25 September 2020

News Flash

आठवणींची साठवण

डिजिटल रिव्हॉल्यूशनमुळे डीएसएलआरस् मार्केटमध्ये आले आणि मर्यादित फोटोंचं बंधन राहिलं नाही.

लग्नसराईच्या हंगामानिमित्त विशेष लेख. आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीतले अविस्मरणीय क्षण कैद करून ठेवणारी वेडिंग  फोटोग्राफर सांगतेय सध्याच्या लेटेस्ट वेडिंग फोटो ट्रेण्डविषयी..

लग्न! प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट. तिचा प्रत्येक क्षण खास असतो. प्रत्येक क्षण कैद करून ठेवावासा वाटतो. हेच काम करतात ‘वेडिंग फोटोग्राफर्स’. पूर्वी ही संधी फक्त राजेरजवाडे किंवा धनिक लोकांनाच उपलब्ध होती. कारण त्या वेळी चित्रकार असे प्रसंग आपल्या कुंचल्यांनी रेखाटायचे. पण १५० वर्षांपूवीं कॅमेराचा शोध लागला आणि एखादा प्रसंग छायाचित्राच्या स्वरूपात बांधून ठेवणे सहज शक्य झाले.

गेल्या काही दशकांपर्यंत ही वेडिंग फोटोग्राफी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध गोष्ट नव्हती. २०१०नंतर एसएलआर कॅमेरे सहज उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे वेडिंग फोटोग्राफी हा लग्नाचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग बनला.  सुरुवातीला रीळच्या मर्यादेमुळे वेडिंग फोटोग्राफी ही ट्रॅडिशनल किंवा पोझ्ड असायची त्यामध्ये फारसा वेगळेपणा नसायचा. म्हणजे दोन लग्नांच्या वेडिंग आल्बममध्ये फक्त नवरा, नवरी आणि नातेवाईकांचे चेहरे वेगळे असायचे बाकी पोझेस सगळ्या सारख्याच! त्यामुळे रचनात्मकतेला जास्त वाव  नसायचा. डिजिटल रिव्हॉल्यूशनमुळे डीएसएलआरस् मार्केटमध्ये आले आणि मर्यादित फोटोंचं बंधन राहिलं नाही. डीएसएलआरमुळे वेडिंग फोटोग्राफीमध्ये एक क्रांतीच झाली. डीएसएलआरस्मुळे वेस्टर्न वेडिंग फोटोग्राफीमध्ये कॅण्डिड फोटोग्राफीचा एक ट्रेण्ड  सुरू झाला. आणि इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे तो इंडियन वेडिंग फोटोग्राफीमध्येही लोकप्रिय झाला. मुक्त अर्थव्यवस्था आणि हिंदी चित्रपटांचा प्रभाव यामुळे सेलिब्रेशनची पद्धत बदलली. तामझाम वाढला. रूढी- परंपरा जपत एन्जॉय करणंही वाढलं आणि डिजिटल क्रांतीमुळे, हे सगळे क्षण फ्रेममध्ये कॅप्चर करण सोपं होत गेलं. वेडिंग फोटोग्राफी जास्तीतजास्त ब्राइड आणि ग्रूम ओरिएंटेड बनली आहे, हे खरं; पण यात फॅमिलीचं महत्त्व कुठेही कमी झालेलं नाही.

वेडिंग फोटोग्राफीमध्ये सध्या बरेच नवीन ट्रेण्ड्स आले आहेत. ट्रॅडिशनल फोटोग्राफीबरोबर आता कॅण्डिड फोटोग्राफी ही हवीच असते. व्हिडीओग्राफीमध्येही आता फक्त व्हिडीओ शूट नाही होत. त्यामध्येही सिनेमॅटिक व्हिडीओचा ट्रेण्ड आला आहे. ट्रॅडिशनल व्हिडीओग्राफीमध्ये एक व्हिडीओग्राफर सगळा लग्नसोहळा कव्हर करू शकत होता. सिनेमॅटिक व्हिडीओसाठी दोन किंवा जास्त व्हिडीओग्राफर्सची गरज असते. सिनेमॅटिक व्हिडीओ असो किंवा फोटोग्राफी, आकर्षक बनवण्यासाठी एडिटिंगचा खूप मोठा भाग असतो.

लग्नाच्याच फोटोग्राफीचा भाग म्हणून प्रीवेडिंग शूटही हल्ली हौसेने केलं जातं. हे सध्या फार लोकप्रिय होऊ लागलं आहे. यामध्ये ब्राइड  आणि ग्रूम एकमेकांसोबत काही छान रोमँटिक पोझेसमध्ये फोटो शूट करतात. प्रीवेडिंग व्हिडीओ शूटमध्ये सिनेमॅटोग्राफीसाठी ब्राइड आणि ग्रूमचा एखाद्या बॉलीवूडच्या गाण्यावर डान्सही कोरिओग्राफ केला जातो. प्रीवेडिंग शूट हे हल्ली जवळजवळ कम्पल्सरी झालेलं आहे.

नव्या नवरीचं ते लाजणं, मुरडणं, तिच्या हालचालीमधून तिच्या व्यक्त होणाऱ्या भावना कॅमेरामधून कॅप्चर करणं ही फोटोग्राफर्ससाठी एक पर्वणीच असते. तरीही आता ब्राइड्समध्ये मोकळेपणा आला आहे. लव्ह मॅरेजेसची संख्याही वाढते आहे. त्यामुळे लग्नाआधीच ब्राइड आणि ग्रूम चांगली मैत्री असते. त्यांच्या नात्यामध्ये मोकळेपणा असतो. एकमेकांबद्दलचं अ‍ॅफेक्शन कॅमेरामध्ये कॅप्चर करणं फार सोपं झालं आहे. त्यामुळे प्रीवेडिंग शूटमध्ये फार सुंदर क्षण, कॅण्डिड मोमेंट्स पकडता येतात. लग्न समारंभ चालू असताना, प्रीवेडिंग शूटचे काही सिलेक्टेड फोटो एडिट करून प्रोजेक्टरवर त्यांचा स्लाइड शो केला जाते. त्यामुळे सध्या प्रोजेक्टर किंवा एलईडी स्क्रीन लावणं हाही एक ट्रेण्ड आहे. त्याचबरोबर ड्रोन व्हिडीओग्राफीलाही सध्या प्रचंड मागणी आहे. ड्रोनमधल्या कॅमेरामधून लग्नासाठी केलेल्या डेकोरेशन्सचे आणि लग्नसमारंभाचे फार सुंदर आणि नयनरम्य  व्हिडीओ आणि स्टिल फोटो मिळतात. या गोष्टीसाठी क्रेनचाही वापर केला जातो. पण क्रेनच्या वापरासाठी खूप मर्यादा येतात आणि अर्थातच खर्च वाढतो.

लग्न म्हणजे घरातील लहानथोर सगळ्यांचीच धावपळ, भावंडांचं प्रेम, मित्रमंडळींची थट्टा मस्करी, छोटय़ा मुलांची लुडबुड, तर कधी मानपानावरून  झालेलं रागावणं आणि रुसणं हे सगळे क्षण टिपताना बनतो एक सुंदर वेडिंग अल्बम. इतक्या सगळ्या गोष्टींची तयारीही तशीच असते. हल्ली नुसत्या मुलीच नव्हे तर मुलगेही नीट तयार होण्यावर लक्ष देतात.

भारतीय लोकांवर चित्रपटांचा प्रभाव खूप जास्त आहेच. त्यामुळे चित्रपटांमध्ये दाखवल्याप्रमाणे भरजरी आणि एकमेकांच्या कपडय़ांना मॅच होणारे कपडे घालणं, सजावट, डान्स परफॉर्मन्स हे सगळं आलंच. हल्ली लग्नामध्ये सेलिब्रिटीजला निमंत्रित करायचा ट्रेण्डही आहे. अर्थातच हे सगळं फार खर्चीक असतं. पण हौसेला मोल नसतं! आणि या सगळ्या गोष्टी शूट करण्यासाठी तशाच इक्विपमेंट्सची गरज असते. प्रोफेशनल कॅमेरा, ड्रोन कॅमेरा, लेन्सेस, लाइट्स, प्रोजेक्टर्स या भारी लवाजम्याचा खर्चही तसाच असतो. पण एका परफेक्ट वेडिंग शूटसाठी हे गरजेचं असतं.

बॉलीवूडच्या इम्पॅक्टमुळेच लोकप्रिय होणारा प्रकार म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग. रोजच्या धकाधकीच्या वातावरणापासून दूर, एखाद्या सुंदर ठिकाणी हा संपूर्ण लग्न सोहळा अरेंज केलेला असतो. अशा वेडिंग्जमध्ये पाहुण्यांची संख्या त्या मानाने मर्यादित असते. नयनरम्य लोकेशन्समुळे डेस्टिनेशन वेडिंग्ज ही वेडिंग फोटोग्राफर्ससाठी एक पर्वणीच असते.

या सगळ्या गोष्टींमुळे वेडिंग फोटोग्राफीचे बजेट हा एक महत्त्वाचा भाग झालाय. क्लाएण्ट्सच्या मागण्यांवर तो अवलंबून असतो. लग्नाची पद्धत, लग्नाचे ठिकाण यावरही ते अवलंबून असते. लग्नाची पद्धत  म्हणजे आपल्या महाराष्ट्रीय, पंजाबी, दक्षिण आणि उत्तर भारतीय लग्नाच्या पद्धतींमध्ये खूप मोठा फरक असतो. लग्नााठी लागणारा कालावधीही वेगळा असतो. महाराष्ट्रीय लग्न हा शक्यतो एकाच दिवसाचा इव्हेंट असतो, तर उत्तर भारतात हे लग्नविधी ३ ते ४ दिवस चालतात.

वेडिंग आल्बममध्येही खूप विविध प्रकारचे अल्बम्स बनतात. करिझ्मा, फोटोबुक, कॉफी टेबल, ऑफसेट, कॅन्वेरा वगैर प्रकार प्रचलित आहेत. या सगळ्या गोष्टींवर वेडिंग फोटोग्राफीचं बजेट अवलंबून असतं. थाटामाटाच्या वेडिंग फोटोग्राफीचं बजेट ५० हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत असू शकतं.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 4:22 am

Web Title: article on wedding season
Next Stories
1 खाबूगिरी : तर्रीबाज मिसळ!
2 पारंपरिक वस्त्रांचा आधुनिक साज
3 पैठणीची शान
Just Now!
X