(शेफ वरुण इनामदार)

पहिल्या दोन लेखांमध्ये काही मूलभूत गोष्टींची माहिती घेतल्यानंतर आता आपला प्रवास आला आहे, रम आणि त्याविषयी भारतीयांच्या मनात ‘रम’लेल्या काही संकल्पना याविषयी जाणून घेण्याच्या टप्प्यावर. भारतात रम आणि त्या पठडीत मोडणारे ड्रिंक्स घेण्याकडे पिणाऱ्यांचा तसा जास्त कल. सैन्यदलात रमचा होणारा वापर त्यामागच्या समजुती आणि वोडका, जिन असतानाही रमला मिळणारी पसंती हा सर्व आढावा घेतल्यावर एक गोष्ट लक्षात येतेय की गडद रंगाच्या स्पिरिट्सना भारतीयांनी नेहमीच पसंती दिली आणि त्यांच्या शेल्फवर एक महत्त्वाचं स्थानही दिलं आहे.

व्हिस्की आणि रममध्ये तसा फारसा फरक नाही. फारसा नसला तरीही त्यातील तफावत मात्र नाकारता येत नाही. व्हिस्की बनवण्यासाठी बऱ्याचदा बार्ली, गहू, रे, मका, मिलेत, ओट्स किंवा मग कोणत्याही इतर पिष्टमय धान्याचा वापर केला जातो. सिंगल माल्ट व्हिस्की ही फक्त आणि फक्त बार्लीपासूनच बनते. तर रम ही उसापासून तयार केली जाते. रम आणि त्यासोबत येणारे अनुभव म्हणजे जणू काही एक वेगळा अभ्यासक्रमच. ती पिण्याच्या पद्धतींपासून ती कोणाबरोबर आणि कधी प्यावी याविषयीसुद्धा अनेकांच्या काही खास आवडीनिवडी असतात. बरं रम पिण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धतही असते.

कॉलेजमध्ये असताना बरेचजण रम पिताना ती पाण्यासोबत पिण्याला प्राधान्य देतात. यामागे बहुधा एकच कारण असावं की पाणी तुलनेने स्वस्त किंवा अगदीच फुकटात मिळून जातं. पण कोल्डड्रिंक्ससाठी मात्र खिशाला चाप बसतो. त्यासाठी पैसे हे मोजावे लागतातच. मुळात कोला किंवा इतर कोणताही ज्यूस घेतला तर त्यासाठीसुद्धा पैसे मोजावे लागतात. त्यामुळे मग रम पिण्यासाठी पाण्याचाच सर्रास वापर केला जातो. हळूहळू हे प्रस्थच होतं. पण ते फक्त कॉलेजच्या दिवसांपुरतंच टिकलं असं म्हणायला हरकत नाही. कारण, कॉलेज संपवून त्यानंतर कामाला लागल्यानंतर पहिला पगार हाती आल्यावर तो आनंद साजरा करण्यासाठीसुद्धा ‘ओल्ड मंक’च्याच पहिल्या घोटाने सुरुवात केली जाते. पण त्यावेळी मात्र कोला, ज्यूस आणि जोडीला ग्लासात एखाद्या बर्फाच्या खडय़ाची जोड असतेच.

भारतात रम पिणं म्हणजे ‘ओल्ड मंक’ पिणं अशीच संकल्पना दृढ झाली होती किंबहुना ती संकल्पना आजही कायम आहे. सैन्य दलात काम करणाऱ्यांपासून ते अगदी सर्वसामान्य पेयांमध्ये रमणाऱ्या अनेकांसाठी ‘ओल्ड मंक’ म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. ‘ओल्ड मंक’ची ती लहानशी लक्षवेधी बाटली आजही फक्त सैन्यदलात काम करणाऱ्यांच्याच नव्हे तर सर्वसामान्यांच्या घरातही आढळते. अर्थात, याला अपवाद असू शकतात. कॉलेजमधल्या आठवणी, प्रेमकहाण्या त्यात झालेला गोंधळ, समज-गैरसमज या सर्व गोष्टींमध्ये ‘ओल्ड मंक’ नाही असं फार कमी होतं. चौकोनी आकाराची ‘ओल्ड मंक’ची बाटली आणि त्यासोबतच्या असंख्य आठवणींचा खजिना प्रत्येकाच्या साथीला असतोच. ही बाटलीही अशी लक्षवेधी आहे की त्यावर असणाऱ्या स्टीकरपासून ते अगदी त्यावर असणाऱ्या प्रत्येक गोष्टीने सर्वाच्या मनात घर केलं आहे.

या ब्रँडची सुरुवात कशी झाली याचा शोध घ्यायचं झालं तर एकोणिसाव्या शतकात जनरल एडवर्ड डायरच्या काळात याचा उल्लेख आढळतो. रम पहिल्यांदा कुठे बनवण्यात आलेली असं जर विचारलं तर १८०५ मध्ये रम बनवली गेल्याचं आढळलं. पण, खरीखुरी ‘ओल्ड मंक’ सर्वाच्या जिभेवर तरळू लागली ती म्हणजे १९५४ पासून.. तोपर्यंत तिला सैन्यदलातही स्थान मिळालं होतं.

गेल्या सात वर्षांमध्ये रमच्या विक्रीच्या प्रमाणात घट झाली आहे. मुळात रमने बरेच काळ आणि बदल पाहिले. गडद रंगांचे स्पिरीट्स पिण्याकडे तरुणाईचा कल कमी झाला हा बदलही तिने अनुभवला. याला कारण ठरलं ते म्हणजे बाजारातील वाढती स्पर्धा आणि त्यातून निर्माण झालेलं रमचं वेगळं विश्व. ज्यामध्ये वेगळ्या चवीची रम अनेकांच्या जिभेवर तरळू लागली. या रमच्या फ्लेव्हरमध्ये कॅरेमल, व्हॅनिला आणि मसाल्याची हलकीशी चव होती. जणू काही ख्रिसमस केकच कोणीतरी ग्लासमध्ये तुमच्या पुढय़ात आणून ठेवला आहे. रमची चव असणारी बरेच कॉकटेल्स अनेकांच्या पसंतीस उतरतात. यात माझी चव म्हणाल तर, ‘आयलंड आइस टी’ ही माझी सर्वात आवडीची चव आहे.

२०१५ मध्ये या रमणीय विश्वात एक वादळ आलं. जेव्हा ‘ओल्ड मंक’चे उत्पादन थांबवले जाणार अशा चर्चाना उधाण आलं. नेमकं त्याच वेळी बाजारात व्हिस्कीचे काही ब्रँड नावारूपास आले होते. ज्यामध्ये ‘जॉनी वॉकर’, ‘ब्लेंडर्स प्राइड’, ‘इंपिरियल ब्ल्यू’, आणि ‘रॉयल स्टॅग’ या नावांची सरशी पाहायला मिळाली. परिणामी मोहन मेकिन या कंपनीने बाजारातील त्यांचं स्थान हळूहळू गमवायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वीच ब्रिगेडीयर कपिल मोहन म्हणजेच मोहन मेकिन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा यांच्या जाण्याने एक मोठी पोकळीच निर्माण झाली. त्यांच्या नावे मग श्रद्धांजली देणारे भलेमोठे लेखही लिहिण्यात आले. तेसुद्धा काही चुकांसह. या चुका तशा महत्त्वाच्या आणि सुधारण्याजोग्या आहेत, कारण कपिल मोहन हे ‘ओल्ड मंक’चे निर्माते नसून त्यांच्या भावाचा म्हणजेच वेद रतन मोहन यांचा मोलाचा वाटा होता. ‘ओल्ड मंक’च्या जन्मात कपिल मोहन यांचा भाऊ च खरा हिरो ठरला. पण, याचं श्रेय मात्र या फॉरवर्डेड जमान्यामुळे कपिल मोहन यांना दिलं गेलं. आजच्या पिढीत एखाद्या गोष्टीविषयी तपासणी करून मगच त्यानंतर ती माहिती पुढे इतरांपर्यंत पोहोचवावी हा गुण नाहीच जणू. सोशल मीडियावर कपिल मोहन गेले ही बातमी आली आणि अनेकांनी ‘ओल्ड मंक’चा निर्माता म्हणून कपिल मोहन यांचा उल्लेख करत त्यांच्या या ग्रेट कामाला आणखी थोडं ग्रेट केलं. पण, मुळात ही एक घोडचूकच होती. कपिल मोहन यांच्या भावाने म्हणजेच वेद मोहन यांनी त्यांचे वडीन नरेंद्रनाथ मोहन यांच्याकडून १९६९ मध्ये कंपनीचे अधिकार घेतले. त्याआधीच १९५४ पासून त्यांनी ‘ओल्ड मंक’ची सुरुवात केली होती. युरोप दौऱ्यावरून परतल्यानंतर ‘बेनेडिक्टीन मंक’पासून प्रेरणा घेत त्यांनी ‘ओल्ड मंक’ची निर्मिती केली होती. ‘ओल्ड मंक’ हे नावही त्याच कंपनीला एक सलाम म्हणून ठेवण्यात आलं. सध्याच्या घडीला त्या बाटलीवर असणारं म्हाताऱ्या माणसाचं छायाचित्रही त्याचंच एक प्रतीक आहे. तो म्हातारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून, एच जी मेकिन यांचेच ते छायाचित्र असल्याचं म्हटलं जातं. ज्यांनी १८८७ मध्ये जनरल एडवर्ड अब्राहम डायरच्या व्यवसायाची सूत्रं आपल्या हाती घेतली होती.

‘ओल्ड मंक’ला कोणाचीही स्पर्धा नव्हती. ते आपल्याच नशेत, दुनियेत धुंद असणारं मद्य. सुरुवातीच्या काळात उभ्या बाटल्यांमध्ये येणारं हे पेय कालांतराने ओल्ड पार व्हिस्कीच्या बाटल्यांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेल्या बाटल्यांमधून विकलं जाऊ  लागलं. पण, त्यानंतर पार व्हिस्कीच्या मालकांनी ‘ओल्ड मंक’ला न्यायालयात खेचलं. अखेर दोन्ही कंपन्यांनी जुने पार गडद आणि थोडे कलात्मक करण्याच्या निर्णयावर सहमत होत हा वाद मिटवला. तेव्हापासून ओल्ड मंकच्या बाटलीमध्ये केलेले बदल आजतागायत कायम आहेत. वेद मोहन ज्यावेळी हा सर्व पसारा सावरण्यात गुंतले होते, त्यावेळी त्यांचा लहान भाऊ  म्हणजेच ब्रिगेडीयर कपिल मोहन यांनी मोहन मेकिनच्या व्यावसायीकरणाकडे जास्त लक्ष देत हा ब्रँड आणखी मोठा करण्यात मोलाचं योगदान दिलं. कपिल मोहन यांनी १९७३ मध्ये आपल्या भावाच्या अपघाती मृत्यूनंतर ‘ओल्ड मंक’ आणि या संपूर्ण कंपनीची सूत्रं आपल्या हाती घेतली. ही झाली कथा ‘ओल्ड मंक’ची. पण, ही एकच कथा झाली. या एका पेयामुळे कित्येक कथा, अनुभव आणि असंख्य आठवणींचा एक वर्तुळच तयार झालं आहे. ज्याची कल्पनाही करता येणं निव्वळ अशक्य आहे. कारण हा ‘रम’णीय मामला आहे लोकहो..

viva@expressindia.com