21 February 2019

News Flash

‘कट्टा’उवाच : सवाल..!

 सवाल! हा एक शब्द नाही, ही एक भावना आहे.

‘तुमच्या शाळेत हे पण शिकवायचे?’

‘सवाल .. !’

आपण सरळ कौतुकाने एखादी गोष्ट विचारावी आणि समोरच्याने त्यातही ‘अ‍ॅटिटय़ूड’ दाखवून असा उद्धटपणा करावा, विचारणाऱ्याच्या अगदी तोंडात मारल्यासारखा! अशा वेळी त्या उत्तराचा मनाच्या तळापासून राग येतो. कारण त्या ‘सवाल’ला एक आवरण असतं अभिमान किंवा अनेकदा ज्याला ‘माज’ म्हणता येईल अशा भावनेचं! ‘हे काय विचारणं झालं, एवढं तर आमच्याकडे असतंच’ किंवा ‘काय वाटलं काय मग तुम्हाला’ अशा आशयाशी साधारणत: साधम्र्य साधणारा या ‘सवाल’चा टोन असतो.

सवाल! हा एक शब्द नाही, ही एक भावना आहे. त्यामध्ये कधीही प्रश्नचिन्ह अपेक्षित नसतंच; उलट अजून प्रश्न येऊ  नयेत म्हणून वापरला गेलेला शाब्दिक पूर्णविराम असतो तो! निरपेक्ष भावनेवर फारच प्रेम करणारा हा ‘सवाल’ कधीच त्यापुढे ‘जवाबा’ची अपेक्षा करीत नाही. मुळात तो कोणाला विचारला गेलेला प्रश्न नसतोच. ‘आता यावर चर्चा नाही’ अशा अर्थाचा स्पष्ट उद्गार असतो तो! त्यावर एक तर काही न बोलणं किंवा विषय बदलणं उत्तम! असं करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यावर बोलण्यासारखं अनेकदा आपल्याकडे काही उरलेलंच नसतं आणि चुकूनमाकून असलंच तर त्या शाब्दिक फटक्यानंतर आपल्या बोलण्यातला जोर गेलेला असतो. त्यामुळे ‘सवाल’च्या पुढय़ात सरळ शस्त्रं टाकून शरणागती पत्करावी.

मात्र जर लढायचाच विचार असेल तर पक्की तयारी करून मैदानात उतरावं लागेल. यासाठी सल्ला देताना पुलंची आठवण येते, ‘पुणेकर व्हायचं असेल तर हरकत नाही, पण मुख्य सल्ला असा की पुन्हा एकदा विचार करा.’ त्याचं कारण असं की सवाल या शब्दाचा उगम जरी मराठीतला नसला तरी हा ‘अ‍ॅटिटय़ूड’ बाळगणारे मिळतील ते मुख्यत: दोन ठिकाणी : एक म्हणजे स्वयंघोषित साम्राज्य ‘पुणे’ आणि दुसरं म्हणजे मुंबईतील ‘प्रति’पुणे अर्थात ‘विलेपार्ले’! त्यामुळे यांच्या ‘सवाला’ला प्रतिप्रश्न करण्याआधी किंवा आव्हान देण्याआधी आपली पूर्ण तयारी झालेली आहे याची खात्री करून घ्या.

या शब्दाची आणि त्यामागच्या भावनेची दखल ‘हाइक’ या अ‍ॅपने घेऊन त्यावर स्टिकरही बनवला. या स्टिकरवर दिसणाऱ्या चेहऱ्यावरच्या भावना आणि त्याचे हातवारे हे त्या ‘सवाल’चा टोन दाखवण्यासाठी इतके योग्य आहेत की बाकी काही स्पष्टीकरण देण्याची गरजच पडू नये. ‘विषयच नाही ना भाऊ. ..’ हे याला समांतर जाणारं ‘एक्स्प्रेशन’, पण ‘सवाल’च्या तोडीचं दुसरं काही असायचा ‘सवाल’च नाही!

First Published on February 2, 2018 12:36 am

Web Title: article on sawaal word katta word