अश्विनी लेंभे

तरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..

आपण जसे निर्णय घेतो त्यावरून आपले आयुष्य घडवणे हे पूर्णपणे आपल्याच हातात असते. लेखक डॉ. राजेंद्र भारूड यांच्या ‘मी एक स्वप्न पाहिलं!’ या पुस्तकात हेच मांडले आहे जे वरील ओळीतून व्यक्त होते. लेखक गरीब घरातून आलेले, पुढे आयएएस झाले. त्यांनी त्यांच्या संघर्षांची कहाणी सांगताना सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजू मांडून सांगितली पण त्यात रंजकताही होती. खरं तर अशीच माणसं आयुष्याबद्दल भन्नाट गोष्टी सांगू शकतात. इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही परिस्थितीला न डगमगता, कोणत्याही समस्येला सामोरे जाण्याचे सामथ्र्य देणारा त्यांचा या ओळीतला मंत्र आजच्या दहावी-बारावीच्या छोटय़ाशा अपयशापुढे हतबल होणाऱ्या तरुणांनी वाचला पाहिजे. घरात अभ्यासाला वेगळी रूम नाही, चांगली पुस्तकं नाहीत, इंटरनेट नाही म्हणून ई-बुक्स नाहीत किंवा अभ्यासाला महागडे टॅब नाहीत या कारणांचा बाऊ  करत आपण रडत बसतो. आपली ही कारणं कशी क्षुल्लक आहेत याची जाणीव आपल्याला होतच नाही. ध्येयासाठी वेडे होऊन, झपाटून ध्येयाचा पाठलाग करणारे, जिद्द आणि चिकाटी मनात ठेवून ध्येयपूर्तीचा ध्यास घेणारे, परिस्थितीचे रडगाणे न गाता यशाचा इतिहास घडवणारे असे कित्येक तरुण आपण पाहिलेच नाही आहेत, त्यामुळे दहावी किंवा बारावीत यश मिळवायचे असेल तर तशा सुविधा हव्यातच असा आजच्या मुलांचा आग्रह असतो. आपण कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करण्याची आपली जिद्द आहे असं मनातल्या मनात घोळवत बसतो. मात्र तशी कृती करतो का? आपल्याला कुठला निर्णय घ्यायचा असल्यास आपण दहा लोकांना विचारतो, ही आपली निर्णय घेण्याची क्षमता आहे? इथेच आपण चुकतो.

आपले निर्णय ठामपणे घेऊन आपला मार्ग शोधलाच नाही तर आयुष्याला कशी दिशा मिळेल? मग सोयी नव्हत्या म्हणून अपयश आले अशी कारणं आपण पुढे करतो. आपले आयुष्य कसे घडते याचा धडा आपण घेत नाही. इतर माणसं तात्पुरते मार्गदर्शन करतील पण युक्ती नेहमी आपलीच असेल हे या ओळीतून भासते आणि या ओळीतून हेही समजते की काही माणसं आपल्याला शिकवतात, काही माणसं आपल्याला घडवतात, काही माणसं फक्त तात्पुरते तत्त्वज्ञान सांगून तेवढय़ापुरते समाधान देतात, पण त्यातून तुम्हाला काय मिळाले? किंवा मला काय मिळाले? हा विचार न करता यश मिळवण्यासाठी सोयीसुविधा, स्टेटस, पैसा काही लागत नाही. युक्तीने कठोर परिश्रम करण्याची तयारीच यशासाठी आवश्यक असते हे आजच्या तरुणांनी स्वीकारायला हवे.

viva@expressindia.com