18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

कल्लाकार : रंग, रेषा आणि समाजभान

मुद्रणशैली अर्थात टायपोग्राफी आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफी या क्षेत्रांत प्रयोग करू पाहाणारा हा कल्लाकार

राधिका कुंटे | Updated: August 11, 2017 1:29 AM

रंग-रेषांमध्ये रमलेला तो वास्तवाचीही जाण ठेवून आहे. त्याचं समाजभान जागृत आहे. वैद्यकीय अभ्यासातीलही थोडं फार शिक्षण घेऊन तो आता नृत्यकलाही शिकतोय. हा कलेचा प्राध्यापक होऊ इच्छिणारा कल्लाकार आहे, सिद्धेश शिर्सेकर.

मनातलं कागदावर उतरवायला सगळ्यांना जमत असं नाही. त्यात ते माध्यम रंग-रेषांचं असेल तर काम अधिकच अवघड होतं. मात्र त्या कलासक्त मनाची नीट मशागत केली गेली, त्याला गुरूंच्या मार्गदर्शनाचं खतपाणी मिळालं आणि अमाप मेहनत घेतली गेली, तर एखादा युवा कलाकार घडतो. मुद्रणशैली अर्थात टायपोग्राफी आणि सुलेखन अर्थात कॅलिग्राफी या क्षेत्रांत प्रयोग करू पाहाणारा हा कल्लाकार आहे सिद्धेश शिर्सेकर.

सिद्धेशचे वडील डॉक्टर आणि आई माजी प्राध्यापक आहे. साठय़े महाविद्यालयात त्यानं विज्ञान शाखेत बारावी केलं. दरम्यान, त्यानं अ‍ॅक्युप्रेशर, फूट रेफ्लेक्सॉलॉजीची पदविका घेतली आणि प्रॅक्टिसही सुरू केली. त्याने योग प्रशिक्षणाची पदविका घेतली असून तो तेही काम करत असतो. इतकंच नव्हे तर त्याने  ग्रेड दोनपर्यंत रेकीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. बारावीनंतर तो मुंबई विद्यापीठातच वंदना देसाईंकडे भरतनाटय़मचे धडे घेत, पदव्युत्तर शिक्षण घेतो आहे. त्याची गोडी त्याला लागली ती बहिणीमुळे. गिरगावकर आई असल्याने तो अनेक सांस्कृतिक उपक्रमांतही सहभागी होतो. पण इतकं सगळं करणारा तो सुलेखनाकडे कसा वळला त्याची गंमत आहे. त्याने बारावीनंतर सीईटी दिली होती. तेव्हा इतर अनेक मुलांसारखंच त्यालाही वाटायचं की आपण डॉक्टर होणं ही आपल्या वडिलांची इच्छा आहे. पण नंतर त्याला कळलं की वडिलांचा तसा काहीच आग्रह नाही. मग त्याने आपलं कलाशाखेसाठीचं प्रेम वडिलांना सांगितलं. तसं पार्ले टिळकला शिकताना अनेक चित्रकला स्पर्धामध्ये त्याने सहभाग घेतलेला होताच. पण घरच्यांचा पाठिंबा मिळाल्यावर त्याचा हुरूप वाढला. बारावीनंतर त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये फाऊंडेशन कोर्स केला. तिथे त्याला ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रतिभा वाघ यांचं मार्गदर्शन लाभलं, ते आजतागायत कायम आहे. त्याच सुमारास त्याने मेडिकलला जाण्यासाठी दुसऱ्यांदा सीईटी दिली होती. पण कलाक्षेत्रात जाण्याचं ठरल्यावर जेजेलाच जायचं हेही पक्कं केलं होतं.

जेजेत प्रवेश नाही मिळाला तर मेडिकलला जायचं असं त्याचं ठरलं होतं. नाशिकला डेंटलसाठी त्याला सीईटीतून प्रवेश मिळाला, पण दुसऱ्याच दिवशी जेजेमधला प्रवेशही मिळाला. मग त्याने अर्थातच जेजे निवडलं. तिथल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या सहा वर्षांत त्याला बरंच काही शिकायला मिळालं. जीएस होऊन त्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन, पुढारीपण याचा अनुभव घेतला. अनेक वैचारिक कल्पनांची देवाणघेवाण झाली. वाघ मॅडमकडे शिकत असताना त्याला पारंपरिक चित्रशैली आवडू लागली. कारण त्यांचीही तीच शैली होती. त्याच सुमारास त्याला आपले कलागुण प्रकट करण्यासाठी एक छान व्यासपीठ मिळालं. तो अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊ लागला.

नेहरू सेंटर, आर्ट प्लाझा, जहांगिरचा मान्सून शो अशा अनेक प्रतिष्ठित ठिकाणी त्याने प्रदर्शनं केली. मात्र कमर्शिअलच्या या विद्यार्थ्यांना तितकासा पाठिंबा मिळाला नाही. तिसऱ्या वर्षी टायपोग्राफी आणि कॅलिग्राफी या विषयासाठी त्याला प्रा. संतोष क्षीरसागर यांचं मार्गदर्शन लाभलं. ते जेजे इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाइड आर्टचे डीन आहेत. त्यांच्यासह प्रा. समीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चौथ्या वर्षांचं कॅम्पेन आणि टायपोग्राफीचा प्रकल्प पूर्ण केला. समीपसरांसोबत त्याने क्लाइंब के२ या व्हिज्युअल कम्युनिकेशन सेमिनारमध्ये भाग घेतला. काही कार्यशाळाही केल्या. त्यातून त्याला कामाचा अनुभव मिळाला. इंडियन ऑइलच्या प्रदर्शनात तो वाघ मॅडमसोबत सहभागी झाला होता. फायनल इअरचा प्रोजेक्ट हा Learning Aid in Braille and Typography टायपोग्राफी आणि ब्रेलशी निगडित होता. त्याबद्दल सिद्धेश सांगतो, ‘‘गेली पाच र्वष मी बुकवाला ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेशी निगडित आहे. तिथं मी आर्ट डिरेक्टर म्हणून काम करतो. संस्थेतर्फे भारतातल्या अनाथाश्रमांत ग्रंथालयांची  उभारणी होते. त्या मुलांना वाचनाची गोडी लागावी, हा त्यामागचा उद्देश. केवळ वाचन तसेच कलेकडंही त्याचा कल झुकावा यासाठी काम करतो आहे. या मुलांच्या सान्निध्यात राहताना विशेष मुलांनाही किमान शिक्षणाचा अधिकार आहे, हे जाणवलं. अक्षरओळख करून देणाऱ्या पुस्तकाची ब्रेलमध्ये प्रतिकृती काढली तर, अशी कल्पना डोक्यात आली. दादरच्या श्रीमती कमला मेहता स्कूल फॉर ब्लाइंड या संस्थेच्या मदतीनं यासंदर्भात पुस्तक तयार केलं. ब्रेललिपीचा आधार घेतला. प्रयोग केले. या मुलांना ब्रेललिपी आपलीशी वाटते. शिवाय सामान्य मुलं शिकत असलेली एबीसीडीही या पुस्तकात एम्बॉस केली, कारण काही मुलं अंशत: अंध असतात. पुढं त्यांना ही लिपी लिखाणासाठी उपयुक्त ठरू शकते. हा प्रकल्प मंजूर होऊन आता तिथं शिकवला जातो आहे. या ड्रीम प्रोजेक्टचा खर्च जवळपास लाखाच्या घरात गेला. घरच्यांनी याही बाबतीत कायम पाठिंबा दिला. माझ्याकडं या पुस्तकाचे सर्व कायदेशीर हक्क सुरक्षित आहेत. त्या संदर्भातल्या पेपर्सचं वाचनही मी केलं आहे. कउफऊ (International Conference of Research in Design) ही डिझाइन क्षेत्रातली दुसऱ्या क्रमांकाची कॉन्फरन्स आहे. स्प्रिंगर पब्लिकेशन या जागतिक मान्यताप्राप्त प्रकाशनात माझ्या या पेपरची नोंद झालेली आहे.’’  हे पुस्तक अनेकांपर्यंत सिद्धेशला पोहोचवायचं आहे. त्यासाठीच्या निर्मितीखर्चासाठी त्याला अर्थसाहाय्य हवे आहे. इ.ा.अ.च्या शेवटच्या वर्षांच्या कॅम्पेनसाठी विविध वस्तू निवडल्या जातात. सिद्धेशने सुई निवडली. इरवी कॅम्पेन प्रिंट केलं जातं. पण सिद्धेशने ते शिवलं होतं, तेही मांजरपाटावर. या कल्पकतेसाठी त्याला क्रिएटिव्ह कॉन्सेप्टच्या आर्ट डिरेक्शनसाठी पुरस्कार मिळाला. त्याचं ट.ा.अ. नुकतंच पूर्ण झालं आहे. तो मुंबई विद्यापीठात पहिला आला आहे. या काळातील लेटरिंग, टायपोग्राफी आणि कॅलिग्राफीच्या प्रकल्पात प्रा. संतोष क्षीरसागर यांचं मार्गदर्शन त्याला मिळालं. पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षांला त्याने अक्षरओळख हा प्रकल्प केला. तो म्हणतो, हा मराठी लिपीशी निगडित प्रकल्प आहे. पार्ले टिळकच्या इंग्रजी व मराठी माध्यमातील शिक्षकांची त्यासाठी मदत झाली. सामान्य शाळांमधील गतीमंद मुलांसाठी हा प्रकल्प आहे. त्यांना अक्षरओळख व्हावी, हा उद्देश होता. मराठीत या संदर्भात फार कमी पुस्तकं किंवा खेळ आहेत. मुलांची हसतखेळत अक्षरमैत्री होण्यासाठी त्यात जवळपास १६ खेळ निर्माण केले असून, त्याची थीम जंगल ही होती. माझ्याच शाळेत हा प्रकल्प करण्याची संधी मिळाल्यानं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सध्या या विषयावर पेपर लिहिणं सुरू आहे.

सिद्धेशला काही डिझाइन कॉन्फरन्सना हजर राहायची संधी मिळाली आहे. टायपो डेनिमित्ताने बंगलोरच्या ‘इंटरनॅशनल टायपो कॉन्फरन्स’मध्ये तो गेल्या वर्षी विद्यार्थी वक्ता म्हणून सहभागी झाला होता. तिथं त्यानं ब्रेल प्रकल्पाचा पेपर वाचला होता. टायपोग्राफीतील जगभरची तज्ज्ञमंडळी तिथं उपस्थित होती. प्रा. समीप सावंत आणि प्रा. संतोष क्षीरसागर यांच्यासमोर पेपर वाचण्याचा खूपच छान अनुभव होता. एक अभिमानाचा आणि हृदयस्पर्शी क्षण होता तो त्याच्यासाठी.. त्याच्या ब्रेल लिपीशी निगडित प्रकल्पाची ठिकठिकाणी दखल घेतली गेली. यंदा आयआयटी गुवाहाटीमधल्या परिषदेत तो स्पीकर प्रेझेंटर आणि पोस्टर डिस्प्ले म्हणून गेला होता. ैकउफऊ1७ैच्या प्रकाशनात त्याच्या पेपरची नोंद घेतली गेली. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंजिनीअरिंग रिसर्च अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’च्या अंकात त्याचा पेपर प्रसिद्ध झाला आहे. आता तो औरंगाबादला इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इंटेलिजण्ट सिस्टिस्म अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशनमध्ये पेपर वाचणार आहे. सध्या गोष्टींची पुस्तकं ब्रेलमध्ये करण्याचं काम सुरू आहे.

सिद्धेशच्या मते, कला ही प्रत्येकाचं वैयक्तिक अवकाश किंवा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. मला आवडणारी गोष्ट, दुसऱ्या व्यक्तीला आवडावीच असं नाही. माझी चित्रं ही अधिकांश इंडियन मिनिएचरवरील आहेत. भारतीय पारंपरिक शैलीवर माझा भर आहे. मात्र मी वेगवेगळे विषय हाताळतो आहे. मात्र एकच एक शैली अंगीकारत नाही, कारण मग त्याच शैलीत काम करायचं बंधन येतं. मी भारतीय रंगशैलीत काम करतो. अनेकदा चित्र उत्स्फूर्तपणे काढलं जातं. मात्र कमर्शिअलचा असल्यानं माझी विचारप्रक्रिया थोडी वेगळी आहे. मला काय काढायचं आहे, ते ठरवून कामाला सुरुवात करतो. भारतीय स्त्रिया, फुलं-पानं-पक्षी, भारतीय देव-देवतांवर भर देतो. नेहरू सेंटरमधल्या अलीकडच्या प्रदर्शनात फक्त देवांच्या वाहनांवर मी भर दिला होता. देव कुठेच दाखवले नाहीत. भारतीय संस्कृती नि परंपरादर्शक चित्रांचं काम करतो आहे. ठरावीक चौकटीबाहेरचा विचार करण्याचा प्रयत्न करतो आहे.

तो कॉलेजला असताना तिसऱ्या वर्षांतलं पहिलंवहिलं प्रदर्शन मांडताना तिथे ज्येष्ठ चित्रकार दत्तात्रय पाडेकर आले होते. प्रदर्शनात फेरी मारून ते म्हणाले की, ‘कामात गोडवा आहे.’ त्यांचा हा अभिप्राय खूप मोलाचा होता. त्यामुळं एक प्रकारे प्रोत्साहनच मिळालं. यापुढे त्याला आर्ट प्लाझा आणि जहांगीरमध्ये एकल प्रदर्शन भरवायचं आहे. कला महाविद्यालयात प्राध्यापक होऊन पीएचडी करायची आहे. तो म्हणतो. शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरूच राहाते. मला कायम विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहायचं आहे. कारण शिकायची उमेद संपल्यावर व्यक्तीचे कलाविचारही थबकून राहतात. कलाक्षेत्रातील त्याच्या मुशाफिरीसाठी त्याला रंगमयी शुभेच्छा.

viva@expressindia.com

First Published on August 11, 2017 1:25 am

Web Title: article on siddhesh shirsekar typography calligraphy