18 April 2019

News Flash

‘जग’ते रहो : चिनी भिंतीच्या पलीकडून..

माझ्या मते चिनी व्यक्ती ‘डाऊन टू अर्थ’ आणि पंक्च्युअल आहे.

अंकिता वालावलकर, चंगचाऊ , चीन 

चीन.. चिनी भाषा आणि बरंच काही.. मनाच्या कोपऱ्यात चीन वसलंच आहे. दहावीनंतर कॉमर्सला अ‍ॅडमिशन मिळवून मी ‘दालमिया लायन्स कॉलेज’मधून बारावी उत्तीर्ण झाले आणि ठरवलं की आता काहीतरी वेगळं करायचं. सगळ्यांचे तेरावीसाठी प्रवेश सुरू असतानाच मला पुढे काय करायचं, याचाच विचार करायचा होता. माझ्या हितचिंतकाच्या, माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मी ‘केईएस लॉ कॉलेज’मध्ये लॉच्या अभ्यासाची सुरुवात केली. मला कॉमर्सची आवड असल्यामुळे मी कंपनी सेक्रेटरीही करायचं ठरवलं. बहुतांशी वेळा चिनी भाषा कठीण समजली जात असल्यामुळे तिच्याविषयी अधिकच कुतूहल वाटल्याने आणि चीनशी आपले व्यापारी संबंध लक्षात घेऊ न त्या दृष्टीने विचार करून मी चिनी भाषेचा अभ्यासही सुरू केला.

२०१५मध्ये पहिल्या वर्षांत ‘लॉ’चं पहिलं वर्ष आणि ‘सीएस’चीही पहिली स्टेप द्यायची ठरवली. तसंच चीनमध्ये राहून आलेल्या एका भारतीय शिक्षिकेकडे चिनी भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली. २०१७पर्यंत चिनी भाषेच्या तीन परीक्षा पूर्ण केल्या. त्यानंतर एका चिनी शिक्षिकेकडे शिकायला सुरुवात केली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी चीनमध्ये चिनी भाषा शिक्षणाच्या शिष्यवृत्तींसाठी अर्ज करायला सुरुवात केली. भाषा शिकत असतानाच युनिव्हर्सिटीचे भाषा शिक्षणाचे कार्यक्रम व काऊ न्सिलेटने आयोजित केलेले कार्यक्रम यांना हजेरी लावली. याचा मला चांगलाच उपयोग झाला. सप्टेंबर २०१७मध्ये मला ‘कन्फ्युशिअस इन्स्टिटय़ूट’तर्फे (सीआयएस)तर्फे एका वर्षांची शिष्यवृत्ती जाहीर होऊ न माझ्या मुंबई ते चीन या प्रवासाची नांदी झाली. त्या सुमारास डोकलामविषयी वादविवाद चालू असल्यामुळे भोवतालच्यांच्या मनात काळजी व शंकेची पाल चुकचुकली होती. पण तिथे आम्हाला कोणताही त्रास झाला नाही.

आत्तापर्यंत ‘निवारा विद्यालय’, गोरेगाव ही मराठी शाळा, मग मुंबईत कॉलेज आणि अचानक दुसऱ्या देशात जाऊ न त्यांची भाषा जगभरातल्या इतर अनेक लोकांबरोबर शिकणं, हा अनुभव मोठा विलक्षण होता. मी हनान प्रांतातील ‘चंगचाऊ  युनिव्हर्सिटी’मध्ये शिकत होते. पहिल्यांदाच कुटुंबापासून आणि मित्रमंडळींपासून लांब जाणार याची काहीशी भीती मनात होती. मुंबईतून वर्षभरासाठी निवडली गेलेली मी एकटीच मुलगी होते. बाकी भारतातील इतर राज्यांमधून मुलं आली होती. आम्ही सगळे मिळून भारतीय आणि चिनी सण साजरे करायचो. मी भारतातील ‘अनाम प्रेम परिवारा’ची सदस्य आहे. वर्षभरातल्या विविध सणवाराच्या निमित्ताने आम्ही समाजासाठी अविरत काम करणाऱ्या व्यक्तींना उदाहरणार्थ – पोलिस, फायर ब्रिगेड, आर्मी, नर्स वगैरेंना गुलाबाचं फूल देऊ न धन्यवाद म्हणतो. हाच उपक्रम मी चीनमध्येही सुरू ठेवला तेव्हा त्यांनीही या चांगल्या कार्यक्रमाचं आणि भारतीय संस्कृतीचं खूप कौतुक केलं. चीनमधले ते पहिले दोन महिने फार कठीण वाटत होते. कारण भाषेवर तेवढी पकड नव्हती. शिवाय जेवण आणि विशेषत: वेळेतील फरकाची सवय नव्हती. चीन हा अडीच तास पुढे असल्याने सगळ्याच वेळा आणि सोयी बदलल्या. पण आता हळूहळू सवय होऊ  लागली आहे.

चीनच्या शिक्षण पद्धतीविषयी सांगायचं झालं तर आपण एखाद्या प्रदेशात जाऊ न तिथली भाषा शिकतो, तेव्हा ती लवकर शिकता येते. कारण आपल्याला भाषेच्या सोबत तिथलं वातावरण, सामाजिक – सांस्कृतिक पर्यावरणही लाभतं. उदाहरणच द्यायचं झालं तर वर्गात शिक्षक शिकवतातच, पण बाहेर बाजारहाट करताना किंवा कुठे फिरताना आपण तिथल्या स्थानिकांशी गप्पा मारतो. तेव्हा आपसूकच आपल्याला नवनवीन शब्द, रूढी, परंपरा यांचं उत्तम ज्ञान मिळतं. इथले शिक्षक प्रत्येक मुलाला त्याच्या क्षमता लक्षात घेऊ न प्रशिक्षित करतात. प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन मिळतं. मला कॅलिग्राफी कराटे, कुंगफू शिकायची संधी मिळाली.

इथे विद्यार्थ्यांपासून ते वयाच्या ६५- ७० वर्षांपर्यंत काम करणारे लोक आहेत. लोकांना कोणतंही काम करण्यात कमीपणा वाटत नाही. स्त्रियांना फार प्रोत्साहन दिलं जातं. अनेक स्त्रिया सार्वजनिक बस चालवताना दिसतात. गॅरेज किंवा आपल्याकडे एरवी फक्त पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या ठिकाणीही इथला माहिलावर्ग काम करतो. माझ्या मते चिनी व्यक्ती ‘डाऊन टू अर्थ’ आणि पंक्च्युअल आहे. त्यांचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. चीन देश सर्व सोयीसुविधांनी समृद्ध म्हणता येईल. या सोयी अप्रतिम आहेत. चंगचाऊ मध्ये फक्त १० रुपयांत संपूर्ण शहर सार्वजनिक बसने फिरता येत होतं. बुलेट ट्रेनचा प्रवास हा विमानाहून जलद सोयीचा (३०५ किमी स्पीड) आहे आणि सर्वजण लाभ घेऊ  शकतील असा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इकडच्या लोकांचा त्यांच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. ते ‘आपल्या भल्याचंच करतील’ असा त्यांचा समज आहे. रस्ते, घरांची बांधणी अगदी अप्रतिम आहे. तिथे भ्रष्ट्राचाराला थारा नाही. नागरिकांची शासकीय कामं वेळेवर होतात.

‘चिनी भाषा’ ही प्राचीन भाषा म्हणून ओळखली जाते. चिनी भाषेला ४००० वर्षांचा इतिहास आहे आणि आत्तापर्यंत ती उपयोगात असणारी भाषा आहे. भाषेत वर्णमाला नसली तरी लिपीचा समावेश केला जातो. भारताप्रमाणेच इथेही अनेक बोलीभाषा आहेत. पण राष्ट्रीय भाषा म्हणून ‘मँडेरिअन’ बोलली जाते. ‘मॅन’ हे सगळ्यात शेवटची संख्या असलेली जातीची माणसं आणि ‘डे’ म्हणजे खूप मोठा, ‘रन’ म्हणजे माणूस. माझा अभ्यासही ‘मँडेरिअन’चाच आहे. चिनी भाषा ही जगातील सर्वात कठीण मानली जाणारी भाषा आहे, तशीच ती सखोल आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही इतिहास दडलेला असतो. चिनी लिपी लिहिण्याची अशी कोणतीही पद्धत नाही. पूर्वी उभ्या मांडणीत लिहिली जाणारी लिपी सध्या डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. जगभरात प्रसिद्ध पावलेली ‘कॅलिग्राफी’ अर्थात सुलेखनाच्या कलेचं मूळ चीनमध्येच आहे. चीनचा पारंपरिक पोशाख हा राजाराणी वापरायचे. सध्याची तरुण पिढी त्याचा वापर लग्नविधी आणि फोटोशूटसाठीच करते.

चीनमध्ये ऐतिहासिक स्थळांना फार महत्त्व दिलं गेलं आहे. ‘ग्रेट वॉल ऑफ चायना’, ‘टेराकोटा वॉरिअर’ ही स्थळं अगदी बघण्यासारखी आहेत. सारा परिसर अतिशय सुंदर व स्वच्छ आहे. चीनमध्ये अजूनही एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात आहे. पार्क, झू, मैदानात लहान बाळं त्यांच्या आजी-आजोबांबरोबर येतात. तरुणाईला तंत्रज्ञानात रस असल्याने ते नवनवीन प्रॉडक्ट्स ट्राय करत असतात. फिटनेसच्या बाबतीत चायना फार प्रसिद्ध आहे. वेळेवर जेवण, हवं तितकंच खाणं आणि सतत गरम पाणी पिणं, सोबत योगासनं करणं, हाच त्यांच्या ‘फिटनेसचा फंडा’ असावा. चीनमध्ये बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम धर्माचे लोक आहेत. इथली मंदिरं व त्यांची बांधणी अगदी बघण्यासारखी असते. सगळ्याच क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. उदाहरणार्थ, पैशांचे बहुतांशी व्यवहार कॅ श वापरण्यापेक्षा ऑनलाइनच होतात. ते अधिक सोईस्कर ठरतं.

इथे प्रत्येकाला शिक्षण मिळतं आणि त्याप्रमाणे नोकरीही मिळते. या देशात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा चिनी असून इंग्रजीचा कमीत कमी वापर करणारा हा देश आहे. त्यामुळे इंग्रजी भाषा बोलू शकणारे किंवा शिकवणारे यांना इथे फार मागणी आहे. ‘चीन’ हा ‘जगातली सर्वात मोठी प्रॉडक्शन फॅक्टरी’ म्हणून ओळखला जाणारा देश असल्याने इथे रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. भारत हा चीनचा सगळ्यात जवळचा शेजारी मानला जातो. भारतातल्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला चिनी प्रॉडक्ट्स मिळतात. याचं कारण म्हणजे दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध आणि व्यापार आहे. त्यामुळे याही क्षेत्रात तरुणाईला अनेक संधी उपलब्ध आहेत.

चिनी माणसं जेवताना चॉपस्टिकचा उपयोग करतात. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे सूप, नूडल्स यांचा समावेश असतो. मोमोज किंवा शेजवान हे पदार्थ आपल्या सगळ्यांच्या आवडीचे. चीनमध्येही हे आवडीचे पदार्थ आहेत. नववर्षांला इथे घरोघरी वेगवेगळ्या प्रकार आणि चवींचे मोमोज तयार केले जातात आणि सहपरिवार खाल्ले जातात. इथल्या नववर्षांची सुरुवात फेब्रुवारीत होते आणि महिनाभर अधिकृत सुट्टी दिली जाते. चिनी लोक अगदी फ्रेण्डली आहेत. माझ्या काही चिनी मैत्रिणींसोबत नवीन वर्षांच्या सणानिमित्त मी त्यांच्या गावाला गेले होते. तिथल्या एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहायची संधीही मला मिळाली. चीनमधला माझा हा वर्षभराचा अनुभव अविस्मरणीय असा आहे. सध्या मी ‘लॉ’चं राहिलेलं शिक्षण पूर्ण करून पुढे चिनी भाषेचं अधिक ज्ञान घेणार आहे. कारण कोणतीही भाषा कधीच संपत नसते, उलट एखाद्याने ती शिकणं हाच तिचा श्रीगणेशा असतो..

संकलन- राधिका कुंटे viva@expressindia.com

First Published on August 24, 2018 1:11 am

Web Title: attractions in changchun china