च्या नेपथ्य, कलादिग्दर्शन, सुलेखन, मूर्तिकार, चित्रकार आदी कलागुणांचा आविष्कार वेळोवेळो होतो. त्याचे रंग, रेषा आणि त्याचं काम फार बोलकं आहे. सध्या त्याचं ‘वर खाली दोन पाय’ हे नाटक रंगभूमीवर गाजतं आहे. हा ‘कल्ला’कार आहे नेपथ्यकार सचिन गोताड.

नाटय़गृहात तिसरी घंटा होते. मखमली पडद्याआडची लगबग शांत होते. निवेदन सुरू होतं की, ‘रंगमंच आणि नाटय़देवतेला विनम्र अभिवादन करून अमुक नाटक सादर करत आहोत..’ मग वाचली जाते नाटकाच्या टीमची श्रेयनामावली. त्यात एक नाव असतं ‘नेपथ्य – सचिन गोताड.’ निवेदन संपून पडदा उघडल्यावर जाणवतं ते नेपथ्यकाराचं अस्तित्व. अर्थात त्यानं उभारलेलं नेपथ्य. नंतर रंगत वाढते ती अभिनय, पाश्र्वसंगीत, प्रकाशयोजना, वेशभूषा आदी घटकांनी. अर्थात या साऱ्या कला एकमेकींत नीट सामावल्या गेल्या की नाटक उभं राहतं, असं म्हणतात.

सचिनला वडिलांकडून कलेचा वारसा मिळाला. त्याने ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’च्या रंगमंचावर बालकलाकार म्हणून काम केलं. दहावीनंतर कलेची गोडी वाटू लागली. वडाळ्याच्या ‘आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स’मध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयातल्या रांगोळी स्पर्धेत तो सहभागी व्हायचा. त्या वेळी किशोर चौघुले यांनी घेतलेल्या ऑडिशनमध्ये त्याची निवड झाली नाही, पण त्यांना त्याची चित्रकला चांगली आहे हे माहीत होतं. त्यांनी त्याला ‘सेटचं ड्रॉइंग करशील का?’, असं विचारलं. ते त्यानं करून दिलं. याच काळात ‘अल्फा टीव्ही मराठी’ने (आता ‘झी मराठी’) एकांकिका स्पर्धा सुरू केल्या होत्या, ‘अल्फा महाकरंडक’. त्यात ‘मंथरमाया’ या  एकांकिकेसाठी सचिनला पारितोषिक मिळालं. त्यानंतर ‘सवाई’मध्येही पारितोषिकं मिळाली. सचिनला हे एका परीनं प्रोत्साहन मिळालं आणि याच क्षेत्रात करिअर करायचा निर्णय त्याने घेतला.

चौदावीनंतर त्याने ‘रहेजा स्कूल ऑफ वांद्रा’ला प्रवेश घेतला. अभ्यास करता करता नाटकाची कामं करू लागला. पुढे राम दौंड यांच्याशी ओळख होऊन मुंबई महानगरपालिकेच्या नाटकाची कामं मिळायला लागली. सचिन सांगतो की, अभ्यास आणि काम ही तारेवरची कसरत होती. दांडय़ा फार व्हायच्या. आंबेडकर कॉलेजमध्ये असताना विविध स्पर्धासाठी मी कॉलेजतर्फे जात असल्याने हजेरीत थोडी सवलत मिळायची. रहेजामधल्या असाइनमेंट्स मित्र आणि प्राध्यापकांच्या मदतीमुळे पूर्ण झाल्या. ‘या क्षेत्रात यायचं तर वाचन आणि निरीक्षण फार महत्त्वाचं ठरतं. चित्त शांत ठेवावं लागतं. कारण ढीगभर अडीअडचणींचे डोंगर पार करायचे असतात. रहेजातल्या कलाशिक्षणामुळे सेट डिझाइिनग करताना बॅलिन्सग पॉइंट, रंगसंगती कळली. कामात अधिक सफाईदारपणा आला. हात साफ झाला. डिटेिलग कळलं. इतरांची कामं पाहायला मिळाली. मान्यवरांचं मार्गदर्शनही मिळाल,ं’ असंही त्याने सांगितलं.

पहिला ब्रेक मिळाला तो किशोर चौघुले यांच्या ‘यडुकेशन’ या नाटकात. त्यांच्या इतर नाटकांसाठीही त्यानं काम केलं. नेपथ्यामागचा विचार सांगताना सचिन म्हणतो की, ‘संहिता-पटकथा हातात आल्यावर मी सखोल वाचन करतो. त्यातले विविध पलू लक्षात घेतो. कथेचा गाभा न हलवता तिला साजेसं डिझाइन तयार केलं जातं. नाटक आणि चित्रपटाच्या नेपथ्यात वेगवेगळ्या गोष्टी ध्यानी ठेवाव्या लागतात. नाटकाच्या प्रयोगासाठी रोज मांडाव्या लागणाऱ्या सेटचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो. प्रेक्षकांची नजर रंगमंचभर फिरती असते. घडतं ते त्यांच्या डोळ्यांसमोर घडतं.’ जितका प्रेक्षकांचा तितकाच कलाकारांचाही विचार करायचा असतो. त्यात वावरताना अडथळा नको, अतिरिक्त सामान नको, आदी मुद्दय़ांचा विचार करावा लागतो. चित्रपटात तसं नसतं. तिथे फ्रेम भरण्यासाठी गरजेच्या नसणाऱ्या गोष्टींचाही भरणा करावा लागतो. त्यामुळे चित्रपटापेक्षा नाटकासाठी नेपथ्य करणं अधिक भावतं, असं सांगणारा सचिन नाटकासाठी शांतपणे विचारपूर्वक काम केलं जातं आणि तिथे प्रेक्षकांचा शाबासकीची थाप त्वरित मिळते. चित्रपटांतलं कलादिग्दर्शन मात्र अनेकांच्या खिजगणतीतही नसतं. मग अभिप्रायाची गोष्ट अधिक लांबते, अशी खंतही व्यक्त करतो.

त्याच्या ‘वर खाली दोन पाय’ या नाटकात सुयोग भोसले आणि सचिनने नेपथ्यात प्रतीकात्मक लैंगिकतेचं सूचन केलं आहे. मेंदूशी संलग्न योनीसदृश दरवाजा, गांधी टोपी, जुनाट टेलिफोन आदी प्रॉपर्टीच्या उपयोजनेतून प्रयोगाला वेगळं परिमाण दिलं आहे. या नाटकाच्या प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आले तर त्यांच्याकडून दाद मिळेल, अशी सचिनची अपेक्षा आहे. त्याच्या नेपथ्याला अनेक मान्यवरांची दाद मिळाली आहे. संभाजी भगतांची ‘येडुकेशन’ आणि ‘शाहिरी जलसा’च्या सेटसाठी, किशोर चौघुलेंची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या सेटला, सचिन पिळगावकरांची ‘येडुकेशन’चा सेट आणि सतीश तारेंना ‘अडगळ’चा सेट खूप आवडला होता. सचिन सांगतो की, ‘मला सतीश तारे यांच्यासोबत काम करायचं होतं. कामाच्याबाबतीत ते खूप मस्त माणूस. त्यांच्या निधनामुळं ते राहिलं.. योगायोग म्हणा किंवा काही.. त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टवर सध्या काम करतोय. ‘लेस्बियन’ या संतोष वाझे यांच्या नाटकावर काम सुरू आहे. एका चित्रपटाविषयीची बोलणी सुरू आहेत. यंदाही कागदी गणपती करायचा विचार चालू आहे,’ सहज म्हणून या गोष्टी सांगणारा सचिन तो एकाच वेळी या कलेची किती वेगवेगळी रूपं हाताळतोय याची जाणीव करून देतो.

व्यावसायिक नाटकांबरोबरच प्रायोगिक नाटकांसाठीही काम करणारा सचिन प्रायोगिक नाटक हे थोडं प्रतीकात्मक असल्याचं स्पष्ट करतो. ‘म्हणजे खरं तर प्रतीकात्मक असायचं असं म्हणावं लागेल.. कारण अलीकडे एकांकिका अधिक जोरदारपणे होऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवीन काही तरी हवं असतं. गोष्टी अवाढव्य करायचा जणू ट्रेण्डच आला आहे. नाटकात फार जीव असो-नसो, पण सेट भव्यदिव्य लागला पाहिजे, ही वृत्ती खटकते. पहिल्यासारखी प्रतीकात्मकतेची मजा प्रायोगिक नाटकात राहिलेली नाही, असं तो म्हणतो. एके काळी टॅक्सीतून आणले जाणारे सेट आता टेम्पो भरून आणावे लागतात. महाविद्यालयासह निर्मात्यांचं आíथक बळ त्यांना लाभतं. इंडस्ट्रीतल्या अनेकांचं लक्ष एकांकिकांवर असतं. पण त्या अवाढव्यपणात एकांकिकेची मजा जाते. खूप मॉब वापरायचं फॅडही निघालं आहे. ब्लॅक आऊटमध्ये इन-आऊट करताना होणारा आवाज खटकतोच. प्रतीकात्मकता लुप्त होताना दिसतेय. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला वेळीच खतपाणी घालायला हवं, असा आग्रही मुद्दा तो मांडतो.

तो रांगोळी स्पर्धा, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या सजावटीसाठी परीक्षक म्हणून जातो. मूकबधिर आणि कर्णबधिर मुलांसह सामान्य मुलांच्या नेपथ्याच्या कार्यशाळा घेतो. लहान मुलांसाठी मातीच्या गणेशमूर्तीची कार्यशाळा घेतो. ज्येष्ठ नेपथ्यकार प्रकाश मयेकरांचं काम त्याला भावतं. ज्येष्ठ नेपथ्यकार अंकुश कांबळी आणि ज्येष्ठ नेपथ्यकार अशोक पालेकर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभतं. ‘मंथरमाया’च्या वेळची आठवण तो सांगतो, तेव्हा पशांची खूप चणचण होती. प्रत्येकाच्या खिशातले पसे खर्च व्हायचे. मीही रात्री जागून पसे जमवण्यासाठी भित्तिचित्रांच्या जाहिराती रंगवल्या होत्या. एकांकिकेच्या प्रॉपर्टीसाठी लागणाऱ्या प्लायसाठी घराशेजारच्या केबिनचं प्लाय काढण्याची करामत केली, खाडीत वाहून आलेले ओंडके शोधून काढले होते.

अनेक इव्हेंट्सच्या कलादिग्दर्शनातून आणि पोर्ट्ेट पेंटिंग, नेमप्लेट, कॅनव्हास पेंटिंग, पोस्टर डिझाइन आदी गोष्टींमधून त्याच्या कलेचा प्रत्यय येतो. शालेय चित्रकला परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी भारत गीते यांच्याकडं तो जात होता. तिथे त्याला सुलेखनाची गोडी लागली. कॉलेजमध्ये छायाचित्र विषय घेतला, पण छायाचित्र काढायला वेळ न मिळाल्याने असाइनमेंट राहायच्या. मग त्याऐवजी सचिननं ग्राफिक डिझाइिनग घेतलं. तो सांगतो की बॅनर रंगवणं, भित्तिचित्र काढण्यामुळं लेखनाची सवय होतीच. त्यामुळं असाइनमेंट पूर्ण व्हायच्या. त्यानं नाटक-चित्रपट, इव्हेंटसाठी सुलेखन केलं. चित्रपटांपकी ‘चल धर पकड’चं त्याने केलेलं लेटिरग अनेकांना भावलं. त्याच्या कॅलिग्राफी टी-शर्ट्सनाही चांगला प्रतिसाद मिळाला.

चित्रपटासाठी काम करून श्रेयनामावलीत कलादिग्दर्शक म्हणून नाव न येणं आणि अपुऱ्या मानधनाचा अनुभवही सचिनच्या गाठीशी जमा आहे. त्या काळात त्याची परिस्थिती फारच हलाखीची झाली होती.. हातात उरलेल्या शेवटच्या बंद्या रुपयानं पीसीओवरून मित्राला फोन केला. मग विजय निकमांमुळे ‘चिअर्स मराठे’ या चित्रपटाचं काम मिळालं. परिस्थिती सावरायला आíथक बळ मिळालं.. नंतर ‘लाडू घ्या लाडू’ या चित्रपटाचंही काम केलं. मध्यंतरी गोव्यातील ‘झेडबीआर रिसॉर्ट’चं डिझाइन त्यानं केलं. ही मूळची कल्पना प्रकाशयोजनाकार भूषण देसाई यांची. त्यांचं स्वप्नं होतं गोव्यात एक हॉटेल असावं. त्याचं डिझाइन करताना प्रत्येक गोष्ट इंचाइंचांचा हिशेबात बसवली. यासाठी ‘बाहुबली’च्या सेट टीमच्या मदतीने आणि मेहनतीने हे काम पूर्ण केल्याचं त्याने सांगितलं.

सचिनला ‘झी मराठी’चं नामांकन मिळालं होतं ‘अडगळ’ नाटकासाठी. ‘सवाई’, ‘मृगजळ’, ‘आयएनटी’, ‘उंबरठा’, ‘रंगायतन’ आदी एकांकिका स्पर्धात विविध पारितोषिकं मिळाली आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सलग तीन नाटय़स्पर्धात पारितोषिक मिळालंय. त्याला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासोबत काम करायचं आहे. किशोर चौघुले दिग्दर्शक असणाऱ्या चित्रपटासाठी काम करायचं आहे. नवनवीन नेपथ्य कल्पना सुचण्यासाठी आणि कलेच्या विविध माध्यमांत सर्जनशील कामाची अधिक संधी मिळण्यासाठी सचिनला रंगमयी शुभेच्छा!

व्यावसायिक नाटकांबरोबरच प्रायोगिक नाटकांसाठीही काम करणारा सचिन प्रायोगिक नाटक हे थोडं प्रतीकात्मक असल्याचं स्पष्ट करतो. ‘म्हणजे खरं तर प्रतीकात्मक असायचं असं म्हणावं लागेल.. कारण अलीकडे एकांकिका अधिक जोरदारपणे होऊ लागल्या आहेत. विद्यार्थ्यांना नवीन काही तरी हवं असतं. गोष्टी अवाढव्य करायचा जणू ट्रेण्डच आला आहे. नाटकात फार जीव असो-नसो, पण सेट भव्यदिव्य लागला पाहिजे, ही वृत्ती खटकते.