18 January 2019

News Flash

‘जग’ते रहो : मनमिळाऊ व्हिएतनामी

‘व्हिएतनाम वॉर’ हे प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपानबरोबर सुरू होते आणि अजूनही काही देशांसोबत युद्ध सुरू आहे.

अनुजा सबनीस हिंगे हानोई, व्हिएतनाम.

‘व्हिएतनाम’ हा आशिया खंडातील एक छोटासा देश. अनेक चित्रपटप्रेमींना त्याचं प्रसिद्ध कलाकार रॉबिन विलियम्स यांच्या ‘गुड मॉìनग व्हिएतनाम’ या चित्रपटामुळे हा देश परिचित असेल. मुंबईच्या नकाशासारखा हा देश उभा पसरलेला आहे. त्याच्या उत्तरेला चीन, पश्चिमेला लाओस व कंबोडिया आहेत. दक्षिणेला ‘गल्फ ऑफ थायलंड’ आणि पूर्वेला दक्षिण चीनचा समुद्र आहे. व्हिएतनाम प्रामुख्याने उत्तर व दक्षिण व्हिएतनाम असा विभागलेला आहे. साइगॉन (सध्याचं नाव हो चि मिन्ह) ही व्हिएतनामची राजधानी होती, पण १९७६मध्ये हानोईला राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं.

‘व्हिएतनाम वॉर’ हे प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपानबरोबर सुरू होते आणि अजूनही काही देशांसोबत युद्ध सुरू आहे. या युद्धात उत्तर व दक्षिण व्हिएतनाम विभागले गेले होते. त्यावेळी हो चि मिन्ह यांनी दोहोंना एकत्रित आणून हे युद्ध १९७५मध्ये संपवलं. त्यामुळे त्यांना व्हिएतनाममध्ये महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं. तिथली जनता त्यांची एखाद्या राजासमान पूजा करते. प्रत्येक नोटेवर त्यांचा फोटो दिसतो. त्यांचं शव रशियन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जतन करून ठेवण्यात आलं आहे. ते हानोईमधील ‘हे चि मिन्ह माझोलियम’ या ठिकाणी आजही पाहायला मिळतं. लोक नियमितपणे त्यांचं दर्शन घेतात आणि तेव्हा त्यांचे डोळे पाण्यावल्यावाचून राहात नाहीत. मुलांना लहानपणापासूनच हो चि मिन्ह यांच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे तेथील तरुणाईलाही त्यांच्याविषयी विशेष आदर वाटतो.

गेले वर्षभर मी पुण्याला स्थायिक झाले आहे, पण व्हिएतनाममधले दिवस अगदी लख्ख आठवताहेत. मी हानोईमध्ये ‘प्रोजेक्ट्स अ‍ॅब्रॉड’ यां कंपनीसाठी इंटरनॅशनल व्हॉलेंटिअर्स कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. जगभरातील विविध देशांतून येणाऱ्या व्हॉलेंटिअर्सना बेसिक भाषा शिकवणं, संस्कृती व शहराविषयी माहिती देणं हा माझ्या कामाचा भाग असल्यामुळे एकाच आठवडय़ात मी थोडीफार व्हिएतनामीज भाषा बोलू लागले आणि हानोई हे आपलंच शहर असल्यासारखं वाटू लागलं. आमची टीम एकत्र काम करताना अनेकदा पर्यटनाच्या अनुभवांची देवाणघेवाण होते. त्यांचं पर्यटन म्हणजे एखाद्या ट्रॅव्हल कंपनीसोबत फिरणं नसतं. ते बॅगपॅकिंग करतात आणि प्रवासाच्या अनुभवांची शिदोरी गाठीशी बांधतात. जवळपास सगळेच वर्षभर पैसे साठवून मग प्रवासाला निघतात आणि एकापाठोपाठ एक असे कमीत कमी ३ ते ४ देश फिरतात. टीममध्ये भारतीय असल्याचं कळल्यावर आम्हाला खूप आदर मिळाला होता. त्यांना आपली संस्कृती, आपलं भाषावैविध्य याविषयी कुतूहल वाटतं. तसंच प्रत्येक देशातल्या आर्थिक, राजकीय परिस्थितीवर चर्चा आणि तुलनाही होते.

तिथे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. पुरुषांपेक्षा विविध क्षेत्रांत तरुणी कार्यरत असलेल्या आढळून येतात. तरुणाईला शिक्षणाचे महत्त्व कळत असून त्यामुळे त्यांना मोठय़ा कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. माझ्या माहितीतला काही तरुणवर्ग समाजसेवेकडेही वळलेला दिसतो. काही अंध मुलांसाठी, काहीजण वेश्या व त्यांच्या मुलांसाठी काम करणारे आहेत. आमची संस्था अनाथलयासाठीही काम करते. सध्या बऱ्याचजणांना अर्थशास्त्राची विशेष गोडी वाटू लागली आहे.

व्हिएतनाममध्ये अनेक परदेशी माणसांनी व्यवसाय सुरू केलेले दिसतात. विशेषत: हानोईमधल्या ‘वेस्ट लेक’ या खूप मोठय़ा तलावाभोवती त्यांनी अनेक कॉफी शॉप्स, रेस्तराँ आणि बार्स सुरू केले आहेत. हानोईमधल्या तरुण मुलींना रोजच छान कपडे घालून, नटूनथटून बाहेर पडायला आवडतं. त्या सगळ्याच देखण्या आणि सडपातळ बांध्याच्या असल्यानं त्यांना ते शोभून दिसतं. व्हिएतनाममध्ये क्वचितच कुणी लठ्ठ दिसेल. खरं तर आजूबाजूच्या देशांप्रमाणे तिथले लोकही कुत्रा, डुक्कर, साप, ससा, बेडूक, कबूतर इत्यादी अनेक प्राणी खातात. पण त्याचबरोबर भात, पालेभाज्या हे त्यांच्या रोजच्या आहारातील अविभाज्य घटक आहेत. त्यामुळेच बहुधा त्यांची पचनशक्ती दांडगी आहे. स्ट्रीटसाईड फूड स्वस्त असल्याने तरुणाई बाहेरचं जास्त खाते. तरीही त्यांचं स्थानिक अन्नही ते खातात. पिझ्झा, बर्गर खाणारं कुणीच दिसत नाही. या स्ट्रीटसाईड रेस्तरॉमध्ये बसायला एक फुटी प्लॅस्टिक स्टूल्स असतात. आमच्या परदेशी व्हॉलेंटिअर्सना त्यावर बसताना कसरत करताना पाहून मला गंमत वाटायची. मी स्वत: शाकाहारी आहे. कामानिमित्त जर्मनीत एक वर्ष राहिले होते, तेव्हा चीज, ब्रेड खाऊन ५ किलो वजन वाढलं होतं. ते व्हिएतनाममध्ये भात-पालक खाऊ न सहा महिन्यांत कमी झालं.

तिथल्या लोकांना व्यायाम व खेळांचीही आवड आहे. बऱ्याच शहरांत पहाटे ४ वाजल्यापासून तरुण, वृद्ध सायकल चालवताना, जॉगिंग करताना, विविध व्यायामप्रकार करताना, लेकच्या बाजूला झुंबा करताना दिसतात. संध्याकाळीदेखील हेच दृश्य दिसतं. शनिवार-रविवारी हानोईतील ‘होईन कीम लेक’ भोवतालचे रस्ते वाहनांसाठी चक्क बंद असतात. या दोन्ही दिवशी अनेकजण मुलाबाळांसकट तिथे दिसतात. गायन, नृत्य, वाद्यवादन, विविध प्रकारचे खेळ खेळणं असं अगदी उत्फुल्ल आणि आनंदी वातावरण असतं. तरुण मुलींना सेल्फी काढायला खूप आवडतं. मात्र लहान मुलांच्या हातात मोबाइल नसून खेळणी पाहून मनाला दिलासा वाटतो. एकूणात तिथे फिटनेसला महत्त्व असून आरोग्यपूर्ण जीवनशैली दिसून येते.

अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरणाऱ्या वाहतुकीची कोंडी हानोई व हो चि मिन्ह सिटीसारख्या मोठय़ा शहरांत दिसून येते. नागरिक बहुतांशी नियमांचे पालन करताना दिसतात. दुचाकी हेल्मेट घालून चालवणं, सिग्नलला थांबणं, नो एन्ट्रीमध्ये न जाणं, हॉर्नचा कमीत कमी वापर करणं त्यांना जमतं. रस्त्यांवर कुठेही पार्क केलेल्या गाडय़ा दिसत नाहीत. बहुतेक घरांमध्ये तळमजला हा निम्मे गॅरेज आणि निम्मे स्वयंपाकघर असा असतो. दुचाकी वाहनं घरात पार्क केलेली दिसतात. परदेशी लोकांना ट्रॅफिक पोलीस क्वचितच हटकतात. कारण त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. तिथे चारचाकी आणि दुचाकी प्रचंड प्रमाणात दिसतात. मीही तिथेच दुचाकी चालवायला शिकले. वाहनांची कोंडी असूनही रस्ता ओलांडताना कुणी दिसल्यास त्याला वळसा घालून ट्रॅफिक सुरळित सुरू असतं. व्हिएतनाम हा विकसनशील देश असला तरी गेल्या १०-१५ वर्षांत तिथे खूप विकास झालेला आहे. अलीकडे पर्यटनात खूप प्रगती झाली आहे. अनेक तरुणांनी स्वत:ची टुरिस्ट ऑफिसेस थाटली आहेत. २,२५०,००० डाँग्सना (६०००रु.) ३-४ दिवसांच्या टूर्स बुक करता येतात. एक रुपया म्हणजे ३४८ डाँग्स. एरवी जे होणं अशक्यप्राय होतं ते माझ्याबाबतीत झालं व्हिएतनाममध्ये. मी मिलेनिअर असल्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

तिथं फिरायला खूप छान ठिकाणं आहेत. दक्षिण चीन समुद्रातील ‘हा लाँग बे’ हे युनेस्को प्रमाणित जगप्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे जवळपास २००० डोंगरांची शिखरं समुद्रात दिसतात. या शिखरांमधून बोटीने फिरता येतं. तसंच आजूबाजूला निळं-हिरवं पाणी आणि त्यातली ही शिखरं पाहत आपण हाऊ सबोटवर राहू शकतो. डोंगरातील कल्पनातीत मोठय़ा गुंफा, कयाकिंग, ‘टी टॉप’ आयलंडवरील व्ह्य़ू पॉइंट, पर्ल फार्म अशा बऱ्याच गोष्टी एन्जॉय करता येतात. उत्तरेला चीनच्या सीमेजवळ असलेला ‘सा पा’ डोंगर हे आणखी एक सुंदर ठिकाण आहे. तिथे आदिवासी जमाती राहतात. २०-२५ वर्षांच्या मुली टूर गाईड म्हणून आपल्याला डोंगरात ट्रेकिंगला घेऊ न जातात. नदी, डोंगर, भाताची शेती, निळंशार आकाश पाहात आपण १०-१२ किलोमीटर कधी चालतो ते कळतच नाही. या मुली त्यांच्या ४-५ महिन्यांच्या बाळांना पाठीवर घेऊन डोंगर पार करतात. त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व पाहून खूप कौतुक वाटतं. या ठिकाणी पुरुष काम करत नसून स्त्रियाच आपल्या कुटुंबाची काळजी घेतात. ‘हुए’, ‘हो यान’, ‘निन बिन्ह’, ‘दा नांग’, ‘न्या चांग’ अशी समुद्रकिनारी वसलेली खूप प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. त्यातील ‘होयान’ व्हिएतनामीज तसंच परदेशी लोकांचे प्रिय असून कंदिलांच्या माळांनी सजलेल्या नाईट मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. ‘न्या चांग’ हे कोरल्ससाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेला समुद्रात ‘फु कुऑक आयलंड’ डायविंग, स्नॉर्केलिंगसाठी प्रसिद्ध आहे. तिथे पॅगोडा खूप असून कोणताच धर्म न मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यानंतर बुद्धिस्ट आणि ख्रिश्चन धर्मीय आहेत.

मी समाजसेवेच्या क्षेत्रातील कामानिमित्ताने जर्मनी, फिलीपिन्स, कंबोडिया देशांत राहिले असूनही व्हिएतनाम फार आपलंसं वाटलं, ते तिथलं आरोग्य, संस्कृती जपणाऱ्या हो चि मिन्हसारख्या महापुरुषांचा अत्यंत आदर बाळगणाऱ्या मनमिळाऊ लोकांमुळेच. मागच्याच महिन्यात माझा नवरा गौरव आणि मी व्हिएतनामला माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलो होतो. तेव्हा हानोईमध्ये फिरताना सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि मन भरून आलं होतं.. या लेखाच्या निमित्ताने व्हिएतनामच्या आठवणींची पुन्हा मनसफर घडली..

viva@expressindia.com

First Published on May 11, 2018 12:36 am

Web Title: article on vietnam