मितेश जोशी

उन्हाळा हा ऋतू जरी सर्वसामान्य असला तरी तो प्रत्येक शहरात वेगवेगळ्या नजरेने बघितला जातो. मुंबईचा उन्हाळा म्हणजे घामट उन्हाळा. पुण्याचा उन्हाळा म्हणजे वाफा मारणारा पण रात्री गारवा देणारा उन्हाळा. तर कोकणातला उन्हाळा म्हणजे सुट्टीसाठी गावी रहायला गेलो आणि काळा होऊन परत आलो, अशी गमतीशीर टीका झेलणारा. उन्हाळ्याच्या अशा ‘व्याख्या’ शहरपरत्वे तरुणाईत प्रसिद्ध आहे. शहर कोणतंही असो, उन्हाळा म्हटलं की जिभेला व घशाला थंडगार अनुभूती देणारं ‘पेय’ हे हवंच! त्यासाठीच या खास पाककृती..

बनाना वॉलनट पॅनाकोट्टा

  • साहित्य : २ कप दही; १ केळं; १-२ चमचे मध; ४-५ अक्रोड; २ चमचे साखर; केशर, बदाम – सजावटीसाठी
  • कृती : मिक्सरमध्ये दही, केळे, मध, अक्रोड आणि साखर घालून फिरवून घ्या. क्रिमी मिश्रण होईपर्यंत फिरवा. मिश्रण जास्त पातळ किंवा एकदम घट्ट नको. तयार मिश्रण ग्लासमध्ये काढून त्यावर कापलेले बदाम व केशर काडय़ा घालून सजवा. थंडाव्यासाठी पॅनाकोट्टा फ्रीजमध्ये तासभर ठेवून सव्‍‌र्ह करा.

टोमॅटो गाजर स्मूदि

  • साहित्य : अर्धा किलो लाल गाजर; पाव किलो टोमॅटो; चिमूटभर मीठ; १ चमचा मध; साखर (चवीनुसार)
  • कृती : गाजर सोलून स्वच्छ धुऊ न त्याचे लहान तुकडे करा. तसेच तुकडे टोमॅटोचेही करा. मिक्सरमध्ये गाजराचे व टोमॅटोचे तुकडे  फिरवून त्याचा रस करा. त्यानंतर तयार मिश्रण थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात थोडं मीठ, मध आणि चवीनुसार साखर घालून ढवळून घ्या आणि सव्‍‌र्ह करा टोमॅटो गाजर स्मूदि.

स्ट्रॉबेरी लेमोनेड

  • साहित्य : दीड कप धुऊ न कापलेली स्ट्रॉबेरीचे तुकडे; ताज्या लिंबाचा रस (अंदाजे ५ लिंबं); १ कप साखर; ३ कप पाणी; मीठ चिमूटभर
  • कृती : स्ट्रॉबेरीचे देठ कापून, साखर, लिंबू रस आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सर मधून पेस्ट करून घ्यावी. एका मोठय़ा मेटलच्या गाळणीने हा रस गळून घ्यावा. गाळलेल्या रसात बाकीचे पाणी आणि चिमूटभर मीठ घालून नीट मिक्स करा. ग्लासात बर्फाचे खडे टाकून तयार स्ट्रॉबेरी लेमोनेड सव्‍‌र्ह करा.

फ्रुट सॅलड स्मूदि

  • साहित्य : सफरचंद, केळं, स्ट्रॉबेरी,ऑरेंज – १ कप; व्हॅनिला आईस्क्रीम – २ स्कुप; मध – २ चमचे; बर्फाचे तुकडे – आवश्यकतेनुसार
  • कृती : सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवा व काचेच्या ग्लासमध्ये फ्रुट सॅलड स्मूदि सव्‍‌र्ह करा.

कलिंगड डिलाइट

  • साहित्य : कलिंगड – १; साखर – १ चमचा; मिरी पूड
  • कृती : एक संपूर्ण कलिंगड चिरून त्याचे बारीक तुकडे करा. कलिंगडाच्या जितक्या बिया काढत्या येतील तितक्या बिया बाजूला काढा. मिक्सरमधून कलिंगडाचे तुकडे बारीक करा. त्यानंतर त्यात १ चमचा साखर घालून मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवा. तयार द्रव्य काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्या. आवडीनुसार त्यात मिरीपूड घाला व सव्‍‌र्ह करा कलिंगड डिलाइट !

गारेगार संजीवनी किंवा पालक पुदिना स्मूदि

  • साहित्य : पालक पाने ५; पुदीना पाने १०; विडयाचे पान २; कढीपत्याची पाने ५; आवळा ज्यूस १ लहान चमचा; आले १/२ इंच; लिंबाचा रस १ चमचा; संत्र १; पाणी १ ग्लास; दालचिनी पावडर १ चमचा; सैंधव मीठ १ चमचा; काळी मिरी पावडर १चमचा; काळे मीठ १चमचा
  • कृती : सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकत्र करा. त्यात १ ग्लास पाणी टाकून चांगले एकजीव करुन घ्या व सव्‍‌र्ह करा गारेगार संजीवनी !

viva@expressindia.com