शलाका मोगरे-मोदी, पॅरिस, फ्रान्स

पॅरिसमध्ये इतिहासाच्या खुणा जागोजागी उमटलेल्या दिसतात. इथे खूप छोटय़ा छोटय़ा गल्लय़ा आहेत. कुठल्याही गल्लीत शिरल्यावर दर दोन-चार इमारतींपलीकडे फलक लावलेले दिसतात. त्यावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं, त्यांची महती थोडक्यात लिहिलेली असते. काही वेळा चालता चालता अनेकदा अनपेक्षितपणे काही गोष्टी आपल्यासमोर येऊन सुखद धक्का बसतो. ढीगभर पुस्तकं वाचून मिळणार नाही, अशी माहिती इथल्या परिसरात फिरल्यावर मिळू शकते.

पॅरिस म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहातं ते कधी न झोपणारं शहर. फुल ऑफ लाइफ अँण्ड लाइट. kjoie de vivre या फ्रेंच संकल्पनेचा अर्थ सांगायचा तर आयुष्य हे उत्फुल्ल आणि आनंददायी असलं पाहिजे आणि हाच दृष्टिकोन इथल्या मंडळींनी अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला आहे. भोवताली कितीही उलथापालथ झाली तरी आपलं हे ब्रीद आणि जगण्याची असोशी त्यांनी सोडलेली नाही. पॅरिसमध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा खूपच धक्का बसला होता. भीती वाटलेली सगळ्यांना.. पॅरिसमधील कॅ फे, कॉन्सर्ट हॉल आणि नॅशनल स्टेडियमसह हल्ले झाल्यावर ते दोन दिवस सगळे कॅ फेज आणि रेस्तराँ बंद होते. नंतर मात्र ‘आम्ही हे ऐकून घेणार नाही’, अशी जणू मनाशी खूणगाठ बांधत सगळेजण आपापल्या कामकाजाला लागले होते. हा हल्ला झाला त्या ठिकाणी दरवर्षी आवर्जून श्रद्धांजली वाहिली जाते. या हल्लय़ांआधी, तीन वर्षांपूर्वी ‘चार्ली हेब्दो’ या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्या स्मृतीही अजून जागवल्या जातात आणि त्या हल्लय़ाला तोंड देऊन ठामपणं उभं राहिलेलं ‘चार्ली हेब्दो’ आजच्या घडीलाही सुरू आहे.

पॅरिसमध्ये इतिहासाच्या खुणा जागोजागी उमटलेल्या दिसतात. इथे खूप छोटय़ा छोटय़ा गल्लय़ा आहेत. कुठल्याही गल्लीत शिरल्यावर दर दोन-चार इमारतींपलीकडे फलक लावलेले दिसतात. त्यावर अनेक प्रसिद्ध व्यक्तींची नावं, त्यांची महती थोडक्यात लिहिलेली असते. काही वेळा चालता चालता अनेकदा अनपेक्षितपणे काही गोष्टी आपल्यासमोर येऊन सुखद धक्का बसतो. ढीगभर पुस्तकं वाचून मिळणार नाही, अशी माहिती इथल्या परिसरात फिरल्यावर मिळू शकते. पॅरिसमध्ये आल्यावर मी महायुद्धाबद्दल एक पुस्तक वाचलं होतं. या पुस्तकातला संदर्भ कधीतरी प्रत्यक्ष जीवनात इमारतीच्या रूपाने उभा ठाकेल असं वाटलंही नव्हतं.. एकदा चालताना एका इमारतीच्या समोर आल्यावर फलक दिसला की, इथे नाझी सैन्याचं मुख्यालय होतं.. ते ठिकाण अगदी माझ्या घराजवळ होतं आणि मला माहितीही नव्हतं. असे आवाक होण्याचे क्षण अधूनमधून येतात. कधी कधी वाचलेले प्रसंग एखादं ठिकाण समोर दिसल्यावर चटकन आठवतात. आमच्या घराजवळची ‘निकोला फ्लामेल’ ही १४०७ मधली इमारत अद्यापही जशीच्या तशी उभी आहे.

पॅरिस हे कलेचं माहेरघर मानलं जातं. इथे मुलांची लहनपणापासून वस्तुसंग्रहालयामध्ये शैक्षणिक-अभ्याससहल नेली जाते. त्यांना कलेची गोडी लागण्याकडे लक्ष पुरवलं जातं. उदाहरणार्थ – लुव्रमध्ये त्यांना चित्रकलेविषयी शिकवलं जातं. कलासंस्कृतीविषयीची जाणीव त्यांच्यात रुजवली जाते. त्यामुळं त्यांना कलेविषयी माहिती मिळते. महाविद्यालयात त्यांच्या आवडत्या कलाप्रकाराचा अभ्यास करून प्रकल्प सादर करायचा असतो. कलेला प्रोत्साहन देण्यासाठी इथल्या प्रशासनाने पॅरिसमध्ये राहणाऱ्या तरुणाईसाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘पॅरिस इन कार्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. ४-५ वर्षांपासून ते १५-१६ वर्षांपर्यंतच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या या कार्डमुळे विविध कलाप्रदर्शनांच्या शुल्कात सवलत मिळते. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्य खूप आहे. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांनाही मतस्वातंत्र्य आहे आणि ते आपापली मतं मांडत असतात. मुळात फ्रेंच लोकांना आपली मतं मांडणं, न पटलेल्या एखाद्या गोष्टीचा निषेध करणं हे अतिशय प्रिय आहे. ते त्यांच्या संस्कृतीचा जणू एक भागच आहे. बहुतांशी हा विरोध शांततापूर्ण मार्गाने केला जातो. ते बाळकडू विद्यार्थ्यांना आपोआपच मिळतं. एरवी कलात्मक ग्राफिटी खूप केली जाते. सध्या तरुणाईच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी इमारतींच्या भिंतींवर मोझॅक आर्टवर्क केलं जातं आहे.

फॅशन ही इथल्या संस्कृतीतला अविभाज्य भाग आहे. लोक फिटनेसविषयी जागरूक आहेत. मूळचे फ्रेंच लोक अजिबात जाडे दिसणार नाहीत. लहानपणापासूनच त्यांच्या खाण्याच्या वेळा पक्क्य़ा ठरलेल्या असतात. भरपूर खात असले तरी ते बॅलन्स डाएट असतं. जेवणात चीज असतंच आणि ते खाऊन कोणी जाड होत नाही, कारण फिटनेसकडे त्यांचा कटाक्ष असतो. स्वत:ची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा जणू अलिखित नियम आहे. इथे विविध क्रीडा प्रकारांना खूप महत्त्व दिलं जातं. जवळपास सगळीच लहान मुलं आणि तरुण मंडळी किमान एखादा तरी खेळ खेळतातच. व्यायाम आणि फिटनेसखेरीज सोशलायजिंगसाठीही खेळ या माध्यमाचा वापर होतो. इनडोअर स्पोर्ट्स आणि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्सला अधिक प्राधान्य दिलं जातं. तरुणाईला फुटबॉलचं प्रचंड वेड आहे. हॉटेल्समध्ये तरुणाईचा वावर अधिकांशी असतो. कुठल्याही पिढीतल्या किंवा वयाच्या फ्रेंच माणसाचं सर्वाधिक प्रेम वाईन आणि चीजवर असतं. एप्रिल ते नोव्हेंबर अखेरीपर्यंत सीनच्या काठी बसून तरुणाई वाईन बॉटल आणि चीजसह तासन्तास गप्पांचे फड रंगवतात. कोणी नृत्य करतात, कोणी गाणी गातात. इथल्या लोकांना स्वत:चा ‘सेन्स ऑफ फॅशन’ असतो. मी अलीकडेच एका लेखात वाचलं की, अख्ख्या युरोपमध्ये फ्रेंच स्त्रियांची गणना स्टायलिश म्हणून केली जाते आणि विशेष सांगायची गोष्ट म्हणजे त्या सगळ्यात कमी खर्च कपडय़ांवर करतात.

फ्रेंच माणसं नारळासारखी आहेत. त्यांना ओळखायला भरपूर र्वष लागतात. एखाद्याशी ओळख असेल म्हणजे मैत्री होतेच असं नाही. तुम्हाला मनापासून आपलं मानतात, तेव्हाच ते तुमच्याशी दिलखुलास वागतात. प्रथमदर्शनी खडूस वाटले तरी ते खडूस नसतात. त्यांचं फ्रेंच भाषेवर अपार प्रेम आणि अभिमान आहे. आपण फ्रेंच बोलत असू किंवा त्या दिशेने थोडासा प्रयत्न करत असू तरी आपण संवादाची अर्धी लढाई जिंकलेलो असतो. हल्ली तरुणाई बऱ्यापैकी इंग्रजी बोलते आहे. या मुद्दय़ाची एक बाजू अशीही असावी की, त्यांना इंग्रजी येत नाही आणि त्या कारणामुळे ते संवादच टाळत असावेत.. यापैकी कारण काहीही असलं तरी मोकळेपणाने बोलायला-वागायला वेळ लागतो.

शहर अलीकडे पहिल्याइतकं स्वच्छ राहिलेलं नाही, ही खंत कुठेतरी वाटते. वाहतूकव्यवस्था चांगली आहे. खुद्द पॅरिसमध्ये राहाणाऱ्यांना स्वत:च्या गाडीची गरज वाटत नाही. मेट्रो आणि बसचं चांगलं जाळं विणलेलं आहे. रात्री-अपरात्रीही रस्त्यावर, मेट्रोमध्ये व्यवस्थित जाग असल्याने पुष्कळसं सुरक्षित वातावरण असतं. मात्र इथे पाकिटमारी खूप होते, विशेषत: पर्यटकांचं पाकीट अधिकांशी वेळा मारलं जातं. दहशतवादी हल्लय़ानंतर पोलीस बंदोबस्त अधिक वाढला आहे. सुरक्षाव्यवस्था कडक झाली आहे. एकीकडे एवढे पोलीस बघून कशाला हे सगळं? हा विचार मनात येऊ  शकतो तर दुसरीकडे मनातल्या मनात कुठेतरी सुरक्षित वाटत असतंच.

पदवी घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी मुलं बाहेर जातात आणि ती घराबाहेरच पडतात. पालकांसोबत कोणी राहात नाही. इथे आपल्यासारखी कुटुंबसंस्था नाही. पण ‘तुझी मुलं, माझी मुलं आणि आपली मुलं एकत्र असतात’, असं चित्र बरेचदा दिसतं. प्रत्येकाला निर्णयस्वातंत्र्य आहे. पॅरिसमध्ये राहाणाऱ्यांविषयी इतर ठिकाणच्या फ्रेंच लोकांना वाटतं की, पॅरिसमध्ये राहाणारे म्हणजे कटकटे, सतत तक्रारी करणारे वगैरे. मी मात्र अभिमानाने सांगते की, ‘‘हो, मी पॅरिसमध्ये राहाते.’’ पॅरिस म्हटल्यावर छोटी घरं, लिफ्टची सोय नसणं इत्यादी गोष्टी पॅरिसमधल्या राहण्यासोबत येतातच. इथे चार-पाच मजल्याच्या जुन्या इमारती असतात. नवीन इमारत बांधायची परवानगीच नाही. इमारतीचं बाह्यरूप आहे, तसंच ठेवावं लागतं आणि काही ठरावीक प्रमाणात आतल्या गोष्टी बदलता येऊ  शकतात. त्यामुळे पॅरिसचा लूक कायम एकच राहतो. त्याचमुळे की काय पॅरिसबाहेरच्यांचं म्हणणं असतं की, इथली घरं लहान असतात, महाग असतात, लिफ्टची धड सोय नसते आणि इथलं राहणीमान तुलनेने महाग आहे. प्रॉपर्टीची किंमत तर गगनाला भिडलेली असते. त्यामुळे लोक पॅरिसमध्ये राहाणं टाळतात किंवा नावं ठेवतात. पण पॅरिसमध्ये राहाण्यातली मजा इतर कुठेही नाही. सतत काही ना काही इव्हेंट, एक्झिबिशन्स चालूच असतात. शिवाय व्यक्तिगणिक अवलंबून असतं की, त्याला किंवा तिला कलेत कितपत रस आहे? पॅरिसच्या लाइफमध्ये किती इंटरेस्ट आहे.. मुंबईसारखं इथलं वातावरणही फुल्ल ऑफ लाइफ आहे. हे कलासक्त पॅरिस मला फारच आवडतं.

viva@expressindia.com