – The Winner is
  • DeVotchKa – 100 Other Lovers
  • Devotchka – Queen of the Surface Streets
  • Sixpence None The Richer – Breathe Your Name
  • Dido – Don’t Leave Home
  • Dido – Sand In My Shoes

viva@expressindia.com