स्वाती छत्रपती

आपण आयुष्यात कोणत्या गोष्टींची निवड करतो, कोणता मार्ग निवडतो यामागे एखाद्या गोष्टीविषयी असलेलं आकर्षण आणि त्याविषयीची आवडच कारणीभूत असते. ‘आवड असली की सवड मिळते’ ते म्हणतात ना ते खरंच आहे, असं उगाचच वाटू लागतं. पण, खरंच प्रत्येकाच्या आयुष्यात आवडीच्या या नावाखाली एक तरी अशी गोष्ट असते, ज्यामुळे खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला समाजात ओळखही मिळते. आपल्या आवडीच्या मार्गावर धावतं झालेलं असंच एक नाव म्हणजे स्वाती छत्रपती. ट्रेकिंग, ट्रॅव्हल ब्लॉगिंग या गोष्टींबद्दल गेल्या काही दिवसांपासून बरंच बोललं आणि लिहिलं जात आहे. या विश्वात एक लोकप्रिय नाव म्हणजे ‘इंडिया हाइक्स’.

ट्रेकिंग आणि ‘इंडिया हाइक्स’ हे अनेक तरुणतरुणींच्या आवडीचं समीकरण आहे. मुख्य म्हणजे ‘इंडिया हाइक्स’च्या या विस्तीर्ण आभाळत उडणारा एक स्वच्छंद पक्षी म्हणजे स्वाती. संपादक, सूत्रसंचालक, ट्रेकर, पर्यटक, पत्रकार अशी वेगवेगळी ओळख असणारी स्वाती सध्या तिच्या व्हिडीओ आणि ‘इंडिया हाइक्स’मध्ये असलेल्या योगदानामुळे ओळखली जाते. साधारण, शालेय जीवन पूर्ण होत असताना म्हणजेच वयाच्या १७ व्या वर्षांपासून तिला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. मग काय, आवड आणि सवड अशा दोन्ही गोष्टींचा तिने योग्य तो मेळ तिने साधला आणि भारतातील पश्चिम घाटमाध्यांवर ट्रेकिंग करायला सुरुवात केली. दोन वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर तिने ‘इंडिया हाइक्स’कडे आपला मोर्चा वळवला. मुद्रित पत्रकारिता आणि डिजिटल माध्यम या दोन्ही गोष्टींमध्ये मेळ साधण्यासाठी स्वातीला बऱ्याच अडचणींचा सामनाही करावा लागला. पण, त्या अडचणींवरही मात करीत तिने मोठय़ा जिद्दीने या क्षेत्रात नावलौकिक मिळवलं. ‘इंडिया हाइक्स’च्या निमित्ताने स्वातीमध्ये दडलेली लेखिका नव्याने तिला गवसली. त्याशिवाय यूटय़ूब चॅनलच्या नव्या संकल्पनेअंतर्गत तिने स्वत:च्या अंगी सूत्रसंचालनाचं कौशल्यही बाणवलं. या सगळ्या प्रक्रियेबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘साधारण एक-दीड वर्षांपर्यंत कॅमेऱ्याला कसं तोंड द्यायचं, त्यापुढे कसं बोलायचं या गोष्टींविषयी माझ्या मनात प्रचंड न्यूनगंड होता. बऱ्याच प्रश्नांनी डोक्यात काहूर माजलं होतं. पण, माझ्या वाटय़ाला आलेली ही महत्त्वाची संधी मला काही केल्या जाऊ  द्यायची नव्हती. त्यामुळे जिद्दीने मी हे आव्हान पेललं. एकेक गोष्ट हळूहळू शिकत गेले, आत्मसात करत गेले,’ असं ती म्हणते. प्रयत्नांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळतंच यावर विश्वास असलेल्या स्वातीने प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही गोष्टी मिळवायच्या असतात, ध्येय पूर्ण करायची असतात. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी त्यामागे प्रचंड जिद्द आणि चिकाटी त्यासोबतच समर्पक वृत्तीने त्या गोष्टीत स्वत:ला झोकून देण्याची गरज असते. त्यामुळे तुम्ही सहजासहजी यशस्वी व्हाल अशी अपेक्षाच करू नका, असा सल्ला ध्येयवेडय़ा तरुणाईला दिला आहे.

viva@expressindia.com