14 December 2017

News Flash

कल्लाकार : स्वरातिंद्र

अतिंद्रने किराणा घराण्यावर पीएचडी केली आहे.

मितेश जोशी | Updated: October 13, 2017 12:37 AM

डॉ. अतिंद्र सरवडीकर

संगीतक्षेत्राविषयी अमाप प्रेम, संगीत साधनेसाठी अपार मेहनत, संगीत प्रसाराची जिद्द अशी विलक्षण संगीताची ओढ असलेला आजचा अष्टपैलू कल्लाकार आहे डॉ. अतिंद्र सरवडीकर. प्रतिभावान गायक, संगीत रचनाकार, विद्यावाचस्पती, रसगंधर्व असा बहुमान मिळवणारा अतिंद्र म्हणूनच फक्त गायक नाही तर अष्टपैलू कलाकार आहे.

अतिंद्र मूळचा सोलापूरचा. त्याचं महाविद्यालयीन शिक्षण सोलापूरमध्येच झालं. आई वृंदा सरवडीकर या संगीत शिक्षिका होत्या. त्यांनी अतिंद्रवर वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच शास्त्रीय संगीताचे संस्कार करण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण सांभाळत अतिंद्रने पुढे दत्तूसिंह गहेरवार यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याची कडक तालीम घेतली. शालेय शिक्षण घेत असतानाच त्याने तबला व संगीतातविशारदसारख्या पदव्या प्राप्त केल्या. संगीत हा जणू त्याचा श्वास बनला आणि पुढची कारकीर्द संगीतात करायचा निर्धार त्याने केला.. पुढची खडतर वाट चालायला तो सज्ज झाला..

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे हे भारतीय संगीतातलं जणू कैलास लेणं! बालवयापासूनच अतिंद्र त्यांचं गाणं ऐकत असे. ते गाणं म्हणजे म्हणजे बुद्धीला आवाहन आणि भावना यांचा समतोल! प्रभाताईंकडे शिकायचं स्वप्न घेऊन अतिंद्र मुंबईमध्ये आला.. आधीची कसलीही ओळख नसताना, प्रभाताईंच्या एका मैफलीनंतर त्यांची भेट घेऊन गाणं शिकवण्याची विनंती त्याने केली. एक लहान मुलगा सोलापूरहून गाणं ऐकायला मुंबईत येतो, शिकायचं म्हणतोय याचं प्रभाताईंना कौतुक वाटलं आणि त्यांनी शिकवायचं मान्य केलं! प्रभाताईंकडे तालीम घ्यायला अतिंद्र दर शनिवार-रविवारी, सुट्टीत मुंबईला येऊ  लागला. प्रभाताईंची कलाकुसरीची, बुद्धीची परीक्षा घेणारी गायकी गळ्यावर चढवण्यासाठी त्याला अपार मेहनत घ्यावी लागली. एके दिवशी बिहाग रागाचा रियाज चालू होता. मी वरचा ‘सा’ लावून एक छोटी तान घेऊन परत ‘सा’ लावला. त्यावर प्रभाताईंनी बहुतेक सर्व गायक याच पद्धतीने ‘सा’ लावतात. तू तसा लावू नकोस. तुझी पद्धत वेगळीच असू दे, असा सल्ला दिला. या छोटय़ा प्रसंगातून ‘स्वतंत्र विचार व नित्य नूतनता’ हा त्यांनी दिलेला कानमंत्र आजही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करतो आहे, असं अतिंद्र सांगतो.

‘सवाई गंधर्व महोत्सव’ म्हणजे रसिक व कलाकारांचा कुंभमेळाच! या महोत्सवाची सांगता करण्याचा मान किराणा घराण्याचे अध्वर्यू पंडित भीमसेन जोशी यांच्या पश्चात डॉ. प्रभा अत्रेंना मिळाला. या महोत्सवात प्रभाताईंना गेली अनेक र्वष साथसंगत करण्याचं भाग्य अतिंद्रला लाभलंय. संगीतासाठी साधना कशी असते, याची प्रचीती गुरूच्या सहवासात पदोपदी अनुभवाला येत असल्याचे त्याने सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने संगीतात मास्टर करण्यासाठी मुंबईतच निवास केला. तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला संगीतक्षेत्रातील नवी क्षितिजं खुणावू लागली. नवे अनुभव गाठीस आले. संगीतात एमए करताना विद्यापीठात सर्वप्रथम स्थान मिळवण्याचा बहुमान त्याने मिळवला आहे. ‘मंचप्रस्तुती’मधील उत्तम प्रावीण्याबरोबरच त्याला संगीतात पीएचडीसाठी संशोधन करायची इच्छा होती. पण मुंबई विद्यापीठ संगीतासाठी पीएचडी देत नाही, हे त्याच्या लक्षात आलं. ही स्थिती बदलण्याचा विडा अतिंद्रने उचलला. अनेक पत्रव्यवहार करून, अनेक पदाधिकाऱ्यांना भेटून त्याने मुंबई विद्यापीठात संगीत विषयासाठी पीएचडी मिळावी म्हणून प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मुंबई विद्यापीठाने संगीत विषयाला देखील पीएचडी देण्यास सुरुवात केली. संगीत विषयात मुंबई विद्यापीठातून पीएचडी झालेला पहिला विद्यार्थी हा महत्त्वपूर्ण बहुमानही त्यालाच मिळाला आहे.

अतिंद्रने किराणा घराण्यावर पीएचडी केली आहे. किराणा घराण्यात अनेक महान गायक होऊन गेले, परंतु या घराण्यातील गायन पद्धतीवर फारसे लिखाण उपलब्ध नसल्यामुळे त्याने संशोधनास सुरुवात केली. किराणा हे कुरुक्षेत्राजवळ वसलेलं एक छोटंसं गाव आहे. आज या गावात किराणा घराण्याचे वंशज राहात नाहीत. ते सध्या इतरत्र निवास करतात. मुंबई विद्यापीठाच्या डॉ. मनीषा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिंद्रने ‘किराणा घराण्यातील बदलत्या प्रवाहांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर ५७५ पानांचा प्रबंध लिहिला आहे. हा प्रबंध लिहिण्यासाठी त्याला साडेचार वर्षे मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी अतिंद्रने डॉ. अश्विनी देशपांडे, डॉ. राम देशपांडे, श्रीनिवास जोशी, शाश्वती मंडल, सुलभा ठकार यांसारख्या अनेक नामवंत गायकांशी चर्चा केली. अनेक जुन्या रेकॉर्डिगचा संग्रह केला, अभ्यास केला. किराणा घराण्याच्या पाकिस्तानस्थित गायिका रोशनारा बेगम तसेच भीमसेन जोशी हे ‘तान’ या प्रकारासाठी विशेष लोकप्रिय होते. या तानांचे वैशिष्टय़ जाणून घेण्यासाठी त्याने त्यांची अनेक जुन्या व दुर्मीळ रेकॉर्डिग्ज मिळवल्या. त्या ऐकल्या व त्या तानांचे नोटेशन काढले. ‘हिगारंग’ आणि ‘सबरस’ या किराणा घराण्यातील पारंपरिक रचनांच्या बंदिशी आज लुप्त आहेत. जुन्या रेकॉर्डिगमधून अतिंद्रने या बंदिशींना पुनर्जन्म दिला आहे. त्याचप्रमाणे किराणा घराण्यातील गायकी लोकप्रिय का झाली, याचे विवेचनही अतिंद्रने प्रबंधामध्ये शब्दबद्ध केले आहे. साडेचार वर्षांची त्याची मेहनत अखेर फळाला आली. प्रबंध लिहून पूर्ण झाल्यावर त्याने तो प्रबंध सर्वप्रथम मिरज येथील अब्दुल करीम खान यांच्या समाधीवर ठेवला. ‘तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा व रोमांचकारी होता,’ असे तो म्हणतो.

अतिंद्रला भारत सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाची विशेष गुणवत्ता राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. तसेच पंडित भीमसेन जोशी शिष्यवृत्ती व दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची शिष्यवृत्ती दोनदा मिळाली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य युवा कर्तृत्व गौरव पुरस्कार, पद्मश्री द. रा. बेंद्रे पुरस्कार, जालन्याचा कलासाधना पुरस्कार यांसारखे अनेक राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पुरस्कार त्याला मिळाले आहेत. अतिंद्रची शास्त्रीय व सुगम संगीताची अनेक व्यावसायिक ध्वनिमुद्रणेही प्रसिद्ध आहेत. मराठी, हिंदी बरोबरच तमिळ भाषेत अनेक अल्बम्स, त्याचबरोबर मालिका, म्युझिक व्हिडीओ व चित्रपटांसाठी त्याने गायन केले आहे. अनेक नामांकित वृत्तपत्रांमधून शास्त्रीय संगीतावर लेखन केले आहे. तसेच त्याच्या प्रबंधावर ‘किराणा घराणे : परंपरा आणि प्रवाह’ या नावाचे त्याचे पुस्तकदेखील प्रकाशित झाले आहे.

सध्या तो देशभर शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम करतो. त्याने स्वत:च्या घरीच शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले आहेत. पाच वर्षांच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत अनेक जण त्याच्याकडे गाण्याची तालीम घेतात. संपूर्ण महाराष्ट्रातून व महाराष्ट्राच्या बाहेरून मुलं संगीत अध्ययनासाठी त्याच्याकडे येतात. रियाजाच्या बाबतीत मात्र अतिंद्र कमालीचा आग्रही आहे. पहाटे पाचपासून त्याच्याकडे मुले रियाजासाठी येतात. ‘संगीतात वैचारिक रियाज होणेदेखील गरजेचे आहे. चिंतन व साधना या दोन गोष्टींनी आपण संगीतरूपी भवसागर तरू शकतो,’ हा कानमंत्र अतिंद्र मुलांनाही देतो.

संगीत हे क्षेत्र केवळ ग्लॅमर मिळवून देणारे नसून त्याने तुम्हाला आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो, असं त्याचं स्पष्ट मत आहे. संगीत परंपरेच्या साखळीतील कडी होणं ही फार भाग्याची गोष्ट आहे असं मानणारा अतिंद्र स्वत: संगीत रचनाकार असून विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारी संगीत साधना कशी असावी याचे वर्णन करणारी रचनाही त्याने लिहिली आहे. ‘गीत व्हावे एक ऐसे अंतराला स्पर्शणारे, नाद बिंदू वेचताना अनंताशी पोचणारे’, अशा शब्दांत आपल्या रचनेतून त्याने संगीताप्रतिची आपली भावना उलगडून सांगितली आहे.

संगीत हा विषय दूरस्थ पद्धतीने कोणतेही विद्यापीठ शिकवत नाही, परंतु मुंबई विद्यापीठात हा दूरस्थ विभाग आपल्याला आढळून येतो. त्याची संपूर्ण देखभाल सध्या अतिंद्र करतो आहे. या दूरस्थ व ओपन लर्निग शिक्षण पद्धतीच्या संपूर्ण १४ अभ्यासक्रमांची आखणीही त्याने केली आहे. दूरच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शिक्षण व मार्गदर्शन कसे देता येईल याचा तो सध्या अभ्यास करतो आहे. संगीत रचनाकार, संगीत सभा (कट्टा) आयोजक, संगीत गुरू, लेखक, शास्त्रीय संगीत गायक, प्रबंधक, कवी, संगीत अभ्यासक्रम आयोजक अशा नानाविध भूमिका तत्त्वाने आणि तरीही लीलया पार पाडणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्याच्या पुढील वाटचालीसाठी ‘व्हिवा’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!

  • मी जेव्हा संगीतक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या नातेवाईकांनी व मित्रांनी नको करणारे सल्ले मला दिले होते. घाबरवलं होतं! पण आज हीच मंडळी जेव्हा माझी मैफिल ऐकून तृप्त  होतात. संगीत शिकण्याची व मीच शिकवण्याची इच्छा व्यक्त करतात. तेव्हा माझ्या आतल्या आवाजाशी मी प्रतारणा केली नाही याचं समाधान माझ्या मनाला सुखावून जातं.

viva@expressindia.com

First Published on October 13, 2017 12:37 am

Web Title: atindra sarvadikar classical singer