26 March 2019

News Flash

ब्रॅण्डनामा : स्टेफ्री

आजही भारतासारख्या देशात सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी चळवळ करावी लागते. त्या

हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

प्रत्येक ब्रॅण्डची कहाणी वेगळी असते. प्रतिष्ठा, उपयोग यापलीकडे काही ब्रॅण्ड म्हणजे एक सुरुवात असते. एका सवयीची सुरुवात. अधिक चांगल्या आयुष्याची सुरुवात. स्त्रीच्या मासिक धर्मात अनेक किचकट कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टी सुकर करणारा ब्रॅण्ड म्हणजे ‘स्टेफ्री’. सॅनिटरी पॅडच्या जगातलं हे परिचित नाव इतकंच त्याचं महत्त्व नाही तर त्यापलीकडे काही गोष्टी पहिल्यावहिल्याने करण्यात स्टेफ्रीचं योगदान मोठं आहे.

आजही भारतासारख्या देशात सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी चळवळ करावी लागते. त्याचा वापर पटवून द्यावा लागतो. पाश्चात्त्य जगतात मात्र या पर्वाची सुरुवात फार आधी झाली होती. औद्योगिक क्रांती ही अनेक नव्या गोष्टींची सुरुवात ठरली. त्यात सॅनिटरी नॅपकिनचा वापरही अंतर्भूत करता येतो. वस्तूंचं मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू झालं. पुरुष वर्गाबरोबरच स्त्रियाही कारखान्यात काम करायला बाहेर पडू लागल्या आणि चार भिंतींत जो मासिक धर्म गुपचूप पार पडायचा त्याच्यासह सार्वजनिक जीवनात वावरताना स्त्रियांना अधिक सोयीच्या गोष्टींची गरज भासू लागली. १८९६ मध्ये अमेरिकेत व्यावसायिक पातळीवर सॅनिटरी नॅपकिन उत्पादन सुरू झालं. पण त्याचं स्वरूप धुऊन पुनर्वापर करता येणारं पॅड असं होतं. त्याला पट्टाही असायचा. १९२६ मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने या व्यवसायात उडी घेतली. कोटेक्सची सॅनिटरी नॅपकिन त्या काळी परिचित होती. या ब्रॅण्डला टक्कर देण्यासाठी तयार होताना आधी कंपनीने एक सव्‍‌र्हे केला. कशा प्रकारची सॅनिटरी नॅपकिन स्त्रियांना आवडतील याचा वेध या सव्‍‌र्हेमध्ये घेतला गेला होता. तो अहवाल प्रसिद्ध केला गेला त्याचा ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीलाच नाही तर एकूणच स्त्री आरोग्य या विषयासाठी फायदा झाला. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीच्या या सॅनिटरी पॅडचं नाव होतं ‘मॉडेस’ तो काळ असा होता जिथे मासिकपाळीबद्दल बोलणंही निषिद्ध मानलं जाई, त्यामुळे स्त्रिया दुकानात जाऊन सॅनिटरी पॅडची मागणी करणं महाकठीण काम. १९२८ मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने यासाठी अशी युक्ती केली की वर्तमानपत्रात मॉडेसचं कूपन छापून येई. जेणेकरून स्त्रिया दुकानात जाऊन कूपन दाखवून पॅड विकत घेतील. त्यांना ते तोंडी मागावं लागणार नाही. केवढा दिलासा!! या युक्तीमुळे निश्चितच पॅडचा खप वाढला. सॅनिटरी पॅडची जाहिरात पाहणंही त्याकाळी अवघडलेपणाचं होतं. त्यासाठी ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने केलेली जाहिरात कल्पक होती. आर्ट म्युझियम, राजवाडे इथे उभ्या असलेल्या नामांकित मॉडेल्सचं अत्यंत मोठय़ा फोटोग्राफरकडून छायाचित्रण करण्यात आलं. खाली फक्त एक ओळ. ‘मॉडेस..बिकॉज’. तिचं अवघडलेपण दोन शब्दांत व्यक्त झालं. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीचा हा ब्रॅण्ड रुजला.

आणि ही सारी पूर्वपुण्याई घेऊ न १९७० मध्ये ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने आणलेला ब्रॅण्ड म्हणजे स्टेफ्री. हा जगातील पहिला ब्रॅण्ड ज्याने सॅनिटरी पॅडला पट्टय़ांच्या गुंत्यातून मोकळं केलं. विशिष्ट गोंदाचा वापर करून पॅड अंतर्वस्त्राला चिकटून ठेवण्याच्या या प्रयोगामुळे मासिक पाळी आणि सोबत येणारी चिडचिड खूपशी सुसह्य झाली. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीचा हा ब्रॅण्ड खूप यशस्वी ठरला. स्टेफ्रीचा फुलपाखराचा लोगो खूप काही सांगून जातो. मासिक पाळीच्या दिवसात स्वत:भोवती कोष विणून सगळ्यांपासून वेगळं, अलग राहण्याचे दिवस संपले असाच संदेश ते स्वच्छंदी फुलपाखरू देतं. ‘अब वक्त है बदलनेका’ ही टॅगलाइन तितकीच महत्त्वाची. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ कंपनीने आपला संपूर्ण वुमेन्स सॅनिटरी विभाग ‘एनर्जायझर’ कंपनीला सध्या विकला आहे, पण या कंपनीचा या क्षेत्रातील इतक्या वर्षांचा अनुभव अजूनही ब्रॅण्डशी जोडलेला आहे. या ब्रॅण्डच्या साइटवर गेलात तर स्त्रियांना मासिक पाळी काळात येणाऱ्या अडचणी, त्यांच्या सूचना इतक्या वर्षांनंतरही या ब्रॅण्डला जाणून घ्यायच्या आहेत. याच ब्रॅण्डने काही वर्षांपूर्वी सॅनिटरी नॅपकिन, स्त्री आरोग्य याबाबत मुलींमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने तळागाळातील मुली जिथं शिकतात अशा शाळांत मोफत सॅनिटरी पॅड वाटप केलं होतं.

सध्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या अगदी स्वस्त सॅनिटरी नॅपकिनविषयी खूप लिहिलं बोललं जातं आहे. ‘पॅडमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या कामाची चर्चा आहे. या साऱ्या गोष्टी मोठं परिवर्तन दाखवतात. कुजबुजत बोलल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडपासून आज मॉलमध्ये इतर सामानासह सहज उचलल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडपर्यंतचा हा प्रवास आश्वासक आहे.

या प्रवासाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील साक्षीदार म्हणजे स्टेफ्री. महिला दिवस आणि संबंधित बातम्यांमध्ये स्त्रीवरील बंधनांची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत असताना दिसते. मासिक पाळी काळात निसर्गत: घडणाऱ्या एका सहज क्रियेचा वापर करून समाजाने स्त्रीसाठी एक नवं बंधन तयार केलं. ही साखळी तोडून बंधमुक्त हो असं आश्वस्त करणारा आणि तिला ‘बाहेरची’ होण्यापासून वाचवणारा हा ब्रॅण्ड अनेकजणींना दिलासा देतो.. स्टेफ्री!

viva@expressindia.com

First Published on March 9, 2018 12:34 am

Web Title: article on stayfree brand sanitary napkins